उमा बापट – umaajitbapat@gmail.com

भीती, चिंता, अस्वस्थता दूर सारायची असेल, तर मनाचा खंबीरपणा स्वत:जवळ कायम लागतो. प्रामाणिक कष्टांमधून आत्मविश्वास येतो आणि संयमी राहणं प्रयत्नांतून जमू शकतं. विनाकारण होणारी निंदा झटकून टाकायला आत्मबळ मिळवता येतं. स्वत:ला, मुलांना, घराला, कामाच्या ठिकाणच्या सहकाऱ्यांना शिस्त लावण्यापासून ते समाजहितासाठी एखादा मोठा निर्णय घेण्यापर्यंत अनेकदा ‘निर्भयता’ हा पैलू अतिशय मोलाचा ठरतो. विविध मर्यादा ओलांडून वाट मोकळी करायला निर्भयतेचं आणि कणखरतेचं स्वागत करूया.

‘श्यामची आई’ या पुस्तकातल्या गोष्टी लहानपणी कानावर पडल्या असतील, स्वत: वाचल्याही असतील. मूल म्हणून त्या ऐकणं, वाचणं आणि पालक म्हणून त्याकडे बघणं, यात वेगळे दृष्टिकोन मिळतात. पालकत्व या भूमिकेतून त्या गोष्टींकडे बघू, तेव्हा श्यामची आई कोणत्या मानसिकेतेनं एखाद्या गोष्टीचा आग्रह धरत होती हे समजून घेता येईल. चांगली कृती करायला जर श्याम बिचकला असेल तर आई त्याला जाणीव करून देते, की एखादं चुकीचं काम करताना जर आपण मागे-पुढे पाहात नसू; तर जगापेक्षा वेगळं, पण नेक काम करताना तू का बिचकतोस?

‘नेक’ काम करायला न डगमगणं हे कणखरपणाचं एक अंग झालं. सगळा प्रवाह एका दिशेला ‘हो’ ला ‘हो’ करत असताना नेक काम करायला पुढे सरसावणं, आपल्या पुढाकारानं त्या परिस्थितीला योग्य तो छेद देणं, न घाबरणं, म्हणजे  निर्भय, कणखर असणं. सध्या अनेक चांगल्या आणि विशिष्ट उद्देशासाठी समाजमाध्यमांचे विविध गट तयार झालेले दिसतात. पण कधी कधी ‘व्हॉट्सअ‍ॅप’ वापरासाठी नव्यानं आचारसंहिता तयार करायला हवी का असं वाटावं, अशी वेळही येते. ‘व्हॉट्सअ‍ॅप’मधल्या एखाद्या गटाचा हेतू कितीही नेमका असला- जसे की शैक्षणिक, पर्यावरण जागरूकता, सकस वाचन साहित्य, तरीही त्या गटांवर कुणी ना कुणी त्या हेतूशी संबंध नसलेले अनावश्यक संदेश, व्यावसायिक जाहिराती, तथाकथित विनोदी किस्से अचानक पाठवून देतात. त्याला आगेमागे धागेदोरेही नसतात. अशा वेळी गटातले काही सभासद वैतागतात, कुरकुरतात. काही दुर्लक्ष करतात. काही मात्र धारिष्टय़ दाखवून त्या गटाचा मूळ हेतू काय याची आठवण करून देतात. या गटामध्ये सहभागी होताना काय पथ्य पाळणं अपेक्षित आहेत ते परत पटवून देतात. ही निर्भय कणखरता समाजाचा तोल सांभाळण्यात हातभार लावते.

निर्भयता म्हणजे बेफिकिरी, काही न जुमानणं असं मात्र अजिबात अपेक्षित नाही. एक पिढी वारंवार सांगत असते, ‘आमची आमच्या पालकांसमोर बोलायची टाप नव्हती’,  ‘आमचं शिक्षण ‘छडी लागे छमछम’ असं झालं’, ‘आमचे शिक्षक कडक होते,’ वगैरे. दुसरीकडे आजचे पालक, शिक्षक भेटतात. मुलांसमोर काहीसे हात टेकलेल्या अवस्थेतच ते बहुतेक वेळा  बोलत असतात. ‘काय करणार , पण मुलं ऐकतच नाहीत..’, ‘हल्ली काहीबाही ऐकून मुलांना ओरडायचं तरी नको वाटतं.’ या दोन्ही टोकाच्या अवस्थांपासून वेगळी, संतुलित विचारधारा ही निर्भय, कणखर मानसिकतेत अपेक्षित आहे. कोणी कोणाला घाबरणं, न घाबरणं, धाकातून विशिष्ट प्रकारचं वागणं किंवा बिनधास्त असणं यातली कोणतीही छटा यात सामावलेली नाही.

मुलांना शिस्त लावताना कडवटपणा येऊ शकतो. त्या कटुतेला पालक कधी कधी हल्ली घाबरतात, असं पालकांनी विचारलेल्या शंकांमधून जाणवतं. मुलाला न दुखवता त्यांना वळण कसं लावायचं, असा सारांश ज्यातून निघतो अशा आशयाच्या हरतऱ्हेच्या शंका पालक विचारतात . छोटय़ा मुलांच्या आणि मोठय़ा मुलांच्याही पालकांना अशा शंका भेडसावतात. शिस्त लावताना मुलांचं रुसणं, रडणं झालं, म्हणजे काही ते पालक-मुलाच्या नात्याला सर्वार्थानं बाधित करतं असं वाटायचं कारण नाही. कुमारवयातली मुलं वाद घालतात, कधी ‘अरे ला का रे’ करतात, म्हणून पालकच दडपण घेतात. शरीराला नव्या सवयी लावताना कष्ट पडणार असतात. बदल स्वीकारताना पहिल्यांदा काही जण तो अडवायला बघतात. हल्ली ‘कम्फर्ट झोन’ हा इंग्रजी शब्दप्रयोग प्रचलित आहे. अर्थात स्वत:च्या उबदार पांघरुणातून बाहेर पडायला काही लोक नाखूश असतात. मुलांनापण साहजिकच ती पायरी ओलांडणं सुखावह नसतं. पण ती क्षणिक नाराजी आहे हे लक्षात घेऊन पालकांनी हिंमत हरायची नसते. मुलांचा हा विरोध न मानता एक अवस्था मानून वेगवेगळया वयातल्या मुलांसाठी वेगवेगळ्या पध्दतींनी ती एक तात्कालिक स्थिती म्हणून हाताळायला शिकावं लागतं. आणि यासाठीही निर्भय, कणखर व्हावं लागतं.

कुणी पोहणं शिकताना तिथल्या शिक्षकांना कणखर असावं लागतं, तर काही पालकांना शाळेच्या पहिल्या दिवशी मूल रडलं तरी उगीच भावुक न होता मुलाला शाळेत सोडावं लागतं. कधी एखादी चुकून झालेली चूक कबूल करायला मुलांना स्वत:चा अपमान वाटतो. अशा वेळीदेखील न लाजता चूक कबूल कशी करायची, यासाठी मुलांना पालकांकडून समंजस पण आग्रही कणखर सोबत हवी. प्राथमिक शाळेतल्या वैदेहीला एकदा बाबांनी आपल्या शाळेतल्या बाईंची माफी मागण्यासाठी पत्र लिहायला लावलं. वय लहान असलं आणि चूक खूप मोठी नसली तरी आवश्यक तेव्हा आपण क्षमा मागायची असते, ही शिकवण देणं पालकांचं कर्तव्य असतं.

कामात उत्तमता यावी म्हणून आग्रही असणारे एखादे वरिष्ठ अधिकारी, साऱ्या घराला वक्तशीरपणाचं वळण लावणारी एखादी गृहिणी, किंवा शुद्धलेखन आणि नेटकं हस्ताक्षर हे कटाक्षानं विद्यार्थ्यांना पाळायला लावणारे कुणी शिक्षक, यांची  ‘कडक’ म्हणून प्रतिमा तयार होते. वरवर अशा कडक वाटणाऱ्या लोकांचा राग येतो, त्रास वाटतो. वास्तवात अनेकांमध्ये एखादा गुण कायमची सवय म्हणून अंगी रुजवण्यात अशा आग्रहाचा खूप भरीव वाटा असतो. जसं वरच्या उदाहरणातले उत्तमता, वक्तशीरपणा आणि नेटकं लेखन असे माणिक-मोती कुणाचा सहजभाव होऊन जातो. ‘निस्पृह देणं’(१४ मार्च) या लेखात आपण बघितलं, की समाजातला एक सजग घटक या नात्यानं आपण मूल्य-धन देणं थांबवायचं नसतं. त्यालाच जोडून हे मूल्य-धन ज्यांच्यापर्यंत पोहोचवायचं ते पोहोचण्यासाठी प्रसंगी कणखर व्हायची वेळ आली तरी घाबरायचं नाही, असंही ठरवूया.

काही वेळेला मुलांची किंवा अगदी वयानं मोठय़ा असलेल्या व्यक्तींचीही प्रगती होण्यासाठी त्या व्यक्तीसोबत कुटुंबाची निर्भयता गरजेची ठरते. मुलांना गिर्यारोहण सहलींना पाठवताना घरच्यांनी घाबरून चालत नाही. मुलगी स्वत:चं स्वत: अभ्यासाचं नियोजन करून एखाद्या परीक्षेला उतरायचं ठरवते, तेव्हा तिचा आत्मविश्वास कमी करून चालत नाही.

अनेक कामांमध्ये निर्भयतेनं वावरून, दिलेली जबाबदारी पूर्ण करणं ही प्राथमिक पात्रता असते. सैनिकी सेवा, प्रशासकीय सेवेतले काही हुद्दे, वैद्यकीय सेवेतली शल्यचिकित्सेसारखी तज्ज्ञतेची क्षेत्रं, या विविध कामांत निर्भयतेच्या वेगवेगळ्या छटा दिसतात. या क्षेत्रांमध्ये पुढे जायचं असेल, तर त्या कार्यक्षेत्राची निवड केलेल्या व्यक्तींसोबत त्याच्या कुटुंबीयांनीपण निर्भय, कणखर साथ दिली तरच दैनंदिन काम आणि त्या कामातली बढती दोन्ही शक्य आहे. सीमेवरच्या जवानाच्या पत्नीची कणखरता हा तिच्या अस्तित्वाचा जणू एक अविभाज्य भाग बनून जातो. नेहमी आकाशात विमान उड्डाण करणाऱ्या वैमानिक स्त्रीचे कुटुंबीय निर्भयतेला अंगीकारूनच दैनंदिन जीवन जगू शकतात. ‘करोना’च्या काळात मैदानात उतरून अत्यावश्यक सेवांमधील काम करणाऱ्या लोकांबरोबरच त्यांची कुटुंबंही निर्भय, कणखर राहून या लढय़ात खंबीर साथ देत आहेत.

जोखीम घेत त्यातून प्रगती साधणं, ही माणसाची आणखी एक महत्त्वपूर्ण क्षमता. उद्योग-व्यवसायात उडी घेताना, तसंच देशपातळीवर निर्णय घेणाऱ्या नेत्यांनाही जोखीम पेलावी लागते. त्यासाठी आवश्यक पूर्वतयारी आणि अभ्यास असेल तर नियोजनपूर्वक घेतलेल्या जोखमीमुळे यशस्वी वाटचाल होऊ  शकते. साध्या घटनांपासून सामान्य माणसाच्या जीवनातल्या मोठय़ा निर्णयांपर्यंत कोणत्या ना कोणत्या प्रकारची जोखीम पत्करायची वेळ सगळ्यांवर येते. तेव्हा ती विचारपूर्वक, निर्भयतेनं घेतली जाते किंवा नाही, यावरून पुढच्या आयुष्यावरही फरक पडू शकतो. महाराष्ट्रात गुंजवणी खोऱ्यातल्या काही छोटय़ा खेडय़ांत मुलींना सातवीनंतरचं  शिक्षण घेण्याची सोय नाही. वेल्हयाला त्यांच्यासाठी ‘जास्वंद गिरीकन्या’ असा एक मुलींचा सहनिवास- म्हणजे वसतिगृह सुरू करण्यात आलं आहे. मुलींना त्या वसतिगृहात राहायला पाठवणं ही कानाकोपऱ्यातल्या खेडय़ांतल्या कुटुंबांना जोखीम वाटली असणार. पण ती ज्या कुटुंबांनी पेलली त्या घरातल्या मुली आज बारावीपर्यंतचं शिक्षण पूर्ण करून पदवी मिळवणाऱ्या कदाचित त्यांच्या परिवारातल्या पहिल्या मुली ठरतील, आत्मनिर्भर बनतील. गणितज्ज्ञ रामानुजन यांनी त्याच्या खूप आधी तमिळनाडूतून इंग्लंडला जाणं, ही त्यांच्या घरच्यांनाही जोखीम वाटली असणार. पण तेव्हा इतक्या दूर गेल्यावरच त्यांच्या असामान्य गणिती क्षमतेचा ठेवा जगासमोर आला.

‘भित्यापाठी ब्रह्मराक्षस’ अशी म्हण आहे. या काळात तर मोठा राक्षसपण लागत नाही! टिल्लू-पिल्लू  राक्षसपण वरचेवर प्रकटतात आणि घाबरणारे बिचकून वागतात. ‘‘अगं, तू अजून दहावीसाठी शिकवणी वर्ग नाही शोधलास?  प्रवेश संपतील हं.,’’ असं ऐकलं, की स्वयंअध्ययनावर विश्वास असलेले विद्यार्थीपण गोंधळून जातात. ‘‘पाढे कशाला पाठ करू, त्यानं काय होणारे,’’ असं मुलानं विचारलं, की कारण माहिती असूनही ठोस उत्तरातून मुलांना ते पटवून द्यायला पालक असमर्थ ठरतात. अशी कितीतरी राक्षसाची शिंगं उगारली जातील. तेव्हा निर्भय आणि कणखर अशी आंतरिक बळ देणारी मानसिकता सतर्क ठेवूया. आपल्या आणि इतरांच्या निरामय घरटय़ाच्या रक्षणासाठी निर्भय, कणखर मनं जोडूया.