News Flash

तुटलेलं पैंजण

विचित्र निर्मिती

|| सुमित्रा भावे

पायातून ‘पैंजण’ पडताना पाहून खूप तरुण मुलींनी श्वास रोखलेले मी पहिले आहेत. बोलकी दृश्य-प्रतिमा ही काही तरी क्लिष्ट गोष्ट नसून ती एक भिडणारी प्रगल्भ भाषा होऊ शकते हा आत्मविश्वास आम्हाला त्यातून मिळाला. एका आदिवासी मेळाव्यात एक म्हातारी बाई शेकडो लोकांसमोर पुढे येऊन म्हणाली, ‘‘खूप वरीस हिते येऊन बोलायचा होता.. हिम्मत नवती.. या पोरीला पायलं.. आता मी बोलनार..’’ सगळे म्हणाले, ‘‘बोला.’’ त्यावर ती म्हणाली, ‘‘बस. येवडाच बोलायचा होता..’’ त्या तुटलेल्या बेडीची प्रतिमा तिला नेमकी उमजली होती!

‘‘तुमची ‘संवाद’ फिल्म मला खूप आवडली.. असं आणखी काही करायचं असेल तर मला सांगा.. पण दोन-तीन दिवस आधी सांगा.. एकदम घाई नको व्हायला..’’- सुमित्राच्या एक ज्येष्ठ स्नेही उषाताई मोडक रोखठोक आवाजात म्हणाल्या. या वाक्याचा अर्थ ‘आपल्याला जर असा लघुपट बनवायचा असेल तर त्या आपल्याला पसे देतील’- असाच घ्यायचा ना- हे उमजण्यात आमचा थोडा वेळ गेला. त्यांच्या वक्तव्यानं आमच्या निर्मितीच्या ऊर्जेला उकळ्या फुटू लागल्या. कोणीतरी १६ मि.मी. वर अध्र्या तासाचा लघुपट बनवण्याचं त्या वेळेचं आमचं सुमारे दीड लाख रुपयांचं बजेट देऊ करत होतं. एखाद्या पारितोषिकाप्रमाणे.. विषय-आशय मांडणीचं पूर्ण स्वातंत्र्य. हे स्वप्नवत होतं..

सुमित्राकडे कधीच गोष्टींचा तुटवडा नसतो. तेव्हाही नव्हता. उषाताईंकडून मिळालेल्या आश्वासनासहित सुरू झाला आमच्या ‘चाकोरी’ या लघुपटाच्या निर्मितीचा आणि चित्रभाषेच्या शिक्षणाचा नवा प्रवास. बायकांच्या एका गट-चर्चेमध्ये सुमित्रानं एका वृद्ध बाईंना बोलताना ऐकलं होतं, ‘‘बाकी सगळं आयुष्य ठीकच गेलं गं.. पण एक इच्छा मात्र राहिली बघ.. मला सायकल शिकायची होती!’’ त्या बाईंची ती हळहळ सुमित्राच्या मनात घर करून होती. त्या वेळी त्यांच्या ‘स्त्री-वाणी’ संस्थेचं काम खेडोपाडी चालू होतं. त्यात त्यांना एक गोष्ट प्रकर्षांनं जाणवत होती. घरोघरी ‘नवऱ्यानं टाकलेल्या’ बायका होत्या. त्या ‘परित्यक्तांना’ ‘टाकलेली’ हाच शब्द होता. एकदा या बायकांनी राम आणि सीतेचं नाटक करून सीता ही कशी आद्य ‘टाकलेली’ बाई असं सिद्ध केलं होतं. वर मोर्चा नेऊन रामाला सीतेचा स्वीकार करायला लावल्याचंही त्या पथनाटय़ात दाखवलं. या ‘टाकलेल्या’ बाया अनेकदा गावच्या अनेक घडामोडींमध्ये पुरुषांच्या बरोबरीनं पुढाकार घेत. चांगल्या निर्भीड कार्यकर्त्यां, शिक्षिका बनत. नवऱ्याचा जुलूम आयुष्यातून गेल्यावर एक निराळंच तेज त्यांच्या व्यक्तिमत्त्वात येई-असं अभ्यासकांना दिसून यायचं.

या सगळ्यांतून सुमित्राच्या मनात कथा तयार होत गेली- सीता या सतरा-अठरा वर्षांच्या, ‘नवऱ्यानं उगीचच टाकलेल्या’ मुलीची. ही सीता आई-बाप आणि दोन भाऊ अशा कुटुंबात परत येऊन मानहानीचं आणि निमूट कष्टाचं जिणं जगते आहे. एका अंगणवाडी चालवणाऱ्या संस्थेच्या बाईचं बोलणं तिच्या कानावर पडतं आणि ती चोरून सायकल शिकायचं ठरवते. ही गोष्ट. सुमित्राची संहिता लिहून झाली तसं लक्षात येत गेलं की सीतेचं सायकल चालवणं ही एक कृती नाही आहे तर ती एक बंडखोरीची प्रतिमा आहे. घरात एक सायकल आहे पण ती सीतेच्या मोठय़ा भावाची. तो शहरात कामावर. घरात अशिक्षित वहिनी. घरातली सायकल ही ‘प्रॉपर्टी’ सीता या मधल्या बहिणीला सोडून धाकटय़ा भावाकडे जाते. तो छोटा असून ती उंच सायकल दामटत असतो. सीता गोवऱ्या थापत असताना शेणात सायकल घालून तिच्या तोंडावर शेण उडवत असतो. सीतेच्या हातात सायकल येणं ही मालकी हक्क, स्वातंत्र्य, तंत्रज्ञान, मुक्त संचार या सगळ्यावर तिनं ताबा मिळवण्याचं प्रतीक बनलं.

पण हे सगळं चित्रपटाच्या भाषेत सांगायचं कसं? त्या वेळी मी ‘ओझू’ या जपानी दिग्दर्शकाच्या प्रेमात पडलो होतो. ओझू-आजोबा कधीच कॅमेरा हलवत नाहीत. त्यांच्या फ्रेम्स पूर्णपणे स्थिर असतात. त्यामुळे त्या दृश्याला एक वेगळाच ठहराव येतो. सीतेचं आयुष्य हे दररोज त्याच त्याच अनुभवांतून जाणारं आहे- म्हणून तर चाकोरी (सायकल) हे फिल्मचं नाव! मग ते दर्शवणाऱ्या फ्रेम्सदेखील तशाच  केल्या तर? सुमित्राला मुघल मिनिएचर चित्रशैली खूप आवडते. तिला त्यातला द्वि-मितीचा परिणाम हा वास्तववादी शैलीपेक्षा आगळा म्हणून आवडतो. तिला सीताच्या चाकोरीबद्ध जीवनक्रमात त्याच त्या स्थिर दृश्य चौकटी वापरण्यामध्ये मुघल चित्रशैलीचा आनंद मिळेल असं वाटलं. आम्ही ‘रांझे’ या खेडेगावात चित्रीकरण करण्यासाठी म्हणून गेलो तेव्हा त्या गावातल्या गल्ल्या-बोळ, मंदिर, पायऱ्या, नदीकिनारा, घरं, भिंती, कौलारू छप्परांचा नकाशा या सगळ्याकडे आता केवळ कथानकाला सोयीची ठिकाणं शोधणारे म्हणून न पाहता दृश्य-चौकटी किंवा खरं तर दृश्य-प्रतिमा शोधणारे दिग्दर्शक म्हणून जागेपणे पाहायला लागलो. आम्हाला हे कळत होतं की, जे आमच्या मनात आहे ते लॉजिक धरून प्रेक्षक चित्रपट बघणार नाहीत. त्या दृश्य-चौकटी प्रेक्षकाला एका कथानकाकडे घेऊन जाणार आहेत. प्रेक्षक घटनेचाच आनंद लुटणार आहे पण त्याच्या नेणिवेमध्ये आमचे प्रयत्न शिरतील आणि त्याचा अनुभव समृद्ध करतील. आमच्या कुवतीनुसार आम्ही माध्यमशोधाच्या नव्या प्रवासाला निघालो होतो. चित्र-शैलीचा शोध हा दिग्दर्शकासाठी फार अमूर्त असतो. एखादी घटना दाखवताना हीच चौकट का निवडली याचं शास्त्रीय कारण प्रत्येक दिग्दर्शक देईलच असं नाही, पण त्याच्या मागची स्फूर्ती त्यानं-तिनं अनुभवलेली असते. किंबहुना या सगळ्याचे निर्णय घेणं म्हणजेच दिग्दर्शन हे आम्ही शिकत होतो.

आम्ही चित्रीकरणासाठी जे घर निवडलं ते होतं एका एकत्र कुटुंबचं. ज्या भागांवर घरातल्या पुरुषांचा मालकी हक्क होता, ते हो-नाही करताना पाहून एका भागाची विधवा मालकीण पुढे आली आणि तिनं तिचं घर देऊ केलं. इतकंच काय सीतेच्या आईची छोटी भूमिका करायला तयार झाली. सीतेचं सगळं कुटुंब एका वरातीला जायला निघतं त्या प्रसंगात त्या विधवा बाईंनी चित्रीकरणापुरतं कुंकूही लावलं. या साध्या पण बंडखोर बाईंनी काही अनपेक्षित ओव्या गाऊन दाखवल्या. माझा नवरा मला गोतानं निवडून दिला- मी नाही निवडला, पण आता मी माझ्या भावाला गुरू केलं- तो मात्र मी निवडलाय.. असं म्हणणारी ओवी ही आमच्या सीतेचीच गोष्ट सांगत होती. आम्ही ती शीर्षकाला वापरली. आमची सीतासुद्धा धाकटय़ा भावाला शेत-मजुरीतला एक-एक रुपया वाचवून ‘लाच’ देते आणि चोरून सायकल शिकते. आपली संहिता खऱ्या माणसांमध्ये सापडू लागणं ही किती आनंददायी आहे.

सुमित्रानं यात प्रसंग लिहिला होता.. सीता गावच्या एका तथाकथित ‘मॉड’ जोडप्याला सायकलवर ‘डबल-सीट’ जाताना पहात असते. एके दिवशी तिला दिसतं की आपणही असे डबल-सीट जातो आहोत. स्वत:कडेच वळून पाहतो आहोत. पण नवरा म्हणून ती दुसऱ्या कोणाला मनात तरी कसं आणणार? त्यामुळे ‘आपोआप’ चालणाऱ्या सायकलवर फक्त कॅरियरवर बसलेली सीता असं दृश्य ठरलं. लिहिणं सोपंय! करायचं कसं? आम्ही काही स्पेशल इफेक्ट करू शकणार नव्हतो. मग सुचलं- की संकलनाचं तंत्र हेच ती जादू करायला पुरेसं आहे. गरिबीतून सुलभ आणि शुद्ध तांत्रिक उपाय सापडत होते. लक्षात आलं की फक्त कॅरियरवरची सीता, फक्त फिरणारे पायटे, फिरणारी चाकं, रिकामी सीट, आपोआप सरकणारं हँडल अशी दृश्यं स्वतंत्रपणे चित्रित करून जोडली तर विना-चालक सायकलचा आभास निर्माण करता येईल. दृश्य एकमेकांना जोडली की ती सलगतेचा आभास निर्माण होतो ही तर या तंत्राची खरी ताकद. मग कशाला हवेत स्पेशल इफेक्ट्स? आणि संकलनाच्या टेबलवर हे खरंच जमलं.

शेवटचा प्रसंग आहे.. सीताला प्रोत्साहन देणारी मैत्रीण तिला अचानक गावासमोर सायकल चालवायला भाग पाडते आणि समोर ठेवलेल्या पुरुषी, दांडा असलेल्या सायकलवर साडी नेसलेल्या अवस्थेत पाय टाकत सीता ती सायकल सर्वासमोर चालवते.. आणि तिच्या पायातलं पैंजण गळून पडतं! ही घटना जणू काळ थांबवून धरणारी आहे. एकेक कृती महत्त्वाची मानून हा प्रसंग वास्तवाच्या पलीकडे न्यायला हवा.. मग आम्ही पाऊल, सायकलची दांडी, पैंजण पडणं, सीतेचा चेहरा या सगळ्यांची स्लो-मोशनमध्ये दिसणारी दृश्य-मालिका जेव्हा चित्रित केली आणि संकलनाच्या टेबलावर लावून पाहिली तेव्हा आपलं मनातलं दर्शन पडद्यापर्यंत नेता येण्याचा दिग्दर्शकाचा मोठ्ठा आनंद आम्ही अनुभवाला..

हे पैंजण पडल्यावर सीता सायकलवर मुक्तपणे विहार करत पार गावाबाहेर निघून जाते.. आकाशाकडे..! घटनेतून, शब्दांतून प्रेक्षकाला ठोस शेवट ‘सांगत’ बसण्याचा उद्योग न करता सीतेच्या या शेवटच्या सायकल चालवण्यातून तयार होणाऱ्या अमूर्त अनुभवातून जो शेवट व्यक्त होतो-तोच आम्ही करायचं ठरवलं. आणि हेही ठरवलं की, इतका वेळ बंधनात असणारा कॅमेराही आता मुक्त हालचाल करू लागतो.

या चित्रीकरणाच्या दिवशी भयंकर गडगडाटी पाऊस येऊन आमचं चित्रीकरण कोलमडलं. झालेल्यावर मारून नेऊ असं न करता आम्ही शेवटचा सायकल प्रवास दीड महिन्यांनी पुन्हा चित्रित केला. गरीब निर्मात्याला पुन्हा चित्रीकरण हे दु:स्वप्न असतं. तरी आम्ही ते करायचं ठरवलं. आणि पुन्हा त्या भागात गेलो तर काय! हिरवळ, डोलणारी शेतं, वहाणारे झरे.. नवी सृष्टीच होती समोर आणि त्याबरोबर मुक्त हलणारा कॅमेरा.. आज दिसणारा ‘चाकोरी’चा शेवट पाहताना मला त्या ‘रि-शूट’चे आभार मानावेसे वाटतात.

‘चाकोरी’ आम्ही खेडो-पाडी अनेक बायांना दाखवली. विना-चालक सायकल जादूने चालताना त्यावर डबलसीट बसलेल्या सीतेला पाहून किती बायका भारावलेल्या मला आठवतात. ‘ते पैंजण’ पडताना पाहून खूप तरुण मुलींनी श्वास रोखलेले मी पहिले आहेत. बोलकी दृश्य-प्रतिमा ही काही तरी क्लिष्ट गोष्ट नसून ती एक भिडणारी प्रगल्भ भाषा होऊ शकते हा आत्मविश्वास आम्हाला मिळाला. एका आदिवासी मेळाव्यात एक म्हातारी बाई शेकडो लोकांसमोर पुढे येऊन म्हणाली- ‘‘खूप वरीस हिते येऊन बोलायचा होता.. हिम्मत नवती.. या पोरीला पायलं.. आता मी बोलनार..’’ सगळे म्हणाले- ‘‘बोला.. बोला..’’ त्यावर ती म्हणाली- ‘‘बस. येवडाच बोलायचा होता..’’ त्या तुटलेल्या बेडीची प्रतिमा तिला उमजली होती!

शहरी मुली ‘चाकोरी’ बघून म्हणायच्या, ‘खरंच, किती अवघड आहे या खेडेगावातल्या मुलींची परिस्थिती.’ मग आम्ही त्यांना विचारायचो, ‘तुमच्या घरी गियरचं वाहन कोण चालवतं? तुम्ही का भाऊ ? आई-वडील कोणकोणती वाहनं चालवतात?’ मग हळूहळू शहरी सक्षमीकरणाचे फसवे मूल्यांक गळून पडायचे.

आम्ही जवळजवळ १३ आंतरराष्ट्रीय महोत्सवात ‘चाकोरी’ दाखवली. इटली मधल्या एका महोत्सवात एक फ्रेंच दुभाषी म्हणाली, ‘‘मी मुद्दाम तुमची फिल्म भाषांतर करण्यासाठी मागून घेतली. ते तुटलेलं पैंजण मला फार आवडलं.’’ मी म्हटलं, ‘‘ ते त्या पोरीच्या स्वातंत्र्याचं प्रतीक आहे..’’ ती उत्तरली, ‘‘तिच्या नाही रे ठोंब्या, आमच्या सगळ्यांच्या स्वातंत्र्याचं प्रतीक आहे!’’

sunilsukthankar@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 23, 2019 12:07 am

Web Title: story of sumitra bhave
Next Stories
1 एक खिडकी स्वत:ची..
2 सत्य स्वीकारणे अवघड
3 हवे तेवढे खुशाल खेळा..
Just Now!
X