16 February 2019

News Flash

पुस्तकाबाहेरचा अभ्यास

किशोरवयीन आणि युवायुवतींच्या सक्रिय सहभागातून १९८८ पासून जनसेवा समिती मुलांसाठी विविध उपक्रम राबवते आहे.

| March 8, 2014 05:16 am

किशोरवयीन आणि युवायुवतींच्या सक्रिय सहभागातून १९८८ पासून जनसेवा समिती मुलांसाठी विविध उपक्रम राबवते आहे. त्यात अभ्यासाव्यतिरिक्त लोणार सरोवराला भेट, विविध समाधिस्थळांना भेट, सूर्यग्रहण पाहण्यासाठी जाणं वा पानिपतच्या युद्धाला ३०० वर्षे होण्याचं निमित्त साधत पानिपतला भेट. पानिपतच्या युद्धावर पूर्ण दिवसांची कार्यशाळा, वैश्विक गणित, फन विथ मॅथस्, फन विथ फिजिक्स, फन विथ केमिस्ट्री, संगणक जोडणी असे छोटे छोटे अभ्यासक्रम राबवले गेले. त्या संस्थेविषयी..
‘नवी क्षितिजे, नवी आव्हाने.’- कुमारवयीन आणि युवायुवतींना बरोबर घेऊन त्यांच्याचसाठी काम करणाऱ्या जनसेवा समितीचे हे बोधवाक्य. १९८८ मध्ये स्थापन झालेली ही संस्था आजही तेवढय़ाच जोमाने काम करीत आहे. मुलांमधील ऊर्जा, क्षमता, बुद्धिमत्ता यांचा पुरेपूर वापर करून घ्यायचा तर त्यांच्यासमोर हवी, सतत नवी आव्हानं, त्यांना प्रश्न पडायला हवेत आणि त्यांची उत्तरं त्यांनीच शोधायला हवीत, हे पक्कं ठाऊक असणाऱ्या प्राध्यापक, डॉक्टर, शास्त्रज्ञ मोहन आपटे यांच्या संकल्पनेतून ही संस्था नव्हे तर चळवळ सुरू झाली.
प्रथम सरांच्या घरीच सर्व मुलं जमत. १९९५ मध्ये त्यांच्याचपैकी एक- कॅप्टन विनायक शहीद झाला. त्याच्या स्मरणार्थ व्यायामशाळा, कराटे प्रशिक्षण वर्ग, रायफल शूटिंग रेंज सुरू झाली. त्यावेळच्या नगरसेविका मंगलाताई जोशी यांच्या प्रयत्नांतून संस्थेला स्वत:ची वास्तू मिळाली. संस्था सुरक्षित सुरू झाली, आपल्या पायावर उभी राहिली, हे पाहताच सरांनी जबाबदारी नव्या खांद्यावर सोपवली. आज तेच नवनव्या कल्पना राबवतात. १९८८ पासूनचे कार्यकर्ते आज अनेक क्षेत्रात नाव कमावून आहेत. पण तरी समितीशी जोडले गेलेले आहेत. समितीची सुरुवात होताच त्यांनी पहिलं काम केलं पाली डिरेक्टरी बनवण्याचं. लहान लहान गट. त्यांची संपर्क यंत्रणेची साखळी करत ते गावातील घराघरापर्यंत पोचले. पाठोपाठ काम हाती घेतलं गेलं, रक्तसूची बनवण्याचं! यात रक्तदात्यांनी नाव व आपला रक्तगट नोंदलेला होता. याचा फायदा अनेकांनी घेतला. या संस्थेनेही गडदुर्ग भ्रमंतीला आपल्या उपक्रमात स्थान दिलंच, पण याचं वैशिष्टय़ म्हणजे या असत अभ्यास सहली. सोबत असत बाबासाहेब पुरंदरे, डॉ. निनाद बेडेकर. तिथे काढलेल्या फोटोचे प्रदर्शन, मिलिंद व माधुरी करमरकर यांनी किल्ल्यांवर स्वरचित गाण्यांचं केलेलं गायन. त्याची बनलेली सीडी व परागचं पुस्तक. विज्ञान सहली आणि छोटे छोटे वर्कशॉप हे या संस्थेने रूढ केले. लोणार सरोवराला भेट, विविध समाधिस्थळांना भेट, सूर्यग्रहण पाहण्यासाठी जाणं वा पानिपतच्या युद्धाला ३०० वर्षे होण्याचं निमित्त साधत पानिपतला भेट. पानिपतच्या युद्धावर पूर्ण दिवसांची कार्यशाळा, वैश्विक गणित, फन विथ मॅथस्, फन विथ फिजिक्स, फन विथ केमिस्ट्री, संगणक जोडणी असे छोटे अभ्यासक्रम राबवले गेले. त्यासाठी प्रथम सरांची स्वत:ची ग्रंथसंपदा खुली केली गेली. त्यात अनेकांनी भर घातली. प्रथम कार्यकर्त्यांनी प्रशिक्षण घेतलं, प्रयोग केले, हे सर्व कार्यकर्ते होते शालेय वा महाविद्यालयीन विद्यार्थी! आणि मग त्यांनी इतरांना प्रशिक्षण दिलं.
या शिबिरात मुलांचं इलेक्ट्रॉनिक वर्कशॉप घ्यायला येणारा अभिजित जेमतेम ११वीत होता. त्याने स्वत: बनवलेला छोटा रेडिओ, हातातला पंखा. रिमोटने वाजणारी बेल, छोटेखानी कारंजं पाहून मुलं खूश झाली. तो लवकरच भारतातील सर्वात लहान हॅम लायन्स होल्डर बनला.
 मुंबई बॉम्बस्फोट, दंगलीत त्यानं मोलाची मदत केली. अवकाशयानाचं मॉडेल, विज्ञान प्रदर्शनासाठी वर्किंग मॉडेल बनवण्यास मदत मिळवण्यासाठी अनेकांनी समितीशी संपर्क साधला. समितीचा स्वातंत्र्यदिन ही खास खासियत. १४ ऑगस्टला रात्री बरोबर १२व्या ठोक्याला संपूर्ण वंदे मातरम् गायलं जातं. त्यापूर्वी एखाद्या गटावर कार्यक्रम सादर करण्याची संपूर्ण जबाबदारी सोपवली जाते. राष्ट्रप्रेमाची ज्योत अशा कार्यक्रमातूनच चेतवली जाते.
चालू घडामोडींचा आढावा घेण्यासाठी जमतो अभ्यास वर्ग. यात चालू घडामोडींवर चर्चा होतेच, पण प्रत्येकजण स्वत:च्या आवडीचा विषय निवडतो. त्याचा अभ्यास करतो. हा विषय अभ्यासक्रमाशी निगडित नसावा ही अट असते. सर्वाच्या स्मरणात राहणारे कार्यक्रम म्हणजे स्वातंत्र्याला ५० वर्षे पूर्ण झाली त्या निमित्ताने काढलेला मशाल मोर्चा आणि मोठय़ा पटांगणावर झालेला राष्ट्रप्रेमानं ओथंबलेला कार्यक्रम. त्यातील अनेक शाळांचा सहभाग, बाबासाहेब पुरंदरे यांची केलेली तुला. सरांची त्यांच्याच ग्रंथसंपदेने (६१ प्रकाशित पुस्तके) केलेली तुला. ही पुस्तके विविध शाळांना, संस्थांना वाटण्यात आली.
 सेनादलाविषयी सर्वाना खूपच अपुरी माहिती आहे. म्हणून तर २६ सप्टेंबर हा कॅप्टन विनायक यांचा स्मृतिदिन संस्था साजरा करते ती संरक्षण दलातील माणसांना आमंत्रित करून. काही वर्षे याच विषयावर व्याख्यानमालाही आयोजित केल्या होत्या. संरक्षण दलात प्रवेश मिळण्यासाठी प्रशिक्षण देणारी १५ दिवसांची कार्यशाळा केशवसृष्टी येथे आयोजित केली जात असे. संरक्षण दलातील माजी अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी आमंत्रित केले जातं. नंतर मात्र पुरेसा प्रतिसाद न मिळाल्यामुळे हा उपक्रम बंद करावा लागला तरी शाळांमध्ये अजूनही पॉवरपॉइंट प्रेझेंटेशन केलं जातं.
अत्याधुनिक शस्त्रे, बदलत्या युद्धाचं स्वरूप अशा अनेक गोष्टी यातून मुलांना दाखवल्या जातात. डिझॉस्टर मॅनेजमेंटची प्रात्यक्षिके आयोजित केली जातात. विज्ञान आणि गणित ही जुळी भावंडं. त्यांच्याशी दोस्ती केली तर आयुष्य खूप सोपं होतं. म्हणूनच गणित वर्ष, त्यानिमित्तानं प्राचीन गणित, आर्यभट्ट यांची माहिती सर्वदूर पोचवण्यात सर्वजण बिझी आहेत. सर्वांपर्यंत पोचणं अशक्य असतं आणि शहरांपेक्षा ग्रामीण भागात अशा उपक्रमांना भरघोस प्रतिसाद मिळतो म्हणून पॉवरपॉइंट प्रेझेंटेशनने अनेकांना कोणतीही फी न आकारता तो शिकवला गेला. अपेक्षा एवढीच की त्यांनी तो सर्वदूर पोचवावा. मुलांची गणिताशी दोस्ती व्हावी. गणितासारखा सोपा, तर्कशुद्ध विचार करायला शिकवणारा विषय नाही हे त्यांना पटावं. तसंच पाटणादेवीजवळ आर्यभट्टांचं जन्मगाव. तिथे त्यांचा आश्रम होता. एक शिलालेख आजही तिथे आहे. त्या परिसराला भेट दिली गेली. आधुनिक युगाची हीच धर्मक्षेत्रे हे मुलांच्या मनावर ठसलं गेलं.
विज्ञानाला साथ हवी श्रद्धेची, परंपरेची. आपल्या जुन्या रूढीपरंपरांना चढवायला हवा नवा साज. म्हणूनच पटांगणावर आयोजित केला जातो भव्य भोंडला. मनावरचे सारे ताणतणाव विसरून मुली-बायका यात सहभागी होतात. विठूमाउलीची ओढ साऱ्यांनाच, पण प्रत्येकाला पंढरपूरला जायला थोडंच जमतं! म्हणून मग दरवर्षी काढली जाते दिंडी. गावातील विठूच्या मंदिरात याचा शेवट होतो. टाळमृदंगांनी आणि विठूच्या गजरानं रस्ते त्या दिवशी निनादून जातात.
संस्थेचा आणखी एक स्तुत्य उपक्रम म्हणजे प्रदर्शिनी. मैदानावर तीन दिवसांसाठी लागणाऱ्या या प्रदर्शनाला असंख्य शालेय विद्यार्थी भेट देतात. दूरच्या शाळा बसमधून मुलांना आणले जाते. हे प्रदर्शन असतं वेगवेगळय़ा विषयांवरचं, जुनी शस्त्रे, किल्ले, अवकाशाचा वेध, अतिशय परिश्रमपूर्वक भरवलेली ही प्रदशर्नी नंतर कोणाच्या तरी हाती सोपवली जाते.
आपण भारतीय मग नव्या वर्षांचं स्वागतही करावं भारतीय परंपरेनुसार. या विचारानं जेव्हा पार्लेकर एकत्र आले तेव्हापासून प्रमुख भूमिका होती आणि असते समितीची. कारण यांच्याजवळ असतात कार्यकर्ते. नव्या दमाचे, उत्साहानं काम करणारे प्लॅनिंग, इक्झिक्युशन आणि नंतर आढावा. साऱ्या गोष्टी कार्यकर्ते उत्साहाने करतात.
आणखी अनेक गोष्टींचा उल्लेख करता येईल पण सर्वात महत्त्वाचं तरुण वर्ग आणि किशोरवयीन चळवळ इतरत्र पसरावी म्हणून होणारे प्रयत्न. ‘तुम्ही तुमच्या गावी कार्यक्रम ठरवा आम्ही मदतीला येऊ’ असं दिलेलं आश्वासन. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि प्रत्येकानं आपल्या आवडीप्रमाणे जबाबदारी घ्यावी. ती पार पाडावी हा आग्रह.
 पूर्वीपासून या संस्थेशी जोडल्या गेलेल्यांना एक खंत जाणवते, ती म्हणजे गेल्या काही वर्षांपासून शालेय विद्यार्थ्यांचा ओढा कमी झालाय. मार्काची शर्यत, क्लासचं लोढणं यामुळे त्यांना वेळच मिळत नाही. त्यांचा सक्रिय सहभाग झालाय.
पण आजही विविध उपक्रम राबवले जात आहेत. नवनव्या कल्पना, नवे उपक्रम यामुळे नवनव्या शाळा, विद्यार्थी त्यांच्या संपर्कात येतात. त्यांच्याशी झालेला संवाद, त्यांच्या अपेक्षा यातून नव्या उपक्रमाचा उगम होतो. मोठय़ा शहरांपेक्षा लहान गावातून लोक अधिक जागृत झालेत, असा त्यांचा अनुभव आहे. तुम्ही पण तुमच्या मुलांना दाखवा नवी क्षितिजे आणि नवी आव्हाने पेलायला त्यांना प्रोत्साहन द्या.    

First Published on March 8, 2014 5:16 am

Web Title: study beyond books