लग्न झाल्यानंतरच्या २५ वर्षांच्या काळात सुवर्णाची २१ वर्षे नवरा, सासू, सासरे यांची रुग्णसेवा करण्यातच गेली. कुठेही मौज नाही, मजा नाही. जबाबदारी, फक्त जबाबदारी. आज ती पन्नाशीची आहे. तरीही प्रफुल्लित दिसते. सुवर्णाला, तिच्या त्यागाला, सेवेला, धैर्याला ‘जागतिक कुटुंबदिनाच्या निमित्ताने शतश: प्रणाम!’
मध्यंतरी एका वृत्तपत्रात ‘बहुरानीला कंटाळून सासू-सासऱ्यांचा चोरीचा बनाव’ ही बातमी वाचली. ती एका उत्तर प्रदेशातल्या आमदाराची मुलगी आहे. ती सासू-सासऱ्यांकडे सारखी पैशांची, दागिन्यांची मागणी करीत असे. घरात ती सारखी दहशत, धमक्या देणे प्रकार करीत असे. खरेच स्त्रीच स्त्रीची शत्रू आहे असे वाटते. घरातील सगळ्या पुरुष, स्त्रियांनी एकमेकांना समजून घेतले तर प्रत्येक कुटुंब हे सुखी कुटुंब राहील. ‘एकमेका साहाय्य करू अवघे धरू सुपंथ’ या उक्तीप्रमाणे कुटुंबाचे आरोग्य, स्थैर्य, समतोलपणा राखण्याचे काम पुरुष व स्त्री दोघांचेही आहे. काही करिअरिस्ट स्त्रिया हे उत्तम प्रकारे सांभाळतही आहेत. त्यातलीच ही एक स्त्री. तिच्या त्यागाची, हिमतीची कहाणी. लग्नानंतरच्या एकूण २५ वर्षांपैकी २१ वर्षे तिने कुटुंबाच्या रुग्णसेवेतच घालविली. तेही नोकरी सांभाळून. तिचे नाव सुवर्णा.
सुवर्णा मूळची नागपूरची. एम.एस्सी स्टॅटिस्टिकमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतलेली. राष्ट्रीयीकृत बँकेत नोकरी. मध्यमवर्गीय कुटुंब तिचे. नोकरी लागल्यावर तिचे १९८६ मध्ये लग्नही झाले. पती इंजिनीअर. आयआयटी पवईमधून पदव्युत्तर शिक्षण घेतलेला होता. उमदा. हसतमुख. लग्न झाले तेव्हा तो जळगावला एका कंपनीत होता व ही नागपूरला दोन वर्षे. दोघांचे नागपूर-जळगाव सुरू होते. पतीपण मूळचा नागपूरचाच असल्यामुळे शक्य झाले. नंतर दोघेही मुंबईला आले. त्याने कंपनी बदलली व हिची बदली झाली. सुखाचा संसार सुरू झाला. त्यातच त्यांना कन्यारत्नही झाले. मुलीला सांभाळायला दोघांचेही आई-वडील आलटून पालटून येत असत. एकदा अविनाश पडला त्याच्या उजव्या हाताच्या अंगठय़ाला दुखापत झाली. होईल बरे म्हणून दुर्लक्ष केले. साधारणत: १९९१ साल होते ते. बरे एवढय़ावरच हे थांबले नाही तर तो ज्या कंपनीत कामाला होता तेथे त्याला प्रमोशन नाकारले. तो निराश झाला होता. त्याने दुसऱ्या कंपनीत नोकरी पत्करली. तिथे तो आनंदाने काम करीत होता. पण अंगठय़ाचे दुखणे कमी होत नव्हते. त्याला लिहिताना त्रास व्हायचा. तपासण्या झाल्या. सगळे रिपोर्ट नॉर्मल होते. पण कुठेतरी चुकत होते. अविनाशच्या कामात गडबड होत होती. एके दिवशी त्याच्या बॉसने सुवर्णाला ऑफिसमध्ये बोलावून घेतले. बॉसने सुवर्णाला विचारले, ‘‘घरी काही टेंशन आहे का? अविनाश हुशार आहे मग असे का?’’ नंतर कळले की त्याला ‘एन’ हे अक्षर लिहिताच येत नव्हते. इतके दिवस तो लिहीत होता आणि आत्ताच काय झाले? सुवर्णाने त्याला मानसोपचार तज्ज्ञाकडे नेले. औषधे सुरू झाली. दोन-तीन वर्षांची मुलगी, नोकरी, सगळी तारेवरची कसरत सुरू होती. दोन वर्षे औषध घेऊन काहीही फायदा नव्हता. दिवसेंदिवस विसरणे वाढत चालले होते. एका परिचिताच्या सांगण्यावरून तिने त्याला जसलोक हॉस्पिटलमध्ये दाखविले. सगळ्या तपासण्या झाल्या. सगळे रिपोर्ट्स नॉर्मल. मग डॉक्टरांनी सांगितले की त्याच्या मेंदूचे व हाताचे नीट कोऑर्डिशन होत नाही. होईल बरे. त्यांनी औषधे सुरू केली. योगा, व्यायाम सगळे करायला सांगितले. सगळे सुरू होते. नोकरी सुटली होती अविनाशची. सुवर्णाला वाटले आता बरे वाटेल त्याला. पण कशाचे काय, अविनाशचा आजार वाढतच होता. त्याला स्वत:चे नावही आता सांगता येत नव्हते. फक्त ओळखीच्या रस्त्याने जिमला जाणे व त्याच रस्त्याने येणे एवढे मात्र समजत होते. सुवर्णा नवीन युगातली असूनही देवधर्म, कुळाचार सगळे सगळे करीत होती. नोकरीही सुरूच होती. तिच्या मदतीला नागपूरहून तिचे सासू-सासरे आले. एक मामेदीरपण शिकायला होता. एक बेडरूमचा फ्लॅट तो. सासूबाई घर मुलगी बघायच्या, तर सासरे दुपारी अविनाशकडे लक्ष द्यायचे. मुलाच्या या विचित्र दुखण्याने सासूबाई तर खचल्याच होत्या. अविनाशला फक्त घर आणि जिमचा रस्ता एवढी ओळख होती. एकदा तो जिममधून येताना हरवला. त्याला स्वत:ची ओळख नाव सांगता येत नव्हते तर शोधणार कसे. सुवर्णाची नुसती धावपळ झाली. सकाळपासून संध्याकाळपर्यंत नुसती फोनाफोनी झाली. पोलीस तक्रार झाली. जिममधून निघाला हे सरांनी सांगितले होते. शेवटी जिमच्या सरांचा मुलगा एका भागात कामाच्या निमित्ताने गेला होता. तिथे एका दगडावर अविनाश बसलेला होता, मलूल होऊन. उन्हाळ्याचे दिवस होते ते. त्या मुलाने ताबडतोब आपल्या वडिलांना फोन करून बोलाविले व त्या दोघांनी अविनाशला घरी आणून सोडले. आता अविनाशचे बाहेर जाणे बंद झाले. जिम, योगा सुरू होते पण फायदा काहीच होत नव्हता. हळूहळू अविनाश अंथरूणाला खिळला. डॉक्टरांनी सांगितले की, त्याला ‘अल्झायमर डिमेन्शीया’ झाला आहे. औषधे सुरूच होती. सुवर्णाचा हा कसोटीचा काळ होता. ५-६ वर्षांची मुलगी, तिची शाळा, सासुबाई थकल्यामुळे घराचीही जबाबदारी. ती घरासाठी शक्तिरूपिणी, आरोग्यरूपिणी स्त्री होती. तिच्या दोन हातात जगदंबेच्या आठ हातांचे बळ आले होते. देवीच्या कृपेने, दुपारी नोकरी, रात्री अविनाशची सेवा असे सुरू होते. त्याला खाणे-पिणे, नैसर्गिक विधी यांचेही भान नव्हते. ती ऑफिसमधून आली की त्याला खूप आनंद व्हायचा. कारण तो तिला व मुलीलाच ओळखायचा. ती त्याची पत्नी नसून आई झाली होती. त्यावेळी डायपर पण फारसे माहीत नव्हते. शेवटी जानेवारी २००३ मध्ये अविनाशचे जास्त झाले. अमेरिकेहून त्याचा लहान भाऊ त्याला भेटायला आला. सुवर्णाने त्याला सासूबाईना या वातावरणातून २ दिवस चेंज म्हणून नागपूरला न्यायला सांगितले. इकडे दीर व सासूबाई विमानतळावर पोहोचल्या होत्या तेव्हाच इकडे अविनाशने २९ जानेवारी २००३ ला शेवटचा श्वास घेतला. सुवर्णाचा १७ वर्षांचा संसार संपला. त्यात १२ वर्षे नवऱ्याचे आजारपण. तेवढय़ाने सुवर्णाचे कष्ट संपलेले होते का? मुळीच नव्हते. आता सासूबाईपण अंथरूणाला खिळल्या. दिवस- रात्रीची बाई ठेवण्याइतकी परिस्थिती नव्हती. त्यांचेही तिलाच करावे लागत होते. पुन्हा तेच चक्र. दिवसभर नोकरी, रात्री सासूबाईंची सेवा, सासरे पण थकत चालले होते. एवढय़ा सगळ्या संकटातही तिच्या मुलीची शैक्षणिक प्रगती सुरूच होती. तिचे दहावी, बारावी झाले व उत्तम गुण मिळवून ती इंजिनीअरिंगला गेली. मुळात मुलगी हुशारच. कुठल्याही परिस्थितीचा तिने बाऊ केला नाही. सुवर्णानेही आता ऑफिसरचे प्रमोशन घेतले होते. ऑफिसमधली जबाबदारीही वाढली होती. तरीही आई-मुलीने धैर्याने ते पेलले. तीन वर्षांच्या आजारपणानंतर २००६ मध्ये वटसावित्रीच्या दिवशी सासूबाईंचे निधन झाले. सुवर्णा थोडी मोकळी झाली खरी, पण तोपर्यंत सासरेही थकले होते. आता तिने त्यांच्यासाठी दिवसभराची बाई ठेवली होती. इकडे सुवर्णाचेही वय पंचेचाळीस-पन्नाशीच्या टप्प्यात आले होते. ऑफिसमधून आल्यावर सासऱ्यांचे सगळे करणे, रात्री पुन्हा त्यांच्यावर लक्ष ठेवणे हे सुरूच होते. एव्हाना मुलगी इंजिनीअर होऊन पुण्याला बहुराष्ट्रीय कंपनीत नोकरीला लागली होती व सासरे जून २०१२ ला वार्धक्यामुळे वारले. सुवर्णा आता घरात एकटीच होती. लग्न झाल्यानंतरच्या २५ वर्षांच्या काळात तिची २१ वर्षे नवरा, सासू, सासरे यांची रुग्णसेवा करण्यातच गेली. कुठेही मौज नाही, मजा नाही. जबाबदारी, फक्त जबाबदारी. आज ती पन्नाशीची आहे. तरीही प्रफुल्लीत दिसते. कुठेही तक्रार नाही. कांगावा नाही. ती म्हणते ‘‘जे घडायचे असते ते घडत असते, फक्त निमित्त मात्र हवे असते.’’ आज स्वत:च्या स्वार्थासाठी आपल्या आई-वडिलांना बिनदिक्कतपणे वृद्धाश्रमात पाठविणाऱ्या मुला-मुलींसाठी हे सुंदर उदाहरण आहे. म्हणूनच काळाच्या कसोटीवर सुवर्णाप्रमाणे चकाकणाऱ्या सुवर्णाला, तिच्या त्यागाला, सेवेला, धैर्याला माझा ‘जागतिक कुटुंबदिनाच्या निमित्ताने शतश: प्रणाम!’