25 February 2020

News Flash

बोधिवृक्ष : निश्चयाचा महामेरू

खरे तर मनुष्याच्या दु:ख, अशांती व अपयशाचे कारण आहे, त्याच्यातील आत्मविश्वासाचा अभाव, निश्चयाची कमतरता.

| December 20, 2014 01:01 am

खरे तर मनुष्याच्या दु:ख, अशांती व अपयशाचे कारण आहे, त्याच्यातील आत्मविश्वासाचा अभाव, निश्चयाची कमतरता. स्वत:वरील विश्वास गमावलेली माणसे कोणतेही कार्य सुरू करण्यापूर्वी नाना प्रकारच्या शंका व नकारात्मक प्रश्नांची मालिकाच आपल्यासमोर उभी करतात. खरे तर कोणत्याही क्षेत्रात यशस्वी व्हायचे असेल तर त्यासाठी योग्य दिशेने वाटचाल व खडतर मेहनत आवश्यक असते.
‘निश्चयाचे बळ, तुका म्हणे तेचि फळ’ खरोखरीच दृढनिश्चय व आत्मविश्वास यांच्या बळावर मनुष्याचे कुठलेही ध्येय, कुठलाही उद्देश वा कुठलेही लक्ष्य सहजसाध्य होते. इतकं की एखाद्या अशक्यप्राय गोष्टीलाही तो शक्य करू शकतो. थोरामोठय़ांची चरित्रे वाचली तर असे लक्षात येते की त्यांच्या या गुणवैशिष्टय़ांमुळेच अशक्य वाटणारी कामे त्यांनी लीलया पार पाडली व यशाचे मानकरी बनून आपले नाव इतिहासात अजरामर करून ठेवले. जिजाऊंसारख्या स्वतंत्र बाण्याच्या आईने शिवबांना राम-कृष्ण आदी देवतांच्या, शूरविरांच्या गोष्टी सांगून तर दादोजी कोंडदेव यांसारख्या राजकारण धुरंधर व स्वातंत्र्यप्रेमी शिक्षकाने राजकारणातील व युद्धातील डावपेच शिवबांना शिकवून त्यांच्यातील आत्मविश्वास जागृत केला व स्वाभिमानाचे बीज पेरले. म्हणूनच केवळ शिवराय हिंदवी स्वराज्याची स्थापना करू शकले. म्हणूनच त्यांचे गुरू श्रीसमर्थ रामदास स्वामी यांनी त्यांचा महिमा- ‘निश्चयाचा महामेरू, बहुत जनासी आधारू’ अशा शब्दांत वर्णिला आहे.
एकदा इंद्रदेवानेही कुठल्याशा कारणाने रागावून आकाशवाणी केली की, तीन वर्षांपर्यंत वसुंधरेवर पाण्याचा एकही थेंब पाडणार नाही. आषाढ महिना आला. इंद्राने पाहिले की, एका म्हाताऱ्या शेतकऱ्याने जमीन नांगरण्यास सुरुवात केली. इंद्र मनुष्याचे रूप घेऊन तेथे आला व म्हणाला, ‘मूर्ख माणसा, तुला माहीत आहे ना तीन वर्षांपर्यंत पर्जन्यवर्षां होणार नाही, मग तू नाहक व्यर्थ परिश्रम का बरे करीत आहेस? तू इंद्राची आकाशवाणी ऐकली नाहीस का?’ त्यावर तो शेतकरी म्हणाला, ‘हो, मी ती आकाशवाणी जरूर ऐकली. पण त्या घोषणेमुळे मी माझा चरितार्थ चालवणारा व्यवसाय व माझे ठरलेले काम का सोडून देऊ? तीन वर्षे असेच हातावर हात धरून बसून राहू? जर का तीन वर्षे मी असेच बसून राहिलो तर पूर्वजांकडून शिकलेले हे शेतीचे काम मी विसरूनही जाईन. मी असा परावलंबी झाल्यामुळे माझी मुलेदेखील अकार्यक्षम होतील. म्हणून इंद्राची गोष्ट इंद्रच जाणो. मी मात्र माझे काम करतच राहणार.’ त्या म्हाताऱ्या शेतकऱ्याचे हे विचार ऐकून इंद्रालाही वाटले की, जर हा शेतकरी स्वत:ला कर्म करण्यापासून परावृत्त करू शकत नाही तर मीदेखील माझ्या कर्मापासून का परावृत्त व्हावे? लागलीच पाऊस सुरू झाला. शेतकऱ्याचा दृढनिश्चय व आत्मविश्वासामुळे इंद्रदेवाचेही मतपरिवर्तन झाले.

डॉ. राम मनोहर लोहिया यांच्या देशभक्तीबद्दल तर आपण सारे जाणतोच. पण यांच्या व्यक्तिमत्त्वातील महत्त्वाचा पैलू होता- त्यांच्यातील दुर्दम्य आत्मविश्वास. एकदा जहाजाने ते मद्रासच्या किनाऱ्यावर उतरले. पण त्यांना पुढे कलकत्त्याला जायचे होते. पण तेथपर्यंतच्या प्रवासासाठीचे पैसेदेखील त्यांच्याकडे नव्हते. तेथून चालत ते ‘हिंदू’ या वृत्तपत्र कार्यालयात आले व तेथील संपादकांना भेटले. संपादकांना ते म्हणाले, ‘मला आपल्या वृत्तपत्रासाठी दोन लेख द्यायचे आहेत?’ ‘द्या की मग आपले लेख,’ संपादक म्हणाले.
‘कागद पेन द्या, मी आता आपणास लेख लिहून देतो.’ संपादक आश्चर्याने त्यांच्याकडे पाहू लागले. तेव्हा डॉ. लोहियांनी सत्य परिस्थिती सांगितली. ती ऐकून संपादकांनी त्यांना हवे असलेले लेखन साहित्य पुरवले व काही तासांतच डॉ. लोहिया यांनी अतिशय अभ्यासपूर्ण असे दोन लेख संपादकांना सुपूर्द केले. संपादकांना त्यांच्यातील असामान्य प्रतिभेचा प्रत्यय आला. त्यांनी योग्य तो परिश्रमिक मोबदला डॉ. लोहियांना दिला व त्याच मिळालेल्या पैशांनी ते इच्छितस्थानी पोहचले. हा डॉ. लोहिया यांचा स्वत:वर असलेला आत्मविश्वासच होता. त्यामुळेच त्यांनी लागलीच लेखही लिहून दिले व आपल्या विचारांना प्रत्यक्षात आणले.
खरे तर मनुष्याच्या दु:ख, अशांती व अपयशाचे कारण आहे, त्याच्यातील आत्मविश्वासाचा अभाव, निश्चयाची कमतरता. स्वत:वरील विश्वास गमावलेली माणसे कोणतेही कार्य सुरू करण्यापूर्वी नाना प्रकारचा शंका व नकारात्मक प्रश्नांची मालिकाच आपल्यासमोर उभी करतात. खरे तर कोणत्याही क्षेत्रात यशस्वी व्हायचे असेल तर त्यासाठी योग्य दिशेने वाटचाल व खडतर मेहनत आवश्यक असते. बऱ्याच वेळा ट्रकवर लिहिलेला एक सुविचार आठवतो- ‘मेहनत मेरी, रहमत तेरी’. गुणवत्तेच्या दारी पोहचण्याआधी परिश्रमाचा घाम गाळलाच गेला पाहिजे.  हिंमत करून एक-एक पाऊल पुढे टाकतो त्यालाच भगवंतदेखील मदत करतो.
 एकदा एक प्रसिद्ध मुस्लीम संत मुल्ला नसरुद्दीन आपल्या नववधूसह जहाजाने प्रवास करीत होते. वाटेत जोराचे वादळ सुरू झाले. जहाजावरील सर्व प्रवासी आता जहाज बुडणार या भीतीने गर्भगळीत झाले. मुल्लांची पत्नीदेखील घाबरून आपल्या पतीला म्हणाली, जहाज बुडणार म्हणून सर्व लोक घाबरले असताना आपण एवढे निश्च्िंात कसे? पत्नीचा हा प्रश्न ऐकताच त्यांनी कमरेला लटकवलेल्या म्यानातून तलवार काढून तिचे टोक पत्नीच्या मस्तकावर ठेवले व म्हणाले, ‘घाबरलीस की नाही?’ त्यावर ती म्हणाली, ‘माझ्या प्रश्नाचं उत्तर न देता ही काय थट्टा चालवलीय आपण? आपल्या हातातील तलवारीला मी का घाबरेन? आपण तर माझे पती आहात. आपण तर आमच्यावर स्वत:पेक्षा अधिक प्रेम करता.’ तिचे हे उत्तर ऐकून मुल्ला नसरुद्दीन म्हणाले, ‘माझ्या हातातील तलवारीला तू घाबरत नाहीस कारण तू मला आपला सखा, साथी समजतेस. त्याचप्रमाणे मीदेखील परमेश्वराला माझा सखा, साथी समजतो. तुला जशी तलवारीची भीती वाटत नाही तसे मलादेखील वादळाची भीती वाटत नाही. तो आहे, तो संकटातून वाचवेल हा विश्वास मला आहे.
जीवनावरचा व जगदीशावरचा अतूट विश्वासच अशी किमया घडवू शकतो. आमच्या विश्वविद्यालयात आम्हाला शिकवलं जातं, ‘तुफाँ को भी तोहफा समजो’ संकटं आम्हाला खूप काही शिकवण्यासाठीच येत असतात. त्यामुळेच तर माणूस खऱ्या अर्थाने विचारशील, धैर्यशील, निधडय़ा छातीचा, कणखर व अनुभवी बनतो. अडचणींशिवाय माणसाचे मन खंबीर व शरीर पक्के बनत नाही. संघर्षांशिवाय जीवनाची मजाच नाही, असं अभ्यासकदेखील मानतात.
राम-रावण युद्धाच्या आधी अंगद यास लंकेला श्रीरामाचा दूत म्हणून पाठवण्याचा निर्णय घेतला गेला, जो ‘अंगद-शिष्टाई’ म्हणून ओळखला जातो. अंगदाने अतिशय नम्रतेने रावणास सांगितले, की त्याने हा अविचार सोडावा व श्रीरामाला शरण यावे. रामाच्या शक्तीशी तू परिचित नाहीस. माझ्यातही जी शक्ती आहे तीदेखील रामाची आहे. पण अहंकारी रावणाला मात्र याचा फारच राग आला. क्रोधाच्या आवेशात तो अंगदाला म्हणाला, ‘मी तुला एका क्षणात येऊन उचलून फेकून देऊ शकतो. मग पाहू या तुझ्यात किती शक्ती आहे ते.’ यावर अंगदाने रावणास सांगितले की, एवढी मेहनत करण्याची गरज नाही. माझा फक्त एक पाय हलवून दाखवावा.
 रावणाच्या सभेतील सर्व राक्षसवीरांनी अंगदाचा पाय हलवण्याचा खूप प्रयत्न केला. पण सर्व असमर्थ ठरले. परिस्थितीदेखील असेच दृढनिश्चय व आत्मविश्वासाचा पाय हलवण्याचा प्रयत्न करते. तेव्हा आपल्यालाही अंगदाप्रमाणे ठाम राहायचं सामथ्र्य अंगी आणायला हवं. पूर्ण दृढतेने, आपल्या स्वत:वरच्या अतूट विश्वासाने परिस्थितीने केलेले प्रहार तुम्ही परतवून लावू शकाल. चिंता करू नका. ‘किं कर्तव्यमूढ ’ बनू नका. अंधाराच्या भीतीने सूर्य आपलं उगवणं सोडतो का? सूर्योदय झाल्यानंतर अंधार आपसूकच निघून जातो हे आपणास ठाऊक नाही का? बस, एवढंच ध्यानी ठेवायचं, आपण सफल होणारच. कारण दृढतेमुळेच तर खरी सफलता मिळते.    
(प्रजापिता ईश्वरीय विश्वविद्यालयाद्वारा प्रकाशित होणाऱ्या ओम शांती मीडिया या वृत्तपत्र विभागाद्वारा प्रसिद्ध होणाऱ्या आध्यात्मिक प्रवचनांचा हा अनुवाद)
(समाप्त)

First Published on December 20, 2014 1:01 am

Web Title: strength of determination
Next Stories
1 रुग्णसेवेचा वसा
2 चतुरंगमध्ये(२९ नोव्हेंबर) प्रसिद्ध झालेल्या ‘जिणे वैधव्याचे’ या लेखावरच्या या प्रतिक्रिया कडवट अनुभव सुसह्य़
3 कोणती पुण्याई ये फळाला..
Just Now!
X