12 July 2020

News Flash

सारांश

वर्षभर विविध विषयांवर आपण गप्पा मारल्या. कधी मानसिक स्वास्थ्याविषयी तर कधी शारीरिक. बऱ्याच आजी-आजोबांनी मला मेलवर पत्रं पाठवली. कौतुकमय आशीर्वाद दिले.

| December 13, 2014 01:01 am

वर्षभर विविध विषयांवर आपण गप्पा मारल्या. कधी मानसिक स्वास्थ्याविषयी तर कधी शारीरिक. बऱ्याच आजी-आजोबांनी मला मेलवर पत्रं पाठवली. कौतुकमय आशीर्वाद दिले. प्रत्यक्षात भेटले / फोनवरून संपर्क साधला. आश्चर्याची गोष्ट म्हणजे मी लिहीत होते आजी-आजोबांसाठी पण वाचकवर्ग मात्र सर्व थरांतील होता. काही मुलांनी सांगितलं की आमच्या घरी सामूहिक वाचन होतं – ‘खा आनंदाने’ या सदराचं. खरंच मी जे काही थोडे प्रामाणिक प्रयत्न केले, माझ्या सर्व वाचकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी त्या बदल्यात मला भरभरून प्रेम मिळालं. काहींनी कात्रणं काढून संग्रही ठेवली तर काहींना पूर्वीची सदरं परत वाचायची आहेत म्हणून विनंती केली. या प्रेमासाठी मनापासून धन्यवाद. 

आजच्या आणि पुढच्या सदरात काही तुमच्या प्रश्नांची उत्तरे आणि सर्व लेखांचा सारांश आपण बघू या. वर्षभरातील सगळ्या लेखांचा आज आपण एक आढावा घेऊया. काही प्रश्न अनवधानाने राहिले असतील तर केवळ जागेचा आणि वेळेचा अभाव म्हणून. त्यांना मी वैयक्तिक उत्तर पाठवीनच.
१. मितभूक आणि हितभूक – आरोग्याची खरी गुरुकिल्ली. भूक मंदावणं हा मोठा गहन प्रश्न समस्त ज्येष्ठांना असतो. पूर्वी ४/ ५ पोळ्या सहज खाणारे, आता एखादी पोळी जेमतेम खाऊ शकतात. वयामुळे पचन संस्थेमध्ये जे बदल घडतात त्यामुळे भूक कमी होते. पण मग अशक्तपणा जाणवतो. त्यावर उपाय काय? थोडे थोडे अन्न पण दिवसातून ४- ५ वेळा खावे. पचायला सोपे, पण पौष्टिक अन्नपदार्थ- जसे की मऊ भात (लाल किंवा हातसडीचा तांदूळ), फुलका, लापशी, वरी तांदूळ, नाचणी-ज्वारी भाकरी, राजगिरा पीठ, लाडू, मूग डाळ, फळभाज्या, पालेभाज्या, ताक, फळे (चावता येतील अशी उदा. चिकू, केळ, पपई, टरबूज वगैरे) पचायला जड अन्नपदार्थ – परोठे, पुरी, तेलकट पदार्थ, मैद्याचे पदार्थ जसे ब्रेड, बिस्कीट, खारी, नुडल्स वगैरे, शेंगा, भाज्या, बटाटय़ासारख्या वातुळ भाज्या, चणाडाळ, उडीदडाळ, चणे, वाटाणे, म्हशीचे दूध, दही, पनीर, मांसाहारी पदार्थ. ते शक्यतो टाळावेत.
२. वयाप्रमाणे शारीरिक आणि मानसिक बदल हे होणारच. पण या बदलांशी जर आपण सोयरीक जुळवली तर त्यामुळे होणाऱ्या त्रासांची तीव्रता आपण नक्कीच कमी करू शकतो. केस उन्हामुळे पांढरे नाही झाले तर अनुभवामुळे परिपक्व झाले आहेत, हा सकारात्मक दृष्टिकोन मी माझ्या आईमध्ये बघितला तो सगळ्याच आजी-आजोबांमध्ये का असू नये?
३. सकाळची न्याहारी खूप महत्त्वाची असते- सगळ्यांसाठीच पण जास्त करून ज्येष्ठांसाठी. कारण मागे म्हटल्याप्रमाणे संध्याकाळी भूक जास्त मंदावलेली असते, मग त्याची कसर भरून काढण्यासाठी नाश्ता-मस्ट, पण पौष्टिक. काही सोप्या वाटणाऱ्या पण महत्त्वाच्या आहार-‘त्रिसूत्री.’
(१) चहा- बिस्कीट / टोस्ट / फरसाण या गोष्टी नाश्ता असू शकत नाहीत. (२) चहा / कॉफी जास्त उकळलेली (कडक) नसावी. तशी सवय असेल तर ती मोडावी. सकाळी उठल्यानंतर साधारण २-३ तासांच्या अंतराने नाश्ता करावा. योग्य वेळ सकाळी ८ ते ९ दरम्यान. पूजापाठ करण्यात वेळ नाही म्हणून १०-११ नंतर नाश्ता करणं पचन-आरोग्याच्या दृष्टीने योग्य नाही. (३) कोणताही नाश्ता घेतला तरी दूध / ताक / दही / मोड आलेले मूग प्रथिनांसाठी बरोबरीने जरूर घ्यावेत. एक लक्षात घ्या की नाश्ता योग्य वेळेवर आणि पोटभर घेतला की दिवसभर तरतरी तुम्ही टिकवू शकता.
४. साधारण ५०-५५ वय झाल्यानंतर ‘पूर्वीसारखे’ उपवास करणे योग्य आहे का? कमी झालेली भूक, शरीराची कमी झालेली ताकद आणि विविध कारणांसाठी चालू असलेली औषधे या कारणांसाठी मी या वयानंतर उपास टाळायला सांगते. बऱ्याच वैयक्तिक / धार्मिक कारणांसाठी उपास सोडवत नाहीत. मग उपाय काय? उपवास कसा करायचा ते सांगण्याइतकी मी मोठी नाही पण आजी-आजोबांनी ‘सोयीस्कर’ उपास करावा.
(क्रमश:)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 13, 2014 1:01 am

Web Title: summery of dite
Next Stories
1 संवाद शरीराशी
2 निर्गुण अनुभूती
3 खा आनंदाने! : ॐ सर्वे भवन्तु सुखिन:
Just Now!
X