ch19हुशार असूनही दहावी न करता बाबांनी तिचं लवकर लग्न लावून दिलं, पण तिनं प्रौढ शिक्षण वर्गात प्रशिक्षण घेतलं, अपार धडपड करत त्याचे वर्ग चालवले, माध्यान्ह भोजन योजना राबवली, आरोग्यसेविकाही झाली, बालवाडीही चालवली. पुढे बचत गट स्थापून गावाच्या कल्याणासाठी धडपडणाऱ्या सुलोचना कडू यांची ही कहाणी..
‘‘सुलोचनाबाई, पंचायत समितीच्या मीटिंगला हाजीर व्हा! तुम्ही बांधकामाचं ‘मटीरियल’ चोरलंय असा तुमच्यावर आरोप हाय?’’ सरपंच आसं बोलले आन् मला रडूच आलं. आज दुपारी पंचायत समितीची मीटिंग झाली. त्याला जनसेवा फाऊंडेशनचे डॉ. विनोद शहा आन् लय मोठी मंडळी हजर व्हती! इतकी कामं केली गावासाठी आणि गावानं मलाच आरोपीच्या पिंजऱ्यात उबं केलं की वो..
ह्य़े गाव हागणदारीमुक्त करावं, या विचारानं मला जवा विचारलं गेलं, तुमच्या गावांसाठी काय करावं? तवा मी लागलीच म्हणले होते, ‘आमच्या गावासाठी संडास बांधून द्या. लेकीबाळींना गावाभाएर रानात संडासला जावं लागतं. लय हाल होतात! गावांत संडास उबे राह्य़ले आणि आता तेच गावकरी म्हन्त्यात, मी पैसं खाल्लं! पर कर नाय तर डर कशाला?’ मी म्हनलं, ‘घ्या झडती!’ माझ्या घराची झडतीबी घेतली. त्यात काय बी गावलं नाय! मंग विनोद शहा भर मीटिंगमध्ये मला बोलले, ‘माजा ईश्वास हाय तुझ्यावर! उलट राहिलेल्या मटिरीअलमधून तू तुझं घर बांधून घे!’ यावर समद्या गावकऱ्यांनी माना खाली घातल्या.
अख्ख्या गावात संडास बांधायला कोनाला किती मटीरिअल दिलं त्ये बी माजा न्हवरा, विजय कडू यानं वहीत लिहून ठिवलय. मीटिंगमध्ये त्या वह्य़ा मी दाखिवल्या. काय झालं की, हे काम ‘सँक्सन’ झालं तवा लोकं डायरेक्ट मटिरीयल मागत व्हती. पयले काही दिवस दिलं बी! पन लोकं संडास बांधायच्या ऐवजी घर बांधायला ते वापराया लागले. तवा समदं काम मी माज्या हातांत घेतलं. तवाधरनं लोकांनी माज्यावर डूक धरलाय. पंचायत बसवून मला जाब इचारला, पन मी काय चुकीचं न्हाय वागले. आन तुमाला सांगती, हार माननारी बाई नाय मी! अख्खी जिंदगी ग्येली झगडन्यात! कुनाशी नाय झगडले इचारा! म्हायेरच्यांशी, सासूशी, गावकऱ्यांशी, ज्या लोकांसाठी काम करते त्यांच्याशीसुद्धा! बाईमाणूस शिकतेया, घराभाएर पडून काम करतया तर समाजाला त्ये नाय चालत. शेण गोठय़ावाणी जगणं नाकारलं मी आन् पडले घराभाएर!
ह्य़ा झगडन्याची सुरुवात कधी झाली.. मी ल्हान व्हते तेव्हाच! आम्ही सहा बहिणी, येक भाऊ! प्रस्थिती गरिबीची! मिलोची भाकरी पान्यासंग पोटात घालायची. तरी बी मी हट्टानं शाळत गेले. येकडाव कळलं, मी नापास झाले. मी गुरुजींना भेटले. म्हनलं, मी नापास कशी झाले? ते ओशाळले. म्हनले, ‘नापास कुठली व्हतेस? तुझा वर्गात पयला नंबर आलाय. पन तुझा बा मला भेटला. म्हनला, हात जोडतो. पोरीला नापास करा. नवीन पुस्तकांसाठी आन् फी भरायला माज्याकडं पैस न्हाईत!’ गुरुजींच्या डोळय़ांत पाणी होतं. मी घरी यिऊन बाला म्हनलं, ‘मी गवत कापीन. मोलमजुरी करन. पन माजी शाळा बंद नग करूस.’ त्येचं बी बरूबर व्हतं. म्हयना ३० रुपयं पगार मिळायचा. त्यांत आमचं पोट भरनार का शिक्शान करनार? एका मांजरपाटात सगळय़ांची कापडं शिवायची आन शेतात वाहून आलेल्या पान्यातलं भोपळे, धरणफुलाची भाजी बनवायची. यात दिवस घालवत होतो आमी.
सातवीपर्यंत गावात शिकली. आठवीला महात्मा गांधी विद्यालयात गेले. ते गावापासून सात किलोमीटर लांब! चप्पल कधी मिळायची नाय. उन्हाचं चटकं सोसत धावत जायचं शाळेपोत्तुर! एकदा तालुक्याच्या गावी परीक्षेला जायचं व्हतं! माझा ब्लाऊज फाटका. ठिगळं लावल्येला! मग रानांत मैत्रिणीचा धड ब्लाऊज घातला. तिचाच परकर घातला. माजं कपडे तिने घातले. परीक्षा दिली. माझा पयला नंबर आला नववीत! गरीब व्हते पर डोस्क चांगलं व्हतं मंग दहा रुपयं जवळ व्हते. त्यांतून दहावीची पुस्तकं आणली. दहावी यत्तेचा आठ म्हयने अभ्यास क्येला आन् विजय कडूंकडचं मागणं आलं. मला लगीन करायचं न्हवतं. शिकायचं व्हतं. बा म्हनला, ‘येक लगीन रखाडलं तर पाठच्या भयनी रखडतील!’ लय रडले मी आन् शेवटाला बोहल्यावर उभी ऱ्हायले.
मला कुरण बुद्रुक गावी दिली. निसता डोंगराळ भाग! तिथे दिवसभर गुरं सांभाळणं, शेतात मजुरीला जाणं, सरपण आणणं, गावात येकच विहीर.. त्यावरून पाण्याच्या खेपा घालणं.. बायामाणसांचं ह्य़ेच काम! येकदा गुरं लोकांच्या रानांत ग्येली तवा सासू लय भांडली. म्हनली, ‘माज्या पोरानं शिकलेली बायको केली. निसती नवऱ्यापुढं बसती आन् बुकं वाचती! ही इथं ऱ्हानार नाय. तुजा प्रपंच होनार नाय. तू दुसरं लगीन कर!’
माजा नवरा लय चांगला. म्हनला, ‘शिकलेली असली तरी मनाने लय चांगली हाय. मी तिला सोडनार नाय!’ येकदा मला कळलं, बाजाराचं गाव पानशेत हाय. तिथं पेपर मिळतो. मी येकटी गेली पानशेतला! पेपर घेतला. त्यात प्रौढ शिक्षण वर्गाच्या प्रशिक्षणाची जाहिरात व्हती. मी हट्ट धरला. मला जायचंय. सासू नायच बोलली. नवऱ्याने परवानगी दिली, पण ट्रेनिंग आळंदीला! तिथं जायचं कसं? एक जोडीदारीण मिळाली. दोघीबी स्वारगेटला गेलो. बस कुठली कळंना. दोन पुरुष भेटले. ते म्हनले, ‘चला दावतो बस!’ आन् मग ते आमच्या मागंच लागले. मी नवी नवरी. गळय़ात गंठन, पायांत पट्टी! हिरवा चुडा! माज्या ध्यानांत आलं ह्य़े भामटे हायेत. तवा एका म्हातारबाबाजवळ जाऊन बसली. त्येनं आळंदीला बरोबर उतरवलं. त्यो बाचा वळखीचा निघाला! आमी माऊलीच्या देवळात बसलो. तिथं मॅडम आली, आम्हाला ट्रेनिंगच्या जागी घिऊन गेली. दुसऱ्या दिवशी तिथं बा आला. म्हनला, ‘आत्ताच्या आत्ता घरला चल!’ पन मी नाय गेले. तिथं प्रौढ शिक्षण वर्गाचं पंधरा दिवस ट्रेनिंग घेतलं. घरी आले आन् गावात वर्ग सुरू केले. लाइट न्हवते. तीस कंदील आणले. पाटी-पुस्तकं आणली. पन येक बाई येईना. म्हनायच्या, ‘दिवसभर शेतात राबतोय. तुज्या साळत येऊन काय करू?’ तरीबी मी हार नाय मानली. चारला उठायची. शेण काढायची. शेतात काम करायची. राबराब राबायची आन् रात्री प्रौढ शिक्षण वर्ग घ्यायची. हळूहळू बाप्ये यायला लागले. मंग बाया बी यायला लागल्या. त्यासाठी दारोदार फिरलेय मी!
त्यानंतर गावात वृक्षारोपणाचं काम आलं. मी ३५ बायांना गोळा केलं. डोंगरात खड्डे खणून झाडं लावू लागलो. त्यांची हजेरी घेणं, मजुरी देणं सगळं मी करायची. येकदा आसं डोंगरावर झाडं लावत व्हतो तर दारुची पिंप दिसली. बायांना म्हनलं, द्यायची का उलथून? त्या घाबरल्या. म्हनल्या, ‘तुला काय करायचं ते कर!’ म्हनलं, ‘आपल्या गावातले पुरुष हिथ येतात. दारू ढोसत्यात आन रात्री बायकांना मारझोड करत्यात हे बरंय का?’ मंग समद्यांना हाताशी घेतलं आन् दिली ओतून दारूची पिंपं! दुसऱ्या दिवशी माज्या दारात हाऽ राडा! मी सामने हुबी ऱ्हायले. म्हनलं, ‘गरिबाचं वाटोळं करता, परपंचाचा नाश करता. लाज नाय वाटत! पुन्हा भट्टी लावा तर खरं! सगळय़ा बायांना घिऊन यिन तिथं आन टाळकी हाणू तुमची!’ तवाधरनं ह्य़ा दारूभटय़ा बंद झाल्या.
मग डॉ. विनोद शहा सरांनी एक प्रोजेक्ट आणला. बालवाडीतल्या पोरांना खिचडी शिजवून घालायची. मी गावातल्या गरीब बायांना म्हटलं, ‘हे काम करा. पैसं बी भेटतील!’ त्या म्हनल्या, ‘आम्ही देशमुखांच्या बायका! आम्ही खरकटं नाय काढत!’ सात वर्षे मी हे काम स्वत: केलं. त्यानंतर ‘जनसेवा फाऊंडेशन’ने विचारलं, ‘तुम्ही गावासाठी आरोग्यसेविका म्हणून काम करणार का?’ मी ‘हो’ म्हटलं. माझा बी फायदा होता. सासूला, घरच्यांना औषधं फुकट मिळत व्हती. माझा लेक तेव्हा तीन म्हयन्याचा होता. त्याला घेऊन तीन म्हयने नर्सिगचं ट्रेनिंग घेतलं. मी काम सुरू केलं. गावात फिरून गरोदर माता, स्तन्यदा मातांना माहिती द्यायची. लहान बाळांचं लसीकरण करायचं. लोकांचं हिमोग्लोबीन, ब्लडप्रेशर, शुगर तपासायची. दर आठवडय़ाला पेशंट जमा करायचे. आठवडय़ातून एकदा हॉस्पिटलची गाडी आणि डॉक्टर यायचे. गावकऱ्यांना मोफत औषध उपचार करायचे, पण लोकं औषध घ्यायला यायचीच नाहीत. मी वणवण फिरून ‘गृहभेटी’ द्यायची. लोकांना आरोग्याचं महत्त्व समजावायची, पण माझी पाठ वळली की बाया म्हणायच्या, ‘सुलोचनाबाई हाय रिकामटेकडी. निसती गावभर फिरती. आम्हाला कामं हायेत! हिचं काय जातंय?’
रचना संस्थेसाठी मी बालवाडी चालवत होते. म्हणून वाटलं, अनुभव हाये तर झेड.पी.ची बालवाडी मिळाली तर चार पैसे तरी मिळतील. त्याचं ऑफिस १७ कि.मी. लांब, चार तास जायला, चार तास यायला लागायचे. मी आणि नव्हरा किती तरी वेळा खेपा घालत होतो. मुलाखतीचं बोलवणं आलं. पुणे जिल्हय़ातल्या नद्या, परिसर असा ‘जनरल नॉलेज’चा लय अभ्यास केला; पर वळख नव्हती, चार वर्षे मला काम नाय मिळालं. पाच वर्षांनी मला झेड.पी.ची बालवाडी तर मिळालीच आणि त्या वर्षीचा आदर्श शिक्षक म्हणून पुरस्कारपण मिळाला.
समाजासाठी असं काम करता करता दोन हजार साली जे.टी. झेडच्या अभ्यासदौऱ्यासाठी गडचिरोलीला जाण्याचं मला निमंत्रण मिळालं. माय आन् बा नायच म्हणले. म्हणाले, तिथं नक्षलवादी हायेत. एवढय़ा लांब तू जाऊ नको. मी गप्प बसले. काही दिवसांनी एक सुशिक्षित मॅडम माझ्याकडे आली. म्हणाली, ‘मी तुला दहा हजार देते. तुझ्या जागी मी जाते. मी खूश झाले. नवऱ्याला म्हटलं, ‘दहा हजार घेते मी. मी गडचिरोलीला नाय जात!’ तो म्हणला, ‘खुळी काय तू? पैसे मिळतील, पण ज्ञान मिळेल तुला? जा तू.’ मला तर पुणं स्टेशन माहीत नव्हतं. ट्रेनमध्ये पयल्यांदा बसले. मला कळंना, ही झाडं पळतात कशी? आम्ही एकूण २६ जणी होतो. सगळय़ा सुशिक्षित बाया! येसफ्यस करायच्या. मला म्हनल्या, ‘वॉट इज युवर नेम?’ म्हनलं, ‘इट इज माय नेम सुलोचना!’ बाया हसल्या, पण मी घाबरली नाय. तशीच बोलत राहिली.
या अभ्यास दौऱ्यात आम्ही वर्धा, नागपूर, चंद्रपूर फिरलो. तिथल्या कुपोषित मुलांचा, तिथल्या पिकांचा अभ्यास केला. घरगुती औषध, गृहउद्योग पाहिले. आनंदवनात बाबा आमटेंना भेटलो. तेरा दिवसांनी परत आले. नवरा स्टेशनवर न्यायला आला होता. त्याला घेऊन मार्केट यार्डला गेले. मला दहा हजार मानधन मिळालं होतं. त्याचं धान्य किराणा भरला. आता सहा म्हयने पोरांच्या पोटाची चिंता नव्हती.
आज माझ्याकडे जर्मनी, अमेरिकेतून मुली येतात. राहतात. इथलं खेडय़ातलं आयुष्य बघतात. मी आता बचत गट चालवते. गावात कोणतीही अडचण आली, की मी ती सोडवते. लोकं म्हणतात, ‘तुम्ही राजकारणात या. सरपंच बना!’
राजकारणात येऊन काय करू? मला पैसं नाय कमवायचे. मला लोकांची सेवा करायचीय. तुम्ही दुसऱ्यासाठी काम केलं, की ईश्वर तुम्हाला भरभरून देतो, ही माझी श्रद्धा आहे.

सुलोचना कडू यांना मिळालेले पुरस्कार
* प्रौढ शिक्षणवर्ग मोहीम पुरस्कार
* आदर्श शिक्षक पुरस्कार
* व्हिलेज हेल्थवर्कर पुरस्कार
* आरोग्यसेविका पुरस्कार
* राजमाता जिजाऊ स्वावलंबन पुरस्कार
* महिला बचत गट हिरकणी पुरस्कार
माधुरी ताम्हणे -madhuri.m.tamhane@gmail.com

rte marathi news, rte latest marathi news
आरटीई अंतर्गत बदलांमुळे विद्यार्थ्यांच्या चौथी, सातवीनंतरच्या शिक्षणाचे काय होणार?
Concession for students to attend school due to highest temperature in state
विद्यार्थ्यांना शाळेत उपस्थित राहण्याबाबत सवलत… काय आहे शालेय शिक्षण विभागाचा निर्णय?
Career MPSC exam Guidance UPSC job
प्रवेशाची तयारी: व्यवस्थापन शिक्षणासाठी राज्यस्तरीय सीईटी
High Court relief
वैद्यकीय विषयाच्या विद्यार्थ्याला उच्च न्यायालयाचा दिलासा, पुनपर्रीक्षेची गुणपत्रिका देण्याचे राज्य शिक्षण मंडळाला आदेश