राजन गवस

उच्चविद्याविभूषित, पदवीधर मुलांना आपले आई-बाप मरमर मरताहेत याविषयी काहीच न वाटता ती आपल्या करिअरचाच विचार केंद्रस्थानी ठेवून कशी काय जगू शकतात? त्यांच्यात हा संवेदनाशून्य भवितव्याचा विचार पेरला कुणी असेल? त्यांना भुकेने व्याकूळ, दारिद्रय़ाने पिचलेले आपले पालक न दिसता फक्त आपले करिअर आणि आपले ईप्सित एवढेच कसे काय दिसते? खूप विचार करत राहिलो. अनेक गोष्टी धुंडाळल्या. तेव्हा ध्यानात आले. संवेदना, भावना, आपुलकी, माया, ममता, जिव्हाळा या साऱ्याला आता शिक्षणात अवकाशच कुठं उरला आहे?

रात्री दहा वाजता समीरचा फोन आला. तुम्ही म्हणणार कोण हा समीर? तो कोणीही असू शकतो. तुमच्या माझ्यासारखा. तो ‘एलआयसी’ मध्ये मोठय़ा पदावर आहे. जास्त संवेदनशील, त्यामुळे सततच मला त्याची काळजी वाटत आलीय. त्यात त्याला त्रासलेले असते आततायी विचारसरणीने. म्हणून काळजी अधिक. भावनाशील, अत्यंत हळवी, शीघ्र, तरल अशी माणसं अशा सापळ्यात अडकत असतात नेहमी. म्हणून त्याचा कोणत्याही वेळी आलेला फोन मी टाळत नाही. फक्त काळजीपोटी.

फोन उचलला, की तो त्याच्या विचारव्यूहांबाबत बोलत असतो मोकळेपणाने. नागरी समस्येबाबत होत असतो हळवा. भारतीय नागरिक असण्याचे सर्व गुण आहेत त्याच्याकडे. मला त्याचे व्यक्तिचित्र रेखाटायचे नाही. तर त्याचा फोन आला. म्हणाला, ‘सर त्या अमुक तमुकला ओळखता का?’ थोडा ताण दिल्यानंतर आलं लक्षात. तो त्याच्यासारखाच त्याच्या विचाराने काम करणारा. पण पुढे फारसं काही करू न शकलेला. म्हटलं, ‘काय झालं त्याचं?’ तर त्यानं सुरू केलं, तो अत्यंत अडचणीत आहे. त्याचे दोन्ही गुडघे झाले आहेत निकामी. आता त्याच्याकडून काहीच नाही होत. त्याला दोन मुले आहेत. दोन्हीही उच्चशिक्षित. एक कॉम्प्युटर इंजिनीअर तर, दुसरा मेकॅनिकल इंजिनीअर. बुद्धिमान आहेत दोघेही. थोरल्याचा परवाच जॉब गेलाय. दुसरा अभ्यास करतोय पुण्यनगरीत. आता घराचं काहीच चालणं शक्य नाही, म्हणून त्यानं मला फोन केला. दोन एक एकर जमीन आहे त्याला. पण जमिनीतून काहीच नाही यायला तयार. आता प्रश्न निर्माण झालाय पोटापाण्याचा. तो म्हणतोय, काही तरी मार्ग सुचव. काय त्याला मार्ग सुचवू?

हा समीरचा प्रश्न. क्षणभर थबकलो. म्हटलं, याला काय सुचवता येईल मार्ग? पण काहीच सुचायला तयार नव्हतं. दोन्ही मुलं पदवीधर. तरीही बापाला प्रश्न पडतो. आपण करायचं काय? समीर वेगवेगळ्या पर्यायांबाबत माझ्याशी बोलत होता. त्याच्या थोरल्या मुलाला त्यानं कुठं तरी शहरात पाच-सहा हजार रुपयांची नोकरी बघितल्याचे तो सांगत होता, पण ती नोकरी मुलाला पसंत नाही. त्याचं म्हणणं, अमुक इतका पगार मिळाला, तरच मी नोकरी करेन, अन्यथा नाही. कारण, पुढे नोकरी शोधताना मागच्या नोकरीचा पगार विचारतात. निरागसपणे हे सगळे समीर सांगत होता आणि पुन्हा मला विचारत होता, यातून पर्याय काय? त्याचा बाप जमिनीतून काहीच उत्पन्न आले नाही, यामुळे हतबल आहे. दोन्ही मुले उत्तम शिक्षण घेऊन मोकळी आहेत. अशा वेळी करावे काय? समीर ती जणू काही आपलीच समस्या आहे, अशा आत्मभावाने मला सांगत होता आणि पुन:पुन्हा ‘यातून मार्ग सुचवा,’ असेही म्हणत होता.

दोन्हीही मुले इंजिनीअिरगची पदवी प्राप्त केलेली आहेत आणि बाप अन्नाच्या शोधात आहे. ‘मुलांना कसं जगवावं?’ हा बापाच्या डोक्यातील तगमग करणारा प्रश्न आहे. तो पर्याय शोधतो आहे आणि त्याला पर्याय दिसत नाही. म्हणून तो आपल्या मित्राला सतावतो आहे. तर, बधिर झालेला त्याचा मित्र मला सतावतोय. काय द्यावे या सगळ्याला उत्तर? या प्रश्नाच्या चक्रव्यूहात गुंतून गेल्यानंतर मी त्याला त्याच्यासमोरचे पर्याय विचारले. तर त्याने त्याच्या उपजीविकेसाठी एखादी म्हैस घेऊन देऊ, भाजीपाल्याचे दुकान उघडून देऊ, असे अनेक पर्याय माझ्यासमोर ठेवले. ज्याचे दोन्हीही गुडघे कामातून गेलेले आहेत अशा माणसाला हा व्यवसायाचे पर्याय सुचवतो आहे आणि त्या सगळ्या विचारशृंखलेतून त्या दोन्ही मुलांना तो वगळतो आहे. याचे अजबच वाटून गेले. माझा भूतकाळ चटकन् माझ्यासमोर उभा राहिला. सात गावांना जमीन असणारे आम्ही जमीनदार. बापाच्या बापाने घरातून हाकलल्यानंतर बेघर तर झालोच आणि उपलानीही झालो. ना जमीन, ना घर अशी आमची अवस्था असताना आई-बापानं सरकारी जागेत चार कुडाचा मांगर उभा करून संसार थाटला. पडेल ते काम करण्याची तयारी दर्शविली. आम्हाला शिकविण्याची ऐपत नसताना शिकवलं. जेव्हा सारेच थकले तेव्हा मामाच्या वळचणीला नेऊन टाकले. त्या वेळी भाऊ जुन्या अकरावीत शिकत होता. त्यानं लवकर कमावतं व्हावं म्हणून कारकुनाची अर्हता प्राप्त व्हावी यासाठी टायिपग वगैरे उद्योग शिकून घ्यायला सुरुवात केली. त्या वेळी मला काहीच कळत नव्हतं. पण दहावीला आल्यानंतर ध्यानात आलं. आपल्याला काहीही करून कमवतं झालं पाहिजे. त्याशिवाय तरणोपाय नाही. दहावीनंतर कशीबशी दोन वर्ष पार केली आणि कमवता झालो. या वेळी आपले भवितव्य, आपल्या आकांक्षा, आपल्या इच्छा, असे काहीच नव्हते. फक्त आपल्या घरातील लोक सुखाने जगायचे असतील तर आपण कमावते झाले पाहिजे, एवढीच एक आकांक्षा. सुदैवाने ती पूर्ण झाली आणि वयाच्या अठराव्या वर्षीच मला काही मिळवता आले. यातून मार्ग निघत गेले आणि आमच्या दारिद्रय़ाचा उतरता काळ सुरू झाला. सहजपणे या सर्वावर मात केली. असे सारे आठवताना त्या उच्चविद्याविभूषित मुलांचे चेहरे माझ्यासमोर उभे राहिले.

आपला बाप अगतिक होऊन गेलाय. त्याला काहीही कमवता येत नाही. असे माहीत असूनही ही दोन्ही मुले अशी का वागत असावीत? असा प्रश्न अचानक माझ्यासमोर उभा ठाकला. त्यांच्या बापाला आपल्या मुलाला आपली वास्तव परिस्थिती समूजन देण्यात अपयश आले असेल का? आपल्या घरातील दैन्य, दारिद्रय़ त्यांच्या उघडय़ा डोळ्यांना दिसत नसेल का? थकलेला बाप, अगतिक आई, यांचा चेहरा त्यांना अस्वस्थ करत नसेल का? असे सारे माझ्या मनातले प्रश्न आमच्या मित्रासमोर मी ठेवले. तर तो निर्वकिारपणे म्हणाला, ‘‘त्यांना या साऱ्याशी काहीही देणे घेणे नाही. उलट, त्यांचे आजचे म्हणणे असे आहे, की बापाने वडिलोपार्जति जी जमीन वाटय़ास आली आहे ती विकावी आणि आम्हाला पसा पुरवावा. यात घालमेल होते आहे ती फक्त त्या बापाची. त्याचं म्हणणं, मी जर ती जमीन कमावली असती तर मी ती सहजी विकूनही टाकली असती. ती वारसा हक्काने माझ्याकडे आलेली आहे. ती विकणारा मी कोण. पुढच्या पिढय़ांच्या हातात ती आहे तशी सुपूर्द करणे एवढीच माझी जबाबदारी. याशिवाय या वयात मी करू शकतो ते फक्त श्रम. जमले नाही जमले तरी ते मला करावेच लागतील. कारण, या मुलांना मी जन्म दिलाय. त्यांचे व्यवस्थित होईपर्यंत जे काही करावे लागेल ते मला करणे भाग आहे.’’ समीर आपल्या शब्दांत त्या बापाची स्वगतं माझ्यासमोर ठेवत होता आणि मला पुन्हा पुन्हा म्हणत होता, आपण त्याला एक म्हैस घेऊन द्यावी म्हणतोय, हे चूक का बरोबर. माझ्या अल्पबुद्धीनुसार मी त्याला ‘हे चूक आहे,’ असे सांगून टाकले आणि ‘तुला कोरडे होता येत नाही,’ असाही ठपकाही त्याच्यावर ठेवला. नि:शब्द होऊन आमचा हा मित्र संवाद थांबवून अबोल झाला.

त्यानंतर माझ्या डोक्यात तिसरेच काही सुरू झाले. उच्चविद्याविभूषित, पदवीधर मुलांना आपले आई-बाप मरमर मरताहेत याविषयी काहीच न वाटता ती आपल्या करिअरचाच विचार केंद्रस्थानी ठेवून कशी काय जगू शकतात? त्यांच्यात हा संवेदनाशून्य भवितव्याचा विचार पेरला कुणी असेल? त्यांना भुकेने व्याकूळ, दारिद्रय़ाने पिचलेले आपले पालक न दिसता फक्त आपले करिअर आणि आपले ईप्सित एवढेच कसे काय दिसते? खूप विचार करत राहिलो. अनेक गोष्टी धुंडाळल्या. तेव्हा ध्यानात आले. संवेदना, भावना, आपुलकी, माया, ममता, जिव्हाळा या साऱ्याला आता शिक्षणात अवकाशच कुठं उरला आहे? पहिलीपासून फक्त स्पर्धा आणि मार्काचे अतिभव्य इमले. आपल्याला जगायचे असेल, आपल्याला हवे ते मिळवायचे असेल तर फक्त मार्क गरजेचे. पाचवीत स्कॉलरशिपला नंबर आला पाहिजे. आठवीत पुन्हा स्कॉलरशिप मिळाली पाहिजे. दहावी, बारावीत बोर्डात झळकले पाहिजे. ‘जेईई’, ‘नीट’ यांसारख्या खतरूड परीक्षा पास होऊन योग्य त्या ठिकाणी प्रवेश मिळाला पाहिजे. पदवी प्राप्त होताच आपल्याला खोऱ्याने पसा मिळवता आला पाहिजे. अशा धारणा, संकल्पनेत मुलाला वाढवले कुणी? त्यांना परीक्षा हा एकमेव अपवाद वगळता कशाचा विचार करू दिला आपण? त्याने उत्तम गुणवत्तेने पास व्हावे म्हणून काय तो आपला आटापिटा. सकाळी पाचपासून रात्री दहापर्यंत पालक म्हणून आपणच बसलो होतो त्याच्या मानगुटीवर. त्यानं रडायचं नाही. कचरायचं नाही. नकार तर द्यायचाच नाही अजिबात. फक्त पळत सुटायचे बेभान होऊन या मार्काच्या आंधळ्या जगात. ही सक्ती आपणच केली आपल्या मुलांवर. आपण काय करतो आहोत याचे भानच नाही राहिले कोणास. आपण मूल वाढवतो आहोत, की मशीन घडवतो आहोत याचाही विचार नाही केला आपण. त्यामुळे वाळवंटी वर्तमान आले आपल्यासमोर. याला कोण काय करणार?

अशा सर्व भवतालात उच्चविद्याविभूषित मुलांना आपला बाप थकला आहे, त्याचे दोन्हीही गुडघे निकामी झाले आहेत, आपल्या मदतीची गरज आहे त्याला, आपण सगळ्यावर तुळशीपत्र ठेवून त्याच्यासाठी राबलं पाहिजे, असं कसं येईल मनात? आणि आपण अपेक्षा तर का धरावी अशी? तरीही आपण दोषाच्या तख्तावर उभा करतो त्या मुलांनाच. इतके शिकले-सवरले पण त्यांना नाही दिसत आपला खंगलेला बाप. ज्या त्या वयात उचलायला नको का या मुलांनी जबाबदारी? कसली निर्दयी पोरं आली आपल्या पोटाला? असे कैक प्रश्न. पण या साऱ्यात आपण विसरतो आहोत. आपली मुलं आपण व आपल्या भोवतालाने वाढवली आहेत. त्यांच्यात काही उणेपुराणे असेल तर त्या साऱ्यास जबाबदार आपणच आहोत. असा विचार कोणी कोणास सांगावा? हे सगळे जर मी माझ्या मित्रास सांगितले असते. तर तो म्हणाला असता, यांना आर्थिक मदत करता येत नाही म्हणून, हे रचू लागले कल्पनेचे इमले. द्यायचा स्पष्ट नकार. काळ तर असा आहे की, तुम्ही नाही म्हटलात तर छप्पन्न उभे असतात आजूबाजूला. तुम्ही नाहीत ना टिकोजीराव. तुम्हाला वगळून आम्ही जगू शकतो आजच्या जमान्यात. असा आत्मविश्वास असणाऱ्या साऱ्या संततीने कधीच वगळून टाकले संवेदनशील माणसाला आणि त्याच्या सदसद्विवेकबुद्धीला.

समीर अनेक उचापती करून त्या त्याच्या गुडघे खराब झालेल्या मित्राला निश्चितच मदत करेल. पण त्याच्या उच्चविद्याविभूषित पोरांबाबत मात्र तो ‘ब्र’ काढणार नाही. ही आजच्या खेडय़ातली, प्रत्येक घरातली, शेवट नसलेली खुली कहाणी आहे. या कहाणीला निवेदकाची, भाषेची अथवा शैलीची कशाचीच गरज नाही. ती कहाणी कुणाला रचावीही लागणार नाही. न रचता, न सांगता अस्तित्वात आलेली ही कहाणी आजच्या खेडय़ाचे ढळढळीत वर्तमान आहे. या कहाणीला वाचणाऱ्याचीही गरज नाही. फक्त भोगणाऱ्याने ती कण्हत कण्हत भोगायची आणि दुखणाईतच मातीमोल होऊन जायचे. एवढेच अंतिम सत्य आहे!

chaturang@expressindia.com