28 March 2020

News Flash

मनातलं कागदावर : या कातरवेळी पाहिजेस तू जवळी..

रोज संध्याकाळी देवापाशी दिवा लावताना मी मोबाइल स्वीच ऑफ करते

(संग्रहित छायाचित्र)

सुजाता लेले

sujataalhad@gmail.com

रोज संध्याकाळी देवापाशी दिवा लावताना मी मोबाइल स्वीच ऑफ करते. कारण समईच्या प्रकाशातलं तेजत्व आणि त्या वेळची नीरव शांतता खरोखरीच अनुभवाशी वाटते. अगदी टय़ूबलाईटही बंद करते. अंधारातला मिणमिणता प्रकाश आपल्याला शांतवत दिवसभराचा शीण घालवतो. आजही नेहमीप्रमाणे देवासमोर दिवा लावला.. तेवढय़ात लॅण्डलाइन फोन खणखणला. हल्ली मोबाइलची सुविधा उपलब्ध असल्यामुळे लॅण्डलाइनचा उपयोग जवळपास केलाच जात नाही. त्यामुळे लॅण्डलाइन घरात आहे, हेही अनेकदा लक्षात रहात नाही.

फोन घेतला तर जवळच राहणारी माझी मैत्रीण सुषमा! मी म्हटलं, ‘‘काय गं आज चक्क लॅण्डलाइनवरून?’’ त्यावर जरा नाराजीच्या आणि रागावलेल्या सुरात सुषमा म्हणाली, ‘‘हे बरंय. म्हणजे स्वत:चा मोबाइल स्वीच ऑफ करून ठेवायचा आणि उलट मलाच विचारायचं की चक्क लॅण्डलाइनवरून? चोराच्या उलटय़ा बोंबाच की!’’ बाईसाहेब खरंच रागावलेल्या आहेत हे मी समजून घेतलं. मग म्हटलं, ‘‘खरंच की.. देवापाशी दिवा लावताना थोडावेळ बंद ठेवते मी मोबाइल. बरं बोल. आज एकदम तिन्हीसांजेला फोन केलास? बरी आहेस ना?’’ त्यावर सुषमा म्हणाली, ‘‘बरी आहे गं, पण हे रिकामं घर आणि नोकरीतून निवृत्त झाल्यामुळे आलेलं रिकामटेकडेपण नकोसं वाटतं, या कातरवेळी तर नकोच नको वाटतं.’’ मी म्हटलं, ‘‘म्हणजे आत्ता घरात एकटीच आहेस का? नवरा कुठे गेलाय?’’

‘‘अगं, गेल्या आठवडय़ात आम्ही सिंगापूरला सुजयकडे जाऊन आलो ना, त्यामुळे त्यांची कामे पेंडिंग आहेत, स्वत:चा व्यवसाय असला की कसली सुट्टी अन् कसलं काय. दोन/तीन दिवसांकरता मुंबईला गेलेत. सध्या मीच आमच्या घरात रिकामटेकडी आहे. अगं, जरा टेन्शन आलं आहे. त्यातून घरात एकटीच आहे, येतेस का जरा गप्पा मारायला?’’ तिचं बोलणं ऐकून म्हटलं, ‘‘गूढकथा वाचत होतीस ना?’’

‘‘हो’’ तिचं उत्तर आलं. मग म्हटलं, ‘‘बरोबर आहे, अशा कातरवेळी एकटीच घरात आणि त्या वेळी असल्या गं कथा कशाला वाचतेस? त्यापेक्षा बदल म्हणून तूच माझ्याकडे ये, आता सोनू आणि सोनूचे बाबा यायची वेळ झालीय, असं कर तूच आज आमच्याकडेच राहायला ये.’’  सुषमा म्हणाली,‘‘बेस्ट आयडिया.. शिवाय उद्या माझ्याकडे भिशी आहे. आपल्या शाळेतल्या मैत्रिणींची. या निमित्ताने तुला भेटतील साऱ्या जणी. चल फोन ठेवू? मग, वाट बघते तुझी.’’

काही वेळातच धापा टाकत बाईसाहेब आल्या आणि आल्या आल्या गळ्यात पडून रडायलाच लागली. मी तिचा हात हातात घेत म्हटलं, ‘‘हे बघ सुषमा, असं तिन्हीसांजेला रडू नकोस.’’ तशी ती म्हणाली, ‘‘अगं, ते पुस्तक वाचत होते ना, त्यातला नायक (पण साठी उलटलेला बरं का!) गॅलरीत येतो आणि सहजच खाली बघतो तर रस्त्यावरून प्रेतयात्रा जात असते. तो लगेच आत येतो आणि डायरीत लिहितो.. निवृत्तीनंतरच्या आयुष्यात काहीही घडू शकतं.. अगं, हे वाचलं आणि रडूच आलं, आपणही याच वयाच्या! इतकी वर्षे नोकरी केली.. यांनी नोकरी सोडली आणि व्यवसाय सुरू केला.. जम बसेपर्यंत नोकरी सोडायची नाही, असं मी ठरवलं, पण मग नंतर सासू-सासरे म्हणाले, आम्ही आहोत की सुजयसाठी.. करायची असेल तर कर नोकरी.. आणि मग मलाही नोकरी सोडावीशी वाटली नाही. आता निवृत्ती घेतली आहे, तर घर खायला उठतंय. सुजय परदेशी, स्वत:चा व्यवसाय असल्यामुळे नवरा निवृत्त होणार नाहीये आणि मला त्याच्या व्यवसायात रस नाही. निवृत्तीनंतर मला माझं आयुष्य जगायचंय..’’ मी म्हटलं, ‘‘अगं, मग, तुला जसं जगायचं तसं जग ना! रडतेस कशाला?’’ पण ती रडतच म्हणाली, ‘‘अगं, आम्ही तिघी जणी एकाच दिवशी निवृत्त झालो, एक महिना नाही झाला तर सरोज अचानक गेली. आज गूढ कथा वाचताना तो नायक म्हणतो ना की, रिटायर्डनंतरच्या आयुष्यात काहीही घडू शकते.. तीच आठवली बघ. वाटलं आपलंही असंच होणार.. आणि तुझ्याकडे येत होते तेव्हा छान छान दुकानं दिसली. ती पाहून वाटलं की आत्ताच आयुष्य जगायला सुरुवात केलीय आणि हे सारं सोडून जायचं? कल्पनाच करवत नाही.’’

‘‘खूप बोललीस सुषमा, आता मी काय बोलणार आहे ते ऐक. हे बघ मृत्यूला वय नसतं, अगदी जन्मापासून वृद्धत्वापर्यंत कोणत्याही वयात मृत्यू येऊ  शकतो, हे तुलाही माहिती आहे. अगं, आपल्याला एवढं आयुष्य जगायला मिळालं, यातच आलं सगळं. तुला जगायचं आहे ना, मग नकारात्मक विचार कशाला? आठवतंय तुला, आपल्या पन्नाशीला तुला सांगितलं होतं की, नोकरीशिवाय आणखीन कशात तरी मन गुंतव. निवृत्तीनंतर काय करशील? त्या वेळी म्हणाली होतीस की, ‘पुढचं पुढे बघू.’ मी म्हणालेही होते की, तू आपल्या शाळेच्या भिशी ग्रुपमध्ये यायला लाग, जुन्या मैत्रिणी भेटतील. आपल्या ग्रुपमधल्या तुम्ही दोघीच जणी नोकरी करत होतात. संध्याने नोकरी सोडली अन् नवऱ्याबरोबर परदेशी स्थायिक झाली. अगं, आपली भिशी नुसती खाण्यापिण्याची नाही तर आम्ही सुनीताच्या बंगल्यात एका खोलीत ग्रंथालय सुरू केलं आहे, थोडी फी घेतो पण ती रक्कम गरजू संस्थांना देतो. सहलीला जातो, पुस्तक भिशी तर आहेच शिवाय एखादा विषय घेऊन प्रत्येक जण स्वत:चं मत मांडतो. त्यामुळे धीटपणा आलाय आमच्यात.

यंदा भिशीला पंचवीस वर्षे पूर्ण झालीत.. घर तर आहेच गं, पण आता त्या घरटय़ातून पाखरे उडाली आहेत, काही घरांमध्ये दोघे जणच राहिले आहेत.. म्हणून तुला मी सांगते आहे की मन गुंतव. तुला वाचनाची आवड आहे ना, मग आपण सुरू केलेल्या लायब्ररीत येऊन बस, खूप पुस्तके आहेत, वाचत बस, १ ते ५ वेळ आहे, रविवारी सुट्टी! तुला जमेल तेव्हा येत जा.

माझे आणखीनही काही ग्रुप्स आहेत. तुला जे आवडत असेल ते कर, पण सतत एकटी राहू नकोस. अगं, एकदम रिकामपण आलं ना की मानसिक आरोग्य बिघडतं. मग आपोआपच शारीरिक दुखणी मागे लागतात. अगं, सकाळी बऱ्याच बागांमध्ये हास्य क्लब असतात.. तिथे पण हसत-खेळत व्यायाम होतो. आपण आपल्या आवडत्या ठिकाणी जात राहिलो ना की मन प्रसन्न राहातं, आपोआपच सकारात्मक विचार करायला लागतं. चल, आता हस आणि मला स्वयंपाक करायला मदत कर. मला तिचे मन नकारात्मक विचारांमधून दुसरीकडे वळवायचं होतं..

दुसऱ्या दिवशी माझ्याकडे भिशीला आलेल्या शाळेतल्या जुन्या मैत्रिणी सुषमाला भेटल्या आणि त्यांना पाहून तिला इतका आनंद झाला की त्यांच्याशी किती बोलू असं तिला झालं होतं. बऱ्याच दिवसांनी ती शाळेतल्या आठवणीत हरखून गेली. स्वत:ला विसरून गेली होती. मैत्रिणी गेल्यावर मी सुषमाला म्हटलं, ‘‘हे बघ घरी गेल्यावर स्वयंपाक करत बसू नकोस, हा घे डबा.’’ हे ऐकल्यावर सुषमा माझ्या गळ्यात पडली. मला वाटलं, झालं हीच रडगाणं पुन्हा सुरू. पण तसं काहीच नव्हतं. चक्क, म्हणाली, ‘‘किती बरं वाटलं गं! असं वाटतयं की युनिफॉर्म घालून पुन्हा शाळेत जावं. तू मला बोलावलंस आणि राहायला लावलंस, मी तुझ्याकडे आलेच नसते तर केवढय़ा मोठय़ा आनंदाला मुकले असते. घरात बसून नकारात्मक जगले असते, मृत्यूला घाबरत बसले असते.. इतकी वर्षे नोकरी, घर, मुलंबाळं, पैसा या पलीकडे जग नव्हतं मला, पण आज निवृत्तीनंतरच्या कातरवेळी मला जगायला शिकवणारी आणि साथ देणारी माझी सखी मला मिळाली ती तुझ्या रूपाने! आणखी एक सांगायचंच राहिलं.. आपल्या साऱ्या मैत्रिणींना मला पाहून केवढा आनंद झाला, निवृत्तीनंतर आमची आठवण झाली का? असं काहीबाही मला बोलल्या नाहीत. खरंच, तुमच्याकडून हे जगणं खऱ्या अर्थाने शिकले मी, सकारात्मक विचार करायला लागले आहे मी. पुढच्या महिन्यात भिशीची नवीन राऊंड सुरू होणार आहे ना, सीमानं मला न विचारताच पहिली भिशी माझ्याकडे ठरवलीसुद्धा. मी भिशीत येणारच.. हा माझ्याबद्दलचा केवढा विश्वास! अशा मैत्रिणी हव्यात..’’

जाता जाता म्हणाली, ‘‘हे माझे आनंदाश्रू आहेत. तुम्ही आणि विशेषत: तू मला पुन्हा जगायला शिकवलंस. काहूर उठलेल्या मनाला सावरलंस तू. नाहीतर मानसिक रुग्ण झाले असते. दिवस जातो कसाबसा पण नको ते विचार कातरवेळीच येतात. उदास वाटतं.  सूर्याचा अस्त होण्यापूर्वीच तू उद्या होणाऱ्या सूर्योदयाचे महत्त्व सांगितलंस. पण त्यासाठी मी तुझे आभार मानणार नाही, आपले ‘मैत्र’ आहे, त्यात परकेपणा नाही. आपण भेटत होतोच, पण आता नव्याने भेटत जाऊ,’’ असं म्हणत तिने मला मिठी मारली आणि एक आनंदाचं ‘जगणं’ घेऊन बाहेर पडली..

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 14, 2020 4:05 am

Web Title: sujata lele manatale kagdavar article abn 97
Next Stories
1 व्वाऽऽ हेल्पलाइन : अति झालं आणि ..
2 यत्र तत्र सर्वत्र : शास्त्राच्या दुनियेतील स्त्रिया
3 गद्धेपंचविशी : आयुष्याच्या टोलेजंग इमारतीचा पाया
Just Now!
X