आयुष्य म्हणजे आपली गोष्ट सांगणं आहेच, पण कधी कधी का होईना, आपली गोष्ट बाजूला ठेवून दुसऱ्या कुणाची गोष्ट ऐकू पाहणंही आहे. दुसऱ्याची गोष्ट खऱ्या अर्थानं ऐकू पाहाणं, ही किती उत्कट संधी असू शकते त्या दुसऱ्याशी स्वत:ला खऱ्या अर्थानं जुडू देण्याची! माझ्या जगण्याची गोष्ट सांगता सांगता, आसपासच्या न संपणाऱ्या गोष्टी मला खऱ्या अर्थानं ऐकायच्या आहेत..
हानपणी मे महिन्याच्या सुट्टीत हमखास आजोळी, रहिमतपूरला जाणं व्हायचं. तिथे, रात्रीची जेवणं झाली, की आम्हा सगळ्या भावंडांचा एक आवडता कार्यक्रम असायचा, गोष्ट!
मला स्वत:ला लांबच्या लांब गोष्ट ऐकायला आवडायची, पण कापूसकोंडय़ाच्या गोष्टीचा मात्र खूप राग यायचा. मला अशी गोष्ट ऐकायची असायची, जी न संपणारी असेल पण कापूसकोंडय़ासारखी तीच तीच नसेल!
माझ्या आयुष्यातल्या पहिल्यावहिल्या गोष्टी मला माझ्या रहिमतपूरच्या आजीनं आणि आजोबांनी सांगितल्या. आजोबांना आम्ही अण्णा म्हणायचो. रात्रीच्या जेवणानंतर आजीची आवरासावर चालू असायची. आम्ही सगळी नातवंडं अण्णांभोवती कोंडाळं करून गलका करायचो. ‘अण्णाऽऽ गोष्ट!’ आम्ही कधी आधी ऐकलेल्या गोष्टींच्या फर्माईशी करायचो, ‘शूर्पणखेची सांगा! नाही, घटोत्कच!’ वगैरे आरडाओरडा चालू असायचा त्या वेळी अण्णा मंद हसत शांत बसून राहायचे. आता हे सगळं आठवताना जाणवतं, मला अण्णांच्या प्रत्यक्ष गोष्टीपेक्षाही त्यांचं ‘कुठली गोष्ट सांगावी’ या प्रश्नापाशी थांबणं जास्त लुभावतं. आता माझ्यासाठी त्यांच्या प्रत्यक्ष गोष्टीपेक्षा त्या गोष्टीपाशी थांबण्याची गोष्ट जास्त थरारक होऊन गेली आहे..
आसपास आमचा आरडाओरडा चालू असताना अण्णा शांत बसून असायचे. मग एका क्षणी त्यांचे डोळे दूर कुठेसे जायचे आणि कुणीही न सांगता आम्ही एकदम शांत होऊन जायचो. आम्हाला कळायचं, ‘गोष्ट येते आहे.. गोष्ट तिच्या वाटेवर आहे.’ ती शांतता, गोष्ट सुरू होण्यापूर्वीची, मला भयंकर आवडायची. आम्ही गच्चीत ओळीने घातलेल्या, चांदण्यांनी पांढुरलेल्या थंडगार अंथरुणांवर पडलेले असायचो. नवाच्या आसपासची वेळ. तंबूतला सिनेमा सुरू होण्याच्या बेतात. सिनेमाची ‘पहिली घंटा’ असल्यासारखं ‘दत्तदिगंबर दैवत माझे’ हे गाणं लागायचं आधी. त्यानंतर जो हिंदी सिनेमा असेल त्याची गाणी लागून मग प्रत्यक्ष सिनेमा सुरू. अण्णांची गोष्ट सुरू होण्याआधीच्या शांततेत हे दूरदूरचे आवाज अचानक मोठे झाल्यासारखे वाटायचे. आमचे डोळे, अण्णांच्या दूर गेलेल्या डोळ्यांकडे विस्फारून पाहात असायचे.
अण्णा दरवेळी नवी गोष्ट सांगायचे. आमच्या ‘आधीची कुठलीशी गोष्ट सांगा’चा आग्रह मोडून, त्याचा आम्हा नातवंडांना कोण अभिमान! आज कुठली गोष्ट येणार आहे. अण्णांचे दूर बघणारे डोळे खरं तर ‘आत’ बघत असणार त्यांच्या, गोष्टींच्या खजिन्याकडे.. आज यातली कुठली निवडू म्हणून अण्णा निवडण्याआधी घाईच करायचे नाहीत. आमच्या विस्फारल्या उत्सुकतेचं जरासुद्धा दडपण यायचं नाही त्यांना. एरवी एक क्षण एका जागी न बसणारे आमच्यातले वीरसुद्धा त्या वेळी आवाज न करता गप्प पडलेले असायचे. अण्णा गोष्ट आठवत असताना आसपासचं काहीही त्यांना स्पर्श करू शकणार नाही. असं वाटायचं. आमचा दंगासुद्धा त्यांच्या अस्पर्श असल्याचाच एक आब तयार व्हायचा भवतालात. तो ‘आब’ आम्ही लहान असलो तरी आम्हा सगळ्यांना आतून जाणवायचा आणि आम्ही न सांगता गप्प व्हायचो. नवीन गोष्टीची वाट पाहात. एरवी अधीर असलेलं आमचं मन तेव्हाही अधीरच असायचं, पण अण्णांच्या संयत थांबण्यात आमची अधीरताही नकळत संयत होऊन जायची. ‘अण्णांची गोष्ट ऐकायची अपार अधीरता’ या नात्याने आम्ही सगळ्यांची वेगवेगळी मनं एकमेकांत गुंफून जणू एकच होऊन गेलेली असायची आणि मग कुठल्याशा जादूच्या क्षणी अण्णांचा भारदस्त घोगरा आवाज कानावर यायचा. ‘एकोणीसशे सत्तेचाळीस सालची गोष्ट असेल..’ आणि मग तंबूत कुठलासा हाणामारीचा सिनेमा सुरू होता होताच आमच्या समोर अण्णांचा चित्तथरारक सिनेमा सुरू व्हायचा. अण्णांच्या सांगण्याच्या पद्धतीनं साधं काहीसं पण सिनेमाच्या पडद्यावरचं होऊन जायचं. एकोणीसशे नऊ साली अण्णांचा जन्म झाला. तेव्हापासून आम्ही गोष्ट ऐकत असलेल्या दिवसापर्यंतचा त्यांच्या आयुष्यातला कुठलाही साधा दिवस अण्णांच्या सांगण्याने भव्यदिव्य होऊन जायचा. अण्णा जितक्या थराराने स्वत:च्या आयुष्याची गोष्ट सांगायचे तितक्याच ताकदीने आम्हाला रामायण-महाभारत काळातही घेऊन जायचे. त्यांच्या घोगऱ्या आवाजाने, मोठमोठय़ा हातवाऱ्यांनी, आरडय़ाओरडय़ाने ते कधी भीम, कधी मयसभेतला फजिती झालेल्या दुर्योधन, कधी गांधीजींच्या हत्येनंतर सर्व ब्राह्मणांची घरं जाळली जात असताना, आम्ही ‘देशपांडे’ असल्याने आमचं रहिमतपूरचं घर जाळायला आलेल्या सर्वाना आपल्या खडय़ा आवाजात ‘एऽऽ हे अण्णाचं घर हाय! ह्य़े न्हाय जाळायचं! असं सांगणारा काळाधिप्पाड मांग..’ असं सगळं सगळं होऊन जायचे! अशा सगळ्यांनी आम्हाला कुठल्याशा थरार, स्फुरण प्रदेशात घेऊन गेलेले अण्णा, त्या त्या रात्रीची त्यांनी निवडलेली गोष्ट सांगून संपताच पुन्हा गोष्ट सांगण्याआधीसारखे शांत होऊन आमच्या ‘अजून एक गोष्ट सांगा!’च्या गलक्याकडे पूर्ण दुर्लक्ष करून झोपायला निघून जायचे.
आमचा एक हुकमाचा एक्का असा जात असतानाच दुसरा हुकमाचा एक्का अवतीर्ण व्हायचा. आजीची आवरासावर संपवून ती गच्चीत आलेली असायची. आजी मला वाटतं आवरासावर करताकरताच कुठली गोष्ट सांगायची ते मनात ठरवत असावी, त्यामुळे अण्णांची गोष्ट संपताच आठवण्याचा वेळ न घेता तिची गोष्ट तडक सुरू व्हायची. अण्णांची गोष्टीची निवड ही अण्णांचा भारदस्त आवाज, मोठाले हातवारे यांच्यानुसार तर आजींचं सगळं लोण्यासारखं मऊ.. शांतावणारं.. तिच्या गोष्टी पण वेगळ्या. अण्णांच्या स्फुरण आणणाऱ्या तर आजीच्या डोळ्यांत पाणी आणणाऱ्या. दोघंही रामायण, महाभारत सांगायचे पण अण्णांची गोष्ट कधी आजीनं नाही सांगितली आणि आजीची अण्णांनी नाही. आजीच्या गोष्टीत आजी गोड आवाजात गाणीसुद्धा गायची. कृष्णाच्या करंगळीतून रक्त वाहू लागतं तेव्हा क्षणाचाही विचार न करता द्रौपदी टर्र्रदिशी तिचा भरजरी शेला फाडून त्याच्या करंगळीला बांधते, या गोष्टीचा शेवट ‘भरजरी गं पितांबर दिला फाडून, द्रौपदीसी बंधू शोभे नारायऽऽण!’ या आजीच्या गोड गाण्याने व्हायचा तेव्हा सर्व नातींच्या डोळ्यात पाणी आणि आजीचा गळा भरून आलेला असायचा आणि नातू गप्प होऊन आवंढे गिळत असायचे! मात्र, आजीच्या एका गोष्टीनं मला एकदा चांगलाच दणका दिला होता! आता ती गोष्ट आणि आजीची ती गोष्ट सांगण्याची पद्धत आठवली की वाटतं, एका माणसाने, एकाच आयुष्यात स्वत:ला सहज बदलवून पूर्ण भिन्न प्रकारच्या वेगवेगळ्या गोष्टी सांगू शकणं हे किती थरारक आहे! हे रोजचं काही रोजच्या पद्धतीनं सांगणं सोडून वेगळंच काही अगदी सहज सांगता येऊ शकणं ही किती सुंदर गोष्ट आहे!
त्या दिवशी का कुणास ठाऊक- माझ्याबरोबर इतर कुणीच भावंडं नव्हती. मी आणि आजी दोघीच होतो. आजीची गोष्ट म्हणून मी डोळ्यांत पाणी यायच्या आशेने बेसावध पडले होते. अंथरुणावर आजीनं तिच्या नेहमीच्या मऊ आवाजात सुरुवात केली. ‘एक गाव असतं, एके दिवशी त्या गावात एक बाई येते कुठूनशी. हिरवी साडी, हिरवा चुडा, कपाळावर मळवट भरलेला. मोकळे केस.’ माझा ठोकाच चुकला.. ही कुठली गोष्ट सांगते आहे आजी.. एकदम सावध ऐकायला लागले. ‘गावातले सगळेजण तिला घाबरून जातात. एके दिवशी काय होतं, एका लहान मुलीला शाळेतून घरी यायला उशीर होतो.’ कुठल्याही गोष्टीत लहान मुलीचं पात्रं आलं की मला त्या ठिकाणी स्वत:ला पाहायची सवय (तेव्हापासूनच!) होती. तसा मी स्वत: अलगद आजीच्या गोष्टीत प्रवेश केला. ‘ती मुलगी घराकडे येतायेताच अंधार पडायला लागलेला असतो. अचानक काय होतं नदीकाठी त्या मुलीला ही बाई बसलेली दिसते. हिरवी साडी मळवट..’ इथे मी अंथरुणावर आडवी पडलेली ताडकन् उठून बसले. श्वास येतो आहे की नाही अशी स्थिती. पण आजीचा आवाज शांतच नेहमीसारखा, त्यामुळे तर सगळं अजूनच अंगावर येत चाललेलं! ‘ती मुलगी धूम पळत सुटते. मागे न बघता. घराच्या दिशेने. घरी ती आणि तिची आजी दोघीच राहात असतात.’ अर्थातच माझ्या मनात चालू असलेल्या गोष्टीत माझ्या खऱ्या आजीचा प्रवेश. मुलगी घरी पोचते. धाडदिशी दार लावते. आजी पाठमोरी बसून भाकऱ्या थापत असते. मुलगी हापत आजीला म्हणते, ‘आजी, मला ती बाई दिसली. हिरवा चुडा – मळवट’ इथे गोष्ट सांगताना आजीचा वेग वाढलेला, पण आवाज शांतच. मी सुद्धा मुलगी घरी पोचली एकदाची म्हणून निश्वास सोडायच्या बेतात. बेसावध! मुलगी खूप घाबरून आजीच्या कुशीत शिरणार तोच आजी वळते आणि म्हणते, ‘तीच गं मी!’ मुलगी पाहाते तर आजीच्या चेहऱ्याच्या जागी त्या बाईचाच चेहरा! आजी गोष्ट सांगताना ‘तीच गं मी!’ म्हणाली मात्र नि मी जीवघेणं दचकून किंचाळलेच! आजी हसायला लागली. ही आजची आजी माझ्या मऊ मऊ आजीपेक्षा कुणीतरी वेगळीच होती. त्या दिवशी पहिल्यांदा मला आजीची भीती वाटली. आता वाटतं त्या भीतीचं कारण ती स्वत: तर होतीच, पण त्याहीपेक्षा जास्त आजीचं गोष्ट ‘सांगणं’ होतं. फार सहज, शांतपणे सांगायची आजी ती गोष्ट. मी त्या गोष्टीचे नंतर अनेक ‘प्रयोग’ पाहिले. शांत आवाज, चढ उतार नाहीत. भीतीचं सांगायचा आव नाही. मात्रं तिचा सगळा शांतपणा ‘तीच गं मी!’ म्हणताना ती सोडायची. समोर जे कुणी बसलं असेल त्याच्या अंगावर ती ‘भॉक्क’ केल्यासारखं डोळे मोठे करून ‘तीच गं मी!’ असं ओरडायची. तिच्या या ‘महान’ आविष्कारामुळे तिच्या या गोष्टीच्या प्रत्येक प्रयोगाचा शेवट समोरच्याच्या यशस्वी जीवघेण्या किंकाळ्यांमध्ये व्हायचाच व्हायचा!
मला अण्णा आणि आजी दोघंही उत्कृष्ट कथा पोचवणारे वाटतात. त्यांनी त्यांच्या नकळत गोष्टी सांगण्याच्या अनेक लुभावणाऱ्या वाटांशी माझी लहानपणीच तोंडओळख करून दिली. दोघांनीही त्यांच्या त्यांच्या ‘असण्यांना’ साजेशा गोष्टी त्यांच्या त्यांच्या पद्धतीनं, क्वचित त्यांच्या पद्धतीनंच ‘सहज’ पद्धत तोडूनही आम्हा भावंडांमध्ये आहेत. लहानपणी गोष्ट जिथून सांगायला सुरुवात होते तीच गोष्टीची सुरुवात आणि सांगून संपते तो शेवट असं वाटायचं. पण आता अण्णा-आजीच्या गोष्ट सांगायचीच गोष्ट सांगताना जाणवतं की सुरुवातीच्या कितीतरी आधीच सुरू झालेली असते गोष्ट आणि शेवटच्या खूप नंतर संपते- अर्थातच चांगली सांगितली गेलेली गोष्ट.
आजी-अण्णांच्या निमित्तानं भवतालच्या कितीतरी गोष्टी पाहते आहे. तेव्हा जाणवतं आहे, काही गोष्टी सांगून कधीच्या संपल्या तरी संपलेल्याच नाहीत. संपतच नाहीत. सांगणारा आणि गोष्ट दोघंही असे तगडे होते की संपल्याच नाहीत काही गोष्टी. एका ऐकणाऱ्यापासून दुसऱ्यापर्यंत लांब लांब जात राहिल्या. वाढतंच राहिल्या. रामायण-महाभारतासारख्या! शिवाय गोष्टी सांगायच्या सुद्धा किती किती वाटा असू शकतात. आजी-अण्णांनी शब्दरूपी गोष्टी सांगायच्या वाटा दाखवल्या, पण एखादं कुणीसं आपलं आयुष्य जगण्याच्या पद्धतीतून गोष्ट सांगतं, कुणी आपल्या स्वर्गीय गाण्यातून सांगतं, कुणी कुठल्याशा अमर शास्त्रीय शोधातून सांगतं. सत्यजित रेंचा सिनेमा; लताबाई, किशोरीबाई, भीमसेनजींचा आवाज; पॉल क्ली ची चित्रे; गुरुत्वाकर्षणाचा शोध या सगळ्या त्या मोठय़ा मोठय़ा लोकांनी त्यांच्या त्यांच्या पद्धतीनं सांगितलेल्या न संपणाऱ्या गोष्टीच की!
अण्णा-आजींनी या न संपणाऱ्या गोष्टी शोधायला शिकवलं तसंच ऐकायलाही शिकवलं. अण्णा-आजींची गोष्ट मन लावून ‘ऐकणाऱ्या’ माझ्यापाशी सुद्धा या निमित्तानं थांबावसं वाटत आहे.
आयुष्य म्हणजे आपली गोष्ट सांगणं आहेच, पण कधी कधी का होईना, आपली गोष्ट बाजूला ठेवून दुसऱ्या कुणाची गोष्ट ऐकू पाहणंही आहे. मी केलेल्या ‘पुनश्च हनिमून’ नावाच्या नाटकात नाटकभर नवरा त्याची गोष्ट सांगत राहतो, पण शेवटी मात्र बायकोला म्हणतो, ‘आता तू तुझी गोष्ट सांग, मी ऐकतो.’ मला या वाक्याशी नेहमी भरून येतं. दुसऱ्याची गोष्ट खऱ्या अर्थानं ऐकू पाहणं, ही किती उत्कट संधी असू शकते त्या दुसऱ्याशी स्वत:ला खऱ्या अर्थानं जुडू देण्याची! माझ्या जगण्याची गोष्ट सांगता सांगता, आसपासच्या न संपणाऱ्या गोष्टी मला खऱ्या अर्थानं ऐकायच्या आहेत.
गोष्टी वाटा आहेत. न संपणाऱ्या माझ्या आवडत्या गावांना घेऊन जाणाऱ्या. आवडत्या गोष्टीच्या आवडत्या वाटांवर चालणं ही सुद्धा एक न संपणारी आणि मला रंजकतेनं मोठं करणारी एक गोष्ट आहे. म्हणूनच ती न संपणारी असली तरी कापूसकोंडय़ासारखी तीच तीच नाही!    

Denial of child custody on charges of adultery is wrong
व्याभिचाराच्या आरोपास्तव अपत्याचा ताबा नाकारणे चुकीचे
Loksatta vyaktivedh John Barth The Floating Opera Novel Novel writing
व्यक्तिवेध: जॉन बार्थ
Loksatta chaturang Think rationally disbelief restless
इतिश्री: भावनेवर तर्कशुद्ध मात!
Career MPSC exam Guidance UPSC job
करिअर मंत्र