22 November 2019

News Flash

विचित्र निर्मिती : चित्रपटाच्या पोतडीतल्या काही लघुकथा..

वेगवेगळे चित्रपट दाखवण्यासाठी मी अनेक देशांतल्या, अनेक चित्रपट महोत्सवांना गेले आहे

(संग्रहित छायाचित्र)

सुमित्रा भावे / सुनील सुकथनकर  

वेगवेगळे चित्रपट दाखवण्यासाठी मी अनेक देशांतल्या, अनेक चित्रपट महोत्सवांना गेले आहे. ग. दि. माडगूळकरांनी ‘गीतरामायण’मधल्या एका गीतात म्हटल्याप्रमाणे, ‘दोन ओंडके वेगाच्या प्रवाहात वाहत येऊन एकमेकांना भेटतात आणि थोडय़ाच काळात दुरावतातही.’ पण त्या काही क्षणांची भेट मनावर खोल सील उमटल्याप्रमाणे ठसा उमटवते आणि लक्षात येतं, ते आपलं आजचं माणूसपण घडण्यात त्या काही क्षण भेटलेल्या माणसांचा रंग मिसळला आहे. आज ती माणसं कुठं आहेत? कशी आहेत? कोण जाणे!

एक चित्रपट बनवायचा म्हटला की, त्याची सुरुवात उत्साहाने होते. ऐन उन्हाळ्यात अचानक कुठून तरी वाऱ्याचा झोत स्पर्शून जावा आणि गरमीने शिणलेल्या आपल्या जिवालाही क्षणभराची तरतरी यावी तशी ओसंडून स्पर्श करणारी स्वप्नंही जागी व्हायला लागतात; पण याच नाण्याची दुसरी बाजू म्हणून अनेक चिंता, विवंचनाही रुंजी घालत असतात. कसे दिवस गेले हे कळण्याच्या आधीच चित्रपट पुरा होतो. आता तो प्रेक्षकांना दाखवायचा म्हटल्यावर पुढची हुरहुर सुरू होते..

आज अशा अनेक चित्रपटांच्या प्रदर्शनाच्या वेळच्या, प्रत्यक्ष चित्रपटाशी संबधित नसलेल्या, तरी चित्रपटामुळेच घडलेल्या लघुकथा आठवताहेत. घटना म्हटली तर छोटीच, विशेष काही नाही. तरी कशी कोरली जाते मनात! भेटलेल्या अनोळखी माणसांमुळे, त्यांच्या ओलाव्यामुळे आपल्या जिवात कसा कोंब फुटतो. वेगवेगळे चित्रपट दाखवण्यासाठी मी अनेक देशांतल्या, अनेक चित्रपट महोत्सवांना गेले आहे. ग.दि.माडगूळकरांनी ‘गीतरामायणा’ मधल्या एका गीतात म्हटल्याप्रमाणे, ‘दोन ओंडके वेगाच्या प्रवाहात वाहात येऊन एकमेकांना भेटतात आणि थोडय़ाच काळात दुरावतातही.’  पण त्या काही क्षणांची भेट मनावर खोल सील उमटल्याप्रमाणे ठसा उमटवते आणि लक्षात येतं, ते आपलं आजचं माणूसपण घडण्यात त्या काही क्षण भेटलेल्या माणसांचा रंग मिसळला आहे. आज ती माणसं कुठं आहेत? कशी आहेत? त्यांनाही अशी अचानक कधी तरी माझी आठवण येत असेल का, कोण जाणे!

सानफ्रान्सिस्कोला गोल्डन ब्रिजच्या पलीकडचं गाव मिल व्हॅली. तिथे खास चित्रपट महोत्सव असतो. हॉलीवूडच्या जवळ असलेलं हे ठिकाण; पण या महोत्सवात आपण जगातले ‘कमर्शियल’ चित्रपट न दाखवता वेगळे चित्रपट दाखवतो, असा अभिमान बाळगणारा हा महोत्सव! त्यांनी लागोपाठ तीन वर्षआमचे तीन चित्रपट दाखवले. महोत्सवाच्या ‘डिरेक्टर’ बाईंनी आमचा ‘जिंदगी जिंदाबाद’ हा चित्रपट त्या भारतात आल्या होत्या तेव्हा पाहिला होता. या चित्रपटासाठी त्यांनी आम्हाला निमंत्रित केलं. त्यांचा आमच्याशी संपर्क हा मुळातच नुसता कोरडा-व्यवस्थापकीय असा नव्हता. त्यांनी कळवलं की, ‘‘आम्ही आमच्या प्रत्येक पाहुण्यांना एक एक स्वयंसेवक सोबत म्हणून देतो. हे स्वयंसेवक गावातले उच्चशिक्षित, उच्चव्यावसायिक पण चित्रपटावर खूप प्रेम करणारे असतात. तेव्हा तुमच्या चित्रपटातून तुम्ही आम्हाला जे समजला आहात, त्यातून तुम्हाला आवडेल अशी स्वयंसेवक मी तुमच्यासाठी निवडली आहे. मात्र तुमचं विमान सानफ्रान्सिस्कोला रात्री बारा वाजता पोचेल.  सानफ्रान्सिस्को विमानतळाहून मिल व्हॅली तसं दूर आहे. रात्री एकच्या सुमारास तुम्हाला विमानतळावरून न्यायला येणं स्वयंसेविकेला अडचणीचं होईल. म्हणून आम्ही तिला सांगितलं आहे की, तुम्ही सकाळी आठपर्यंत पोचलात तरी चालणार आहे.’’

रात्री बारा वाजल्यापासून सकाळी आठपर्यंत त्या बाईंची वाट बघत बसणं एवढंच आम्ही करू शकत होतो. विमानतळावर आरामखुर्च्या असल्या तरी खुर्च्याच त्या! मोठा प्रवास झालेला, अंग आंबून गेलेलं, भूकही लागलेली होती. धड झोप येईना आणि पहाटे पाच वाजता समोरून एक बाई तरातरा आमच्या दिशेने चालत येत असताना दिसल्या. त्यांनी जवळ-जवळ पळतच येऊन माझे हात हातात धरले आणि म्हटल्या, ‘‘सुमित्रा?’’

मी म्हटलं, ‘‘हो’’

त्या म्हणाल्या, ‘‘मी गेल. महोत्सवाच्या लोकांनी मला कळवलं, की सकाळी आठ वाजता यांना विमानतळावर घ्यायला जा. तुमचं विमान बारा वाजता येणार हे मला माहीत होतं. तुम्ही रात्री बारापासून सकाळी आठ वाजेपर्यंत नुसती माझी वाट पाहाणार ही कल्पना मला सहन होईना. मलाही झोप येईना. खरं तर मी आणखीन आधीसुद्धा आले असते; पण ज्यांनी मला वेळ दिली त्यांच्या आदेशाचाही आदर करावा म्हणून मी स्वत:ला रोखलं.’’ गेलने तो धरलेला हात, तिची चष्म्याआडची स्थिर, खोल नजर. आम्ही मत्रिणीच झालो. मग तिने आम्हाला सरळ ज्या हॉटेलमध्ये आमची राहण्याची व्यवस्था केलेली होती तिथे न नेता स्वत:च्या घरी नेलं. म्हणाली, ‘‘गरम पाण्याच्या अंघोळीने बरं वाटेल तुम्हाला.’’ अंघोळ होईस्तोवर तिने नाश्ता बनवलेला. म्हणाली, ‘‘मला खात्री आहे, तुला रोज गरम भात खाण्याची सवय असणार. मी तुझ्यासाठी एक हॉटेल बघून ठेवलंय. रोज मी तुला गरम भात खाण्यासाठी तिथे घेऊन जाईन.’’ ही आमची स्वयंसेविका ‘सायकॅट्रीक नर्स’ होती, उत्तम चित्रकार होती. ती मूळची कॅनडाची. तिचा डॉक्टर नवरा वारला आणि आता तिथे राहवेना म्हणून ती गाव आणि घर सोडून मील व्हॅली या सुंदर शहरात येऊन राहिली होती. ती अनेक वेगवेगळ्या विषयांचा अभ्यास करण्यासाठी युनिव्हर्सटिी लायब्ररीची खास सदस्य होती. तिचा एकुलता एक मुलगा युरोपमध्ये होता. इथे ती एकटीच राहात होती. जेमतेम पाच-सहा दिवसांचा परिचय; पण खूप जुनं नातं असल्यासारखी तिने माझी काळजी घेतली. मानसिक आजाराने ग्रस्त असलेल्या माणसाकडे बघण्याचा तिचा दृष्टीकोन इतका सहानुभूतीचा होता की पुढे ‘देवराई’सारखा चित्रपट करताना मला हटकून तिची आठवण यायची. शेवटच्या दिवशी गेल मला म्हणाली, ‘‘आज तुम्हाला विमानतळावर सोडण्यासाठी माझी एक मत्रीण येईल. तिला मी तुम्हाला सोडण्याची विनंती केलेली आहे.’’ मी थोडी खट्ट झाले. म्हटलं, ‘‘म्हणजे जाण्याच्या बरंच आधी तुझा निरोप घ्यावा लागणार.’’ ती पहिल्या दिवसाप्रमाणे माझा हात हातात घेऊन म्हणाली, ‘‘हो.’’ आम्ही विमानतळावर पोचलो. तिची मत्रीण खूप बडबडी, रस्ताभर खूप बोलत होती. मला आतून गप्पच राहावंसं वाटत होतं. एअरपोर्टवर पोचलो. सामान चेक-इन केलं आणि सिक्युरिटीच्या दिशेने गेलो तो मागून हाक आली, ‘‘सुमित्रा!’’ मागे वळून बघते तो गेल. आम्ही दोघींनी एकमेकींकडे पळत येऊन मिठी मारली. तिच्या गळ्यात मी भेट दिलेला स्कार्फ होता. तिने तिच्या पद्धतीने माझे हात हातात घेतले. तिच्या डोळ्यांत पाणी होतं. ‘‘मला निरोप देणं सोसत नाही म्हणून मी येत नाही म्हटलं; पण घरी बसून करमेना. म्हटलं हे काही खरं नाही. शेवटपर्यंत सोबत असायला पाहिजे तरच दोस्ती असते म्हणून आले.’’ पुढच्या वर्षी आम्ही मिल व्हॅलीला परत गेलो तर समजलं की गेल कॅनडाला परत गेली होती. आता मानसिक आजाराचा उल्लेख झाला की मला ही मानसोपचार परिचारिका आठवते. दुसऱ्याच्या मनात स्थळ, काळ, जबाबदारी कशाचाही हिशोब न करता खोलवर शिरणारी! गेलजवळ उपजतच ‘हीलिंग’ची ऊब होती. ती आजही कधी कधी जाणवते..

‘दोघी’ चित्रपट दाखवण्यासाठी मी जपानला गेले होते. तिथली आमची दुभाषी हिबिनो. दुभाषी खरी पण इंग्रजीवर तिचं फार प्रभुत्व होतं असंही नाही. जपानी लोकांचा सगळाच कार्यक्रम खूपच शिस्तीचा. वेगवेगळ्या देशांतले दिग्दर्शक तिथे जमलेले. त्यांच्या स्वागतासाठी खास पार्टी होती. मी शाकाहारी. त्या पार्टीतल्या बहुतेक पदार्थाना माशांचा वास येत होता. एकही पदार्थ खाववेना. त्यातल्या त्यात काही तरी ‘डेझर्ट’ घेऊन सगळ्यांचा निरोप घेऊन मी आणि माझ्याबरोबर उत्तरा बावकर होत्या, आम्ही निघालो. पार्टी हॉलच्या बाहेरच्या रस्त्यावर आम्हाला परत नेणारी गाडी उभीच होती. मी गाडीत बसण्यासाठी दार उघडलं तर मागून हिबिनो पळत आली. रस्त्यातच गुडघे टेकवून खाली बसली. माझा हात धरून म्हणाली, ‘‘आय एम सॉरी. मी पाहिलं, तू काही खाऊ शकली नाहीस पार्टीमध्ये. मी तुमच्या हॉटेलला कळवून ठेवले आहे. तिथे गेल्याबरोबर तुमच्यासाठी शाकाहारी पदार्थ तयार ठेवलेले आहेत. काही खाल्ल्याशिवाय झोपू नकोस. नाही तर मला वाईट वाटेल.’’ हा अनुभव अनपेक्षितच होता..

नंतर मी हिबिनोला विश्वासात घेऊन म्हटलं होतं, ‘‘तुमच्याकडल्या सर्वात वेगवान आगगाडीने प्रवास करण्याची माझी इच्छा आहे आणि मला जगातला सर्वात मोठा, जागृत ज्वालामुखी, फुजियामा पाहायचा आहे.’’ ‘प्रवासाची व्यवस्था झालेली आहे, विमानाचं तिकीट परत करणं अडचणीचं आहे, उगीच खर्च वाढेल.’ अशी कुठलीही कारणे न सांगता हिबिनोने तिच्या वरिष्ठांकडे रदबदली करून माझी इच्छा पूर्ण केली. उद्या परतायचं.. टोकोयोतल्या हॉटेलात सहाव्या-सातव्या मजल्यावर मी आणि उत्तराताई गप्पा मारत बसलो होतो. म्हटलं, ‘‘या हिबिनोमुळे थोडय़ा दिवसांत आपल्याला जपान किती छान अनुभवता आला. पण एकच गोष्ट अनुभवायची राहिली ते म्हणजे इथला भूकंप.’’ आणि काय बोलाफुलाला गाठ पडावी तशी जमीन आणि हॉटेलची इमारत हलते आहे असा भास होऊ लागला. आम्ही दोघी घाबरून उठून उभ्या राहिलो. तोल जातोय की काय असं वाटता-वाटता जमीन स्थिर झाली. खरं की स्वप्न कळलं नाही आणि तेवढय़ात हिबिनो पळत आली. म्हणाली, ‘‘तुम्हाला कळलं ना, आत्ताच भूकंप झाला, पण घाबरू नका. पुन्हा असं हललं तर दाराच्या चौकटीत येऊन उभ्या राहा. म्हणजे बाजूनी भिंती किंवा छप्पर पडलं तरी आपण वाचतो.’’ सूचना नामी होती, पण आम्ही भीतीने शहारलो. भिंत आणि छप्पर पडलं तर? हिबिनो खांद्यावर हात ठेवून म्हणाली, ‘‘जपानमध्ये जमीन केव्हा सरकेल सांगता येत नाही. मन घट्ट ठेवण्याचा सरावच करावा लागतो.’’ त्यानंतर थोडय़ाच दिवसांत दिल्लीमध्ये चित्रपट महोत्सव होता. तिथे हिबिनो आली होती. ती म्हणाली, ‘‘दिल्लीमध्ये मी असेस्तोवर आपण एकत्र असायचं.’’ त्यावेळी दिल्लीमध्ये ‘भैस बराबर’ या आमच्या मालिकेच्या एका भागाचं आम्ही शूटिंग करणार होतो. हिबिनोला मला शूटिंग करताना पाहायचं होतं. हिबिनोने जपानमध्ये कुरुसोवा या प्रख्यात दिग्दर्शकाचं शूटिंग पाहिलेलं. तिने मला कुरुसोवाची सही भेट म्हणून दिली होती.

जपानमध्ये किमोनोमध्ये शिस्तशीर हालचाली करणारी, पावलं जवळजवळ टाकत तुरुतुरु पळणारी, दात न दाखवता डोळ्यांनीच हसणारी हिबिनो, दिल्लीत आमच्याबरोबर हिंडताना मोकळी झाली होती. खळखळून हसत होती. तिला बंगाली मार्केटमध्ये नेऊन आम्ही आमच्या युनिटसोबत पाणीपुरी खायला घातली. त्या पदार्थाने ती थक्क झालेली होती. निरोप घेताना मला म्हणाली, ‘‘तशी मी हळवी वगैरे नाही. पण तुझा निरोप घेताना मला रडू येतं आहे.’’ कुठून आलेलं हे नातं?

(क्रमश:)

sumitrabhavefilms@gmail.com

chaturang@expressindia.com

First Published on June 15, 2019 1:44 am

Web Title: sumitra bhave sunil sukthankar article on some short stories from the film
Just Now!
X