01 December 2020

News Flash

लेकीचं बाळंतपण

शंकररावांनी पासपोर्ट, व्हिसाची सगळी कागदपत्रे गोळा केली व त्यांनी जोमाने प्रयत्न सुरू केले. आणि शालिनीताईंची वेगळी धावपळ सुरू झाली..

| September 7, 2013 01:02 am

शंकररावांनी पासपोर्ट, व्हिसाची सगळी कागदपत्रे गोळा केली व त्यांनी जोमाने प्रयत्न सुरू केले. आणि शालिनीताईंची वेगळी धावपळ सुरू झाली.. परदेशात जायचे म्हणजे इकडूनच सगळे बरोबर न्यावेच लागणार.. आठवण करून करून एक एक वस्तू बाजूला काढून ठेवावी लागत होती..
शालिनीताई रात्री तांब्या-भांडे उशाला घेऊन आडव्या झाल्या.. आणि फोनची बेल वाजली.. त्यांनी घडय़ाळात पाहिले. रात्रीचे अकरा वाजले होते. ‘अहो फोन घ्या’, असे म्हणून त्यांनी शंकररावांना उठवले..
शंकररावांनी खडबडून जागं होत फोन घेतला. ‘हं बोल बेटा कशी आहेस? काय आईला देऊ? बरं बरं घे गं फोन.. मला माहीत होतं तिला तुझ्याशीच बोलायचे आहे.’ असे म्हणून शंकररावांनी रिसीव्हर दिला.
‘‘काय म्हणतेस शिवानी.?’’
 ‘‘अगं आई, मुद्दाम तुला फोन केला. कसं सांगू? तू आजी होणार आहेस.. तीन महिने पूर्ण झाले आहेत. तुला इकडे येण्यासाठी आत्तापासूनच तयारी करावी लागेल बघ.. म्हणजे तू वेळेवर येशील.’’ शिवानीनं सांगून टाकलं.
‘‘बरं बरं जावईबापू काय म्हणतायत? काळजी घे स्वत:ची. आणि हो दर २/३ दिवसांनी फोन करत जा.’’.. शालिनीताईंनी फोन खाली ठेवला आणि त्यांच्या डोळ्यांसमोर शिवानीची अल्लड मूर्ती उभी राहिली..
शिवानी सॉफ्टवेअर इंजिनीअर.. नवराही सॉफ्टवेअरमध्येच होता.. लग्न होऊन दोन वर्षांपूर्वी नवऱ्याबरोबर अमेरिकेला निघून गेली होती..
‘‘चला, आता अमेरिकेत बाळंतपणाला जायचे म्हणजे आपल्याला आत्तापासूनच व्हिसा आणि पासपोर्ट याची तयारी करावी लागेल..’’ बोलता बोलता मग दोघांची झोपच उडाली.
शंकररावांनी सगळी कागदपत्रे गोळा केली व त्यांनी जोमाने प्रयत्न सुरू केले. आणि शालिनीताईंची वेगळी धावपळ सुरू झाली.. परदेशात जायचे म्हणजे इकडूनच सगळे बरोबर न्यावेच लागणार.. आठवण करून करून एक एक वस्तू बाजूला काढून ठेवावी लागत होती.. मागच्याच वर्षी कल्याणीची डिलीव्हरी झाली होती.. त्या वेळेस शालिनीताईंनी आईला १५/२० दिवस आधीच बोलावून घेतले होते.. शिवाय वेळेवर धाकटी जाऊ अर्चनासुद्धा येऊन राहिली होती.. अर्चना घरचा स्वयंपाक, बाळंतणीसाठी डबे वगैरे सगळं बघायची.. शालिनीताई दवाखान्यातच बाळंतिणीजवळ राहायच्या व त्यांची आई घरी बसल्या बसल्या सगळ्या सूचना द्यायची.. सगळ्या जणी होत्या म्हणून कल्याणीचे बाळंतपण व्यवस्थित पार पडलं. पण आता मात्र शिवानीच्या वेळेस सगळं एकटय़ा शालिनीताईंनाच सांभाळावे लागणार होते.. डिंक, अळीव, खसखस, खारीक, खोबरे, चांगले तूप, एक ना अनेक वस्तू, शिवाय बाळासाठी गुटीचे सामान, वेखंडाची पुड, त्याच प्रमाणे कॉटनचे झबले, दुपटे इत्यादी सगळ्या सामानांची त्यांनी जमवाजमव केली.. त्यांची तयारी बघून शंकरराव थट्टेने म्हणत अहो आधी व्हीसा तरी मिळू द्या.. बघता बघता शिवानीला नववा महिना लागला आणि शंकररावांनी म्हटल्याप्रमाणे अजूनही व्हीसा मिळाला नव्हता.. आता मात्र शालिनीताईंचे धाबे दणाणले.. त्यांनी शिवानीला फोन लावला. ‘‘बेटा घाबरू नकोस.. अजून तुला महिनाभर अवकाश आहे. तोपर्यंत व्हीसाचे काम होईलच.. स्वत:ची काळजी घे.. दगदग करू नकोस’’.. विचार करून करून शालिनीताईंची तर झोपच उडाली.. लेकीच्या काळजीने त्या बेचैन झाल्या.. रात्ररात्र त्यांना झोप येईना.. त्यांची घडय़ाळाकडे नजर गेली.. पहाटेचे तीन वाजले होते. आता तरी झोप लागावी म्हणून त्यांनी डोळे गच्च मिटून घेतले.. आणि फोनची बेल वाजली.. त्या खडबडून उठून बसल्या.. नक्की शिवानीचाच फोन असेल.. त्यांनी गडबडीने रिसीव्हर उचलला.. ‘‘हं बोल बेटा.. तुझा आवाज एवढा का बारीक येतोय?’’
‘‘अगं, आई ऐकतेस ना.. तुला नातू झालाय..’’
 ‘‘काय?’’ शालिनीताईंच्या पायाखालची जमीन सरकली..
 ‘‘अगं हो, माझी आणि बाळाची तब्येत अगदी छान आहे.. काळजी करू नकोस’’..
‘‘अगं पण इतक्या लवकर?’’
 ‘‘अग हो, नववा महिना लागल्यावर डॉक्टरांनी सोनोग्राफी केली आणि लगेच अ‍ॅडमीट करून घेतले.. रात्री एक वाजता माझी डिलीव्हरी झाली.. यांना डॉक्टरांनी सगळं ट्रेनिंग आधीच दिलं होतं.. माझी डिलीव्हरी झाल्यावर यांना लगेच पॅटर्निटी लीव्ह मिळाली आहे.. त्यामुळे माझे बाळंतपण, तुझे जावई अगदी व्यवस्थित करीत आहेत..’’
‘‘अगं, पण तुझ्या जेवणाचे काय?’’
 ‘‘आई तू मुळीच काळजी करू नकोस.. डॉक्टर सांगतील त्या प्रमाणे हे मेसमध्ये जाऊन माझे जेवण बनवून आणतात..’’
 ‘‘बरं बरं कर आता आराम.. ’’
‘‘हं आई, तू पण काळजी करू नकोस आणि हो बाबांना कॉम्प्टय़ुटर ऑन करायला सांगतेस का?’’
 ‘‘अगं बाई एवढय़ा रात्री कशाला?’’
‘‘अगं सांग लवकर’’ असे म्हणून फोन कट झाला..
 शालिनीताईंनी शंकररावांना उठवले. ‘‘अहो, जरा इंटरनेट लावा.’’
 ‘‘काय स्वप्न वगैरे पडले की काय? तुझा शिवानीच्या नावाचा जप चालू आहे.’’
‘‘अहो, लावा म्हटले ना’’.. शालिनीताई रडवेल्या झाल्या..
कॉम्प्टय़ुटर ऑन केला. स्काइपवर पाहिलं तर शिवानी छोटय़ा बाळाला मांडीवर घेऊन कॉटवर बसली होती. स्क्रीनवर शिवानीचा फोटो बघून शालिनी ताईंना गहिवरून आले..‘‘आईबाबा, मी आणि माझे बाळ अगदी सुखरूप आहोत.. तुमचे जावई माझे बाळंतपण करीत आहेत.. काळजी करू नका.’’ शिवानी म्हणाली.
शालिनीताईंना एकदम थकल्यासारखं झालं आणि हतबलही वाटलं. मुलं आपापल्या जबाबदारीवर सगळं निभावून नेताहेत याचं समाधानही वाटलं..
 शिवानीच्या मांडीवरील चिमण्या बाळाला पाहून शंकरराव आनंदाने म्हणाले, ‘‘अगं, ते व्हीसाचे कागदपत्र परत घेऊन येतो’’..
 ‘‘अहो, असे काय करता?’’ शालिनीताईंनी त्यांना हटकले.. ‘‘असू द्या ती कागदपत्रं.. आत्तापासून तयारी केली तर आपल्याला नातवाच्या लग्नाला तरी जाता येईल नाही का?’’
..आणि शंकररावांनी मान हलवली..

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 7, 2013 1:02 am

Web Title: story of shalini tai
टॅग Chaturang
Next Stories
1 महापराक्रमी रसिकराज
2 सासू-सासरे होताना
3 रंगभूमीचं अपरिमित अवकाश
Just Now!
X