News Flash

जुगाराचं व्यसन

विचित्र निर्मिती

सुमित्रा भावे / सुनील सुकथनकर sunilsukthankar@gmail.com

‘‘बाई  लघुपट दाखवतानाच ‘पाणी’ लघुपटाचे ढोल सुमित्राच्या मनात वाजायला लागले होते. १९८६च्या दुष्काळी वातावरणात गावाच्या पिण्याच्या पाण्यासाठी बायांना जी वणवण करावी लागते, त्या विरुद्ध त्यांनी उभा केलेला संघर्ष अशी कथा तिच्या मनात जन्म घेत होती. हरलेल्या जुगाऱ्याला पुन्हा पैसे गुंतवायची खुमखुमी असावी तसं न जमलेल्या गोष्टी करण्यासाठी पुढचा चित्रपट बनवावासा वाटणं हे दिग्दर्शकीय व्यसन आम्हाला लागलं होतं..’’ सुनील सुकथनकर यांच्या शब्दांत हा प्रवास

चित्रपट निर्माण होण्याचे अनुभव अनेकदा बाळंतिणीच्या गोष्टींसारखे असतात. विशेषत: पूर्वीच्या बायका ‘अमक्या ‘खेपेला’ असं झालं’ अशी सुरुवात करून बोलतात तसं  होतं होतं आमचं..! तर आमचा दुसराच लघुपट ‘पाणी’- त्या ‘खेपेची’ गोष्ट..!

मी ‘एफटीआयआय’मध्ये शिकायला लागलो होतो.. ‘बाई’ या लघुपटाच्या वेळी मला एक फिल्म बनते म्हणजे काय याची अथपासून इतिपर्यंत प्रक्रिया अनुभवता आली होती. ही पुण्याई घेऊन मी एफटीआयआयमध्ये दिग्दर्शन शिकू लागल्यावर ‘अरे, हे मला माहितीय..हे मी केलंय.’ अशी मजा अनुभवता येत होती. बाहेर संकलनाचे स्टुडिओ किंवा लॅब्ज अशा व्यावसायिक ठिकाणी अगदी गरीब टीम म्हणून काम केल्यावर प्रत्येक गोष्टीला दमडय़ा मोजाव्या लागतात याची कठोर जाणीव घेऊन मी एफटीआयआयमधली सुबत्ता अनुभवत होतो. माझ्या मनात आमच्या संस्थेविषयी तक्रार यायचीच नाही, कारण हे मिळणं किती दुरापास्त आहे हे मला माहीत होतं.

‘बाई’ लघुपट दाखवतानाच ‘पाणी’ लघुपटाचे ढोल सुमित्राच्या मनात वाजायला लागले होते. १९८६च्या दुष्काळी वातावरणात गावाच्या पिण्याच्या पाण्यासाठी बायांना जी वणवण करावी लागते त्या विरुद्ध त्यांनी उभा केलेला संघर्ष अशी कथा तिच्या मनात जन्म घेत होती. तळागाळात काम करणाऱ्या अनेक संघटनांशी तिचा जिव्हाळ्याचा संबंध होता. त्यातूनच या लघुपटाची आखणी सुरू झाली. ‘बाई’ ही एका शहरी वस्तीतल्या एका बाईची गोष्ट होती तर ‘पाणी’ ही एका गावाची-त्यातल्या बायांची गोष्ट होती.

त्या काळी चित्रपट बनवण्याची प्रक्रिया खरंच बाळंतपणासारखी जिकिरीची होती. अनेक सरकारी संस्थांमध्ये अर्ज करून शूट करण्याची निगेटिव्ह विकत घेण्याचा परवाना मिळे. तो दिल्यावर तेवढीच फिल्म ‘कोडॅक’ कंपनीकडून विकत घेता येई. ती संपली नाही तर उरलेली लॅबमध्ये द्यावी लागे. नाही तर काळाबाजार केल्याचा आरोप होई. त्यात ती फिल्मही खूप महाग! त्यामुळे सगळी प्रक्रिया खूप ठरवून, निगुतीने आणि काटकसरीने करावी लागे. एक एक शॉट विचार करूनच घ्यायचा. कारण तो पुसता येत नाही. डिलीट करता येत नाही. त्यामुळे लघुपट बनवणंही महाग होतं.

‘बाई’ लघुपट दाखवताना ज्यांनी ‘मग पुढे काय’ असा प्रश्न विचारला त्यांना आम्ही ‘पुढच्या लघुपटाचं तिकीट बुक करा’ असं सांगू लागलो आणि चक्क असे पैसे जमू ही लागले. पण ते खूपच अपुरे होते. मग मित्र नातेवाईक यांच्याकडून उसनवारी करत भांडवल उभारणी सुरू झाली. मला एफटीआयआयमध्ये शिकल्यामुळे नव्या मतांची मिसरूड फुटायला लागली होती. चित्रपट हे मुक्त कलाविष्कार करण्याचं माध्यम आहे, आपण ‘सामाजिक’ चित्रपटच बनवत राहणार का, कलात्मक चित्रीकरण म्हणजे नेमकं काय- असे गोंधळ मनात जन्म घेत होते. सुमित्राला स्पष्टता होती. ज्या बायांच्या प्रश्नांवर आपण काम करतो आहोत त्यांना बरोबर घेऊन आणि त्यांना उद्देशून हा लघुपट असेल.. हळूहळू माझे डोळे उघडत जात होते..

पाणी आणण्यासाठी बाया कशा मल-मल चालतात हे मी प्रथमच डोळ्यांनी बघितलं. त्यांना सुकलेल्या विहिरीत घसरडय़ा वाटेनं उतरून वाटी वाटी पाणी आणून घागर भरताना आणि पुन्हा उन्हातान्हात परतताना पाहिलं. पुरुषांना मोठमोठय़ा पाणी योजना, देवळांचे जीर्णोद्धार अशा विषयांवर रिकामटेकडय़ा चर्चा करत पिण्याचं पाणी ही बाईचीच जबाबदारी असल्याच्या आविर्भावात वावरताना पाहिलं. अनेक संस्था, शहरी कायकत्रे गावोगावी धडपडताना पहिले.

माझं एफटीआयआयमधलं शिक्षण मला यातलं काहीच देत नव्हतं. मी जागतिक चित्रपटांनी भारावून जात होतो. अनेक बुलंद कलाकृतींसमोर आपण किती क्षुल्लक आहोत, ही नम्र जाणीवही होत होती. आपण, आपला समाज आणि आपण कसा चित्रपट बनवावा याचा वैचारिक गोंधळ मनात उडत होता. (माझ्या तरी मनात अजूनही उडतो..!) अति-कलात्मक अमूर्त किंवा धंदेवाईक अशा बाजू घेणारे असे माझ्या वर्गमित्रांचे तट पडले होते. जे काही डाव्या विचारांशी जवळीक असणारे होते, त्यांना मात्र माझ्या या उद्योगांविषयी कुतूहल वाटायचं. त्यावेळी विद्यार्थ्यांनी बाहेर काम करणं संस्थेला मान्य नव्हतं. त्यामुळे ऐन चित्रीकरणाच्या दिवशीच माझी एक दिवसाची परीक्षा आडवी आली तरी मला ती धडपडत येऊन द्यावीच लागली आणि त्या वेळात सुमित्रा आणि टीमला चित्रीकरण चालूच ठेवावं लागलं.

‘पाणी’ या प्रश्नाभोवतीचं हे वास्तव सुमित्रानं तिच्या संहितेत घट्ट बांधलं होतं. तिचा ग्रामीण भागात काम करण्याचा अनुभव व्यक्तिरेखा निर्माण करताना व्यक्त होत होता. उदाहरणार्थ- बायकांना एरवी दुर्लक्षित ठेवलं जात असलं तरी खेडोपाडी बाया-पुरुष एखाद्या अशा म्हातारीचा सल्ला घेतात, जिच्या चेहऱ्यावर शहाणपणाच्या सुरकुत्या पडलेल्या असतात. अशी व्यक्तिरेखा सुमित्रानं नायिका करायची ठरवली. आणि

माई केदारी या स्त्री कार्यकर्ती या ‘नायिका’ कुशाकाकीच्या भूमिकेसाठी उभ्या राहिल्या. त्यांच्याप्रमाणेच दिवे घाटाजवळच्या वडकी गावातल्या अनेक बाया प्रथमच कॅमेऱ्यासमोर उभ्या राहणार होत्या. गंमत म्हणजे गावाच्या पुरुषांना त्याचं हे निष्क्रिय चित्रण मान्य होतं आणि त्या भूमिका करायला ते तयारही झाले. हा पुरुषी निर्ढावलेपणा होता की या प्रक्रियेतून सुरू होणारी बदलाची नांदी कोण जाणे!

मी माझ्या नाटकाच्या पुण्याईवर कलाकारांच्या तालमी घ्यायचो. नॉन-अ‍ॅक्टर्स हे अनेकदा कसलेल्या कलावंतांपेक्षा काहीतरी जास्त प्रामाणिक देऊ शकतात हे जाणवत होतं. पण त्याचबरोबर त्यांच्याबरोबर खूप काम केल्याशिवाय किंवा त्यांना खूप ‘टेक्स’ घेण्याची मुभा दिल्याशिवाय त्यांच्यातला संकोच जाऊन खरं व्यक्तिमत्त्व बाहेर येत नाही हेही उमजत होतं. कॅमेरामन शरद नवले यांच्याबरोबर रखरखीत माळ, कातरे गेलेले पाय, घामेजलेल्या बायांची तलाव खंदून काढण्याची धडपड हे सारं प्रतिमेत कसं रूपांतरित करायचं याचे प्रयत्न आम्ही करत होतो. दृश्य भाषेचा अवघडपणा जो मी एफटीआयआयमध्ये पुस्तकांतून शिकत होतो, तो इथे मला प्रत्यक्षात जाणवत होता. खोल गेलेली विहीर ही प्रत्यक्ष परिस्थितीही आहे आणि एक प्रतीकदेखील. पण कुठे कॅमेरा लाऊन कुठली लेन्स लावून कुठल्या छायाप्रकाशात हा शॉट घेतला असता हे सगळं पोचवता येईल, हे कळणं सोपं नव्हतं. त्यासाठी सुमित्राची सामाजिक जाणीव आणि संहिता-लेखनाची उपजत समज यांच्या जोडीला आमच्यातल्या दिग्दर्शकाकडून माध्यम प्रगल्भतेची अपेक्षा होती. माझ्या अस्वस्थ मनाला तिथे आपण कमी पडतो आहोत हे जाणवत होतं.

आम्ही शेजारच्या गावात पाझर तलाव स्वच्छ करण्याच्या प्रसंगाचं चित्रण करत होतो. तिथल्या काही प्यायलेल्या पुरुषांचा एक जमाव अचानक चालून आला. त्यांनी स्वत: दुर्लक्षित ठेवलेल्या तलावाच्या स्वच्छतेचं श्रेय भलतं गाव घेतंय म्हणून आमच्या कॅमेरामनच्या गाडीवर दगडही उगारले. शेवटी सुमित्रा आणि आमच्या ‘नायिका’ आजी पुढे होऊन त्यांना दमात घेऊन बोलायला लागल्यावर त्यांनी सपशेल लोटांगण घातलं. एक पुरुष म्हणून मला हा दंगेखोर दारुडय़ांचा ‘एपिसोड’ यानंतर अनेक चित्रीकरणात जेव्हा जेव्हा पाहावा लागे तेव्हा तेव्हा माझी मान खाली जाई. यातून असे चित्रपट बनवण्याची गरज अधोरेखितच होत जायची!

आमच्या निर्मिती संस्थेच्या गरिबीत आम्ही घरगुती साधं जेवण आणि एका ओसरीवर ओळीने सतरंज्यांवर झोपण्याची व्यवस्था इतपतच करू शकत होतो. कॅमेरामन वगळता कुणाकडे चार चाकी वाहनही नव्हतं. सामाजिक क्षेत्रातले काही कार्यकत्रेही भूमिका करत होते. त्यांनाही बसने ये जा करत राहावी लागे. चार-पाच दिवसांच्या या चित्रीकरणात ४०  मिनिटांचा हा लघुपट तयार करताना या काही जणांच्या वेळेचा अपव्यय होणं किंवा निरोपांची गैरसोय असे व्यवस्थापकीय गोंधळ आम्ही केले. आम्ही नवीन आहोत म्हणून वेळ मारून नेणं सोपं होतं. पण तसं न मानता हे सगळंच सुधारू असं आम्ही स्वत:ला सांगत होतो. माध्यमाचा वापर असो वा व्यवस्थापनाची सुधारणा ही ‘पुढच्या वेळी’ नक्की शिकू असं म्हणताना आम्ही नकळत पुढचा लघुपट बनवण्याचा मनोदय व्यक्त करू लागलो होतो, हे आमच्या लक्षात आलं नाही. हरलेल्या जुगाऱ्याला पुन्हा पैसे गुंतवायची खुमखुमी असावी तसं न जमलेल्या गोष्टी करण्यासाठी पुढचा चित्रपट बनवावासा वाटणं हे दिग्दर्शकीय व्यसन आम्हाला लागलं होतं..

फ्लॅश फारवर्ड – आम्ही ‘देवराई’ चित्रपट दाखवण्यासाठी कॅनडामध्ये माँट्रियलला गेलो होतो. तिथे एका कार्यक्रमात एक भारतीय ज्येष्ठ समाज संशोधक भेटल्या. त्या म्हणाल्या, नुकतीच तुमची ‘पाणी’ ही फिल्म मी स्त्रियांचं संघटन कौशल्य शिकवायला प्रेरणादायक म्हणून पाकिस्तानमधल्या खेडेगावी बायांना दाखवली. किती आवडली ती त्यांना!

मला तेव्हा ‘अयशस्वी’ झाली की काय असं वाटलेली ‘पाणी’ ही फिल्म त्यानंतर १८ वर्षांनी दाखवली जात होती.

chaturang@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 26, 2019 2:21 am

Web Title: sumitra bhave sunil sukthankar documentary on water
Next Stories
1 एक कप..!
2 रचनात्मक सकारात्मकता
3 इंटरनेटच्या युगातलं पालकत्व
Just Now!
X