05 April 2020

News Flash

वळणवाटा – गोष्ट ‘लुना’च्या जन्माची.. वाढीची..

‘‘अमेरिकेतील शिक्षण पूर्ण झालं आणि मला आव्हानात्मक कामगिरी करायला मिळाली ती पूर्णपणे भारतीय बनावटीच्या ‘लुना’च्या निर्मितीची.

| February 7, 2015 01:41 am

‘‘अमेरिकेतील शिक्षण पूर्ण झालं आणि मला आव्हानात्मक कामगिरी करायला मिळाली ती पूर्णपणे भारतीय बनावटीच्या ‘लुना’च्या निर्मितीची. ‘लुना’ ही भारतीय बनावटीची, तर ‘कायनेटिक होंडा’ परदेशी सहकार्याची आणि अद्ययावत तंत्रज्ञानाची. ‘लुना’द्वारे आम्ही सर्वसामान्य माणसांना ‘फिरते’ केले व कायनेटिक होंडाद्वारे आम्ही स्त्रियांना ‘फिरते’ केले. भारताच्या सामाजिक क्रांतीमध्ये आमचा खारीचा वाटा आहे याचा आम्हाला अभिमान वाटतो.’’

भा रताने १९७०च्या दशकात विकासाची वाटचाल सुरू केली होती, मार्ग कठीण होता, परंतु संधी मुबलक होत्या. खासगी उद्योगांना आता वाव होता. मध्यमवर्गाचा आकार आणि क्रयशक्ती वाढत होती. शहरांची वाढ चौफेर होत होती, परंतु सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेकडे दुर्लक्ष होत होते, ती अकार्यक्षम होती. शिक्षण, उद्योग, व्यवसाय यासाठी फक्त  सायकलवर अवलंबून राहता येत नव्हते. अंतरे वाढत होती, म्हणून स्वयंचलित, वैयक्तिक वापराच्या वाहनांची गरज वाढत होती. अजूनही ती वाढतेच आहे, परंतु त्या वेळच्या स्कूटर, मोटरसायकलच्या उत्पादनावर संख्यात्मक र्निबध होते. उत्पादन पुरेसे वाढत नव्हते, वर्षांनुवष्रे वाट पाहावी लागत होती. त्याच सुमारास एकदा दिल्ली-मुंबई विमान प्रवासात माझे वडील एच. के. फिरोदिया आणि विक्रम साराभाई यांची भेट झाली. गप्पा झाल्या. त्यात साराभाईंनी एक कल्पना सुचवली, युरोपमध्ये त्यांनी एक हलके- सुटसुटीत, हाताळण्यास, देखभालीस सोपे असे वाहन बघितले होते, म्हणजे सायकल व स्कूटरच्या मधले. तसले वाहन भारतातील सामान्य जनतेसाठी बनवण्याची त्यांची कल्पना होती. एच. कें. ना ती एकदम पसंत पडली. आणि तसे वाहन बनवण्याचा त्यांनी ध्यासच घेतला, परंतु ते स्वत: टेम्पोचा विस्तार करण्याच्या कामात व्यग्र होते, मग हे काम करणार कोण, अर्थातच अस्मादिकांवर ती जबाबदारी टाकण्याचे त्यांनी ठरवले व मला तसे विचारले.
त्या वेळी नेमका मी अमेरिकेतून शिक्षण संपवून भारतात परतण्याची तयारी करीत होतो. तोपर्यंत अशा स्वयंचलित दुचाकी कशा असतात याची मला काहीच कल्पना नव्हती. कारण मी इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअर होतो ना! त्याच वेळी १९६९ मध्ये तेलाच्या किमती प्रचंड वाढण्याचा मोठा धक्का जगाला बसला. किमती एकदम चारपट वाढल्या. साहजिकच पेट्रोल वापरणाऱ्या वाहनांचा खर्च आवाक्याबाहेर जाऊ लागला. हीच संधी होती आम्हाला आमची नवी ‘लुना’ बाजारात आणण्याची. ‘लुना’ची रचना आम्ही अशी बनवली होती की ती स्कूटरपेक्षा निम्म्याने हलकी होती. फक्त ५० किलो. चालवायला, देखभालीला, हाताळायला अगदी सोपी. तिचे ५० सीसीचे पॉवरफुल इंजिन दोघांचा भार सहज वाहून नेऊ शकत होते. अगदीच अडले तर चढावावर पेडलची जोड देता येत होती. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे ‘लुना’ ही संपूर्णपणे भारतीय बनावटीची होती. तिचा कोणताही भाग परदेशातून आयात केलेला नव्हता. भारतात असे वाहन बनवण्याचा पहिला मान ‘लुना’कडे जातो. किंमतही अगदी कोणालाही परवडणारी. मुळात आम्ही तिची किमत १००० रुपये ठेवणार होतो, परंतु तेलाच्या समस्येमुळे सर्वच खर्चात वाढ झाली होती, म्हणून सुरुवातीला आम्हाला तिची किंमत १६०० रुपये ठेवावी लागली. शिवाय एक लिटरमध्ये      ६० कि. मी. जाण्याची गॅरंटी. बसतोय का विश्वास!
 निर्णय तर झाला होता, पण तो प्रत्यक्षात आणणं हेही एक मोठे आव्हान होते. मुख्य प्रश्न होता तो भांडवलाचा. आमच्याकडे फक्त १५ लाख रुपये भांडवल होते. आणि आम्हाला ‘लुना’चा कारखाना काढायचा होता. त्या वेळी औद्योगिक विश्वातले अनेक दिग्गज आमच्या मदतीला धावले. ‘टेल्को’चे सुमंत मुळगांवकर, ‘ब्राइट ब्रदर्स’चे भोजवानी, ‘िहदुस्थान मशीन टुल्स’ (एचएमटी) या कंपनीचे डॉ. एस. एम. पाटील आणि ‘मॉरिस इलेक्ट्रॉनिक्स’चे डॉ. मॉरिस यांची मोठी मोलाची मदत झाली कारखाना उभारताना ‘लुना’चा कारखाना आम्ही आमच्या गावी म्हणजे नगरला काढायचे ठरवले होते. एकतर ते पुण्यापासून जवळ होते आणि तो भाग अविकसित होता, त्यामुळे तेथे कारखाना काढून रोजगारनिर्मिती करायची आणि विकासाला हातभार लावायचा, अशी आमची कल्पना होती. तेथे ‘कायनेटिक’चा कारखाना सुरू झाला आणि अनेक छोटे व पूरक उद्योग आले. पायाभूत सुविधा मिळू लागल्यानंतर अनेक मोठे उद्योगही या औद्योगिक क्षेत्रात उभारले गेले. नगरच्या विकासात आमचा खारीचा वाटा आहे.
एक नवं वाहन बाजारात आणायचं तर काहीतरी वैशिष्टय़पूर्ण करावे असे मनात होते. त्यासाठी आम्ही भर दिला तो अपेक्षांवर. आम्ही मेकॅनिक्स व ‘लुना’च्या भावी गिऱ्हाईकांच्या अपेक्षा समजावून घेतल्या. मुख्यत: त्यांना वाहन वापरण्यास व दुरुस्त करण्यास सोपे हवे होते. दरवेळी दुरुस्तीसाठी इंजिन बाहेर काढावे लागले तर वेळही लागतो व खर्चही वाढतो. हे कसे टाळता येईल असा विचार करून आम्ही तोडगा काढला. इंजिन, गीयरबॉक्स व क्लच वेगवेगळे ठेवले. तसेच इंजिन आडवे ठेवून त्याचा एक्स्हॉस्ट पोर्ट खालच्या बाजूस केला. त्यामुळे सििलडर हेड व एक्स्हॉस्ट पोर्टवर कार्बन साठणे बंद झाले. नाही तर दर दोन महिन्यांनी हे डिपॉझिट साफ करण्याचे त्रासदायक काम मेकॅनिकला करावे लागायचे. आता या बदलाने सफाई कमी झाली. तसेच त्या काळी टायर सारखे पंक्चर व्हायचे. ते काढायला पूर्ण चाक दर वेळी काढावे लागे. आम्ही मागचे चाक असे वैशिष्टय़पूर्ण बनवले की ते न काढताच पंक्चर झालेली टायर टय़ूब काढता यावी.
‘लुना’मध्ये भारतातील ऑटो सेक्टरमधील अनेक कल्पना प्रथम राबवल्या गेल्या. उदा. वजनाने हलकी (५० किलोच्या खाली) करण्यासाठी बॉक्स चासी अशी केली की तिच्या डिझाइनमधून तिची मजबुती येईल. यासाठी आम्ही मोनोकोक्यू एअरक्राफ्ट फ्रेम्सचे तत्त्व वापरले. यामुळे धातूचे पातळ पत्रे वापरता आले. या बॉक्समध्येच आम्ही पेट्रोल टँक टाकला. स्वच्छ हवा इंजिनला मिळावी म्हणून ती सीटच्या खालून घेऊन काबरेरेटरला दिली. टुल किटदेखील बॉक्सखालीच ठेवली. शिवाय वजन कमी करण्यासाठी प्लॅस्टिक वापरले. भारतात प्रथमच वाहनात प्लॅस्टिकचा वापर केला गेला. एका इंजेक्शन मोल्डमध्ये हवे तसे प्लॅस्टिक मोल्ड करता येते. ते हलके तर असतेच व खराब झाल्यास रिपेअिरग, पेंटिंग न करता स्वस्त असल्याने बदलता येते. हेडलॅम्पमध्ये प्लॅस्टिक वापरल्याने त्यातच स्पीडोमीटर, हॉर्न, पॉवर बटण सर्वच त्यात टाकता आले. हेडलॅम्पची वायरही छोटी ठेवता आली. ‘लुना’त इतरही इनोव्हेशन आम्ही केली. इंजिन कन्सिल्ड ठेवले, गरज पडल्यास पेडल मारण्याची सोय, परदेशी तंत्रज्ञान पाळण्याचे बंधन आम्हाला नव्हते हा फार मोठा फायदा आम्हाला मिळाला!
पण हे सारे करताना आमच्या बिझिनेस असोसिएटस्ची टेक्नोलॉजी आम्ही वेळोवेळी मिळवून वापरली. त्या काळी भारतात प्लॅस्टिकची टेक्नॉलॉजी फारशी विकसित झाली नव्हती. ‘ब्राइट ब्रदर्स’ ही कंपनी तेव्हा घरगुती प्लॅस्टिकच्या गोष्टी बनवत असे. त्यांचे प्रमुख इंजिनीअर खान यांनी आमच्या विनंतीनुसार प्लॅस्टिक हेडलॅम्प बनवायला मदत केली. त्यांनाही नवा प्रॉडक्ट करायला मिळाल्याचा आनंद झाला. आम्हाला बॉक्स चासिससाठी डाइज बनवायचे होते, पण आमच्याकडे टुल रूम नव्हती. ‘टेल्को’ कंपनीचे सुमंत मुळगांवकर यांनी आम्हाला डाइज बनवून दिल्या, त्याही फक्त मटेरियल कॉस्टमध्ये!
नगरमध्ये फॅक्टरी लावायची होती. मोठय़ा प्रमाणात वाहने उत्पादन करण्यासाठी अनेक मशीन्स लागतात. एक मशीन इंजिनचे क्रंककेस करायला, एक गियर बॉक्स करायला, एक ब्लॉक करायला तर आणखी एक हेड करायला! आमच्या बजेटमध्ये एकच मशीन बसत होते! पण आमचे चीफ इंजिनीअर बोमरा यांनी ‘एचएमटी’च्या डॉ. एस. एम. पाटील यांच्या मदतीने खरोखरच असे ‘मल्टिपर्पज’ मशीन बनवले. आमच्या बजेटमध्ये पेंटशॉप लावण्यासाठी आम्ही इन्फा रेड ओव्हन हीटिंग पद्धत निवडली. त्यासाठी लागणारे ओव्हन आम्हीच बांधले. ही पद्धत नवी व स्वस्त होती.
पूर्णपणे भारतीय बनावटीची ‘लुना’ आम्ही बनवली खरी परंतु भारतीय मानसिकतेचा विचार करणेही गरजेचे होते. तिच्यात परदेशी भाग नसूनही किती मजबूत आहे हे दाखवण्यास आम्ही खास उपक्रम केले. एक म्हणजे ८ लुना रायडर्स ‘अराऊंड इंडिया इन एटी डेज’ गेले. पुणे ते काश्मीर, नेपाळ, आसाम मग कन्याकुमारी व परत पुणे! दर गावी त्यांची पत्रकार परिषद  व्हायची. पुण्यात परतल्यावर ‘व्हिक्टरी लॅप’ केली त्यास सुप्रसिद्ध अभिनेता सुनील दत्त यांना बोलावले होते.
‘लुना’ अमेरिकेतही निर्यात केल्या. तेथे लोकांना डू इट युवरसेल्फ प्रॉडक्ट आवडतात तेव्हा त्यांना पार्टचे किट दिले. अशा ५० हजार ‘लुना’आम्ही निर्यात केल्या. तेथे स्पेअर्स पण उपलब्ध केले. अगदी आंतरदेशीय प्रसिद्ध नियतकालिक ‘टाइम’मध्येही ‘लुना इनवेड्स अमेरिका’ अशी जाहिरात केली. त्यामुळे भारतीय लोकांची खात्री पटली ‘लुना’च्या बेस्ट क्वालिटीबद्दल!
दुकानदार, गृहिणी, विद्यार्थिवर्ग यांच्यात ‘लुना’चा खप वाढवण्यासाठी आम्ही वेगवेगळय़ा मोहिमा आखल्या. दुकानदारांना ५००० रुपयांपर्यंतच्या अ‍ॅसेट खरेदीवर १०० टक्के घसारा मिळत असे. ती गोष्ट त्यांना समजावून सांगितली. महिला मंडळांमध्ये ‘लुना’ वापरायला सोपी कशी, तिचे क्लच, अ‍ॅक्सिलेटर कसे सोपे याचे प्रात्यक्षिक दाखवत असू. ते पाहून त्या पतीच्या मागे लागून ‘लुना’घेत असत. विद्यार्थी ‘लुना’मुळे अनेक क्लास करू शकत. ‘लुना घ्या व पसे, वेळ व शक्ती वाचवा’ हे आम्ही त्यांना पटवून देत असू. कॉलेज गॅदिरग्सना आम्ही वेगवेगळय़ा इव्हेंटमधील जिंकलेल्यांना ‘लुना’चे चित्र असलेले टी-शर्ट्स देत असू. संदेश हा की विनरकडे ‘लुना’ असते! पावसाळय़ात मुला-मुलींना खंडाळय़ात ट्रिपला जायला आम्ही ‘लुना’ पुरवत असू. तसेच आम्ही डायरेक्ट मार्केटिंग सुरू केले. त्यासाठी मेट्रिक्स कन्सल्टन्सीच्या डॉ. आनंद करंदीकर यांनी टीम तयार केली. लोकांना आर्थिक मदत उपलब्ध करून दिली, ज्यायोगे आम्ही दरमहा शेकडो ‘लुना’ विकू शकलो.
  लोकांमध्ये तिच्याबद्दल कुतूहल जागृत होत होतं, मग आम्ही विक्रीकडे लक्ष केंद्रित केले. त्यासाठी प्रथमच अभिनव मार्केटिंग प्रयोग केले. टेस्ट क्रिकेटमध्ये ‘मॅन ऑफ द मॅच’ आम्हीच दिले.     बी. एस. चंद्रशेखर यास बोिलगचे व फारूख इंजिनीयर व सलीम दुराणी यांना बॅटिंगचे! त्यांचे ‘लुना’बरोबर फोटो पाहून खूप लोकांना ‘लुना’घ्यायची इच्छा न झाली तरच नवल. इतकंच कशाला एस.एस.सी टॉपरला आम्ही ‘लुना’ भेट देत असू. आमच्या कंपनीने प्रथमच सर्व शहरांत ऑथोराइज्ड सíव्हस सेंटर्स काढले. त्यामुळे ‘लुना’ वापरणाऱ्यांचा आमच्यावरील विश्वास वृिद्धगत होई.
‘लुना’ची वाढती मागणी पुरी करण्यासाठी आम्ही उत्पादनही वाढवीत होतो पण त्यामुळे एका विचित्र नियमात अडकलो. लायसेन्स कपॅसिटीपेक्षा जास्त उत्पादन केल्यामुळे आम्हाला दंडही भरावा लागला होता. ‘लुना’ची मागणी वाढत असताना ८०च्या दशकात पुन्हा एकदा तेलाच्या किमती अचानक वाढल्या. त्या वेळी आम्ही जाहिरातीच्या माध्यमातून काही नवीन प्रयोग केले. ‘लुना’ ही वेळ, पेट्रोल आणि पसा बचत करणारी आहे, हे सांगण्यावर भर दिला. त्यात आम्ही अगदी तरुण विद्यार्थी, खेळाडू, डॉक्टर, व्यावसायिक अशा सर्वसाधारण लोकांवर चित्रित केल्या. शिवाय प्रसिद्ध दिग्दर्शक श्याम बेनेगल यांनी त्या वेळी नवीन असणाऱ्या शबाना आझमी आणि स्मिता पाटील या अभिनेत्रींना घेऊन टीव्ही जाहिरातीही केल्या तर सचिन तेंडुलकर, अझरुद्दीन या क्रिकेटवीरांना घेऊन आम्ही इंधन बचतीचा संदेश देणाऱ्या जाहिराती केल्या. सचिन तेव्हा साधारण १५ वर्षांचा असेल. त्या वेळी केलेल्या जाहिरातीतून ‘चल मेरी लुना’ ही पंचलाइनही लोकप्रिय झाली. या जाहिरातींना अनेक पुरस्कारही मिळाले.
‘लुना’च्या या यशाबरोबर ‘कायनेटिक होंडा’ची कहाणीही मोठी थरारक आहे. कारण ही दुचाकी आम्ही परदेशी तंत्रज्ञानाच्या साहाय्याने संयुक्त प्रकल्पात तयार करीत होतो. कारण बदलत्या काळाची ती मागणी होती. १९८१ मध्ये मी जपानला गेलो होतो. थोडा वेळ होता, कुतूहल होते म्हणून तेथील ‘होंडा’च्या शोरूममध्ये गेलो. कसे कोण जाणे पण तेथील जपानी व्यवस्थापक वनाका यांनी मला ओळखले. त्या वेळी होंडा कंपनी भारतात येण्यास उत्सुक होती व योग्य भागीदाराच्या शोधात होती. त्यानंतरच्या दोन-तीन वर्षांत होंडाच्या चार-सहा टीम्स भारतात येऊन गेल्या आणि आमचे काम पाहून आमच्याशी भागीदारी करण्याची उत्सुकता दाखवली. मग काय. पुढील गोष्टी वेगाने घडल्या. १९८४ मध्ये ‘कायनेटिक होंडा’ या संयुक्तप्रकल्पाची स्थापना झाली आणि १९८६ मध्ये उत्पादन सुरू झाले. अभिमानाची गोष्ट म्हणजे भांडवल बाजारात आमच्या समभागांना अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. १६५ टक्क्यांपेक्षा जास्त भरणा झाला. जनतेच्या आमच्यावरील विश्वासाचे ते द्योतक होते.
‘लुना’ भारतीय बनावटीची तर ‘कायनेटिक होंडा’ परदेशी सहकार्याची आणि अद्ययावत तंत्रज्ञानाची. तिला खरोखरच तोड नव्हती तरीही हे उत्पादन भारतात नवेच असल्याने ते लोकप्रिय करण्याचे आव्हान आमच्यासमोर होते. त्यासाठी विविध उपक्रम करणे गरजेचे होते. या स्कूटरच्या नावांवर अनेक विक्रम नोंदले गेले आहेत. ‘खारडुंगला’ या जगातील सर्वात उंच रस्त्यावर पोहोचणारी पहिली स्कूटर. तिने ३००० किमीचे सहारा वाळवंटातील अंतर सहज पार केले. सतत १००० तास (४२ दिवस) न थांबता चालवण्याचा विश्वविक्रमही केला आहे. त्याची गिनीज बुकात नोंदही आहे. त्याचाच फायदा घेत आम्ही ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स’ हा शो स्पॉन्सर करीत असू. हेतू हा की प्रेक्षकांना वाटत राही की आमची ही स्कूटरही वर्ल्ड क्लास आहे. लोकांमध्ये पोहोचण्याचा आणखी एक उपक्रम म्हणजे पुण्यात दसऱ्याच्या मुहूर्तावर आम्ही एकदम एक हजार स्कूटर्स बाबासाहेब पुरंदरे यांच्या हस्ते वितरित केल्या. टर्की व कॅरेबियन मध्येही स्कूटर्स निर्यात केल्या, कारण गोव्यात परदेशी पर्यटक आवडीने आमच्या स्कूटर्स भाडय़ाने घेऊन फिरत.
येथे मुद्दा असा आहे की, नव्या उत्पादनाचा खप वाढवायचा तर नीट नियोजन करून बाजारामध्ये घुसावेच लागते. भारतात प्रत्येक मार्केटची मानसिकता, गरज वेगवेगळी असते. त्या ओळखून निरनिराळे प्लॅन्स व योजना राबवायला लागतात.
हा कारखाना मात्र आम्हाला मध्य प्रदेशातील ‘पीथमपूर’ येथे सरकारी धोरणाप्रमाणे काढावा लागला. त्या वेळी तेथे कोणत्याही सोयीसुविधा उपलब्ध नव्हत्या, परंतु सर्व अडचणींवर मात करून आम्ही कारखाना काढला, ते एक मोठे धाडसच होते. परंतु नंतर अनेक कारखाने पाठोपाठ आले. या कारखान्यात पाण्याची मोठी टंचाई जाणवे. टँकरने पाणी आणावे लागे म्हणून आम्ही कारखान्याच्या मागे एक मोठे तळे तयार केले, त्यात पावसाचे पाणी साठवता येईल, अशी व्यवस्था केली, काठावर विविध प्रकारची वनराई लावली. काही दिवसांतच आमचा पाण्याचा प्रश्न सुटला, टँकर बंद झाला. गम्मत म्हणजे रात्रीच्या वेळी तेथे जवळच्या जंगलातील वाघ व इतर प्राणी पाणी प्यायला येऊ लागले.
१९९० च्या दशकात देशात आíथक उदारीकरणाचे वारे वाहू लागले. परकीय गुंतवणूक आकर्षति करण्यासाठी अनेक नियम शिथिल करण्यात आले. त्याचाच परिणाम संयुक्त प्रकल्पातील भागीदारांवर होत होता. त्यांच्या महत्त्वाकांक्षा बळावत होत्या. त्या वेळी ‘होंडा’ने आमच्यापुढे प्रस्ताव ठेवला की कोण्या एका भागीदाराचेच प्रभुत्व ‘कायनेटिक होंडा’वर असावे. आमचा हिस्सा खरेदी करण्याची त्यांची तयारी होती परंतु आम्हाला ते मान्य नव्हते. तेव्हा आम्ही त्यांना उलट प्रस्ताव दिला की आम्हीच त्यांचा हिस्सा घ्यायला तयार आहोत. खूप मोठे धाडस होते ते. परंतु त्यांना पटवून देण्यात आम्ही यशस्वी झालो. बाजारभावाने आम्ही त्यांचा हिस्सा खरेदी केला आणि व्यवस्थापनाचा ताबा आपल्याकडे घेतला. जपानी व्यवस्थापकाच्या जागी भारतीय व्यवस्थापक आले. सर्व कर्मचाऱ्यांचे, वितरकांचे, पुरवठादारांचे आणि आíथक संस्थांचे संपूर्ण सहकार्य मिळाले.
एका भारतीय उद्योगाने आपल्या परदेशी भागीदाराचा संपूर्ण हिस्सा खरेदी करण्याचा व उद्योग ताब्यात घेण्याचा तो ऐतिहासिक निर्णय होता. औद्योगिक विश्वानेही त्याचे स्वागत केले. अशा वेगवेगळय़ा वाटांवर आम्ही वेगवेगळी वळणे घेतली. मागे वळून पाहता हा वळणावळणाचा रस्ता अजूनही दिसतो व खूप समाधान वाटते.
‘लुना’द्वारे आम्ही सर्वसामान्य माणसांना ‘फिरते’ केले व ‘कायनेटिक होंडा’द्वारे आम्ही स्त्रियांना ‘फिरते’ केले. भारताच्या सामाजिक क्रांतीमध्ये आमचा एक खारीचा वाटा आहे याचा आम्हाला खूप अभिमान वाटतो.    
अरुण फिरोदिया – ahf@kineticindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 7, 2015 1:41 am

Web Title: story of birth of luna
Next Stories
1 संवादातून संवाद
2 रिक्षावाल्या मॅडम
3 याद बेहिसाब आए..
Just Now!
X