मंगला गोडबोले – mangalagodbole@gmail.com

जयंतला लहानपणीच्या ठिकरीच्या खेळाची आठवण व्हायची. त्याला वाटायचं, अप्पाही आपल्याशी असंच काही तरी खेळताहेत. काळाची ठिक्कर लांब उडवायची आणि हव्या त्या वयाच्या चौकोनात उडय़ा मारत बसायचं. वागायचं कसं यांच्याशी? माणूस ‘ऑफिशियली’ केव्हापासून म्हातारा धरला जातो? हा जयंत आणि ज्योतीपुढचा मोठा प्रश्न होऊन बसला होता. अप्पा घटकेत ‘सतरा’चे असत, घटकेत ‘सत्तर’चे. मध्येच ते बारा गाडय़ांचं बळ आल्याचं अवसान आणत, मध्येच देहावसानाची भाषा करत.  त्यांच्या या ‘पक्षबदला’नं रोज-रोज गोंधळून जायला लागल्यावर अखेर त्यांनी वत्सलाबाईंच्या ‘व्वा हेल्पलाइन’ला फोन लावलाच.

सोनाच्या ‘स्कूल’मधल्या ‘ग्रँडपॅरेंट्स डे’चं निवेदन घरी आलं, तेव्हा जयंताला बरं वाटलं. ‘आजी-आजोबा दिन’ असावा आणि नेमकं  त्या वेळी  सोनाचे आजी-आजोबा, म्हणजे आपले आई-अप्पा आपल्याकडे असावेत, हा छानच योग वाटला त्याला. एका म्युच्युअल फंडामध्ये बरेचसे पैसे गमावल्यापासून अप्पा अलीकडे नाराज-नाराजच असत. बरा हा विरंगुळा त्यांना! पोराटोरांत जरा मन रमेल, असं वाटलं तेव्हा जयंता उत्साहानं त्यांना सांगायला गेला. ‘‘अप्पा, असा-असा ‘इव्हेंट’आहे. जाणार तुम्ही?’’

‘‘ढकला म्हाताऱ्यांना पोरकटपणात,’’ अप्पा त्रासून, दुखरा गुडघा हातानं चोळत पुटपुटले.

‘‘अहो, जाऊन तर बघा एकदा. मजा वाटली तर बसा. फालतू गेम्सबिम्स सुरू केले तर बाजूला थांबा.’’

‘‘का?  मी खेळू शकत नाही? चौथीत धावण्याच्या स्पर्धेत अख्ख्या गडहिंग्लजमध्ये पहिला आलोय मी. दाखवू धावून? आतापण?’’ अप्पा त्वेषानं एकदम ताठ उभं राहायला गेले, पण हातात आधाराची काठी घ्यायला विसरल्यानं जागीच लडबडले. मग तीच काठी उगारून खेकसले, ‘‘मनात आणलं तर पर्वतीपण चढू शकतो मी.’’

‘‘शाळा पर्वतीवर नाहीये अप्पा! आणि मुलं ‘रॉक क्लायम्बिंग’ करून शाळेत-वर्गात जात नाहीत. लिफ्टनं जातात.’’ जयंता हसू दाबत म्हणाला. अप्पांच्या ‘ऐच्छिक अधू’ नजरेतून ते सुटलं नाही. (अप्पांना भिंतीवरच्या ठसठशीत घडय़ाळातले काटे दिसत नसत, पण भाजी-आमटीत कोथिंबिरीची कणभर काडी पडलेली तेवढी अचूक दिसे. यावरून ज्योती त्यांच्या नजरेला ‘ऐच्छिक अधू’ नजर म्हणे. सासू-सासऱ्यांवर शेरे मारताना तिची प्रतिभा ‘ओव्हरटाइम’ करे. ज्योती म्हणजे अर्थातच जयंताची बायको.)

तर, तेच ‘ऐच्छिक’ डोळे वटारत अप्पा खेकसले, ‘‘दात काढायला काय झालं? स्वत:चे दात काढून घ्यायची वेळ आली, की समजेल.. तोवर घ्या म्हाताऱ्यांना हसून.’’

‘‘आय डिडन्ट मीन दॅट अप्पा.. पैसे बुडाल्यापासून तुम्ही फार चिडचिड करताय हं! तरी मी सारखा सांगत असतो, उगाच आपल्या मनानं परस्पर कुठे तरी पैसे गुंतवू नका.’’

‘‘अच्छा.. म्हणजे आमचाच पैसा आम्ही तुम्हा तरुणांच्या परवानगीनं टाकायचा का? बरं बाबा, तरी बरं, नोकरीत असताना वर्षांचं लाख्खोंचं ‘फायनान्स बजेट’ करून द्यायचो मी.’’

‘‘तेव्हाची गोष्ट वेगळी होती अप्पा. ‘कंपनी फायनान्स’ वेगळा, ‘पोर्टफोलिओ मॅनेजमेंट’ वेगळी.’’

‘‘आम्हा म्हाताऱ्यांना ती कुठली कळायला? आधीच मर्कट तशात मद्य प्याला. आधीच अज्ञ तशातही वृद्ध  झाला.’’

‘‘कुठलं कुठे नेताय अप्पा? सोनाची शाळा – पोर्टफोलिओ – वृद्ध – मद्य.. तुमची ‘रेंज’ अफाट आहे हो. जायचंय की नाही तुम्हाला एकदा ठरवा ना.’’

‘‘तुला काय वाटतं? मला निर्णयक्षमता उरली नाही? आताच्या आता जाऊन त्या शाळेच्या डोमलावर थयथय नाचून येतो हवं तर..’’

‘‘आज ‘जी.पी.डे’नाहीये अप्पा.. असं काय करता?’’ जयंता हताश होऊन म्हणाला.

अलीकडे खूपदा असंच व्हायचं त्याचं. थेट-खुला संवाद कमी. सारखी दोन्ही बाजूंनी बाणांच्या नेमबाजीची प्रात्यक्षिकं चालायची. आपण आपल्या जन्मदात्याला केव्हा ‘फुल्ली ओल्ड’ मानावं, केव्हा ‘अर्धवृद्ध’ समजावं आणि केव्हा ‘तारुण्यानं मुसमुसणारं’ वगैरे मानावं, हे त्याला कळता कळत नसे. घटकेत ते सतराचे असत, घटकेत सत्तरचे. मध्येच चक्क बारा गाडय़ांचं बळ आल्याचं अवसान आणत, मध्येच देहावसानाची भाषा करत. ताप मोजायला थर्मामीटर असतो, तसं वय मोजायला कुठलं कर्माचं मीटर लावणार यांना? चौथीची आपली शिष्यवृत्तीची परीक्षा तपशीलवार सांगतील. आज औषधाचा चौथा डोस घेतला की नाही, हे चार-चारदा विचारूनही पत्ता लागू देणार नाहीत.

जयंता लहानपणी बहिणींबरोबर गॅलरीत ठिकरी खेळायचा. त्याची आठवण व्हायची त्याला. वाटायचं, अप्पाही आपल्याशी असंच काही तरी खेळताहेत. काळाची ठिक्कर लांब उडवायची आणि हव्या त्या वयाच्या चौकोनात उडय़ा मारत बसायचं. वागायचं कसं यांच्याशी?

प्रत्येक विवाहित बाप्याला लग्नानं एक सोय कायमची बहाल केलेली असते. अडचणीचे चेंडू खुशाल बायकोच्या अंगणात टोलवून द्यावेत, की आपण नामानिराळे! तसंच आता जयंतानंही केलं आणि आपलं भरतवाक्य म्हटलं, ‘‘ज्योती घेईल आईशी बोलून आणि सांगेल काय ठरलंय ते.’’

साहजिकच आता ज्योतीवर सासूशी ठिक्कर खेळण्याची वेळ आली. (प्रथेप्रमाणे ती सासूला ‘आई’ म्हणे. सासूसारखंच वागवे.)

‘‘मी काय म्हणत्ये आई.. तुम्हाला थोडा बदल हवाय ना? मग तुम्ही जाच सोनाच्या शाळेतल्या ‘ग्रँडपॅरेंट्स डे’ला.’’

‘‘छे बाई.. पोरांच्या गोंगाटानं मला अगदी कलकलेल,’’ ‘आईं’चं उत्तर.

‘‘गोळी घेऊन जा वाटल्यास सोबत. फारच डोकं उठलं तर घ्यावी चटकन,’’ ज्योतीनं उपाय सांगितला.

‘‘आणि पित्त उसळलं तर? पित्तानं मला बाई मळमळतं.’’

‘‘अहो, पूर्णवेळ बसलंच पाहिजे असंही नाही. कंटाळलात तर फोन करा. आम्ही कुणी तरी घ्यायला येऊ तुम्हाला.’’

‘‘आणायला कशाला हवंय?  रस्ता चुकणारे माझा, की अंगावरून बस जाणारे? तुला आम्ही जायला हवंय, घरात ही ब्याद नकोय थोडा वेळ.. असं म्हण की स्पष्ट.’’

‘‘अहो, असं कुठं म्हटलं मी? तेवढीच शाळेची गंमत आतून बघायला मिळेल म्हणून म्हटलं.’’

‘‘तीन-तीन कार्टी वाढवलीयेत. ती काय शाळेच्या गमती बघितल्याशिवाय? आतून- बाहेरून- वरून- खालून- मधून.. सगळ्यांचं सगळं बघून झालंय बरं आमचं.’’ आई.

‘‘बरं राहू दे. सोनाची आभा म्हणून एक मैत्रीण आहे. तिच्या आजीला दरवर्षी ‘ग्रँड ग्रँडमदर’ असं अ‍ॅवॉर्ड मिळतं शाळेतर्फे. म्हणून वाटलं.. पण तुम्हाला..’’ ज्योतीनं असाही प्रयत्न करून पाहिला.

‘‘माहित्येय. टक्कल पडायची वेळ आली तेव्हा ‘बॉबकट’ करून ‘मॉडर्न’ म्हणून मिरवायला लागल्यात त्या आजी आणि अंबाडय़ात असले तरी मीही काही कमी नाहीये म्हणावं.’’

(‘कमी कशाला असताय़  रोज बघत्येय की मी! पोळी चाववत नाही म्हणता, पिझ्झा मागवला की एकदम तुमच्या दातांमध्ये दैवी ताकद येते.’ हे वाक्य ज्योतीनं अर्थातच मनात म्हटलं. वरकरणी मात्र सावरून घेतलं.)

‘‘वाटेल ढीग. या वयात झेपलं पाहिजे. त्या दिवशी सकाळी गलबलत नसेल तर जाईन.’’ ‘आईं’नी निकाल दिला.

‘‘असं चालणार नाही बहुतेक. अगोदर नाव नोंदणी करायचीय.’’

‘‘आणि ऐन वेळी गेलं तर काय अंगठे धरून उभं करणार आहेत?.. जायचं तर नीट जायला हवं. तुमचं काय ते ‘फेशियल’, ‘आयब्रोज’ वगैरे करून..’’

‘‘आम्हालाही कुणाला तरी तुम्हाला शाळेपर्यंत पोहोचवणं- आणणं करावं लागेल,’’ ज्योती म्हणाली.

‘‘का? आम्हाला काय शाळा माहीत नाही का? रिक्षा करता येत नाही? तेवढे घट्ट आहोत अजून आम्ही. मध्येच छातीत थोडं लकलकतं, हे सोडलं तर..’’

ज्योतीच्या ‘सासूमाँ’नं तिचं डोकं पुरतं सरबरीत करेपर्यंत ‘घट्ट’ आणि ‘पातळ’चा घोळ घातला. दोनदा त्यांचं नाव त्या कार्यक्रमासाठी नोंदवावं लागलं. तेवढय़ाच वेळा रद्द करावं लागलं. शेवटी त्या दिवशी सकाळी आई-अप्पांनी एकदम सोळाव्या वर्षांतच पदार्पण केल्यासारखा उत्साह दाखवल्यानं त्यांची वरात शाळेपर्यंत गेली. गुडघ्याला पट्टे, पित्ताची गोळी, पाण्याची बाटली, कलकलल्यास आवळा सुपारी, गलबलल्यास सुंठ-साखर, उन्हासाठी छत्री, कानाला वारं लागू नये म्हणून मफलर, डोक्याला हलकासा बाम अशी बुलंद तयारी करून दोघं कार्यक्रमाला गेले. ज्योतीच त्यांना सोडून आली. पार्किंगपासून मुख्य सभागृहापर्यंत धरून-धरून जाताना आईंचे पाय कसकसत होते. ती त्यांना परत घरी आणायला गेली तेव्हा त्या सोनाबरोबर ‘नाच रे मोरा’वर नाच करत होत्या. ते बघून ज्योतीच्याच डोळ्यासमोर ‘काळा काळा कापूस पिंजल्या’सारखा झाला. रात्री नवरा-बायकोनं ‘तुझी माझी जोडी जमली रे’ म्हणत आई-अप्पांचं म्हातारपण चर्चेला घेतलं. की बुवा हे दोघं खरंच किती म्हातारे आहेत?  मुळात म्हातारे आहेत की नाहीत? असल्यास केव्हा व किती ‘डिग्री सेल्सिअस’ किंवा ‘फॅरनहाईट’ म्हातारपण मानावं यांचं?  आणि जे असेल त्याच्याशी आपण किती झुंजणार आहोत? ढगांशी वारा झुंजतो तसं?

या प्रश्नांची उत्तरं मिळवायला दोघांनी सरळ वत्सलावहिनींना ‘कॉन्फरन्स कॉल’च लावला.

‘‘वत्सलावहिनी, एका बाबतीत तुमचं मार्गदर्शन हवंय.’’

‘‘देऊ या की!’’

‘‘काय आहे, आमच्या घरी आमचे म्हातारे ‘पॅरेंट्स’ आहेत.’’

‘‘मग खरा मोठाच आहे तुमचा प्रश्न.’’

‘‘नाही हो, तसे ते ‘सेल्फ सफिशियंट’ आहेत.’’

‘‘मग तर आणखीनच मोठी समस्या आहे तुमची.’’

‘‘पूर्ण ऐकून घ्या हो. ते म्हातारे असायला, स्वावलंबी असायला आमची काही हरक त नाहीये, पण ते सारखे पाटर्य़ा बदलतात. त्यानं आम्ही गोंधळून जातो.’’

‘‘पक्षबदल.. गंभीर समस्या आधुनिक काळातली. लोक निष्ठा बदलतात. कधी या पक्षात, कधी त्या.. तरी राजकारणात ते जाहीर तरी करतात. इथे म्हणजे सगळ्या गुप्त कारवाया. कधी साधा हात धरायचं सुचत कसं नाही म्हणून उखडणार, कधी हात धरायला मी काय लंगडा-आंधळा आहे, असं विचारणार. आजच्या ज्येष्ठांना, म्हाताऱ्यांना स्पष्ट, ठसठशीत म्हातारं कधीपासून म्हणावं, हा प्रश्न सर्वाचाच आहे हो.’’  वत्सलावहिनी म्हणाल्या.

‘‘ऑफिशियली माणूस केव्हापासून म्हातारा धरला जातो? हा आमचा प्रश्न आहे.’’

‘‘अहो, बहुतेक सरकारलासुद्धा ते ठरवता आलेलं नाहीये आजवर. उगाच का निवृत्तीचं वय सारखं ५२, ५५, ५८, ६० असं बदलताना दिसतं?’’

‘‘त्यांचं ठीक आहे. सत्तेवरची पाच र्वष सुखरूप घालवली की भागतं त्यांचं. आम्हाला उरलेलं आयुष्य घालवायचंय एकत्र. नक्की करायला नको का हा कळीचा मुद्दा?’’ ती दोघं म्हणाली.

‘‘शेवटी बघा, वय हा तुमचा आकडा असतो.’’

‘‘तसली भोंगळ तत्त्वज्ञानं नकोत. रोखठोक सांगा.’’

‘‘उगाच का म्हातारपणाला पोरवय म्हटलंय?’’

‘‘म्हणणाऱ्यांचं काय जातंय? पोरवयाला एकेक आई असते. ती फटकाही मारू शकते. पोटाशीही घेऊ शकते. या असल्या ‘थोरवया’ला कोणी आधार द्यायचा?’’

‘‘तुम्हीच! हे बघा, म्हातारे वाढतच जाणार जगातले. डॉक्टर थोडेच कोणाला हातासरशी मरू देणारेत? थोडं गमतीजमतीत घ्यायला शिका राव!’’

‘‘ते कसं?’’

‘‘दर खेपेला बोलणं सुरू करण्यापूर्वी ज्येष्ठांना विचारावं, की बुवा आज, आता, या घडीला तुम्हाला माझ्यापेक्षा लहान मानू, बरोबरीचं म्हणून वागवू, की ज्येष्ठ म्हणून लोटांगण घालू? नक्की ठरवा आणि पक्कं सांगा.’’ वत्सलावहिनींनी ‘हेल्प’ के ली.

‘‘हे म्हणजे चक्क आमंत्रणच झालं की?’’

‘‘कशाला?’’

‘‘पुढच्या गाडाभर उलटसुलट संवादाला.’’

‘‘अहो, त्यांना तोच तर हवा असतो ना? एरवी तुम्हाला वेळ नसणार. तुम्ही घटकाभर त्यांच्याजवळ थांबायला मागत नसणार. त्यांना शक्यतो टाळणार. हलकेहलके आपल्या आयुष्यातून गाळणार. म्हणून हा ‘थोरखेळ’ आरंभलाय असं समजा न् काय!’’ वत्सलावहिनी सांगत  होत्या. तेवढय़ात अप्पांचा पुकारा सुरू झाला.

‘‘जयंता, आईला नाकात चुरचुरतंय. तिची नाकातल्या ड्रॉप्सची बाटली कुठे ठेवलीयस?’’

‘‘असेल तिथेच अप्पा. विसरला असाल.’’

‘‘रोजची गोष्ट विसरायला एवढा थेरडा झालो का रे मी? ’’ अप्पांनी सुरुवात केली. जयंता हसून ज्योतीला म्हणाला, ‘‘काय करू या?.. त्यांना विचारू या? आता तुम्ही स्वत:ला नक्की कोणत्या वयोगटातले मानताय म्हणून?’’ त्यानं डोळा मिचकावला. तिनं त्याला चापट मारली. थोडा वेळ दोघंही ‘नवतरुण’ वयोगटात ‘ट्रान्सफर’ झाले!