दोन्ही मुलं कायमची परदेशी निघून गेल्यावर इथल्या उतरत्या वयातल्या पालकांना काय वाटतं हे त्यांना कसं कळणार होतं? तरुणपणी बाळासाहेबांना दिल्लीला मिळत असलेली चांगली नोकरीसुद्धा त्यांनी घेऊ दिली नव्हती. मुलगा लांब जाऊ नये म्हणून. बाहेरचं जग कितीही बदलो, त्यात उत्पात घडोत, नानासाहेबांचे प्रश्न त्यांच्या पलंगाशी जखडलेलेच होते. संधिवात..ब्लडप्रेशरच्या गोळ्या..
‘आली का रे बेबी?’
नानासाहेबांनी गेल्या तासाभरात निदान दहाव्यांदा तरी विचारलं, तेव्हा बाळासाहेबांना त्यांच्याकडे लक्ष देणं भाग पडलं. खूप संयमाने पण कोरडेपणाने म्हणाले,
‘नाही आली.’
‘अजून नाही आली? पाचवी बस पकडायची असेल तिला.’
‘असेल. पण अजून इथे आली नाही हे सत्य आहे. आली की कळेलच ना तुम्हाला? मी काय तिला खिशात का कोंबून ठेवणार आहे? आणि आख्खी ती मावेल एवढा खिसा कुठून आणू?’
‘तुम्ही लोक परस्पर प्लॅन ठरवता, बदलता, म्हणून म्हटलं.’
‘तसं काही नाहीये. स्वस्थ बसा. मला माझं काम करू द्या.’ बाळासाहेब त्यांच्या पेन्शनच्या थकबाकीचा हिशोब करण्यात गढले होते. कॅलक्युलेटरवर तीनचा आकडा समजून आठचा आकडा दोनदा दाबला होता त्यांनी. अ‍ॅरिअर्सचा आकडा दरवेळेला वेगवेगळा येत होता! डोळ्यांनी बिनचूक वाचण्याचा, बोटांनी हवा तो अंकच दाबण्याचा आटोकाट प्रयत्न त्यांच्या बाजूने सुरू असताना पुन्हा खिडकीजवळच्या कॉटवरून सुस्कारा आला.
‘ही बेबी पहिल्यापासून वेंधळीच. आपला पत्ता धड शोधता येतो की नाही बयेला, कोण जाणे!’
‘नानासाहेबऽ तुमच्या या वेंधळ्या बेबीनेच टुकीचा संसार करून तीन-तीन पोरं वाढवलीये हे विसरू नका.’
‘आम्ही काहीच विसरत नाही रे. बसल्या बसल्या जुनंपानं जमेल तेवढं आठवण्याखेरीज उद्योग काय आम्हाला? तुमची पिढी मात्र आम्हाला विसरत चालली एवढं खरं! या सगळ्या भाच्यांचं, पुतण्याचं लहानपणी काय कमी का केलंय आम्ही? घरामध्ये तुझी आई पोळ्यांच्या चळती बडवायला समर्थ होती.. मी सुद्धा खर्चाला मागे हटत नव्हतो.. शाळेच्या उन्हाळी सुट्टय़ांमध्ये बच्चेकंपनी गर्दी व्हायची आपल्या घरामध्ये.. खाणी, पिणी.. दंगाधोपा.. भांडणं मारामाऱ्या.. सगळं सगळ्यांच्या विस्मरणात गेलं.’
‘वयं झाली म्हणायची अन् काय..’
‘कप्पाळ! जेमतेम साठीला पोचताय तुम्ही एकेकजण. बेबीची साठी तर व्हायचीच असेल माझ्या मते! साठ हे काय वय झालं? चांगले टुकटुकीत राहून, जीन्सबीन्स घालून फिरताय की सगळे जगभर!’
‘वर जीन्स चढवल्या म्हणजे आतले पाय थकलेले नसतात असं थोडंच आहे ना नानासाहेब?’
‘पायाचं नका सांगू. आजकाल गाडय़ाघोडी सगळं असतं तुमच्या पाश्र्वभूमीखाली. ही बेबी तरी काय पायी का येणार होती मला भेटायला? नारायणगावातून मॅरेज पार्टीबरोबर इथे पुण्याला लग्नाला आली असणार सकाळीच. आता जरा रिक्षा करून मला भेटायला येऊन जायचं एवढंच तर काम होतं तिला.’
‘नसेल जमलं.’
‘नसेल जमवायचं मनात! ठरवलं तर काहीही करतंच की मनुष्य!’
‘गेल्या पाच वर्षांमध्ये डॉक्टरकडे जाण्याखेरीज घराबाहेर पडत नाही तुम्ही नानासाहेब. डॉक्टरांकडेसुद्धा आम्हा दोघांपैकी कोणीतरी घेऊन जाईल तेव्हाच!  बाहेर केवढा ट्रॅफिक असतो, रिक्षा मिळायला किती त्रास पडतो, असल्या मोठमोठय़ा मंगल कार्यालयातून मुख्य रस्त्याला लागेपर्यंत वाटेतली गर्दी कापता कापता जीव किती मेटाकुटीला येतो हे तुम्हाला कसं कळणार?
‘आम्हाला एक कळलंय बाबा! आमची कोणाला गरज नाही. आमची आठवणबिठवण काढायला कोणाला वेळ नाही.’
नानासाहेब उंच, चिरक्या आवाजात म्हणाले आणि खोलीकडे पाठ करून पलंगावर कलंडले. वयाची साडेआठ दशकं पार गेलेला जीव होता त्यांचा. त्यांना मधूनमधून आडवं व्हावंसं वाटायचंच अलीकडे. सगळ्याच हालचाली मंदावलेल्या होत्या. फक्त आवाज तेवढा चढायचा अधूनमधून आणि चढला की चिरकायचासुद्धा. असा प्रक्षोभ झाला की थोडा वेळ त्यांना शांत पडू द्यावं हे बाळासाहेबांना आतापर्यंत समजलेलं होतं. मुळामध्ये त्यांचा प्रक्षोभ होईल अशा गोष्टी, बातम्या ते त्यांच्यापर्यंत जाऊच देत नसत. या बेबीने तरी स्वत:हून भेटायला येण्याची दवंडी पिटली म्हणून..
बेबी लग्न करून नारायणगावला गेली त्या गोष्टीला आता ४० तरी र्वष झाली असणार. सुरुवातीला खूपदा पुण्याला यायची, भेटायची. सगळ्याच चुलत-मावस भावंडांचा पुण्यात राबता असायचा. मजा वाटायची. पुढे एकेक व्यवधान वाढत गेलं. भेटी दुरावल्या. तीन वर्षांपूर्वी पहिलंवहिलं नातवंड झालं, ते स्पास्टिक चाइल्ड निघालं. तेव्हापासून हाय खाऊन बेबी एकदम खचलीच. अशीच एक ना एक उपाधी अनेकांच्या आयुष्याला लागली. एका भावाच्या कंपनीचं फॉरेन कोलॅबोरेशन झालं, त्या उलाढालीत त्याची नोकरी गेली. एका बहिणीच्या धडधाकट नवऱ्याला एक्स्प्रेस वेवरच्या अपघाताने कायमचं जायबंदी केलं. एकीच्या मुलीनं पळून जाऊन दुसऱ्या धर्मातल्या माणसाशी लग्न केलं म्हणून तिनं अवेळी सगळ्यातून माघार घेतली. बहुतेकांची तरुण मुलं नोकरी व्यवसायाने घरापासून दूर गेली. पांगली. तिसऱ्या पिढीतले प्रश्न, समस्या, त्यांची दुसऱ्या पिढीला लागणारी झळ यासारखे बरेच विषय नानासाहेबांपर्यंत पोचलेच नाहीत. जेवढे पोचले ते सगळे भिडलेच असंही नाही. दोन्ही मुलं कायमची परदेशी निघून गेल्यावर इथल्या उतरत्या वयातल्या पालकांना काय वाटतं हे त्यांना कसं कळणार होतं? तरुणपणी बाळासाहेबांना दिल्लीला मिळत असलेली चांगली नोकरीसुद्धा त्यांनी घेऊ दिली नव्हती. मुलगा लांब जाऊ नये म्हणून बाहेरचं जग कितीही बदलो, त्यात उत्पात घडोत, नानासाहेबांचे प्रश्न त्यांच्या पलंगाशी जखडलेलेच होते. संधिवात.. ब्लडप्रेशरच्या गोळ्या..
बाळासाहेबांना जरा वेळ शांतता दिल्यावर एकदम आठवल्यासारखं ते म्हणाले,
‘माझ्या बी. पी.च्या गोळ्या आणल्यास? कधीचा सांगतोय.’
‘आणेन या आठवडय़ात. तोवर पुरेल एवढा स्टॉक आहे तुमच्याकडे.’
‘आणि नसला तर वाढू दे माझं बी.पी. जाऊ दे जीव. सगळेच सुटू आपण एका फटक्यात.’
‘कितीदा सांगितलंय असं बोलू नये! त्रास होतो.’
‘न बोलल्याने जास्तच होतो त्याचं काय करू? तुमच्यापेक्षा आम्ही लोक आमच्या आईवडिलांचं पुष्कळ नीट करत होतो, काहीही म्हणा तुम्ही.’
‘तुमचे वडील म्हणजे अप्पाआजोबा गेले तेव्हा तुम्ही केवढे होतात?’
‘होतो कीऽ चांगलाऽ चाळिशी पार केलेला.’
‘मी केवढा आहे? चाळिशीच्या तोंडावर आहे की नाही?’
‘सारखं सारखं साठीचं तुणतुणं वाजवू नकोस रे. तुम्ही सगळे असलेच. कुचकामाचे. ती बेबी अजून आलीये का बघ. फार दिवस बोलावणार नाहीये म्हणावं मी.’
‘नाही ना? मग बोल तरी लावू नका. कशाला वाकडय़ात शिरता?’
‘श्रावण बाळाच्या वगैरे गोष्टी सांगून वाढवलं रे आम्ही तुम्हा मुलांना.’
‘प्रश्नच नाही.’
‘मग ते वायाच का सगळं?’
‘वाया नाही. संदर्भ गमावलेलं. तुमच्या गोष्टीतला श्रावण हा ‘बाळ’ होता नानासाहेब. झटकन आईवडिलांची कावड उचलण्याची रग होती त्याच्यात. आता घराघरातले खरे श्रावण बाळ घरांपासून मैलोन्मैल लांब गेलेत आणि आमच्यासारख्या श्रावण बाळासाहेबांवर वेळ येत्येय आईवडिलांकडे बघायची.. आता या वयात स्वत:ला बघू का तुम्हाला, सांगा.’
‘त्यात आम्ही ऐंशीऐंशी-नव्वद नव्वद वर्ष जगणार! साधं वेळच्या वेळी मरताही येत नाही आम्हा लोकांना.’ पलंग पुन्हा करकरला.
‘बघाऽ पुन्हा वाकडय़ात गेलात. असा त्रागा करण्यापेक्षा जरासं समजुतीने घेतलं तर? तुमची मुलं आता मुलं नाहीत, त्यांना त्यांच्या आधीव्याधी आहेत. त्यातून ती सगळ्या आघाडय़ा सांभाळायला प्रयत्न करताहेत. हे दिसतंय ना? मग निदान ऊठसूट संशय घेणं, आरोप करणं तरी थांबवता नाही येणार? एका वयानंतर कोणीच कोणाकडून कावड उचलली जाण्याची वाट बघायची नाही, ज्यानंत्यानं शेवटी आपापल्या परीने आपापला रस्ता काटायचा प्रयत्न करायचा असा काही विचार नाही का करता येणार? बघा बुवा.’
नानासाहेब बघतच होते. फक्त खिडकीबाहेर. समोरून त्यांची बेबी खुरडत खुरडत फाटकाच्या आत येत होती आणि तिला किती कसं सुनवायचं या विचारात ते गढलेले होते!

uddhav thackeray slams narendra modi during in an interview with the indian express
मोफत धान्य देण्यापेक्षा रोजगार का देत नाही? ‘द इंडियन एक्स्प्रेस’च्या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांचा मोदींना सवाल
Sarbajeet singh
सरबजित सिंगच्या मारेकऱ्याची पाकिस्तानात हत्या; मुलगी म्हणते, “हा न्याय…”
Police raid on Dancers obscene dance in bungalow at lonawala
लोणावळा: बंगल्यात सुरू होता नृत्यांगनाचा अश्लील नाच; पोलिसांनी टाकला छापा
Pankaja munde and jyoti mete
बीडमध्ये तिहेरी लढत? पंकजा मुंडेंसमोर आता ज्योती मेटेंचंही आव्हान; मविआनं डावलल्यानंतर म्हणाल्या, “पुढची पावलं…”