वात्सल्य, प्रेम, काळजी या भावना फक्त मानव जातीतच आढळतात असं नाही, तर इतर प्रजातीतील मादी-वर्गातही त्या आढळतात. प्राणीजातीतल्या अशाच एका वेगळ्या ‘आई’ची ही ह्रदयस्पर्शी गोष्ट! उद्याच्या जागतिक मातृदिनानिमित्त..
रोजच्यासारख्याच तुळशीला पाणी घालायला आई गेल्या. पण त्या दिवशी बाहेरून येताना त्यांच्या हातात एक मांजराचं पिल्लू होतं. घाबरलेलं, बावरलेलं, अगदी छोटंसं. त्या पिलाला पाहून मुलं एकदम खूश! लगेच बशीत दूध घेऊन त्याला पिण्यासाठी घेऊन आली. दूध प्यायला त्याला खाली ठेवलं, तेव्हा ते कसंबसं सरपटत पाय ओढत हळूहळू चालत बशीपर्यंत पोहोचलं. त्याचे मागचे दोन्ही पाय अधू होते. त्याला उभं राहता येत नव्हतं. डोळे मात्र त्याचे विलक्षण बोलके होते. त्याची अवस्था पाहून मुलांनी त्याला घरातच पाळण्याचं, सांभाळण्याचं नक्की केलं.
त्या दिवसापासून मनी आमच्या घरातीलच एक सभासद झाली. तिची सगळी जबाबदारी- स्वच्छता ठेवण्याची जबाबदारी मुलीनं घेतली व त्यात मदत करण्याची मुलानं. दुसऱ्या दिवसापासून मनीला दूध, गरम पोळीला तूप या आहाराबरोबरच तिच्या पायाला बदामाच्या तेलाचं मालीश सुरू झालं. शिवाय पायांसाठी घरीच प्लास्टर बनवलं. झाडूच्या काडय़ांचे छोटे तुकडे करून त्यावर स्पंज व कापूस गुंडाळला व त्या काडय़ा मनीच्या पायांना बांधून त्या आधारे तिला हळूहळू उभं करायचं. असे अनेक उपचार सुरू झाले. वर्ष-सहा महिन्यांत मनी चालायला लागून मग धावू लागली.
तिचं विशेष म्हणजे, घरात कधीही तिनं दह्य़ा-दुधाच्या पातेल्यांना तोंड लावलं नाही. बाहेरचंही ती काही खात नसे. अगदी शेजारच्यांनी मासे दिले तरी ती तोंड लावत नसे. आणि विशेष सांगण्यासारखं म्हणजे पालकाच्या काडय़ा हा तिचा आवडता खुराक होता. पूर्ण शाकाहारी होती मनी!
आमच्याकडेच तिला दोन पिल्लं झाली. चंगू आणि मंगु. दोन्ही बोके. पिलांशी तिला खेळताना बघणं म्हणजे एक आनंददायी कार्यक्रमच होता आमचा. शेपटी हलवत त्यांना ती पकडायला लावणं, मध्येच उचलणं, कधी खोटय़ा रागाने गुरगुरणं; पाहत राहावं असं वाटे.
एक दिवस मनी बाहेरून आली ती विचित्र ओरडतच. जोरजोरात ओरडत ती घरात शिरली. तिला उलटीही झाली. आम्ही तिला प्राण्यांच्या दवाखान्यात घेऊन गेलो. डॉक्टरांनी तपासून औषध दिलं व तिला विषबाधा झाल्याचं निदान केलं. बाहेर तर ती कधीही काहीही खात नव्हती. आम्हाला आश्चर्यच वाटलं. त्याच दवाखान्यात एक आजी त्यांच्या टॉमीला घेऊन आल्या होत्या. त्या म्हणाल्या, ‘‘अहो, ती नसेल बाहेरचं काही खात. पण आता तिला पिलं झालीत ना. ती आई आहे ना त्यांची. त्यांना शिकवण्यासाठी उंदीर पकडायला गेली असणारच ती. सवय नसल्यानं दुसरं काही तरी चुकून पोटात गेलं असणार किंवा औषध मारलेला उंदीर पकडायचा प्रयत्न केला असणार तिनं!’’
पिलांना या जगात योग्य मांजर म्हणून जगता यावं यासाठी आईने हे दिव्य केलं होतं तर! पण ते तिला खूपच महागात पडलं. तिचं दुखणं वाढलं.
डॉक्टारांनी पिलांना तिचं दूध देऊ नका, असं सांगितलं होतंच. पण आता तीही पिलांना जवळ येऊ देत नव्हती. पिलांना आपला त्रास होऊ नये म्हणून तीच काळजी घेत होती. पिलं नजरेआड मात्र होऊ देत नव्हती. माझी मुलं त्या पिलांना कापसाच्या बोळ्याने, इंजेक्शनच्या सिरिंजने दूध पाजत होती. ते ती शांतपणे पाहत राही. पिलांचं दूध पिऊन झालं की तिचे डोळे आनंदाने चमकून उठत. तर त्यांना दूध पाजल्याबद्दल माझ्या मुलांकडे ती कृतज्ञतेने डोळ्यांनीच जणू आभार मानीत असे.
दोन-चार दिवसांनी तिला पुन्हा उलटी झाली. दुखण्याने तिचं जोरजोरात ओरडणं सुरू झालं. मध्येच पिलांकडे पाहून वेगळाच केविलवाणा सूर काढून ओरडे. आम्ही तिला परत दवाखान्यात नेण्यासाठी बास्केटमध्ये ठेवलं. मग तर ती पिलांकडे पाहत जोरजोरात ओरडू लागली. आम्ही तसंच तिला दवाखान्यात नेलं. ओरडणं सुरू होतंच. डॉक्टरांनी तिला इंजेक्शन दिलं. थोडय़ा वेळाने ओरडणं थांबलं नाही तरी जोर थोडा कमी झाला होता. आम्ही तिची औषधं वगैरे घेऊन घरी निघालो. घर जवळ आलं तसं परत ती जोरजोरात ओरडू लागली. अखेर सोसायटीच्या गेटपाशी आम्ही तिला बास्केटमधून बाहेर सोडलं. तेथून ती जी सुसाट धावत निघाली ती थेट आमच्या गॅलरीच्या कट्टय़ावरून घरातच तिने झेप घेतली. अगदी पिलांजवळ, जणू ‘हिरकणीच’! पिलांजवळून ती अजिबात हलली नाही. काही खाल्लं-प्यायलं नाही, पालकाची काडीसुद्धा न खाता एकटक ती पिलांकडे पाहत होती.
दुपारी परत दुखण्याने जोर केला. परत तिचं ते कधी दुखण्यामुळे ओरडणं तर कधी पिलांकडे पाहत केविलवाणं ओरडणं सुरू झालं. आम्ही परत डॉक्टरां ना फोन केला, त्यांनी तिला अ‍ॅडमिट करण्यास सांगितलं. तिला दवाखान्यात नेऊ लागलो. तिचं ओरडणं, पिलांकडे सारखं पाहणं आम्हाला कसंतरीच करीत होतं. डॉक्टरांनी परिस्थिती कठीण असल्याचं सांगितलं. मला काय करावं कळेना. तिची ती नजर, ते ओरडणं पाहवत नव्हतं – ऐकवत नव्हतं. डॉक्टरांनी उपचार सुरू केले होते. तिने परत जेव्हा माझ्याकडे पाहिलं तेव्हा मला काय झालं कुणास ठाऊक, मी तिच्या अंगावर हात फिरवला. तिला थोपटलं व अगदी मोठय़ाने सांगितलं, ‘मने, तू पिलांची काळजी करू नकोस. चंगू, मंगू मोठे होऊन आपणहून बाहेर जाईपर्यंत मी त्यांचा नीट सांभाळ करीन. त्यांची काळजी घेईन.’’(बोके मोठे झाले की घरात राहत नाही म्हणतात.)
मी हे सांगितल्याचा परिणाम म्हणा किंवा उपचारांना प्रतिसाद म्हणा ती हळूहळू शांत झाली. अतिश्रमाने, औषधाने तिला झोप लागली. दोन-तीन दिवस तरी तिला तेथे राहावा लागणार होतं. मी व मुलगी दवाखान्यातून घरी येईपर्यंत रात्र झाली. रात्रभर कुणालाच घरात चैन नव्हती.
सकाळी डॉक्टरांचा फोन आला, ‘‘मनी आताच सकाळी ७ वाजता गेली. झोपेतच शांतपणे! तुम्ही दिलेल्या वचनामुळे तिची तगमग थांबली होती. शांतपणे झोपेतच काहीही त्रास न होता ती गेली.’’
पुढचं सगळं डॉक्टरांच्या मदतीनेच उरकलं. सगळेच सुन्न झालो होतो. पिलांची, चंगू-मंगूची आता खूपच कीव येऊ लागली. त्यांच्या काळजीने – प्रेमाने ती आई जिवाला थोपवून धरत होती.
चंगू-मंगू आमच्याकडेच मोठे झाले. एक दिवस मंगूराव बाहेर गेले, ते आलेच नाहीत. खूप शोधलं, पण सापडला नाही. आठ-दहा दिवसांनी चंगूही बाहेर पडला; पुन्हा आमच्याकडे न येण्यासाठी. ते स्वत:च्या पायांवर उभे राहिले होते. करतेसवरते झाले होते, स्वतंत्रही!
मी माझ्या शब्दांना जागले होते. एका आईला दिलेलं वचन माझ्यातील आईने प्रामाणिकपणे पूर्ण केलं होतं!

kanyadan, valid marriage,
वैध लग्नाकरता कन्यादान नाही, तर सप्तपदी महत्त्वाची !
feast of snowballs juicy fruits and green fodder for animals at Karunashram Orphanage in Wardha
वन्यप्राणी करताहेत उन्हाळा एन्जॉय! बर्फ के गोले, रसभरीत फळे अन हिरवा चारा यांची मेजवानी
history of bhang on holi
होळीच्या दिवशी भांग पिण्याला आहे विशेष धार्मिक महत्त्व; जाणून घ्या या परंपरेमागील पौराणिक कथा
shukra asta 2024
एप्रिल महिन्यात मेष राशीत शुक्र होणार अस्त! ‘या’ राशीच्या लोकांचे नशीब पटलणार! आयुष्यात येईल प्रेम करणारी व्यक्ती