आई – बाबा तुमच्यासाठी
मुलांचा अभ्यास घ्यायचा असेल तर त्यांना छोटय़ा छोटय़ा व्यावहारिक उदाहरणांतून शिकवले, तर तो त्यांना कळतोही चांगला आणि आयुष्यभर लक्षातही राहातो. विज्ञानाचंही तसंच आहे.
आ पण भाषा, इतिहास, भूगोल, समाजशास्त्र कसं पुस्तकातून बाहेर काढून शिकवायचं ते मागच्या (२५ ऑगस्ट आणि २२ सप्टें.) लेखांतून बघितलं आहे. त्याचं मुख्य कारण असं की मुलांना असा प्रश्न पडतो की हे सगळं आपण शिकतोय कशाला? या प्रश्नाचं उत्तर त्यांना तेव्हा मिळतं जेव्हा व्यवहारात ती विज्ञान, गणित, भाषा किंवा इतिहासाचा वापर होताना बघतात. याचं स्पष्टीकरण करण्यासाठी तीन उदाहरणे देते.
 एकदा मी एका स्वयंसेवी संस्थेतर्फे धारावीत ‘स्वच्छता’ या विषयावर बोलायला गेले होते. सावित्रीबाई फुले यांचं नाव या मोहिमेला दिलं होतं. व्यासपीठावरील सगळी माणसे सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर, कामावर बोलली. ‘आरोग्य आणि आरोग्यशास्त्र’ या विषयावर माझं भाषण होतं. दुपारची वेळ, सगळे जण जेवून आलेले, सुस्तावलेले. मी विचार करत होते, त्यांच्यात तरतरी आणणं गरजेचं होतं. इतक्यात मला माझ्या मुलाच्या पुस्तकातील सावित्रीबाईंवरचा धडा आठवला. मी बोलायला उठले. श्रोते आणि व्यासपीठावर बसलेल्या सगळ्यांना एक प्रश्न विचारला, ‘कोणी सांगेल का सावित्रीबाई वारल्या कशा ते?’ कोणालाच उत्तर माहीत नव्हते. मी त्यांना मग सांगितलं की प्लेग होऊन त्या वारल्या. आणि मग प्लेग कशाने होतो तर अस्वच्छतेने, आणि मग आरोग्य म्हणजे काय व ते कसे टिकवायचे या मूळ विषयाकडे वळले. पण सगळ्यांचे संपूर्ण लक्ष माझ्या बोलण्याकडे खेचून. आपण लहानपणापासून आणि पालक म्हणून मुलांना शिकवताना जे वाचतो त्याचा आपल्याला असा कधी उपयोग होईल सांगता येत नाही.
     माझ्या मैत्रिणीचं कुटुंब आणि माझं कुटुंब असे सहलीला कोकणात गेलो होतो. मुलांना घेऊन मी समुद्रात आणि वाळूवर खूप मजा केली. घरी आल्यावर कपडे पाण्यात घालणे आणि साबणाने धुणे आलेच. मी मुलांना मदतीला घेऊन हे काम करत असताना त्यांना दाखवलं की बघा कसा साबणाचा फेस येत नाहीये, कारण इथे जड पाणी आहे, मग त्यांना जड व सौम्य पाणी म्हणजे काय, जड पाणी सौम्य कसं करायचं वगैरे सांगितलं. मुंबईला परत आल्यावर जवळपास एका वर्षांनंतर त्यांना या विषयावर एक धडा होता. अगदी बाईंनी शिकवायच्या अगोदरच ही तीनही मुलं उभी राहून म्हणाली, आम्हाला माहिती आहे याबद्दल आणि त्यांना बाईंना उत्तरंसुद्धा देता आली. सांगायचा उद्देश असा की, प्रत्यक्ष पाहिलेलं मुलं साधारणत: विसरत नाही.
     माझ्याकडे माझ्या आजीची चांदीची लोटी आहे तुपाची. दर पंधरा दिवसांनी ती घासून साफ करायला लागते. एकदा माझा मुलगा अभ्यास करत स्वयंपाक घरात बसला असताना मी ती लोटी घासत होते. घासून पुसून मी ती त्याला दाखवली, तर त्याने विचारलं ‘आई नवीन लोटी घेतली?’  मी म्हटलं, नाही रे तीच जुनी पण ऌ2र वायूचा चांदीशी संसर्ग होऊन ती काळी पडते. मग त्याला रासायनिक प्रक्रिया सांगितली. सिल्व्हर सल्फाईड काळ्या रंगाचं असल्यामुळे लोटी काळी पडली होती. पुढे त्याला दहावीच्या सराव परीक्षेत हा प्रश्न आला की चांदीची भांडी प्रयोगशाळेमध्ये का वापरत नाहीत? पुस्तकात त्याचा कुठेही उल्लेख नसून त्याला सहज उत्तर लिहिता आलं. रासायनिक प्रक्रियाही तो सहज लिहू शकला.
मला चांगलं आठवतंय, मी लहान असताना माझी आई स्टोव्ह बंद करायला त्याच्यावर उलटी ताटली टाकायची आणि मला सांगायची, बघ रोजच्या जीवनात विज्ञान असं वापरता येतं. आत जाणारा ऑक्सिजन आपण ताटलीने बंद केला, मग वात जळणार कशी? जळण्यासाठी ऑक्सिजन लागतोच. फुंकर मारली की फुंकणीसारखी क्रिया झाल्याने कधी कधी स्टोव्हचा भडका उडू शकतो, तो मग आपल्याच तोंडावर आल्याने आपण भाजू शकतो, मग ताटली टाकलेली जास्त सुरक्षित नाही का?
गणिताचंसुद्धा असंच करावं. मुलांना अगदी लहानपणापासून किलो, अर्धा किलो वगैरे वजनांची ओळख करून द्यावी. लिहिता लिहिता एक मजेदार किस्सा आठवला. एकदा माझी विद्यार्थिनी तिच्या मुलाला गणित शिकवताना अगदी मेटाकुटीला आली होती. ती त्याला रुपया आठ आणे वगैरे शिकवताना त्याला विचारत होती सांग, २५ पैसे जास्त की एक रुपया आणि तो सारखं म्हणे २५ पैसे. मी तिला विचारलं, अगं पण त्याला सांगितलंस का, की १०० पैशांचा एक रुपया होतो? तो २५ या संख्येसमोर १ संख्या ठेवून तुला उत्तर देतोय. आपण अनेक वेळा मुलांच्या दृष्टिकोनातून विचार करत नाही आणि मग आपल्याला कळत नाही, त्यांना का कळत नाहीये ते .
आपल्या आजूबाजूला विज्ञान सतत असतं. आपण त्याच्याकडे बघत नाही आणि मुलांनासुद्धा बघू देत नाही. मुलं लहान असताना आकाशात पक्षी कसे उडतात, ते का उडू शकतात, त्यांच्या शरीराची रचना कशी असते, घरी मासे खात असाल तर मासळी बाजारातच त्यांना माशांच्या  शरीराची रचना, मासे पाण्यात श्वास कसे घेतात, आपण चालताना पडत का नाही, गुरुत्वाकर्षण म्हणजे काय, झाडं श्वास कशी घेतात, दिवसा कार्बन डाय ऑक्साईड घेतात आणि आपल्यासाठी ऑक्सिजन सोडतात हे अगदी लहानपणापासून मुलांना माहीत असेल, तर त्यांना प्राणीमात्रांबद्दल, पर्यावरणाबद्दल आदरयुक्त कुतूहल निर्माण होईलच, पण पर्यावरणाबद्दल जाणीव आणि त्याचं रक्षण करण्याची भावना आणि तळमळ निर्माण होईल. एकदा माझ्या मुलाला मी अकरावी-बारावीचं भौतिकशास्त्र शिकवत होते. एक प्रयोग होता, एक तार तुम्ही एका लाकडाच्या खुंटीवर ताणून धरली आणि ती कंप पावायला हवी असेल तर अमुक अंतरावर दोरा त्या लाकडाच्या पट्टीवर अडकवावा, मग तारेच्या लांबीप्रमाणे दोऱ्याचं अंतर मोजा वगैरे गणित होतं. माझा मुलगा जरा गोंधळला, मी म्हटलं थांब आणि घरात तानपुरा आहे तो काढला. त्याला तार, तारेची लांबी, ती कंप पावून स्वर निघण्यासाठी दोरा कसा कुठे लावायचा आणि तो जरा वर-खाली केला की नाद कसा बदलतो, हे दाखवलं. त्याला ते इतकं छान समजलं की अजून त्या प्रसंगाची आठवण काढून आम्ही खूप हसतो.
सागरगोटे किंवा कवडय़ा किंवा रंगीत दगड घेऊन प्राथमिक पाढे शिकवले तर पुढचे पाढे शिकायला मुलांना त्रास होत नाही. घरातील छोटे छोटे हिशेब तर मुलांना करायला द्यावेच, पण त्यांच्याकडून छोटीछोटी कामं करून त्याबद्दल त्यांना मोबदला देऊन ते पैसे बँकेत ठेवायला शिकवून बचतीचे इतर मार्ग लहानपणापासूनच शिकवावेत. छोटय़ा खर्चाचं कसं व्यवस्थापन करायचं. दोन गोष्टी हव्या असतील तर प्रथम कुठली घ्यायची, त्यांच्या गरजेप्रमाणे त्याचा निर्णय त्यांना घ्यायला सांगावा. त्या मागील कारणमीमांसा समजून घेऊन मग त्यांचं काही चुकत असेल तर त्यांना मार्गदर्शन करावं. नेहमी डोक्यावर बर्फ ठेवून मुलांचं अगोदर ऐकून घेऊन मगच बोलावं, त्यांचं म्हणणं समजलं नाही तर परत विचारून समजून घ्यावं.
पालक हो, जर अशा पद्धतीने तुम्ही मुलांना सगळेच विषय स्वत:च शिकवलेत तर त्यांचा जो वेळ शिकवणीला जाऊन येण्यात जातो तो वाचेल आणि त्यांना काही छंद जोपासता येतील. अभ्यासाव्यतिरिक्त आपल्यासाठी काही तरी असं करायला वेळ मिळेल, ज्याचा उपयोग त्यांना संपूर्ण आयुष्यभर होईल. मुलांचं कुतूहल जागृत होईलच, पण त्यांना विज्ञानाची गोडी लागेल आणि त्याचा आनंद तुम्हालासुद्धा लुटता येईल.. किंबहुना तुम्ही अजून एक बालपण जगाल…