25 September 2020

News Flash

ऊस आमच्यासाठी कडूच

अंधारात माजा न्हवरा बॅटरी घिऊनशान हिरीवर पानी शेंदाया गेला. मी येक भाकरी थापली आसल नसल तेवढय़ात भावजय वरडत आली. माझा न्हवरा काळोखात हिरीत पडला व्हता.

| June 13, 2015 01:01 am

अंधारात माजा न्हवरा बॅटरी घिऊनशान हिरीवर पानी शेंदाया गेला. मी येक भाकरी थापली आसल नसल तेवढय़ात भावजय वरडत आली. माझा न्हवरा काळोखात हिरीत पडला व्हता. समद्यांनी त्याला भायेर काढलं. पण मुकादम लागला की वरडाया. ‘उसाची गाडी लोड कराया चला’, म्हनायला लागला. मी हात जोडलं. म्हणलं, त्येला अजून सुध नाय आली. इळभर जरा थांबा! त्यो लागला भांडाया! त्याच्याकडनं साठ हजाराची उचल घेतलीया न्हवं? ती फेडस्तवर आमी याचे गुलाम.. ऊसतोडणी कामगार दिवलीबाईचं उसाने कडू केलेलं आयुष्य तिच्याच शब्दांत..

थंडीचा लय कडाका पडलाय. मुकादमाची हाळी आलेय. कदी बी यील आन् टोळीला घेऊन जाईल. आमच्या टोळीत माझा भाव, भावजय, देर, जाव, नणंद आन् नणंदावा.. मस माणसं हाएत. आमी सगळी नांदेडजवळच्या मुरवेडगावची! येकाच परिवारातली माणसं!
गेल्या साली लय दुस्काळ पडला तिथं! तीन साल असाच दुस्काळ! खायाला अन्न नाय, ना पियाला पानी! हिरीचं पानी पार तळाला! नद्या, नाले पार सुके ठाक! पान्याचा घोट प्यायला मिळना झाला! चारा नाय तर जनावरं मरून पडल्याली! एक रुपयाला एक हंडा इकत घ्यायचा. त्या हंडय़ातलं पानी म्हंजी निसता गाळ! शेवटाला आमी सगळी जगायला भाईर पडलो. वळखीचा मुकादम भेटला. त्यांच्याकडनं साठ हजार रुपयांची उचल घेतली. म्हातारी-कोतारी मानसं घरी ठिवली. माजी चार पोरं ठिवली त्यांच्या संग अन् बारकं अपंग पोर घिऊन निघाली. आता अपंग म्हंजी पोलीओचा डोस दिला पन् पायातली ताकदच गेली जणू त्याच्या! त्याला संग घेतला आन् दादल्यासंग निघाली. तवाधरनं पाच म्हयने भाएरच हाय. फिरते एका गावातून दुसऱ्या गावात!
रातचं दोन वाजलेत. अख्खी वस्ती मुकादमाची वाट पाहत जागी! थंडीचा कडाका वाढला तशी शेकोटी पेटवली आन् इळभर शेकत बसली. तेवढय़ात वस्तीवर मुकादमाची हाळी आली. तशी कोयता उचलला आन् लगालगा भायेर पडलो.. सगळेच! टेम्पोत बसलो. टेम्पो सुटला. उसाचा फड वाघोळी गावाजवळ! गावापासून लय लांब! रस्त्यात निसता काजळावाणी काळोख! गावाबाहेरच्या मसणवाटय़ावर मुकादमानं आमाला उतरवलं. जवळ वढा व्हात व्हता. मसणवटय़ावर येक प्रेत जळत हुतं. त्याचा धूर समदीकडं पसरलेला. पोरं निसती पेंगत हुती. तिथच येक पटकुर आंथरलं आन् लगालगा समद्यांनी आपली पोरं तिथं निजवली. मी बी बारक्याला तिथं पटकुरावर घातला आन् आम्ही सगळे जण कोयतं घिऊनशान गाडी लोड कराया धावलो. गाडी लोड करायच्या आधी, कधी ऊस कापलेला बी असतोया. पन आज आधी वावरातलं ऊस कापायचं व्हतं. काळोखात ऊस कापताना लय जापावं लागतं. फडात अख्खी टोळी कामं करत असती. काळोखात कोनाचा कोयता बसला हातावर पायावर की काम खतम! हातपाय तर जाईलच. पन काम बी जाईल! मंग रोजंदारी बुडाली कां ऱ्हावा उपाशी!
ऊस तोडला आन् पस्तीस कांडक्याची एक मोळी ऱ्हातीया ती बांधली. डोक्यावर घेतली. गाडीत ती लोड करताना शिडी चढावी लागतीया. मोळी घिऊन काळोखात शिडी चढली. गडी मानसं बी गाडी भराया व्हती. त्ये ती जड मोळी उचलाया लागले. अशा शंभर मोळय़ा गाडीत लोड क्येल्या तवा ‘शंभर’ रुपये खुशाली भेटली. एक एकर ऊस तोडला कां फडाचा मालक शंभर रुपये ‘खुशाली’ देतो. त्यातूनच मीठ-मिरची आनतो. मजुरी मुकादम उचलतो. अम्ही येताना ‘उचल’ घेतल्याली असते. तवा त्याच्यातून वळती करून घ्येत्यात!
गाडी लोड क्येली आन् आम्ही सगळय़ांनी तिथच चार लाकडं बांधून त्यावर गोणपाट टाकलं. आत चूल पेटवली. दोन घास पोटात गेलं तसं डोळं पेंगाया लागलं. रातभर काम क्येलेले! जीव थकलेला! पन तेवढय़ांत मुकादमाची हाळी आली. आता कासखेडकडं जायाचं ऊसतोडणी कराया आन् गाडी लोड कराया निघायचं व्हतं. कासखेडला आडरानात मुकादमानं आम्हाला उतवलं. कुठं लाईट नाय. काय नाय. अंधारात माजा न्हवरा बॅटरी घिऊनशान हिरीवर पानी शेंदाया गेला. मी चूल पेटवली. पोरान्ला भुका लागल्या व्हत्या. येक भाकरी मी थापली आसल नसल तेवढय़ात माझी भावजय वरडत दारांत आली. माझा न्हवरा काळोखात हिरीत पडला व्हता. मी तशीच हिरीकडं धावत सुटली. तवर समद्यांनी त्याला भायेर काढलं हुतं. त्येच्या पोटातलं पाणी काढलं हुतं. त्येला रानातल्या उसाच्या कांडकांवर पटकूर टाकून झोपीवलं मी. पण मुकादम लागला की वरडाया, ‘गाडी लोड कराया चला’, म्हनायला लागला. मी हात जोडलं. म्हणलं, त्येला अजून सुध नाय आली. इळभर जरा थांबा! त्यो लागला भांडाया! म्हणाला, ‘‘बाकी बांधून जा! पैसं टाक आन् निघ इथून. हिथ ऱ्हायचं तर गाडी भराया आलाच पायजे!’’ त्याच्याकडनं साठ हजाराची उचल घेतलीया न्हवं? ती फेडस्तवर आमी याचे गुलाम! पन योच कशाला? समदे सारके! त्यो तुकाराम मुकादम तर तान्ह्य़ा लेकराला दूध पाजाया बी जाऊ द्यायचा नाय. शेवटाला न्हवऱ्याला येकलाच सोडला. चुलीवरची जळकी भाकरी भुकेल्या पोरांच्या पोटात घातली. आन् कोयता उचलला. उसाच्या फडा कडं गाडी लोड करायला निघाली. हा ऊस समद्यांना गोड लागतुया. आमचं तोंड मात्तुर कडुझार करतोया. गेल्या सालची गोस्ट! माझी थोरली भावजय वारली म्हून सांगावा आला. पन मुकादमानं नाय जाऊ दिलं. लय वंगाळ वाटलं. भावकीतले लोकं लय बोलले. पन पोट जाळायचं असतं. मजबुरी असते.
माझा कोयता सपासप चालत व्हता. येवडं उच्च उसाचं कांडक पार भुईसपाट होत व्हतं. दुपार झाली तसं काम थांबिवलं. फडाभाएर पडल्ये. आज न्हवऱ्याचा खाडा लागला व्हता. मुकादमाच्या मानसाचं माज्यावर आन् माज्या न्हवऱ्यावर लक्ष व्हतं. त्यो बी संग संग आला. म्हनला, ‘‘दिवली बाय कुठे जातीस?’’ म्हनलं, ‘‘भाकरी, वरण-भात खाया नग? पोटाला भूक लागलीया.. माज्या बी आन् पोरांच्याबी!’’ मी चार काटक्या गोळा करूनशान चूल प्येटवली. भाकरी थापाया बसले. तर त्यो समोरच दगडावर बसून ऱ्हायला व्हता. माज्यावर नजर ठिवून!
गेल्या साली माझा भाचा- नणंदेचा पोरगा आमच्या टोळी बरूबर ऊसतोडणीच्या कामाला आला व्हता. त्यो फडातनं पळाला. त्यानं चाळीस हजाराची उचल घेतली व्हती. त्याचं मामा-मामी म्हणून आम्ही ते दोघं फेडतुया. त्यासाठी मुकादम आमच्यावर पहारा बशिवतो.
आता हिथलं काम संपलं का पुढं कुटं न्येतो देवाला ठावं! पाच म्हयनं झालं घरी चार लेकरं हायती, त्यांचं तोंड सुदिक दिसलं नाय. साळा नाय काय नाय. पोरं निसती रानांत भटकत असतील! पोरांचं काय झालय काय बी कळंना. कामावर खाडा बी करता यीना. येक खाडा क्येला की दोनशे रुपयं कापत्यात! एक दिवस गाडी भराया नाय गेलं का चारशे रुपयांचा खाडा लावत्यात! त्यासाठी गरोदरपणात नववा म्हयना सरस्तोवर ऊसतोडणीवर गेलीया मी! पस्तीस कांडकांची मोळी उचलून शिडी चढलीय. पण ‘‘कांटा बी मोडला नाय!’’ आपरेशन झाल्यावर चार दिवसांत कामावर हजर! ऊसतोडणीचं काम हंगामी! येकडाव सुरू झालं की सुट्टी नाय. विश्रांती बी नाय. ‘‘काम व्हतंय तवर करावं नाय तर गोळय़ा खाऊन मरावं!’’  भाजी-भाकरी पोटांत घातली. पायटय़ावर अपंग बारक्याला टाकलं आन् लागले कामाला! दुसऱ्या लेकाला मोळीवर बशिवलं व्हतं. जराशानं पोरं उठलं आन् रडाया लागलं. आवाज ऐकला म्हून बघाया ग्येले. तर मुकादम ओरडला. ‘‘लेकरांना घे आन् घरीच बस! येते कशाला हिथं?’’
येक येक करून उसाचं कांडकं कापत गेली. आन् समोर काय तरी वळवळलं. अगं बया! परड (पट्टय़ाचा साप) हाय की! मी जोरात वराडली. त्ये फुंकलं का गड्डे येतायत अंगभर! उसाच्या गारव्यांत फडामंदे सरी, काकरी बी ऱ्हात्यात. येकेक जनावर ह्य़े आसलं मोठ्ठं! पाच-सहा किलोचं! चावलं तर जागेवर मरण! मी वराडले तशी गडी माणसं धावून आली. त्यांनी कोयत्यानं खांडकं केली. दिस व्हता म्हणून दिसला तरी! रातच्या टायमाला त्याच्यावर पाय पडला असता तर? लय भ्या वाटलं. पन म्हून घरात बसलं तर पोट भरलं व्हय! काम झालं तसं फडाभाऐर पडले. पोर रडून रडून हागामुतात झोपून गेलं व्हतं. पोराचा पाय उसाच्या कांडाक्यावानी कडक झालेत. मला कळंना झालय, जिंदगीभर ह्य़ांचं वझं व्हाऊ? का जिंदगानीचच वझं व्हाऊ?
माधुरी ताम्हणे – madhuri.m.tamhane@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 13, 2015 1:01 am

Web Title: sugar can that made life bitter
Next Stories
1 स्किझोफ्रेनियावर उपचार
2 भात्यामधले नवीन बाण
3 रुग्णसेवेचा अमृतानुभव
Just Now!
X