आम्ही सगळ्या जणी जेवायला बसलो की पहिलं लोणचंच वाढून घेतो. तो लाल भडक रंग, खारात मध्येच चमकणाऱ्या हिरव्या-पांढऱ्या फोडी आणि या सगळ्याला तेलामुळे आलेली हलकीशी चमक. बघूनच जीव अर्धा तृप्त होतो. आणि जेव्हा खाराचं बोट जिभेवर ठेवलं जातं त्या क्षणी तोंडातून फक्त ‘अहाहा’ असा उद्गार निघतो. एकदा का आपलं लोणचं चांगल जमलयं हे कळलं की मग चर्चा सुरू होते ती कसं बापटिणीच्या लोणच्यात मीठच जास्त होतं किंवा जोशिणीच्या लोणच्याला जरा रंग म्हणून नाही वगैरे वगैरे वगैरे..
शहरात आजकाल लोणचं वगैरे कोणी घरी करत नाही. लागेल तशी लोणच्याची बाटली विकतच आणतात, पण आमच्याकडे अजूनही गावाला आम्ही लोणचं घरीच करतो. लोणचं घालणं हा एक सोहळाच असतो आमच्याकडे.
माझं सासर तळकोकणातलं. तसं बघायला गेलं तर फेब्रुवारी महिन्यापासूनच कैरीचं ताजं लोणचं घालायला सुरुवात होते. पण बेगमीचं (साठवणीचं) लोणचं साधारणत: मे महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवडय़ात घातलं जातं. काही ठिकाणी पहिल्या पावसानंतरही हा घाट घातला जातो. मुळात आमचं खूप मोठं, एकत्र कुटुंब, त्यात गडीमाणसांची जेवणी खाणी घरात, पै-पाहुण्यांचा सतत राबता, सगळे सणवार, कु़ळाचार, त्यातच अधून मधून ‘वैनीनु, माका वाइच लोन्चा दी’ अशी कामगारवर्गाकडून होणारी मागणी, त्यामुळे लोणचं लागतंही खूप. तर ही त्या लोणच्याची कहाणी.
लोणच्यासाठी चांगल्या कैऱ्या देणारं माझ्या आजे-सासऱ्यांनीच लावलेलं रायवळ आंब्याचं झाड आहे. त्याची कैरी खूप आंबट असते आणि त्याची फोड ही खूप दिवस करकरीत राहते. हा आमचा आंबा इतका प्रसिद्ध आहे की, आजूबाजूच्या घरांतूनही याला मागणी असते. आमचं लोणचं घालून झाल्यावर, झाडावर कैऱ्या शिल्लक असतील तर आम्ही देतोही त्यांना. गावाकडे अशी देवाणघेवाण अजूनही चालते. तर अशा या आंब्याच्या कैऱ्या जेव्हा जून होतात तेव्हाच लोणचं घालण्याचा घाट घालता येतो.
लोणच्याची पूर्वतयारी करायला सुरुवात झालेलीच असते. विकतचा लोणच्याचा मसाला वापरणं ही आमच्यासाठी अशक्य कोटीतली गोष्ट आहे. मसाला आम्ही घरीच बनवतो. लोणच्याच्या मसाल्यासाठी लागणारे मुख्य पदार्थ म्हणजे तिखट, लाल मोहोरी, मेथीदाणे, हळद, हिंग, मीठ आणि तेल. लोणच्यासाठी लागणाऱ्या, उत्तम रंग असणाऱ्या मिरच्या शेतात मुद्दाम लावलेल्या असतात आणि त्या मिरच्यांचं लालभडक तिखट खास लोणच्यासाठी म्हणून वेगळं राखून ठेवलेलं असतं. लाल मोहोरी धुवून उन्हामध्ये चार दिवस कडकडीत वाळवून घेतात आणि लोणचं करण्याच्या आधी दोन दिवस कामवाल्या बाईच्या मदतीने ती वायनात म्हणजे उखळात कांडून तिची अगदी बारीक पूड करतात. मेथी दाणे आणि हळकुंड ही तेलात तळून त्यांचीही वायनात घालून पूड केली जाते. खास खडा हिंग आणला जातो आणि ते खडे तेलात तळून त्याची खलबत्त्यात पूड करतात. हे काम स्वत: जाऊबाई करतात कारण हिंगाची पूड करणे हे कौशल्याचे काम आहे. पूड अगदी बारीकही चालत नाही कारण बारीक केली तर फोडणीत जळते आणि जास्त जाडही चालत नाही कारण मग खडे तसेच राहतात म्हणून जाऊबाई हे काम दुसऱ्या कोणालाही देत नाहीत. मिठाच्या गोणीची आणि तेलाच्या डब्याची वाण्याकडे ऑर्डर दिली जाते. तुम्ही म्हणाल, ‘मिठाची गोण लोणच्यासाठी म्हणजे काय कारखाना वगैरे आहे की काय?’ दचकू नका, साधारण तीनशे-चारशे कैऱ्यांचं लोणचं सहज लागतं आम्हाला. म्हणूनच हा सगळा खटाटोप.
लोणचं कालवण्यासाठी खास लाकडी काथवट (मोठी लाकडी परात) आणि मोठा लाकडी कालथा आहे आमच्याकडे. कोणत्याही धातूच्या पातेल्यात नाही लोणचं कालवत. मिठाचा आणि आंबटाचा परिणाम होतो ना त्यावर म्हणून. ती काथवटही नेहमी वापरात नसल्याने माळ्यावरून खाली काढून स्वच्छ केली जाते. लोणचं ज्यात भरलं जातं त्या चिनी मातीच्या मोठय़ा-मोठय़ा बरण्या एकदा धुवून, पुसून, वाळवून ठेवल्या असल्या तरी परत एकदा खबरदारीचा उपाय म्हणून उन्हात ठेवून तापविल्या जातात. जुन्या धोतरांचे किंवा साडय़ांचे तुकडे बरण्यांना दादरे बांधण्यासाठी तयार ठेवतात.
एवढी तयारी झाली की एखादा त्यातल्या त्यात शुभ दिवस नक्की केला जातो. अमावस्येला वैगरे आमच्याकडे कधीच बेगमीचं लोणचं घातलं जाणार नाही. त्या दिवशी इतर काही जास्तीची कामं ठेवली जात नाहीत. तरी घरातल्याच १५-१७ माणसांचं जेवणखाण, चहा-पाणी ही कामं असतातच. आम्ही घरच्याच ६-७ जणी असल्यामुळे शेजारणींना आम्हाला मदतीला बोलवावं लागत नाही.    
त्या दिवशी पहाटेच जाऊबाई चूल पेटवतात आणि एका पातेल्यात तेलाचा डबा रिकामा करून ते पातेलं चुलीवर चढवून देतात. लोणच्याला फोडणी गार करूनच घालायची असते. तेलातून लाटा लाटा  यायला लागल्या की, तेल तापलं असं समजायचं हे जाऊबाईंच शास्त्रं. हे काम जोखमीचं म्हणून त्या स्वत: करतात  कारण तेल तापायच्या आधी मोहरी घातली तर फोडणी  खमंग होत नाही. एकदा तेल  तापलं की, त्यात क्रमाने मोहरी, हळद, हिंग आणि थोडे मेथीदाणे घालून फोडणी तयार करतात आणि गार करण्यासाठी बाजूला ठेवून देतात.
सकाळी कामगारवर्ग लोणच्यासाठी कैऱ्या उतरवायच्या कामाला रवाना होतो आणि आठ-साडेआठपर्यंत कैऱ्यांचं पहिलं ओझं घरात येतं. तो ताज्या नुकत्याच उतरवलेल्या कैऱ्यांचा हवाहवासा वाटणारा वास घरभर दरवळायला लागतो. मग आम्ही घरातल्या जास्तीत जास्त बायका कैऱ्या चिरायच्या कामाला लागतो. कामवाल्या बायकाही असतातच हाताशी. काही कैऱ्या जून पण अगदी छोटय़ा असतात त्या मुद्दाम वेगळ्या काढून ठेवतो. हे कशासाठी ते येईलच ओघाने. गप्पा मारत मारत हे काम चालतं. मुलं मधून मधून फोडींवर डल्ला मारत असतात पण आम्ही त्याकडे थोडा कानाडोळाच करतो, कारण एखादी फोड तोंडात टाकायचा मोह मोठय़ांना आवरत नाही तिथे लहानांची
काय कथा!
जेवणं झाली की, साधारण दुपारी दोन-अडीचच्या सुमारास देवाला नमस्कार करून प्रत्यक्ष कामास सुरुवात केली जाते. जी कोणी  लोणचं कालवणार असेल ती तिच्या हातातील बांगडय़ा उतरविते. शास्त्रापुरती एखादी ठेवते हातात. कारण भरपूर बांगडय़ा हातात असतील तर अरुंद तोंडाच्या बरणीत लोणचं भरणं अवघड जात ना म्हणून.
आम्ही एकदम सगळं लोणचं न कालवता एकेका बरणीच्या हिशेबाने कालवतो. एका बरणीसाठी किती फोडी, किती मीठ, किती मसाला याचं प्रमाण माझ्या एका सुगरण चुलत सासुबाईंनी तयार केलेलं आहे. त्या आता हयात नाहीत तरी प्रमाण त्यांचंच आहे. लाकडी काथवटीत प्रथम फोडी आणि नंतर क्रमाक्रमाने इतर सर्व जिन्नस घातले जातात. आमच्याकडच्या लोणच्याचं वैशिष्टय़ म्हणजे एका बरणीला एक तांब्या पाण्यात मोहोरीची
पूड घुसळून ते आम्ही लोणच्यात घालतो.
शेवटी फोडणी घालून परत एकदा ते सारखं केलं जातं आणि मग बरणीत भरलं जातं. भरताना त्या जून छोटय़ा कैऱ्या न चिरता तशाच  एकेका बरणीत सात-आठ तरी घालतोच. मुरल्यानंतर त्या चवीला अप्रतिम लागतात. शेवटी बरणीचं झाकण अगदी घट्ट लावून त्यावर दादराही घट्ट बांधायचा आणि बरणीची रवानगी फडताळात करायची. आणि त्यावर तुळशीचं पान ठेवून द्यायचं.
मुंबई, पुण्यात असणाऱ्या लेकी सुनांसाठी प्लॅस्टिकच्या बरण्या भरल्या जातात. शेजाऱ्यांसाठी वाडगे भरले जातात. कामगारवर्गासाठी ही प्लॅस्टिकच्या पिशव्या भरल्या जातात. पूर्वीच्या काळी जेव्हा प्लॅस्टिक नव्हते तेव्हा लोणच्याच्या देवाण-घेवाणीसाठी आम्ही नारळाच्या करटय़ांचा (करवंटी) सर्रास उपयोग करीत असू. एक तर कोकणात नारळ भरपूर आणि त्यात आमच्या कोकणस्थांच्या करवंटय़ा अगदी साफ आणि स्वच्छ. एक कण खोबऱ्याचा काय राहील तिला!  हे अगदी इकोफ्रेंडली होतं असं मला वाटतं. पण आता प्लॅस्टिकच्या जमान्यात हे मागे पडलं.
रात्री जेवताना पुरुषांकडून जेव्हा पसंतीची पावती मिळते तेव्हा सगळ्या श्रमांचं चीज झाल्यासारखं वाटतं. अगदी दोन वर्षांच्या लहानग्यालासुद्धा वरण-भाताबरोबर त्या दिवशी कौतुक म्हणून पुसटसं लोणच्याच्या खाराचं बोट चाटवलं जातं. ते छोटं बाळही ‘हाय हाय’ म्हणतं पण हातानं ‘छान छान’ अशी खूण करतं तेव्हा जाऊबाईंच्या चेहऱ्यावर एक वेगळंच समाधान दिसतं. थोडय़ा मोठय़ा मुलांचा निराळाच उद्योग. पानातल्या फोडी धुवायच्या आणि मग जेवण झाल्यावर झोपाळ्यावर बसून त्या गप्पा मारता मारता मिटक्या मारत खायच्या. आम्ही बायका जेवायला बसलो की, पहिलं लोणचंच वाढून घेतो. तो लालभडक रंग, खारात मध्येच चमकणाऱ्या हिरव्या-पांढऱ्या फोडी आणि या सगळ्याला तेलामुळे आलेली हलकीशी चमक. बघूनच जीव अर्धा तृप्त होतो आणि जेव्हा खाराचं बोट जिभेवर ठेवलं जातं त्या क्षणी तोंडातून फक्त ‘अहाहा’ असा उद्गार निघतो. त्या दिवशी जेवताना फक्त लोणचं हाच विषय असतो गप्पांसाठी. एकदा का आपलं लोणचं चांगलं जमलंय हे कळलं, की मग चर्चा सुरू होते ती, कसं बापटिणीच्या लोणच्यात मीठच जास्त होतं किंवा जोशिणीच्या लोणच्याला जरा रंग म्हणून नाही वगैरे वगैरे. आणि समेवर येताना प्रत्येक वेळी, ‘आपलं कसं मस्त झालयं’ हे ठरलेलं.
रात्री अंथरुणाला पाठ टेकली की दिवसभरच्या श्रमामुळे शरीर थकल्याचं जाणवतं, पण लोणचं सगळ्यांना आवडलं हे समाधान खूप मोठं असतं. या समाधानाच्या गुंगीतच कधी झोप लागून जाते कळतही नाही, अशी ही साठा उत्तराची लोणच्याची कहाणी पाचा उत्तरी सफळ संपूर्ण.