News Flash

एक खिडकी स्वत:ची..

‘मी’ची गोष्ट

|| मेधाविनी नामजोशी

‘मी’ म्हटले तर एक अक्षरी शब्द –

पण त्यामध्ये आपले पूर्ण अस्तित्व सामावलेले असते. या ‘मी’ची आपली आपल्यालाच ओळख असते का? असायला हवी का? हा काही फक्त तत्त्वज्ञानाचा प्रश्न नाही, एक साधा सरळसोपा प्रश्न जगण्याचा दृष्टिकोनआहे असं मी मानते. आपणच स्वत:शी घट्ट मत्री करायची. मी केली आहे, खूप लहानपणापासून. स्वत:शी मत्री म्हणजे आपल्या बुद्धी आणि मनाशी मत्री, त्यांच्यावर विश्वास ठेवणे आणि त्यांना जपणे.

काही दिवसांपूर्वी एका चित्रपटगृहातून बाहेर पडत होते. शाळेतल्या एका मत्रिणीने हाक मारली. कित्येक वर्षांनी भेटली. ‘‘अरे वा आम्हीपण याच शोला होतो..’’ मग तिने मुलांची व नवऱ्याची ओळख करून दिली. मी भेटले याचा तिला खरंच आनंद झाला होता, पण तिची नजर मात्र काहीतरी शोधत होती. मला अनुभवाने आता याचीही सवय आहे. संकोचाने ती काही विचारतही नाही हे लक्षात आल्यावर मीच मग सांगितलं, ‘‘अगं, मी एकटीच आले आहे आज.’’ मग तिच्या चेहऱ्यावर आश्चर्य!

बाईने एकटीने असे काही करणे म्हणजे ती भलतीच डॅशिंग किंवा आगाऊ असेल अशा कौतुक/ मत्सर/हेवा ते नालस्तीच्या विविध छटांच्या संमिश्र प्रतिक्रिया मिळतात. या प्रतिक्रियांचा अनुभव मी खूप वेळा घेतला आहे. देशा-परदेशांत एकटीनेच प्रवास करताना, कधी मनात आलं तर एकटीनेच हॉटेलमध्ये जेवताना, नाटक- सिनेमा पाहताना. आपल्या सगळ्यांनाच सतत माणसाच्या सहवासाची ओढ असते. स्त्रियांना तर माणसं जोडावी अशी पद्धतशीर शिकवणही मिळते. मलाही माणसांत राहायला, माणसं जोडायला, मत्री करायला खूप आवडतं. मी सामाजिक कार्यकर्ती असल्यामुळे सतत माणसांमध्येच असते. पण हे सगळं करत असताना माझ्या स्वत:साठी वेळ काढून माझ्या आवडीचं काहीतरी करणंही खूप खूप गरजेचं वाटतं.

‘मी’ म्हटले तर एक अक्षरी शब्द – पण त्यामध्ये आपले पूर्ण अस्तित्व सामावलेले असते. या ‘मी’ची आपली आपल्यालाच ओळख असते का? असायला हवी का? हा काही फक्त तत्त्वज्ञानाचा प्रश्न नाही, एक साधा सरळसोपा प्रश्न जगण्याचा दृष्टिकोन आहे असं मी मानते. आपली आपल्या स्वत:शीच खूप छान मत्री असायला हवी, असं मला वाटतं. आपल्या मत्रिणी किंवा मित्र आपली काळजी घेतात. आपलं काही चुकत असेल तर हक्काने आपली चूक दाखवून देतात. कधी आधार देतात आणि आपल्या यशाचे कौतुकही करतात. आजच्या धकाधकीच्या आयुष्यात असे लोक आपल्या आयुष्यात येतात, पण दर वेळेस आपल्या जवळ असू शकतीलच असे नाही.

आपणच अशा वेळी स्वत:शी घट्ट मत्री करायची. मी केली आहे, खूप लहानपणापासून. माझ्या आई-बाबांनी ओळख करून दिली या संकल्पनेची. स्वत:शी मत्री म्हणजे आपल्या बुद्धी आणि मनाशी मत्री, त्यांच्यावर विश्वास ठेवणे आणि त्यांना जपणे. त्याबाबतीत मी खूप भाग्यवान. अतिशय तर्कशुद्ध विचार करणारे, प्रेमळ आणि आम्हा दोघी बहिणींना घरातील जबाबदार सदस्यांप्रमाणे वागवणारे आई-बाबा आम्हाला मिळाले. कधीही लहानपणी किंवा मोठेपणी आम्हाला हे आमचे मुलगेच आहेत असे त्यांनी म्हटले नाही. आम्हाला नेहमीच मुली – सक्षम मुली म्हणूनच घडविले.

आयुष्यातली वादळी र्वष असोत वा नंतरच्या आयुष्यात, कायम मला माझे निर्णय घ्यायला मिळाले. मग ते दर वेळी त्यांना पटले नसले तरीही कायम पाठीशी त्यांच्या आश्वासक असण्यानेच माझ्या पंखांत बळ आले. स्वत:वर विश्वास ठेवायला त्यांनी शिकवले. मुलींच्या आयुष्यात असा स्वत:वर विश्वास ठेवता येणे, आपल्या आयुष्याचे निर्णय आपल्या मनाने घेता येणे, ही दुर्दैवाने खूपच दुर्मीळ गोष्ट आहे.

या सगळ्या संस्कारांच्या मुशीत मी घडले. कुठलाही निर्णय घेताना त्या निर्णयाच्या सर्व परिणामांचा विचार करायचा, जबाबदारी स्वीकारायची आणि कृती करायची अशी सवयच मग अंगवळणी पडली. या सवयीचा खासगी आणि व्यावसायिक जीवनात खूप फायदा झाला. नंतरच्या टप्प्यावर कॉलेजमध्ये मत्रिणी मिळाल्या त्याही अशाच विचारांच्या. स्वतंत्र, विचारी आणि आता देश-विदेशांत विखुरलेल्या असल्या तरी एकमेकींसाठी घट्ट – ठाम उभ्या राहणाऱ्या, प्रसंगी आपली चूकही दाखवून देणाऱ्या.

आपण बरेचदा आपल्या निर्णयासाठी दुसऱ्यांच्या संमती/ स्वीकारावर अवलंबून असतो, खास करून स्त्रिया. मी अशी वागले, बोलले तर घरचे, इतर काय म्हणतील, या एका विचाराने आपले मन मारून जगणाऱ्या कित्येक स्त्रिया मी जवळून पाहिल्या आहेत. स्वयंपाकघर हातात असून कित्येक वष्रे ‘यांना’ आवडत नाही म्हणून स्वत:च्या आवडीचा पदार्थ न बनवणाऱ्या, मत्रिणीचा फोन आला तरी मनसोक्त बोलायला वेळ न काढू शकणाऱ्या, कामासाठी दोन दिवस जायचे तितक्या दिवसांचा खूप राबून स्वयंपाक करून सकाळी सहाला डय़ुटीवर रिपोर्ट करणाऱ्या. तीन-चार दिवसांच्या चपात्या, भाजी करून फ्रीजमध्ये ठेऊन मगच बाहेरगावी जाणाऱ्या, मुंबईमध्ये ऑफिस सुटताच घराच्या जबाबदाऱ्या पूर्ण करण्यासाठी स्टेशन, बसस्टँडकडे तीरासारख्या धावणाऱ्या! ही धावपळ घरच्यांच्या अपेक्षापूर्तीसाठी असते, कर्तव्यभावनेतून असते, पारंपरिक साच्यात आपला स्वीकार व्हावा म्हणूनही असते. म्हणजेच ही धावपळ फक्त घडय़ाळाच्या वेळेशी संबंधित नसते तर स्वप्रतिमा आणि समाज स्वीकृतीसाठीदेखील असते. मला खरंच खूप प्रामाणिकपणे असं वाटतं की जर आपल्याला आपल्या संबंधांतल्या माणसांना खूश ठेवायचं असेल तर स्वत: आनंदी आणि समाधानी असणं अतिशय महत्त्वाचं आहे. आडातच नसेल तर पोहऱ्यात कुठून येणार?

जर धावधाव करून मन मारून मी घरच्यांसाठी झटत असेन, पण मनात त्याबद्दलची सुप्त नाराजी असेल तर काय उपयोग? त्याऐवजी जर आपण ऑफिसहून वाहनापर्यंत जर आनंदात आजुबाजूला सहज नजर फिरवत आलो तर फारफार तर पाचच मिनिटे जास्त लागतात, पण ती पाच मिनिटं स्वत:सोबत असणं दिवसभराचा शीण घालवतात आणि आपण जास्त शांत समाधानी घरी पोहोचतो असा माझा स्वत:चा अनुभव आहे.

मी अनेक पातळ्यांवर ‘प्रिव्हिलेज्ड’ म्हणजेच विशेष आधिकार प्राप्त गटात मोडते याची मला पूर्ण जाणीव आहे. अनेक संधी, सुविधा, मोकळीक मला माझ्या जाती, धर्म, शिक्षण, मुंबईस्थित असणे यामुळे मिळाली आहे हेही मी जाणते. माझी आजी, माझी आई आणि आता मी – म्हणजे तीन पिढय़ा आम्ही घराबाहेर पडून काही ना काही काम करतोय. त्याचाही एक वारसा मला आपसूकच मिळाला आहे, याचीही मला जाणीव आहे. अतिशय समजूतदार आणि संवेदनशील जीवनसाथी मिळाल्यामुळे एकमेकांना साथ देतानाच स्वतंत्र अवकाश देणारे घर आम्ही उभारू शकतोय. या वातावरणात आमचा मुलगाही घडत आहे.

मला मिळालेल्या या ‘प्रिव्हिलेज्ड’ अनुभवांचा उपयोग इतरांपर्यंत कसा नेता येईल, माझं समाजाप्रती जे देणं लागतं ते मी कसं फेडू शकेन, हा विचार सतत मला दिशा दाखवत असतो. माझ्या कामाच्या संदर्भात मी अनेकविध आíथक-सामाजिक गटातील स्त्रिया-किशोरी यांना जवळून पाहिलं आहे. स्वत:चं मन मारून जगणाऱ्या स्त्रिया जशा आहेत, तसंच खूप विपरीत परिस्थितीतही स्वत:च्या आनंदासाठी जगताना पाहिलं आहे. सकारात्मक दृष्टिकोनातून आयुष्याशी लढतानाही पाहिलं आहे. वयाच्या विसाव्या वर्षी तीन वर्षांचं मूल घेऊन नवऱ्याची मारहाण सहन न झाल्याने माहेरी परत आलेली शब्बो. पण कालांतराने ‘‘दीदी, जिसको जो बोलना हे बोले, म तो अब अपने खुशी के लिए जिती हूं..’’ असं म्हणत दिलखुलास हसतानाही पाहिलंय. सासू उपास करायला सांगते त्या दिवशी घरून डबा नेता येत नाही, पण असल्या कर्मकांडांवर विश्वास नाही म्हणून त्या दिवशी मस्तपकी आवडता पदार्थ हॉटेलमधून ऑर्डर करून त्यावर ताव मारणारी सरूही पाहिलीय.

आपल्या स्वत:ची थोडीशी काळजी घेण्यात, आवडत्या गोष्टीसाठी वेळ काढण्यात आपण सगळेच हल्ली फार दिरंगाई करतो किंवा चंगळ समजतो. विश्वास ठेवा हे फार कठीण किंवा खर्चीक अथवा बंडखोरीचे बिलकूल नाहीये. गरज आहे ती आपल्या मनात डोकावणारी आपणच घट्टबंद करून ठेवलेली खिडकी उघडण्याची. सगळ्यांची एकदम सताड नाही उघडणार अचानक, वेळ लागेल एखादवेळेस, पण कालांतराने ती किलकिली तर होऊच शकेल. प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे?

एक खिडकी स्वत:ची..

आपलं आकाश पेलून धरणारी.

आतलं बाहेर, बाहेरलं आत स्पर्शणारी..

हवीच प्रत्येकाला

स्वत:ला स्वत:शी जोडणारी..

medhabhi@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 23, 2019 12:06 am

Web Title: story of medhavinee namjoshi
Next Stories
1 सत्य स्वीकारणे अवघड
2 हवे तेवढे खुशाल खेळा..
3 रियाज
Just Now!
X