अध्यात्म हा शब्द फारच मर्यादित अर्थाने आपण वापरतो. म्हणजे धार्मिक, कर्मकांड, उपास-तापास, पूजा-अर्चा, नवस-सायास, कुळाचार इत्यादी सारे काही करणारी व्यक्ती फारच आध्यात्मिक आहे, असे  सहज म्हणून जातो.
वास्तविक अध्यात्म या शब्दाची फोड अधि+आत्म अशी आहे. अधि म्हणजे ‘जवळ जाणे’ आणि ‘आत्म’ म्हणजे स्वत:च्या. थोडक्यात अध्यात्माचा खरा अर्थ ‘आत्मदर्शन’ असा आहे. आरशात पाहायला वयाचे बंधन नसते. आपल्या सगळय़ांना स्वत:कडे पाहायला खूप आवडते, पण खऱ्या अर्थाने पाहायला आपली साधना आपल्याला शिकविते. स्वत:तले दोष, आपल्या आवडी-निवडी, स्वत:च्या उणिवा, हातून घडलेल्या/ घडणाऱ्या चुका या साऱ्याकडे नुसतेच पाहायचे नाही तर त्यातून स्वत:ला सुधारायचा प्रयत्न करायचा. कर्तृभाव, भोक्तृभाव सोडून देऊन साक्षीभाव जागृत करायचा. साधना काही निर्माण करण्यासाठी नाही तर ‘निर्मिती तत्त्व अथवा ब्रह्माचा’ अनुभव देण्यासाठी आहे. स्वत:च्या शुद्धीसाठी केलेली साधना प्रसिद्धी सिद्धी यांहीपेक्षा शुद्ध आत्मिक समाधान देते. अरिवदजी म्हणत ”Yoga is not a part time activity. It is a methodized effort – towards self perfection.””
शरीर साधना
आज आपण गुडघ्याचा सांधा अजून थोडा मोकळा करून घेऊ या.
 प्रारंभिक बठक स्थितीतील विश्रांती अवस्था घ्या. दोन्ही हात उजव्या मांडीखाली ठेवून पाय गुडघ्यात दुमडा. गुडघ्यापासून खालचा पाय वर्तुळाकार पद्धतीने फिरवा. घडय़ाळाप्रमाणे व त्याविरुद्ध अशा प्रकारे ही क्रिया १०-१० वेळा आपल्या क्षमतेनुसार करण्यास हरकत नाही. मात्र श्वास रोखून धरू नका. शरीराचा भार समर्थपणे पेलण्याचे काम गुडघे करतात. ही आसने गुडघ्याचा सांधा, वाटी व त्याभोवतालचे स्नायू, पोटरीचे स्नायू यांचे सक्षमीकरण करतात.