News Flash

सामथ्र्य भावनांचे

अनुकूल, सुखद भावना फक्त शरीराची सुदृढता/क्षमता टिकवायला किंवा वाढवायला मदत करतात असं नाही,

| February 14, 2015 03:09 am

अनुकूल, सुखद भावना फक्त शरीराची सुदृढता/क्षमता टिकवायला किंवा वाढवायला मदत करतात असं नाही, तर ताणतणावाच्या वेळी अशा भावनांना जाणीवपूर्वक (विचारांच्या मदतीने) मनात रेंगाळू दिलं तर आपण परिस्थितीशी चांगलं जुळवून घेऊ शकतो.

म हाभारतात वाचलेली एक गोष्ट आठवते. कृष्णाची पट्टराणी रुक्मिणी हिला एकदा कृष्णाच्या आपल्यावरच्या प्रेमाची परीक्षा घ्यावीशी वाटली. (जवळजवळ सर्वच बायकांना वाटते तशी!) तिनं चक्क त्याला रोखठोक सवाल केला, ‘‘देव, तुमच्या इतक्या सगळ्या भार्या. मग माझ्यावर किती प्रेम आहे तुमचं?’’ कृष्णच तो, चतुरपणे म्हणाला, ‘‘स्वयंपाकातल्या मिठाएवढं!’’ रुक्मिणी बसली रुसून. बाकीच्या राण्यांची गोडाधोडाशी तुलना आणि माझी मात्र खारट मिठाशी काय? कृष्णाला तेच हवं होतं. त्यानं रुक्मिणीला आग्रहानं महालात जेवायला बोलावलं. नाराजीनं का होईना ती आली. चमचमीत पदार्थानी भरलेलं ताट समोर होतं. तिनं जेवायला सुरुवात केली आणि घास तोंडात घुटमळायला लागला. ‘‘हे काय-अळणी स्वयंपाक? चवच नाही कशाला! मीठ घालायचं विसरले काय सेवक?’’ असं विचारताच कृष्ण हसून म्हणाला, ‘‘हो, चव आणणारं ते मीठच, म्हणून तर माझं तुझ्यावर प्रेम आहे, मिठासारखं.’’  रुक्मिणी खजील झाली.
भावनांचं आपल्या आयुष्यातलं स्थानही मिठासारखंच आहे. त्या नसतील तर आयुष्य म्हणजे बेचव, रखरखीत, निश्चल वाळवंटच नाही का? भावनांची साथ कमी असलेल्या किंवा अतिशय कोरडय़ा असलेल्या माणसाला आपण काय म्हणतो? दगड! कठीण, कोरडा, खडबडीत! त्या उलट सतत भावनाकूल होणाऱ्याला म्हणतो-पापड ! (स्पर्शानंही मोडणारा) मग भावनांचं नेमकं काम काय? त्या मूळच्याच असतात का हळूहळू निर्माण होतात? मुख्य म्हणजे त्या आपलं मन:स्वाथ्य टिकवायला मदत करतात का शत्रूसारख्या वागतात-असे प्रश्न आपल्या मनात सहज निर्माण होतात.
‘भावना’ हा आपल्या उत्क्रांतीतील एक अत्यंत महत्त्वाचा पलू आहे. प्राण्यांनाही भावना असतात. पण अगदी ढोबळ, स्पष्ट आणि मूलभूत गरजा भागवण्यापुरत्या. माणसाच्या भावना मात्र खूपच गुंतागुंतीच्या. हळूहळू विकसित होणाऱ्या, अनुभवांनी बदलणाऱ्या, म्हणूनच खूप मजेदार. भावना म्हणजे आपली ऊर्जेची ‘कोठारं!’ आपल्या प्रत्येक विचार आणि कृतीच्या सोबत येणारी ‘मिठाची चव!’
आपल्याला हे माहीत आहे की भावनांची निर्मिती मुख्यत आपल्या मेंदूत होते. तेथील अनेक रासायनिक द्रव्यांच्या चित्रविचित्र संयोगातून आपण निरनिराळ्या भावना अनुभवतो. त्याच्या बरोबरीनं आपल्या शरीरातील रक्तात थेट मिसळणाऱ्या काही रसायनांचाही त्यात वाटा असतो. काही भावना आपल्याला सुखावणाऱ्या असतात तर काही दुखावणाऱ्या-त्रास देणाऱ्या! हेसुद्धा त्या त्या प्रसंगावार- संदर्भावर अवलंबून असतं.
जेव्हा आपल्याला एखादी आवडती-हवीहवीशी व्यक्ती दिसते, नुसती दिसत नाही तर आपल्याकडे पाहून हसते तेव्हा कसं वाटतं? मस्त! अगदी अंगावरून मोरपीस फिरवल्यासारखं. आपलीही जिवणी नकळत रुंदावते. आपण जेव्हा अशा व्यक्तीशी बोलतो, तिच्या सहवासात असतो, तेव्हा आपल्या मेंदूत ऑक्सिटॉसिन नावाचं एक रसायन तयार होत असतं. हा आनंद, ओढ, फिल गुड या भावना त्यामुळेच निर्माण होतात. मग त्याच आपल्याला पुढची ऊर्जा पुरवतात. तोच परिणाम एन्डॉíफन्स या रसायनांचा असतो. प्रतिकूल/ नकोशा भावनांचा परिणाम कमी करायलाही ती रसायनं मदत करतात. आपण व्यायाम करतो त्यानंतर जे ताजंतवानं वाटतं ते त्यामुळे. मला आठवतं, पीएच.डी.ची अंतिम तोंडी परीक्षा देताना माझ्या मनावर खूप ताण आला होता. थोडी भीती/ चिंता वाटत होती. पण परीक्षा चांगली झाली आणि परीक्षकांनी कौतुक केलं, त्यानंतर विद्यापीठाबाहेर पडून स्कूटर सुरू करताना जी ‘येस्स!’ची भावना ‘तना-मनात’ अनुभवली होती ती आजदेखील नुसत्या आठवणीनं मनात ताजी होते. भावनांचं जे महत्त्वाचं काम आहे ते अशा अनुभवांना स्मरणकुपीत जोडण्याचं, घट्ट बसवण्याचं! अशा सुखावणाऱ्या, ताण कमी करणाऱ्या भावनांचे अनुभव सहज आठवल्यानंतरही खूप छान वाटतं. मग जर जाणीवपूर्वक अशा भावनांचं स्मरण केलं तर? चांगल्या, अनुकूल भावनांना आपण ठरवून जोडून घेऊ शकलो तर? अशा ‘शुभस्मृती’ मनात पुनपुन्हा जागवू शकलो तर?
  हॅरी पॉटर ह्य़ा सुप्रसिद्ध कादंबरी शृंखलेतही या ‘शुभस्मृती’ संकल्पनेचा खूप चपखल वापर केलेला आहे. जेव्हा निराशेचे-आनंद नष्ट करणारे डिमेंटर्स (दृष्ट वृत्तीचे प्रतीक) आसपास येतात तेव्हा एक प्रकारचा सुन्नपणा येतो, जगणं निर्थक वाटायला लागतं. जणू काही जगण्याची इच्छाच खेचली जाते असं वाटतं, तेव्हा त्यावर मात करायला वापरलेला जो मंत्र हॅरी वापरतो, पण तो म्हणताना आपल्या मनातली सर्वात सुखद स्मृती नजरेसमोर आणायची अट असते. म्हणजेच अत्यंत सुखद, मन आनंदानं भरून टाकणारी ती एकच घटना आठवली तरी निराशेचे ढग पांगायला सुरुवात करतात, असं त्यात सुचवलं आहे. ‘साउंड ऑफ म्युझिक’ या मास्टरपिस चित्रपटातही हे खुबीनं दर्शवलं आहे. विजेच्या कडकडाटानं भेदरून जाऊन सातही (एरवीची खटय़ाळ) मुलं मारिया (त्यांची नवी, तरुण दाई) च्या खोलीत येतात, तेव्हा ती एक गाणं म्हणते. त्यात आपल्याला जेव्हा भीती वाटते, वेदना होतात, दुख होते, अपमान वाटतो तेव्हा ‘आठवायच्या’ छान गोष्टींची यादीच आहे. मांजराच्या मऊ मऊ केसांपासून रंगीबेरंगी कपडे आणि इंद्रधनुष्यापर्यंत सगळं ‘देन आय डोन्ट फील सो बॅड!’ असं ती शेवटी म्हणते आणि मुलंही ते पट्कन शिकतात. नंतर एकदा ती नसताना जेव्हा त्यांना खूप ताण देणारी घटना घटते तेव्हा त्यांच्या नकळत ती ते गाणं म्हणायला लागतात. अगदी बघता बघता त्यांचा मूड पालटतो. दुखाच्या/ निराशेच्या भावनेनं आपल्या विचारशक्तीवर जो पडदा टाकलेला असतो, जे अडथळे आणलेले असतात, त्यावर मात करायला सुखद स्मृती-त्यातून निर्माण होणारी आनंदाची-निश्चिततेची भावना मदत करत असते.
खरं तर सर्वच भावना आपल्या जगण्याला अर्थ देत असतात, त्याची रंगत वाढवत असतात. क्षणभर विचार करा-
भीती वाटलीच नसती तर.. आपण बेदरकार, बेपर्वा होऊ.
चिंता वाटलीच नाही तर..आपण निष्किय, कोरडे वागू.
राग आलाच नाही तर.. आपण अन्याय असाहाय्यपणे सोसत राहू.
 पण या भावनांचा अतिरेक झाला तर मात्र ‘गडबड’ होते. इतकंच नाही तर आपल्या प्रकृतीवरही त्याचा विपरीत परिणाम होतो. पाश्चिमात्य देशांत अगदी सूक्ष्म अशा बदलांचाही या संदर्भात अभ्यास केलेला दिसतो. आपल्या प्रतिकारक्षमतेची काळजी घेणाऱ्या पांढऱ्या पेशींमध्ये ‘ळ’ नावाच्या पेशी असतात, ज्या कुठलेही विचित्र किंवा शत्रू ठरू शकतील, अशा आगंतुक जंतूना ओळखून प्रतिजैविकांना  निर्माण करतात आणि त्यांना मारतात, संशोधनात असं दिसून आलंय की जेव्हा मगाशी उल्लेखलेल्या भावना मनाचा ताबा घेतात तेव्हा या ‘नसíगक सन्याची’ ताकद कमी होते, आपण आजारांना चटकन बळी पडू शकतो. दुसऱ्या एका संशोधनात एकूण ४८ पुरुषांना त्यांच्या रोजच्या मूडच्या नोंदी ठेवणारी दैनंदिनी लिहायला सांगितली. अशी तीन महिने त्यांनी दैनंदिनी लिहिली. शिवाय त्यांना रोज एक प्रोटीनची गोळी दिली गेली. त्यांच्या शरीरातील प्रतिजैविकांचे प्रमाण वाढलंच, पण भरीला त्यांची बौद्धिक क्षमताही विस्तारलेली दिसते. इतकंच काय, पण नेहमी होणाऱ्या सर्दीचासुद्धा त्रास कमी व्हायला लागला म्हणून चांगल्या सुखद भावनांचा मनातला सततचा वावर काही ना काही प्रमाणात मदत करतो असंही एका संशोधनात दिसून आलंय. आपल्या शरीराची रोग प्रतिकाराची (विशेषत सर्दीसारख्या विषाणूजन्य रोगांसाठीच्या) पहिली सन्यतुकडी म्हणजे आपल्या लाळेत असलेलं एक विशिष्ट द्रव्य असतं. एका संशोधनात असं दिसून आलं की मनापासून खळखळून येणाऱ्या हास्यामुळे या द्रव्याचं लाळेतलं प्रमाण वाढतं. (हास्य योग-हास्य क्लब्स म्हणून तर इतके फोफावलेत!)
अनुकूल, सुखद भावना फक्त शरीराची सुदृढता/क्षमता टिकवायला किंवा वाढवायला मदत करतात असं नाही, तर ताणतणावाच्या वेळी अशा भावनांना जाणीवपूर्वक (विचारांच्या मदतीने) मनात रेंगाळू दिलं तर आपण परिस्थितीशी चांगलं जुळवून घेऊ शकतो. मनाला सवय लावली असेल तर अगदी टोकाच्या ताणतणावांच्या वेळीही या अनुकूल भावना अनुभवता येतात आणि समस्या जास्त शांत चित्तानं हाताळता येतात.
भावना कधी एकेकटय़ा येत नाहीत. उदाहरणार्थ-सुमंतला परदेशातील एक मोठी नोकरीची संधी मिळाल्याचं कळलं. आनंद तर झालाच होता, पण त्याच वेळी आई-बाबांना सोडून जाण्याची हुरहुर होती, नवीन काम कसे असेल ही उत्सुकता होती आणि सगळी प्रक्रिया सुरळीत होईल याबद्दलची थोडी काळजी,भीतीसुद्धा होती. वरवर पाहता त्याच्या शरीरातले बदल या सगळ्या भावनांकरता बऱ्यापकी सारखे होते, पण जाणीव मात्र वेगवेगळी होती, कारण ती संदर्भाप्रमाणे बदलत होती. म्हणूनच आपण जेव्हा भावना अनुभवतो, तेव्हा शरीरातले बदल आणि डोक्यातले विचार याची कॅलिडोस्कोपिक कॉम्बिनेशन्स होत असतात; जेवढी कॉम्बिनेशन्स जास्त तेवढय़ा भावनांच्या सूक्ष्म छटा.
हव्याशा भावना म्हणजे फक्त आनंद नव्हे तर काही वेळा नुसतीच तृप्ती किंवा प्रेम किंवा वात्सल्य किंवा कुतूहलही! या सगळ्याच भावना आपल्या नुसत्या सुखाच्यापेक्षा खूप गुंतागुंतीच्या असतात. त्यांना अनुभवता येण्यासाठीचे प्रसंग आयुष्यात नियोजनपूर्वक आणणं खूप महत्त्वाचं आहे. त्यासाठी रोजची चौकट बदलून थोडी अजून आव्हानात्मक करायला हवी. सुखाच्याही त्याच त्या कल्पनांमध्ये स्वतला घोटाळत ठेवलं तर त्यातून मिळणारी हवीशी भावना कमी कमी होऊन एका रेषेवर स्थिरावते. चौकटी बदलल्यामुळे छोटय़ा छोटय़ा गोष्टींमधूनही मनस्वास्थ्याकडे  नेणाऱ्या वाटा तयार होतात.
 खरं तर जगण्यासाठी-त्याची खरी ‘मजा’ घेण्यासाठी सर्वच भावनांची गरज असते. पण कृष्णाच्या मिठासारखी! काही वेळा आपल्याच अतिउत्तेजिततेमुळे/विचारांतील घोटाळ्यांमुळे जगणं खारट किंवा अळणी होऊन जातं तेव्हा लागतं ते भावनांचं नेटकं व्यवस्थापन! त्यातून जे विधायक बळ मिळतं त्यामुळे आपण स्वतचंच नाही तर आपल्या जवळच्या सर्वाचंच जगणं सुकर करू शकतो; पण त्याबद्दलची चर्चा थोडा दम खाऊन!
डॉ. अनघा लवळेकर
anagha.lavalekar@
jnanaprabodhini.org  

हव्याशा भावना म्हणजे फक्त आनंद नव्हे तर काही वेळा नुसतीच तृप्ती किंवा प्रेम किंवा वात्सल्य किंवा कुतूहलही!
काही वेळा आपल्याच अतिउत्तेजिततेमुळे/ विचारांतील घोटाळ्यांमुळे जगणं खारट किंवा अळणी होऊन जातं तेव्हा लागतं ते भावनांचं नेटकं व्यवस्थापन!
खुलासा : ३१ जानेवारीच्या लेखात ‘सिंधुताई यांच्या यजमानाच्या निधनानंतर’ असे प्रसिद्ध झाले आहे. त्याऐवजी ‘पतीने दूर लोटल्यानंतर’ असे होते.  

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 14, 2015 3:09 am

Web Title: strongness of feelings
Next Stories
1 निश्चयाचे बळ
2 आनंदाचे मोजमाप?
3 आश्वासक मानसशास्त्र
Just Now!
X