भूकंपाने उद्ध्वस्त झालेल्या लातूर- उस्मानाबाद पट्टय़ात आज स्त्रियांची किमान शंभर कृषी मंडळे आहेत. या कृषी मंडळांनी या स्त्रियांमध्ये एवढा आत्मविश्वास निर्माण केला आहे की, स्वत:च्या शेतात पिकलेली सोयाबीन, ज्वारी, तूर, मूग कधी विकायची, या निर्णयात त्यांचा फार महत्त्वाचा वाटा असतो. तोही कसा, तर उभ्या पिकाची किंमत त्या स्वत: बचत गटातून कर्ज घेऊन नवऱ्याला चुकती करतात, माल ताब्यात घेतात आणि जेव्हा बाजारपेठेत उत्तम किंमत मिळेल तेव्हाच तो विकायला काढतात !
सर्जनाची एक अद्भुत शक्ती परमेश्वराने स्त्रीच्या ओंजळीत टाकली आहे, ती फक्त एक नवा जीव जन्माला घालण्यापुरती नाही. याच सर्जनाच्या ओढीने ती काळ्या भुईत एखादं बी रुजवते आणि ओटीतला जीव नऊ महिने ज्या मायेने वाढवते, सांभाळते, त्याच निगुतीने हे भुईत पेरलेले बीही जोपासते, वाढवते. अशा निगुतीने शेती करणाऱ्या, गावातील चार बाया-बापडय़ा जेव्हा बोलतात तेव्हा त्यातून व्यक्त होताना दिसते फक्त त्या हिरव्या पिकाची काळजी आणि कृतज्ञता. तर, अशाच या सगळ्या मैत्रिणी उस्मानाबाद, तुळजापूर-लातूरमधील छोटय़ा छोटय़ा गावांतून राहणाऱ्या. संजीवनी माळी, मंगल सुरवसे, मैनाबाई माळी, लीलाताई सोमवंशी, गोदावरी क्षीरसागर, जयश्री कदम आणखी अनेक. या महिलांची नावे वाचून त्यांची ओळख होणे अवघडच. पण त्यांच्याशी बोलताना डोळ्यापुढे उभे राहते, स्त्रीचा संपूर्ण सहभाग असलेले, शेतीचे एक आश्वासक रूप. लावणी-खुरपणी करणारे, पुढच्या हंगामासाठी बियाण्याचा सांभाळ करणारे, पिकाच्या रक्षणासाठी सेंद्रिय कीटकनाशक बनवणारे आणि आपल्या घरापुरती भाजी-धान्य काढून मग एकत्रितपणे बाजारात विक्रीला धान्य पाठवणारे एक शहाणेसुरते रूप.
     लातूर- उस्मानाबाद- तुळजापूरमधील ही स्त्रियांची कृषी मंडळे जन्माला आली ती एका भूकंपासारख्या विध्वंसातून. त्या विध्वंसात मदतीचा हात देणाऱ्या अनेक संस्थांपैकी ‘स्पार्क’ (स्वयंशिक्षण प्रयोग) या संस्थेच्या आधाराने, आधी आपली घरं पुन्हा उभी करणाऱ्या या महिला गेल्या २० वर्षांच्या प्रवासात स्वत:च्या पायावर उभ्या राहिल्या-शिकल्या आहेत. कधी तोल गेलाच तर आधाराला स्वयंशिक्षण संस्था आहेच या भरवशावर.
३० सप्टेंबर १९९३ ची ती विनाशकारी सकाळ लातूर, उस्मानाबादला ओरबाडून, हलवून, रक्तबंबाळ करून गेली. त्या जमिनीवर पुन्हा एखादे हिरवे पाते तरारेल यावर विश्वास बसू नये, असा हा विनाश होता. घरांबरोबर, गावांबरोबर माणसे उभी करण्याचे आव्हान मोठे होते. अशा वेळी घरबांधणीसाठी लोकसहभाग सल्लगार म्हणून गावात गेलेल्या ‘स्पार्क’ने शासनाला सुचवले. गावात पुन्हा योग्य सुविधा असलेली घरे उभारायची असतील तर महिलांचा सहभाग त्यात असणे फार महत्त्वाचे आहे. कारण त्यांचा वावर घरात सतत आणि सर्वाधिक असतो. घर चालवणाऱ्या स्त्रीला त्यातील सोयी-गैरसोयीचे असणारे भान लक्षात घेऊन हा सहभाग शासनाने धोरणात्मक पातळीवर मान्य केला आणि भूकंपग्रस्त लातूर, उस्मानाबादमधील घरउभारणी कामात महिलांचा प्रवेश झाला. अर्थात प्राथमिक प्रशिक्षणानंतर आणि मोठय़ा प्रमाणात विरोधाला तोंड देत.
दोन दशकांपूर्वी लातूरमध्ये भूकंपाने केलेला उत्पात आता जगाच्या दृष्टीने इतिहासजमा झाला असेल, पण त्या भूकंपाने या महिलांना मात्र स्वशक्तीचे भान दिले. त्या थरारक, खूप काही शिकवणाऱ्या दिवसांच्या आठवणी या महिलांच्या स्मरणात पक्क्या आहेत. काळाच्या उमटणाऱ्या पावलांमुळे उडालेली धूळ जरा पुसली की त्या आठवणी प्रत्येक बाई तपशीलवार सांगू शकते. जुन्या खिडक्या, दाराच्या चौकटी वापरून नव्या घरांचा खर्च कसा कमी करता येईल, रोजंदारीवर कामे न देता प्रत्येकाने स्वत:चे श्रम देऊन पैसे कसे वाचवता येतील, असे पर्याय सुचवणाऱ्या या महिला घरबांधणी कामातील प्रगतीचा अहवाल देताना तब्बल १५२ कलमांचा तपशील त्यात देत. १९९४ ते ९७ अशी तब्बल तीन वर्षे हे काम करीत असताना या महिलांनी हेच सिद्ध केले की, घरबांधणीसाठी केवळ पदवी पुरेशी नाही, समजही हवी आणि संसाधनांचा योग्य तऱ्हेने वापर करण्याची दृष्टीही! संवाद सहायक म्हणून या कामात शिरलेल्या या महिलांनी पुढे जाऊन गवंडी कामाचेही प्रशिक्षण घेत आपला त्यातील सहभाग वाढवत नेला. एकीकडे प्रत्यक्ष घरबांधणीत सहभागी होत असताना दुसरीकडे कलापथकांची उभारणी करीत, पोस्टर्स बनवून त्याच्या साहाय्याने भूकंपाला तोंड कसे द्यायचे याचे शिक्षण त्यांनी गावोगावी दिले. या इतिहासाविषयी आणि त्यातील स्त्रियांच्या दमदार भूमिकेविषयी खूप काही लिहिले गेले आहे.
स्वसामर्थ्यांची खूण पटलेल्या या महिला आता उत्सुक होत्या नव्याने काही शिकण्यास. स्वत:च्या आयुष्याला हवे ते वळण देण्याचे आव्हान आपण पेलू शकतो याचे भान आल्यानेच मग त्या अर्थातच वळल्या बचत गटासारख्या रुळलेल्या वाटेकडे. पण केवळ आर्थिक उत्पन्न वाढवणे हे पुरेसे नाही. भूकंपातील तडाख्यामुळे जाणवलेले आरोग्य आणि स्वच्छतेचे प्रश्न, पाणी व जमीन नापिकीची समस्या यांनाही भिडायला हवे, त्याचे गांभीर्य जाणवून घ्यायला हवे, असे त्यांना वाटत होते. पण या प्रवासात शेतीचे वळण नेमके कुठे भेटले?
काठगावात दहा महिलांचे कृषी मंडळ चालवणाऱ्या संजीवनी माळी म्हणाल्या की, गावातील आरोग्य तपासणी करताना महिलांमधील हिमोग्लोबिन (त्यांच्या भाषेत सांगायचे तर एच बी) खूप कमी झालेले आढळले आणि ही सार्वत्रिक आढळलेली बाब होती. डॉक्टरांनी अर्थातच सल्ला दिला, भाजीपाला, फळे खाण्याचा. पैसे मोजून घरात आलेली अर्धा-पाव किलो भाजी, सगळ्यात शेवटी जेवणाऱ्या बाईच्या वाटय़ाला कितीशी येणार? शेतात गहू, ज्वारी, मका पिकवता पिकवता आंतरपीक म्हणून भाजी लावण्याची युक्ती ज्या क्षणी या महिलांना शिकायला मिळाली त्या क्षणी त्यांना आरोग्याचा आणि अर्थप्राप्तीचा एक नवा मार्ग सापडला.
संजीवनी माळी यांच्या कृषी मंडळातील दहा महिला गुंठय़ामध्ये भाजीपाला लागवड करतात आणि गावातच त्याची विक्री करतात. वर्षभरातून कमीत कमी तीन ते चार भाजीची पिके त्या काढतात. लागवडीची सगळी कामे त्या एकत्र करतात. एकमेकींच्या शेतीत काम करण्याची ही प्रथा केवळ काठवाडीतच नाही तर लातूर- उस्मानाबादेत स्त्रियांची जेवढी कृषी मंडळे आहेत त्या सगळ्यांनीच स्वीकारलेली आहे. घरासाठी भरपूर भाजीपाला ठेवून उरलेल्याची विक्री केली जाते, पण तरीही या प्रकल्पाने मोठा आर्थिक हातभार या कुटुंबाला मिळाला आहे आणि स्त्रियांचे हिमोग्लोबिन झकास सुधारले आहे.
या कृषी मंडळांनी या स्त्रियांमध्ये एवढा आत्मविश्वास निर्माण केला आहे की, आता स्वत:च्या शेतात पिकलेली सोयाबीन, ज्वारी, तूर, मूग कधी विकायची या निर्णयात त्यांचा फार महत्त्वाचा वाटा असतो. तोही कसा, तर उभ्या पिकाची किंमत त्या स्वत: बचत गटातून कर्ज घेऊन नवऱ्याला चुकती करतात, माल ताब्यात घेतात आणि जेव्हा बाजारपेठेत उत्तम किंमत मिळेल तेव्हाच तो विकायला काढतात! घरातच इतका रोख आणि चोख व्यवहार करण्याचा हा आत्मविश्वास त्यांना आजवर जमलेल्या अनुभवाच्या संचितातून मिळत गेला आहे. मिळतो आहे. त्यामुळेच एकीकडे घरच्याच शेतीत होणाऱ्या रासायनिक फवारणीला रोखण्यासाठी त्या ‘लमितं’ (लसूण, मिरची, तंबाखू) द्रावणाचे कीटकनाशक घरी करतात आणि त्याबरोबरीने बियाणे प्रक्रियाही लागवडीपूर्वी पूर्ण करतात. भाडेपट्टीने शेती घेऊन नैसर्गिक शेतीचे प्रयोग करणाऱ्या महिलाही मोठय़ा संख्येने दिसतात.
लातूर- उस्लानाबाद पट्टय़ात आज अशी स्त्रियांची किमान शंभर कृषी मंडळे आहेत आणि शेती करता करता त्यांना हे जाणवले आहे, की आता जे करतो आहे त्यापेक्षा अधिक खूप असे काही आहे जे आपल्याला खुणावते आहे. करायचे आहे ते शिकण्यासाठी त्या आता कृषी विद्यापीठ, कृषी प्रदर्शनांना भेटी देत आहेत. अर्थात या सर्व प्रयत्नांमागे त्यांना साथ आहे ती स्वयंशिक्षण प्रयोग या संस्थेची, त्यातील माणसांची.
संकट जेव्हा अकस्मात अंगावर कोसळते तेव्हा सावरून त्याला तोंड देण्याची शक्ती निसर्गत:च माणसात असते, कदाचित स्त्रीमध्ये थोडी अधिक. आणि या शक्तीला जेव्हा सर्जनाचे धुमारे फुटतात तेव्हा आयुष्य कसे हिरवे, तजेलदार होते, हे या स्त्रियांशी बोलताना जाणवत राहते.