‘ जरा आपण तेथवर जाऊन तर बघू या. मिळाला तर एक साथीदारच मिळेल आपल्याला. तिघं मिळूनच घेऊ जलसमाधी. कदाचित त्यालाही अद्याप पूर्ण धीर होत नसेल. त्यालाही बळ येईल आपली साथ मिळाली तर..’
सूर्य केव्हाचाच मावळतीला गेला होता. भोवताली धुप्प अंधार. तो क्षणाक्षणाला अधिकच गडद होत चाललेला. समुद्रकिनाऱ्यावर हळूहळू सन्नाटा वाढू  लागला होता. तो याच क्षणाची वाट पाहत आडोशाला दडून बसला होता. किनाऱ्यावर सर्वत्र पूर्ण अंधार व सन्नाटा झाल्याची त्याने खात्री करून घेतली. मग तो सावकाश दबक्या पावलांनी पुढे-आणखी पुढे समुद्राच्या दिशेने चालू लागला. जरा जराशाने थांबून तो आसपासचा कानोसा घेत होता. कोणी आपल्याला पाहत तर नसेल? पाहिलं तर नसेल? या संशयाने त्याचं आधीच धडकणारं काळीज आणखीनच जोरानं धकधकू लागे. आपण जीव द्यायला निघालोय खरं, पण आपली हिंमत मोडून तर नाही ना पडणार? आपण करतोय ते चूक की बरोबर ते त्याचं त्यालाच पूर्ण कळत नसावं बहुधा. पण तो चालत राहिला..
आता तर भोवतालचा अंधार अन् फक्त अंधारच त्याच्या सोबतीला होता. अन् मधूनच उठणाऱ्या मोठय़ा लाटेचा आवाज! काहीसा भयानकच वाटावा असा. समोरचा समुद्र भक्ष्याच्या प्रतीक्षेत आपला िहस्र जबडा वासून बसलेल्या एखाद्या भीषण मगरीसारखा भासत होता. समुद्राच्या आवेशाने झेपावणाऱ्या लाटा म्हणजे जणू त्या मगरीच्या आनंदाने लपलपणाऱ्या जिभाच!
तो आता पाण्यात पुढे पुढे चालत होता. खोल पाण्यात पाय टाकण्यापूर्वी त्याने परत एकदा सभोवार नजर टाकली. काही अंतरावर त्याला एक हलणारी आकृती असल्याचा भास झाला. तो थांबला. चाहूल घेतली. त्याचा अंदाज बरोबर होता. त्याच्यासारखी ती आकृतीही सावधपणे पुढे सरकत होती. मग तोच जरा झेपावल्यासारखा  पाण्यातून त्या आकृतीच्या दिशेने चालू लागला. रात्रीच्या अंधारात त्यांना एकमेकांचे चेहरे दिसू शकत नव्हते. दूर किनाऱ्यावरील सडकांवरच्या दिव्यांच्या प्रकाशाचा एक झोत पाण्यात परावíतत होऊन एका मोठय़ा लाटेसरशी त्याच्या डोळ्यांपुढून सरकून गेला.
त्या एका क्षणात ते दोघेही जवळ जवळ उभे असलेले दोघांनाही दिसले. पहिल्याने त्या आकृतीचा हात घट्ट धरला.
‘तू पण?’
‘आणि तूसुद्धा?’
‘मग थांबलास का? भीती वाटते?’
‘तुला वाटते?
‘जराजराशी.’
‘चल, जोडीनेच जाऊ.’
‘पण का करतोय तू असं? तू तर अजून बराच लहान दिसतोस.’
‘जीव देण्यासाठी फार मोठं धाडस लागतं. तसंच काही कारण घडल्याशिवाय माणूस या निर्णयाला जात नाही. तुझ्या तरूण वयाकडे पाहता बहुधा  प्रेमभंग झाल्यासारखं वाटतंय.’
‘हं.’
दुसरा कारण जाणून घेतल्याशिवाय पुढे सरकायलाच तयार नव्हता. पाहिल्याने हाताला हिसका देण्याचा जोरदार प्रयत्न केला. पण त्यानं पहिल्याच्या  हातावरची पकड सल करण्याऐवजी आणखीनच घट्ट केली. हार पत्करून पहिला अनिच्छेने का होईना पण बोलता झाला. म्हणाला ‘खरं आहे. माझं एका मुलीवर अतोनात प्रेम होतं. अजूनही आहे. पण ती वय, शिक्षण, वैभव सर्वच बाबतीत माझ्याहून श्रेष्ठ. तीही माझ्यात पूर्ण गुंतली होती. पण तिच्या घरच्यांनी तिचा फारच छळ करायला सुरूवात केली. सारं असह्य़ होऊन तिनं गळफास लावून घेऊन घेतला. ’
‘मग ?’
सुदैवानं म्हणावं की दुर्दैवानं ते कळत नाही. पण ती मेली नाही. तिला हास्पिटलात हलवण्यात आलं. शुद्धीत आली तेव्हा पोलिसांनी जबानी घेतली. माझं नाव पुढे आलं. पोलीस माझ्या मागावर आले. मी माझ्या गावातून कसाबसा पळून इथवर आलो. ती मेली की जिवंत आहे तेही मला माहीत नाही पण दोघांनीही जीव देण्याचा निर्णय मात्र एकत्रच घेतला होता. या एवढय़ा मोठय़ा शहरात मला कोणीही ओळखत नाही. मला जीवन व्यर्थ वाटू लागलं आहे. म्हणूनच माझा जीव देण्याचा निर्णय पक्का झाला आणि अजूनही आहे. चल, आता आणखी उशीर नको.
 ‘चल.’
ते दोनेक पावले पुढे गेले असतील तोच पहिल्यानं त्याला थांबवत म्हटलं
‘ माझं तर जाणून घेतलं पण तुझं काय ? मलाही ऐकायचंय. ’
‘मला लहानपणापासूनच महत्त्वाकांक्षा होती खूप मोठ्ठं साहित्यिक होण्याची. खूप लेखन करायचो मी. ते प्रसिद्व व्हावं म्हणून अनेक संपादकांकडे चकरा मारायचो. सारे वरकरणी फार गोड बोलायचे. मी अल्पशिक्षित असूनही एवढं चांगलं कसं लिहू शकतो म्हणून कौतुक करायचे. प्रोत्साहन दिल्यासारखं दाखवायचे. त्यामुळे मी आणखीनच चेव येऊन लेखन करायचो. पण खूप वाट पाहूनही शेवटी माझ्या लिखाणाला केराची टोपलीच दाखवली जायची. लेखन परत मागायला गेलो की सारेच जणू आपण त्या गावचेच नाही असं दाखवायचे. मग सारे लोक माझी टर उडवू लागले. मी घराबाहेर पडणंच बंद केलं. माझी आतल्या आत घुसमट वाढू लागली. जीवन संपवण्याचा निर्धार दृढ होऊ लागला. आणि पोहोचलो इथं. आता मागे फिरणे नाही. चल आता.’
‘चल.’
दोघे हातात हात घालून साथीने समुद्रात खोल पाण्यात निघाले. मूकपणे. परत अचानक एक मोठी प्रकाशरेखा परावíतत होऊन डोळ्यांना प्रकाशाची वाट दाखवून गेली. पण क्षणभरच. तेवढय़ात दुसऱ्याने पहिल्याच्या हातावरची पकड घट्ट केली. त्याला थांबवल्यासारखं केलं.
पहिल्याने किंचित त्रासिकपणे विचारलं, ‘आता काय?’
‘त्या तिकडं दूर बरंच दूर लक्ष देऊन बघ. कोणीतरी आहेसं वाटतं तिथं. कोणास ठाऊक आपल्यासारखाच तोही याच उद्देशाने या अवेळी तिथं आला असेल.’
‘पण तो तर अद्याप पाण्यात उतरलेलाही दिसत नाहीये. तो काय करत असेल तिथं, वाळूचा किल्ला?’
‘कमाल आहे तुझी. या वेळी तुला गंमत कशी सुचू शकते?’
‘मग काय करू?’
‘ऐक ना. जरा आपण तेथवर जाऊन तर बघू या. मिळाला तर एक साथीदारच मिळेल आपल्याला. तिघे मिळूनच घेऊ जलसमाधी. कदाचित त्यालाही अद्याप पूर्ण धीर होत नसेल. त्यालाही बळ येईल आपली साथ मिळाली तर.’
‘असं म्हणतोस?’
‘हं. चल बघू या तरी.’
ते दोघेही पाण्यातून किनाऱ्याच्या उजव्या टोकाकडे चालू लागले. किनाऱ्यावर अगदी समुद्रालगत जिथं पाणी खूप खोल होत जातं अशा धोक्याच्या जागी ‘तो’ बसलेला होता. पाठीत वाकून. बराच वयस्कर दिसत होता. त्याच्या हातात एक झोळी होती. त्यात नोटांच्या खूप चळती होत्या. तो परत परत त्या नोटा पिशवीतून काढत होता. मोजून त्यातल्या काही परत झोळीत भरत होता. हे त्याचं सतत चाललं होतं.
‘बहुतेक वेडा दिसतोय.’
‘किंवा चोरीचा माल असेल. घेऊन फरार व्हायचा बेत असेल.’ ते दोघे त्या आकृतीच्या आणखी जरा जवळ पोहोचले. त्याचं निरीक्षण करीत राहिले. अचानक त्या वाकून बसलेल्या म्हाताऱ्याची नजर त्यांच्यावर पडली. नोटा मोजणं न थांबवताच त्याने विचारलं, अगदी सहज वाटावं अशा सुरात, ‘काय? जलसमाधीसाठी मुहूर्त शोधताय की धैर्य?’
‘तुझं काय?’ दोघांनी एकदमच विचारलं, ‘तूही याच इराद्यानं इथं आलायस ना या अपरात्री? कुठं तरी लूटमार, छापा, दरोडा वगैरे टाकलेला दिसतोय. आता लाज वाटतेय जगाला तोंड दाखावायची म्हणूनच ना तू पण आता इथं जीव द्यायला आला आहेस आमच्यासारखाच?’
‘होय. मीही जीव द्यायलाच आलोय. पण तुम्ही तर तरुण दिसताय. एवढय़ा लवकर जीवन संपवावंसं वाटायला काय घडलं एवढं? प्रेमभंग? अपयश? प्रापंचिक कलह? कारण कळू शकेल?
‘काय करणार आहेस तू कारण जाणून घेऊन?’
‘काही नाही. तरी उत्सुकता म्हणून.’
‘तसंच समज. पण तू आता ऊठ. चलतोस ना. साथीनेच जाऊ तिघंही.’
‘तुम्ही व्हा पुढे. माझा हिशेब अजून पुरा व्हायचा आहे.’
‘हिशेब? सारा पैसा सोबत घेऊनच तर जीव द्यायला निघाला होतास ना तू?’
‘होतो. पण आता विचार बदलला.’
‘अजून पैसा मिळवायचा बाकी आहे तर. मरायला निघालाय, पण पैशाचा मोह मात्र संपत नाहीए अजून. पण काही म्हण, तुझ्याएवढा पैसा आमच्याजवळ असता ना तर किती सुखाने, आनंदाने जगलो असतो आम्ही. जीव द्यायची गरजच उरली नसती.’
‘पण मी पैशासाठी जीव देतोय असं का वाटलं तुम्हाला?’
‘तूच म्हणालास ना, की तुझा हिशेब अजून पुरा व्हायचा आहे म्हणून?’
‘हो. बरोबर. हेच म्हणालो मी. मीही तुमच्यासारखाच एक फसलेला जीव आहे. पिढय़ान्पिढय़ा वर्षांनुर्वष मी अतिशय प्रामाणिकपणे मेहनत करीत होतो. करीत आहे. कधी कोणाची एका दमडीचीही फसवणूक केली नाही मी. पण माझीच एवढी मोठी फसवणूक कोणी व का कशी केली?’
‘कसली फसवणूक?’
‘माझ्या गिऱ्हाइकांपैकीच कोणीतरी माझ्या पैशात खूप साऱ्या बनावट नोटा मिसळून माझी फसवणूक केली आहे. आज सगळे पैसे वसूल झाले, म्हणून मी आनंदात घरी परतलो. टेबलवर झोळी उलटी केली. पैसे मोजू लागलो. माझा आपल्या डोळ्यांवर विश्वासच बसेना. मी परत परत नोटा मोजत होतो. अन् लक्षात आलं, की यातल्या जवळजवळ सर्वच नोटा बनावट आहेत. माझे हातपायच गळाले. माझ्या सहनशक्तीचा अंत झाला होता. मी तसाच तिरीमिरीत उठलो अन्  थेट समुद्रकिनाराच गाठला. जीव देण्यापलीकडे दुसरा पर्यायच दिसत नव्हता मला. पाण्याच्या दिशेने सरसर चालू लागलो, पण वाटलं, एकदा परत मोजून पाहाव्यात नोटा. अत्याधिक उत्तेजनेमुळे आपल्याला दृष्टिभ्रम झाला असेल म्हणून माघारी वळलो. परत नोटा मोजत राहिलो. म्हणतात ना, आशेला अंत नसतो म्हणून. पण आशा खोटी ठरली अन् माझा निश्चय पक्का झाला.’
‘मग उठतोस ना आता? दिवस उजाडायला फार वेळ नाही उरलेला आता. कोणाच्या नजरेस पडलो तर उगाच.’
तो हसला.
‘का हसलास?’
‘मरणाची वेळ नोंदवायला आल्यासारखं हातावरचं घडय़ाळ सोबत घेऊन आलेले दिसताय.’
‘सोड रे. चल ऊठ आता.’ ते दोघं त्याला हाताला धरून उठवू लागले. पण त्याची उठण्यासाठी काहीच हालचाल दिसत नव्हती.
‘तुम्ही व्हा पुढे. मला अजून थोडा वेळ हवाय.’
‘का? धैर्य एकवटायला?’
‘हो. धैर्यच. पण जीव द्यायला नाही. मला या नकली नोटा कोणाकडून आल्या याचा छडा लावल्याशिवाय जीवन संपवायचं नाहीये. माझं जीवन लवकर संपलं किंवा संपवायला लागलं ही खंत आयुष्यभर माझ्या कुटुंबीयांना द्यायची नाही. आणि काय माहीत, कदाचित मरताना आणि मेल्यानंतरही मलाही ती खंत वाटत राहील? या खोटय़ा नोटांचा शोध हीच आता माझ्या नव्यानं जगण्याची प्रेरणा आणि उद्देश असेल. मला आता कळून चुकलंय की, जीवनाचा शेवट लवकर झाला, असं म्हणणं चूक आहे. खरं तर आपण जीवन सुरू करायलाच उशीर करतो. माझा निर्णय पक्का आहे. पण जीव देण्याचा नाही तर जगण्याचा. नव्यानं जीवन सुरू करण्याचा. पण तुम्ही का थांबलात. निघा.’
त्याचा नाद सोडून मग ते दोघं खोल पाण्याकडे झपाझप चालू लागले. तेवढय़ात त्या दुसऱ्याने पहिल्याचा हात मागे खेचला.
‘काय झालं?’
‘अरे तुझ्या लक्षात येतंय का, तो शेवटचं वाक्य काय बोलला ते? जीवनाचा शेवट लवकर झाला, असं म्हणणं चूक आहे. खरं तर आपण जीवन सुरू करायलाच उशीर करतो.’
‘काही येतय ध्यानात ?’ पहिल्याचेही डोळे चकाकले. दोघेही हाती हात धरूनच किनाऱ्याकडे निघाले. त्यांचा निर्णय आता पक्का झाला होता. आपल्या अपयशाला पुसून टाकण्याचा. अधिक प्रयत्नपूर्वक आयुष्य नव्यानं सुरू  करण्याचा. दोघांनीही एकदा मागे वळून पाहिलं.
किनाऱ्याकडे वेगाने झेपावणाऱ्या पण पोचू न शकलेल्या लाटा परत अधिक वेगाने झेपावण्यासाठी माघारी वळलेल्या पाहात त्याच्यातला साहित्यिक ओठात पुटपुटताना पहिल्याने ऐकले. त्याच्या पाठीवर त्याने हलकेच थोपटल्यासारखे केले अन् दोघेही किनाऱ्याच्या दोन दिशांना चालू लागले.