वयात आल्याची जाणीव झाली आणि गावातल्याच एका तरुणावर प्रेम जडले. त्याचे आधीच लग्न झालेले होते म्हणून घरच्यांनी विरोध करायला सुरुवात केली. तशातच घरातही वहिनीचा छळ सुरू झाला. अखेर या साऱ्या प्रकाराला कंटाळले आणि थेट नक्षलवादी चळवळीत जाण्याचा निर्णय घेतला.’ काही दिवसांपूर्वी गडचिरोली पोलिसांसमोर शरण आलेली शांती ऊर्फ निर्मला सांगत होती. शांती भामरागड तालुक्यातील मन्नेराजारामजवळ असलेल्या येचलीची राहणारी. अवघ्या २२ वर्षांच्या शांतीचे ‘दलम’मध्ये असताना एकाशी सूर जुळले. दोघांनी लग्न केले. चळवळीच्या नियमानुसार शांतीच्या नवऱ्याची संततिप्रतिबंधक शस्त्रक्रिया करण्यात आली. लग्नानंतर वेगवेगळे राहण्याचा नियम असल्याने दोघेही त्याला कंटाळले आणि त्यांनी सरकारला शरण येण्याचा निर्णय घेतला.
धानोरा तालुक्यातील गुऱ्हेकसा ??गावात लहानाची मोठी झालेल्या ललिताचे आईवडील दोघेही नक्षलवादी म्हणून सक्रिय आहेत. नातेवाईकाकडे राहणाऱ्या ललिताचे लग्न तिच्या मर्जीविरुद्ध लावून देण्याचा घाट रचण्यात आला. पाचवीपर्यंत शिक्षण घेतलेल्या ललिताला हे लग्न मंजूर नव्हते. शिवाय लग्नानंतर आदिवासी संस्कृतीप्रमाणे ब्लाऊज न घालता वावरणे तिला योग्य वाटत नव्हते. यावरून तिचे मन बंड करून उठले आणि तिने थेट ‘दलम’चा रस्ता धरला. चार वष्रे चळवळीत काढल्यानंतर व मनासारखा नवरा मिळवल्यानंतर आता ललिता तिच्या पतीसह शरण आली आहे.
भामरागड तालुक्यातील पेनगुंडाची राहणारी नीलिमा उंच, धिप्पाड व गोरीपान. आदिवासी वाटणारच नाही अशा देखण्या नीलिमाला लग्नानंतर ब्लाऊज न घालता राहणे ही कल्पनाच पसंत नव्हती. दिसायला सुंदर असल्यामुळे आईवडिलांनी वरही तसाच शोधावा अशी तिची अपेक्षा होती, पण घरचे एका मुलाशी लग्नाचा आग्रह धरू लागले जो तिला अजिबात आवडत नव्हता. अखेर नीलिमाने घरात थेट बंडाचा झेंडा उभारला व चळवळीत दाखल झाली. तीन वष्रे ‘दलम’मध्ये काम केल्यानंतर एक दिवस नक्षलवादी तिच्या आलापल्लीत राहणाऱ्या भाऊजीलाच मारायला गेल्याचे तिला कळले. यामुळे संतापलेल्या नीलिमाने कमांडरजवळ तीव्र निषेध नोंदवला. तिच्या या निषेधाकडे कुणी लक्षच दिले नाही. परिणामी तीन वर्षांपूर्वी मनात उठलेल्या व नंतर चळवळीत दाखल होताच शमलेल्या तिच्या मनातील बंडाने पुन्हा उचल खाल्ली व नीलिमाने थेट शरणागती पत्करण्याचा मार्ग स्वीकारला. अजूनही अविवाहित असलेल्या नीलिमाला चळवळीतही देखणा मुलगा सापडला नाही. चळवळीत असताना शोषणाच्या प्रयत्नाला बळी न पडणाऱ्या निर्मलाला आता समाजाची कोणतीही रूढी व परंपरा न मानता शांतपणे आयुष्य जगायचे आहे. सोबतच अपेक्षित जोडीदारासाठी तिची नजर अजून भिरभिरते आहे.
या साऱ्या कथा देशाला हिंसाचाराच्या खाईत लोटणाऱ्या व राष्ट्रीय अखंडतेसमोर मोठे आव्हान उभे करणाऱ्या नक्षलवादी चळवळीतील आहेत. गेल्या मे महिन्यात शेजारच्या छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांनी काँग्रेसच्या बडय़ा नेत्यांना ठार मारले. या हल्ल्यात सर्वात समोर होत्या हाती बंदुका घेतलेल्या महिला नक्षलवादी. त्याआधीच्या हिंसक कारवायांमध्येसुद्धा महिलांचा सहभाग अनेकांना चक्रावून टाकणारा ठरला. गेल्या ७ जुलैला गडचिरोलीतील मेंढेर गावाजवळ झालेल्या चकमकीत सहा महिला नक्षलवादी ठार झाल्या. या घटनेने समाजमन आणखी सुन्न झाले. २००९ मध्ये नक्षलवाद्यांनी धानोरा तालुक्यात हत्तीगोटाजवळ १५ पोलिसांना ठार केले होते. त्यात ९ महिला शिपाई होत्या. या महिलांच्या मृतदेहाची विटंबना करतांना नक्षलवाद्यांनी गर्भवती महिला शिपायाच्या मृतदेहालासुद्धा सोडले नाही. तेव्हा नक्षलवाद्यांच्या क्रौयाने सुन्न झालेले समाजमन आता पुरुष जवानांसोबत झालेल्या चकमकीत सहा महिला नक्षलवादी ठार झाल्याचे कळताच व्यथित झालेले दिसले. या पाश्र्वभूमीवर नक्षलवादी चळवळीचा महिलांच्या दृष्टिकोनातून घेतलेला आढावा अनेक धक्कादायक बाबी समोर आणणारा आहे. देशातील १८२ जिल्हय़ांत प्रभाव निर्माण करणाऱ्या या चळवळीत आता महिलांची संख्या ६० टक्क्यांच्या जवळपास पोहोचली आहे. शरण आलेले नक्षलवादी, त्यातील महिला, नक्षलवादविरोधी मोहिमेत असलेले पोलीस दलातील अधिकारी, जाणकार, अभ्यासक या सर्वाशी चर्चा केल्यानंतर समोर आलेली ही महिला सहभागाची टक्केवारी व त्यातून निर्माण झालेले प्रश्न अनेक नव्या मुद्दय़ांना जन्म देणारे आहेत. या हिंसक चळवळीत महिलांचा व विशेषत: आदिवासी तरुणींचा सहभाग वाढण्यामागील कारणांचा शोध घेतला की अनेक गोष्टी स्पष्ट होतात.
 या चळवळीच्या निमित्ताने दुर्गम भागात नक्षलवादी व पोलीस या दोन्ही घटकांकडून होणाऱ्या हिंसाचाराला तेथील जनता कंटाळली आहे यात तथ्य आहे. अशा स्थितीत गावातला अर्धवट शिक्षण घेतलेला तरुण या चळवळीकडे जाण्याचे टाळतो. उलट तो पोलीस दलात नोकरी मिळावी म्हणून प्रयत्न करतो. तिथे जमले नाही तर रोजगारासाठी गाव सोडतो. त्यामुळेच नक्षलग्रस्त भागात तरुणांच्या स्थलांतरणाचे प्रमाण सर्वात जास्त आहे. नोकरी वा रोजगारासाठी पाहिजे तेव्हा गाव सोडणाऱ्या तरुणांच्या तुलनेत तरुणींसमोर मात्र अडचणींचा डोंगर उभा राहतो. त्यांना वाटेल तेव्हा गाव सोडता येत नाही. सोडले तरी राहायचे कसे व कुठे हा प्रश्न आ वासून उभा ठाकतो. परिणामी नक्षलवाद्यांविषयी, त्यांच्या शोषणाविषयी सारे ठाऊक असूनसुद्धा मुलींना गावातच राहणे भाग पडते. अशा स्थितीत मग गावात येणाऱ्या नक्षलवाद्यांच्या नजरेत या मुली भरतात. मुलगा रोजगारासाठी गेला ना मग मुलीला चळवळीसाठी द्या, असा आदेश नक्षलवादी देतात व आईवडिलांसमोर पर्याय उरत नाही. गावात बैठकीसाठी आलेले नक्षलवादी जंगलापर्यंत सोबत चला म्हणून मुलींना घेऊन जातात व नंतर परत जाऊच देत नाहीत. ग्यारापत्तीच्या सुशीलाला अशाच पद्धतीने नक्षलवादी घेऊन गेले. सुशीला खूप रडली, तिने सुटकेची भीक मागितली, पण कमांडरने ऐकले नाही. तब्बल पाच वष्रे मन मारून चळवळीत राहिल्यानंतर आता शरण येत गडचिरोली पोलिसांच्या आश्रयाला आलेली सुशीला जेव्हा ही आपबिती सांगते तेव्हा ऐकणाऱ्यांच्या अंगावरच काटा उभा राहतो. जबरीने सोबत नेणाऱ्या नक्षलवाद्यांनी नंतर काही दिवस लोटताच आता परत गेलीस तर पोलीस ठार मारतील अशी भीती दाखवणे सुरू केले. त्यामुळे गप्प राहण्याशिवाय पर्याय नव्हता, असे सुशीला सांगते. पोलिसांची भीती दाखवूनही माझे मन चळवळीत रमत नाही हे लक्षात आल्यावर त्यांनी माझ्या हाती बंदूक दिली. गोळी चालवण्याचा सराव करून घेतला. सहा महिन्यांनंतर छत्तीसगडच्या सीमेवरील एका गावात एका खबऱ्याची हत्या करण्याचे आदेश मला देण्यात आले. पहिल्यांदा गोळी झाडताना शरीरास कंप सुटला खरा, पण आदेश पाळण्याचे भूत मानगुटीवर होते. माझ्या हातून एकाची हत्या झाली होती. तो अनुभव विलक्षण, भयानक होता. या हत्येनंतर कित्येक दिवस मला झोपच आली नाही, पण नंतर मात्र अशी हिंसा सरावाची झाली. आणि आता शरणागतीनंतर मात्र त्या मन:स्थितीचं वैषम्य वाटतं. आपण गोळी घालून हत्या करूच कशी शकलो, असा प्रश्न राहून राहून मनात येतो. साधी ओळखही नसलेल्या माणसाला आपण ठार मारले याचे दु:ख वाटल्याचे सुशीला बोलून दाखवते. हे सांगताना हिंसाचार, त्यामागील चळवळीची वैचारिक भूमिका यातले काहीही सुशीलाला ठाऊक नसल्याचे स्पष्टपणे जाणवते. ‘दलम’मध्ये असताना आपण जे केले ते चूक होते याची खंत तिच्या चेहऱ्यावर दिसते. सुशीला एवढे तरी बोलते, पण इतर मुली हिंसेच्या मुद्दय़ावर मोकळेपणाने बोलायला तयार नाही हेही चर्चेच्या वेळी दिसून आले. शरण आलेल्या या मुलींना ‘माओ’ ठाऊक नाही. हा कोण? असा प्रश्न त्या विचारतात. जल, जमीन, खनिज वाचवायचे आहे, असे सांगत नक्षलवादी सोबत घेऊन गेले, असेही त्या सांगतात.
चळवळीत मुलींची संख्या वाढण्याचे आणखी एक कारण आदिवासी संस्कृती व रूढी, परंपरेशी निगडित आहे. नक्षलप्रभावी भागात प्रामुख्याने माडिया व गोंड आदिवासी जमाती आहेत. या जमातीत महिलांना आदराचे स्थान असले तरी लग्नविधीच्या संदर्भात असलेल्या रूढी व परंपरा आताच्या मुली पाळायला तयार नाहीत. लग्नानंतर ब्लाऊज घालायचे नाही ही परंपरा आज शिक्षण घेतलेली वा न घेतलेली मुलगीसुद्धा पाळायला तयार नाही. वडिलांनी लग्न ठरवण्याच्या मुद्दय़ावरसुद्धा या मुली आता आक्षेप घेऊ लागल्या आहेत. आईवडिलांनी निवडलेला वर मान्य नाही, असे मुली बोलून दाखवू लागल्या आहेत. लग्नाच्या आधी देवाचे विधी करायचे नाहीत व लग्नानंतर करायचे या परंपरेवरसुद्धा मुलींना आक्षेप आहे. नक्षलवादी नेमके याच आक्षेपांचा आधार घेत मुलींना चळवळीत ओढत आहेत. या चळवळीच्या प्रसारासाठी असलेली चेतना नाटय़मंचची पथके गावात गाणी गाताना याच स्त्री-पुरुष असमानतेचा आधार घेतात. चळवळीत आले तर समान वागणूक मिळेल, असे आश्वासन देतात. त्यामुळे मुलींचे या चळवळीत जाण्याचे प्रमाण वाढले आहे, असे शरण आलेल्या मुलींनी सांगितले. समाजात होत असलेल्या मुलींच्या स्वातंत्र्यसंकोचाचा योग्य फायदा नक्षलवादी उचलू लागले आहेत हे पोलीस दलातील अधिकारीही आता मान्य करतात.
गेली २१ वष्रे या चळवळीत सक्रिय असलेला व शरण येण्यापूर्वी कंपनी कमांडर असलेला राकेश तर आता चळवळीने केवळ महिलांची स्वतंत्र कंपनी सुरू करण्याची तयारी केली आहे, असे सांगतो. आधी १३ सदस्य संख्या असलेल्या ‘दलम’मध्ये ३ ते ४ मुली असायच्या, आता मुलींची संख्या ८ ते ९ झाली आहे. चळवळीसाठी मुली हेरताना नक्षलवादी १४ ते १७ हाच वयोगट निवडतात. किशोरवयीन असलेल्या या मुली स्वप्नाळू असतात. त्यांना क्रांतीची गाणी भावतात. शोषणाविषयी त्यांना फारसे ठाऊक नसते. नेमके या वयात चळवळीत आलेल्या या मुली आकर्षणाच्या आहारी लवकर जातात. चार ते पाच वष्रे चळवळीत काढल्यानंतर हळूहळू त्यांना शोषणाची जाणीव होते. मग लग्नाचा विचार त्यांच्या मनात येतो. ‘दलम’मध्ये योग्य साथीदार मिळाला की त्या लग्नही करून टाकतात. त्यानंतर मात्र बाहेर पडण्यासाठी त्यांची धडपड सुरू होते. या सर्व घडामोडीकडे बारकाईने बघणारे नक्षलवादी खूश असतात, कारण त्यांना पाच वष्रे राबवण्यासाठी मनुष्यबळ मिळालेले असते, असे मत एका पोलीस अधिकाऱ्याने व्यक्त केले.
मुलींची संख्या वाढण्यावर भर देणाऱ्या नक्षलवाद्यांनी या मुलींसाठी ‘क्रांतिकारी आदिवासी महिला संघटना’ स्थापन केली असून संपूर्ण दंडकारण्य भागात जहाल नक्षलवादी नर्मदा त्याचा नियमितपणे आढावा घेते. ‘दलम’ व कंपनीत असणाऱ्या या मुलींवर गावातून जास्तीत जास्त तरुणींना आणण्याची जबाबदारी देण्यात येते. जंगलात राहताना या मुलींना कामाच्या बाबतीत समान वागणूक दिली जाते. मात्र मुलींना भेडसावणाऱ्या शारीरिक समस्या आदींवर ज्येष्ठ नक्षलवादी कधीच गांभीर्याने लक्ष देत नाहीत, असे या शरण आलेल्या मुली सांगतात. पोलीस व सुरक्षा दलासोबत होणाऱ्या चकमकीच्या वेळी मुलींना जाणीवपूर्वक समोर केले जात नाही. मात्र त्यांचा ‘दलम’मधील दर्जा कनिष्ठ असल्याने त्यांना लढताना समोरच राहावे लागते. शत्रूची हत्या करताना मात्र नक्षलवादी मुलींना जाणीवपूर्वक समोर करतात. चळवळीत मुलींच्या शोषणाचे प्रकार ही नित्याची बाब आहे. अशा प्रकरणात तक्रार केली तर शोषण करणाऱ्याला चळवळीतून सहा महिन्यांसाठी बडतर्फ केले जाते. दोन वर्षांपूर्वी माकडचूहाच्या चकमकीत सुमारे सहा तास एकटय़ाने पोलिसांशी झुंज देत शहीद होणाऱ्या रनिताचा नवरा सुनीलला याच कारणावरून बडतर्फ करण्यात आले होते, अशी माहिती या मुली देतात. मात्र शोषणाच्या अनेक प्रकरणांत तक्रारच होत नाही, असेही या मुली सांगतात. या चळवळीतील मुलींचा सहभाग वाढल्याने नक्षलवाद्यांसमोर अनेक नव्या समस्या उद्भवायला लागल्या आहेत. चळवळीत दाखल झालेल्या मुलीने ३ वष्रे, तर मुलाने २ वष्रे लग्नाची मागणी करू नये असा नियम आहे. जगाच्या पाठीवर कुठेही प्रेमाचा अंकुर नियमाने फुलत नसतो. त्यामुळे हा कालावधी पूर्ण होण्याच्या आधीच प्रेम जमलेले सदस्य मग पलायनाचा मार्ग स्वीकारतात. हा नियम पाळून प्रेम करणाऱ्या युगुलाला चळवळीकडून लग्नाची परवानगी मिळते. लग्न झाल्यानंतर तीन महिने या जोडप्याला सोबत राहू दिले जाते. नंतर वेगवेगळ्या ‘दलम’मध्ये पाठवले जाते. हा विरह सहन न झालेली अनेक जोडपी पळून जातात. लग्नानंतरचे तीन महिने सोबत राहताना या जोडप्यातील एकाला संततिनियमक शस्त्रक्रिया करून घ्यावी लागते. ‘दलम’चा मुक्काम असेल तिथे या विवाहितांना सोबत झोपण्याची परवानगी नसते. मुक्कामाच्या ठिकाणी पहारा देणारा नक्षलवादी शत्रूची भीती नाही हे स्पष्ट करतो तेव्हा या जोडप्याला मुक्कामाच्या ठिकाणाहून थोडे दूर एकत्र झोपण्याची परवानगी मिळते. या सर्व जाचक अटींमुळे लग्न झालेले नक्षलवादी पळून जाण्याचा विचार जास्त करतात. त्यामुळे अशा तरुण जोडप्यांच्या समर्पणाचे प्रमाण कमालीचे वाढले आहे. त्यामुळेच आता नक्षलवाद्यांनी या विवाह प्रक्रियेशी संबंधित नियमांवर नव्याने विचार करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे,  असे शरण आलेल्या राकेशचे म्हणणे आहे.
तरुणपणात झालेला विवाह व त्यातून निर्माण झालेली सुखासीन आयुष्याची लालसा व त्यामुळे होणारे पलायन या घटनाक्रमांमुळे खडतर स्थितीत वाटचाल करणाऱ्या या चळवळीसमोर गंभीर संकट उभे ठाकले आहे. तरुण मुली व महिलांचा अतिशय हुशारीने वापर करून घेत समाजात अंतर्विरोधाची भावना निर्माण करण्यात यशस्वी ठरलेली ही चळवळ आता भविष्यात कशी वाटचाल करते याकडे साऱ्यांचे लक्ष आहे. या चळवळीतील महिलांचा सहभाग याच पद्धतीने वाढत गेला तर त्यांच्याविरुद्ध लढणाऱ्या पोलीस व सुरक्षा दलांनासुद्धा भविष्यात अनेक आक्षेपांना तोंड द्यावे लागणार आहे. कारण भविष्यात होणाऱ्या चकमकीत ठार मारले जाणाऱ्यांमध्ये महिलांची संख्या लक्षणीय राहणार आहे. आम्ही स्त्री व पुरुष असा भेदाभेद करत नाही, असे नेहमी सांगणाऱ्या नक्षलवाद्यांच्या पॉलीट ब्युरोत एकाही महिलेला अद्याप जागा देण्यात आली नाही. या ब्युरोच्या खालोखाल असलेल्या केंद्रीय समितीत आजवर अनुराधा गांधी या एकमेव महिलेचा सहभाग होता. तिच्या मृत्यूनंतर या समितीत अद्याप एकाही महिलेला स्थान देण्यात आले नाही. विविध राज्यांत सक्रिय असलेल्या विशेष क्षेत्रीय तसेच राज्य समितीत मात्र अनेक महिला आहेत. नर्मदा, निर्मला, मैनाक्का ही त्यातली काही प्रमुख नावे आहेत. आता संपूर्ण चळवळीत महिलांची संख्या वाढवण्यात यशस्वी ठरलेल्या या चळवळीला भविष्यात या मुद्दय़ावरसुद्धा विचार करावा लागणार आहे.
devendra.gawande@expressindia.com