News Flash

जोतिबांचे लेक  : स्त्री सन्मानासाठी

हरियाणातील जिंद जिल्ह्य़ातील बीबीपूर या सुमारे ५००० लोकवस्तीच्या गावात सुनील राहात आहे.

हरीश सदानी

स्वत:च्या मुलीच्या जन्माच्या वेळी सरपंच सुनील यांच्या लक्षात आलं, की स्त्रीभ्रूण हत्येचा शाप असलेल्या आपल्या गावामध्ये मुलींची संख्या खूपच कमी आहे.  स्त्रीअस्तित्वालाच सुरुंग लावणाऱ्या या एका घटनेनं त्यांना पूर्णपणे बदलून टाकलं. त्यांनी स्त्रियांसाठी ग्रामसभा आयोजित के ली आणि एकामागोमाग एक उपक्रम सुरू झाले. लाडो पुस्तकालय, डिजिटल इंडिया विथ लाडो, सेल्फी विथ लाडो, लाडो स्वाभिमान उत्सव, लाडो राइट्स अशा अनेक उपक्रमांमुळे हरियाणातील जिंद जिल्ह्य़ातील बीबीपूरची दखल थेट राष्ट्रपतींनी घेतली आणि आज हे गाव सर्वच बाबतीत प्रगतिपथावर आहे. २६ व्या वर्षी सरपंच झालेल्या आणि आज गेली ११ वर्षे स्त्रीसन्मानासाठी काम करणाऱ्या या जोतिबांच्या लेकाचं, सुनील जागलान यांचं हे कार्यकर्तृत्व..     

स्त्रियांच्या सन्मानानं व सुरक्षितपणे जगण्याच्या हक्काच्या रक्षणासाठी त्यांच्या आयुष्यातील पुरुषही मोलाची भूमिका बजावू शकतात- वैयक्तिक पातळीवर आणि व्यावसायिक पातळीवरही. जर तो पुरुष राज्यसंस्थेचा, प्रशासकीय सेवेचा एक महत्त्वपूर्ण घटक असेल, तर स्वत:कडे असणाऱ्या सत्ता, सामर्थ्यांच्या जोरावर नागरिकांचं आयुष्य उंचावण्यामध्ये तो ठोस पावलं नक्की उचलू शकतो. अशीच पावलं हरियाणातील एका माजी सरपंचानं सातत्यानं आणि प्रभावीरीत्या उचलली आणि आपल्या गावातील स्त्रियांना सन्मानानं जगू देण्यासाठीची त्याची धडपड गेली ११ वर्ष चालू आहे. या सुनील जागलान यांचे,  ३८ वर्षांच्या तडफदार माजी सरपंचाचे हे प्रयत्न नक्कीच जाणून घेण्यासारखे आहेत.

हरियाणातील जिंद जिल्ह्य़ातील बीबीपूर या सुमारे ५००० लोकवस्तीच्या गावात सुनील राहात आहे. ‘एमएस्सी’चं पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या सुनीलला गणित आणि व्यवस्थापकीय बाबींमध्ये रस होता. २००७ मध्ये स्वत: सुरू केलेल्या कोचिंग इन्स्टिटय़ूटमध्ये शिकवण्याचं काम  करताना त्याला एका शिक्षक-प्रशिक्षण महाविद्यालयात थेट संचालकपदाची नोकरी मिळाली. पहाटे ५ वाजता कामासाठी घराबाहेर पडणाऱ्या सुनीलनं जास्तीत जास्त पैसे कमावण्याचा ध्यास आणि त्यासाठी काम एके काम असा दिनक्रम अंगीकारला.

एकदा गावात रस्ता बांधण्यासाठी गावच्या उपायुक्तास भेटून अर्ज देण्याची विनंती काही गावकऱ्यांनी सुनीलकडे केली. सुनीलनं स्वत: जाऊन तो अर्ज देऊनही काही प्रतिसाद न मिळाल्याने त्या अर्जाचा पाठपुरावा सुरू केला. त्याच्या या चिकाटीनं रस्तेबांधणीसाठी २५ लाख रुपये मंजूर झाले. गावातील अनेकांनी सुनीलचं व्यवस्थापकीय कौशल्य ओळखून त्याला गावचा सरपंच होण्याचा आग्रह केला. सुनीलनं सुरुवातीला हे फारसं गांभीर्यानं न घेताच सरपंचपदासाठी तयारी केली आणि ५५० मतं अधिक मिळवून २६ वर्षीय सुनील देशातील सर्वात तरुण सरपंच झाला. त्यानं ६ जून २०१० रोजी पदभार स्वीकारला.

‘मिशन पॉसिबल- गांव बने शहर से सुंदर’ या घोषणेसह सुनील काम करू लागला. बीबीपूर गावात मुलांना खेळण्यासाठी झोपाळे, बागा, नागरिकांसाठी सौरऊर्जा, स्वच्छता मोहीम या सुविधा देण्याबरोबरच ऑनलाइन माध्यमाद्वारे (आरटीआय) माहिती पुरवण्यात, ग्रामपंचायतीचं संके तस्थळ बनवण्यात, ऑनलाइन ग्रामसभा घेण्यात त्यानं पुढाकार घेतला.  २४ जानेवारी २०१२ च्या मध्यरात्री एका खासगी रुग्णालयात त्याच्या बायकोनं एका बाळाला जन्म दिला. ‘बेटी हुई हैं,’ असं एक परिचारिका हलक्या आवाजात सुनीलला सांगायला आली. आनंदी झालेल्या सुनीलनं दुसऱ्या दिवशी रुग्णालयात सर्वाना मिठाई वाटण्यासाठी २००० रुपये परिचारिके ला देऊ केले. तिनं ते घेण्यास नकार दिला. ती म्हणाली, ‘‘मुलगा जन्मला असता तर यापेक्षा जास्त पैसे घेतले असते. मी तुमच्याकडून मुलगी जन्मल्यानंतर ज्यादा पैसे घेतले, असं डॉक्टरांना कळलं, तर ते रागावतील!’’ परिचारिके च्या प्रतिक्रियेनं गोंधळात पडलेल्या सुनीलनं दुसऱ्या दिवशी घराजवळच्या आरोग्य केंद्रात जाऊन पाहाणी केली. २०११ च्या जनगणनेनुसार हरियाणा राज्याचं स्त्री-पुरुष लिंग गुणोत्तर (सेक्स रेशो) देशात सर्वात कमी- म्हणजे दर १००० मुलग्यांमागे ८७९ मुली, अशी नोंद असल्याचं सुनीलला कळलं. बीबीपूर गावाच्या बाबतीत हे प्रमाण दर हजार मुलांमागे ८६७ मुली इतकं कमी होतं. स्त्री अर्भकांच्या हत्या  थांबवण्यासाठी गावातील स्त्रियांना जागरूक करून बोलतं करण्याकरिता सुनीलनं १८ जून २०१२ रोजी महिला ग्रामसभा  घेतली. त्यात २५० स्त्रिया जमल्या. या घटनेद्वारे ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ या सरकारी अभियानाची आधारभूत सुरुवात बीबीपूर येथे झाली असल्याचं सुनील नम्रपणे नमूद करतो.

न जन्मलेल्या मुलींच्या अस्तित्वाचा प्रश्न हा समाजात एकंदरीत स्त्रिया किती सन्मानानं, सुरक्षितपणे वावरत आहेत याच्याशी थेट निगडित आहे. घरात व घराबाहेर निर्धास्त, आत्मविश्वासानं त्या वावरू लागल्या तर स्त्रीजन्माचं स्वागत होण्याच्या दिशेनं ते आश्वासक पाऊल ठरेल, हे सुनीलनं ओळखलं. स्त्रियांनी मोठय़ा प्रमाणात एकत्र येऊन याविषयावर खुलेपणानं बोलावं, यासाठी केवळ हरियाणा नव्हे, तर पंजाब, उत्तर प्रदेश, दिल्ली, राजस्थान इथल्या खाप पंचायतीच्या प्रतिनिधींना बोलावून महाखाप पंचायत आयोजित करण्याचं सुनीलनं ठरवलं. यात स्त्रिया मोठय़ा प्रमाणात येऊन बोलल्या पाहिजेत, यासाठी गावातील प्रत्येक घरात जाऊन आवाहन केलं गेलं. मात्र अनेक खाप पुढाऱ्यांनी स्त्रियांच्या सहभागाविषयी आक्षेप नोंदवला. खाप पंचायतीच्या कुठल्याही बैठकीला किंवा ‘चौपाल’मध्ये फक्त पुरुषच भाग घेऊ शकतात असा वर्षांनुवर्षं चालत आलेला संकेत असल्याचं सुनीलला अनेक बुजुर्गानी सुनावलं. मुलींची घटती संख्या, कौटुंबिक हिंसाचार या स्त्रियांशी थेट संबंधित मुद्दय़ांवर स्त्रियांना नेमकं काय वाटतं हे त्यांच्याकडून जाणून घेतल्याशिवाय ते प्रश्न कसे सुटू शकतात, असा सवाल करत सुनीलनं जिद्दीनं स्त्रियांच्या सहभागाबद्दल आग्रह धरला. १४ जुलै २०१२ रोजी बीबीपूर येथे भरलेली महाखाप पंचायत अद्वितीय ठरली. हरियाणा आणि शेजारच्या राज्यातील १३० खाप पंचायतींमधील प्रतिनिधी तिथे उपस्थित होते आणि लक्षणीय संख्येनं स्त्रियाही. ऐतिहासिक ठरलेल्या या उपक्रमामध्ये पहिल्यांदा एका मंचावर मुली, सुना जमल्या. ‘वंश चालवण्यासाठी मुलगाच हवा’ यासाठी कुटुंबीयांकडून येणाऱ्या दडपणापासून स्त्रियांना संपत्तीत असणाऱ्या हक्कापर्यंत अनेक विषयांवर या स्त्रिया हिरिरीनं बोलल्या. पूर्णत: घुंघटमध्ये असलेल्या ९२ वर्षांच्या संतोष देवी उद्गारल्या, ‘‘१६ व्या वर्षी माझं लग्न झालं होतं. तेव्हापासून आजपर्यंत मी स्वत:साठी जगलेच नाही. सतत दुसऱ्यांचं ओझं वाहात आले. मला आता परिवर्तन हवंय. स्वत:साठी आणि गावातील तरुण मुलींसाठी!’’ संतोष देवी बोलत असलेल्या माईकची वायर कापून सभा उद्ध्वस्त करण्याचा डाव काही विरोधकांनी आखला होता. पण अशाही स्थितीत आसपासच्या नीरव शांततेत त्यांचा आवाज सर्वत्र घुमत राहिला होता, असं सुनील कथन करतो.

या अभूतपूर्व महाखाप पंचायतीच्या आयोजनानंतर सुनीलनं गर्भवती स्त्रियांच्या निगराणीकरिता ज्येष्ठ स्त्रियांचा एक गट तयार के ला. कुठल्याही दडपणाखाली कोणी बेकायदेशीररीत्या गर्भपात करत नाही ना, याबद्दल दक्ष राहाण्याबरोबरच मुलींच्या घसरत्या जन्मदराविषयी जाणीव-जागृतीचे अनेक कार्यक्रम गावात आयोजित करण्यात आले. लाडो पुस्तकालय, लाडो सरोवर, स्त्रियांना एकत्र जमून बैठक घेण्यासाठी चबुतरा बांधण्यात आला. या सर्व प्रयत्नांनी गावात पहिल्यांदा मुलींची संख्या २०१३ आणि त्यापुढील वर्षांत वाढत गेली. सुनीलच्या स्त्री-सक्षमीकरणाच्या आगळ्या उपक्रमांची दखल घेऊन राष्ट्रीय गौरव पुरस्कार, तसंच हरियाणा सरकारकडून एक कोटी रुपयांचं पारितोषिक देऊन त्याला सन्मानित केलं गेलं. ९ जून २०१५ रोजी सुनीलच्या घरी टीव्हीवर सलमान खानच्या ‘बजरंगी भाईजान’ चित्रपटातील ‘सेल्फी ले ले रे’ गाणं सुरू होतं. त्याची मोठी मुलगी नंदिनी फोनच्या कॅमेऱ्यावर स्वत:चा फोटो काढत होती. तरुणाईला असणारं ‘सेल्फी’चं वेड लक्षात घेऊन त्यानं ‘सेल्फी विथ डॉटर’ अभियान सुरू केलं. आई-वडिलांनी मुलींसोबत काढलेले सेल्फी पाठवण्याचं आवाहन केलं. एका आठवडय़ात असे ७९४ सेल्फी (अगदी प्रसिद्ध खेळाडू सायना नेहवाल, गीता फोगट यांच्यासह) सुनीलच्या मोबाइलवर पाठवले गेले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत या अभियानाची माहिती पोहोचली आणि त्यांनी त्याची प्रशंसाही केली.

यानंतर ‘डिजिटल इंडिया विथ लाडो’ उपक्रमाअंतर्गत सुनीलनं घराबाहेरची नावाची पाटी मुलींच्या नावानं करण्यासाठी मोहीम राबवली. ‘ईशा निवास’, ‘जैनम निवास’ अशा  मुलींच्या नावांच्या पाटय़ा घराबाहेर झळकायला सुरुवात झाली.  बीबीपूरच्या ३० घरांपासून सुरू झालेली ही मोहीम राज्यात हळूहळू अनेक लोकांनी स्वेच्छेनं अंगीकारली. सध्या हरियाणा आणि इतर राज्यांत १५,००० घरांवर अशी मुलींच्या नावांची ‘नेमप्लेट’ लावण्यात सुनील यशस्वी झाला आहे. ‘लाडो स्वाभिमान उत्सवा’चा भाग म्हणून कुटुंबातील पुरुषानं आपल्या मुलीला वा नातीला पगडी बांधण्याचा कार्यक्रमही घेण्यात आला. यात ५ वर्षांपासून सुनीलच्या कामाशी जोडलेल्या सुमारे ३५० पुरुषांनी आपापल्या मुलींच्या/ नातींच्या डोक्यावर पगडी बांधली. हा उपक्रम वरकरणी प्रतीकात्मक वाटत असला तरी पगडीचं महत्त्व मानणाऱ्या हरियाणवी लोकांमध्ये ‘लक्षणीय संख्येनं मुलींना सन्मान देणारे पुरुष’ या मुद्यावर गावागावांत चर्चा घडवण्यास ही गोष्ट कारणीभूत ठरली हे विशेष.

जानेवारी २०१६ मध्ये सुनीलचा सरपंचपदाचा कार्यकाळ संपला तरी त्याचं काम सुरूच होतं.  तत्कालीन राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी सुनीलच्या कामाचं कौतुक केलं. त्यांनी बीबीपूरच्या ग्रामविकास व महिला सक्षमीकरण मॉडेलचं हरियाणातील १०० गावांमध्ये ‘स्मार्टग्राम’मध्ये रूपांतराकरिता ५० लाखांचं अर्थसहाय्य सुनीलला दिलं. तसंच राष्ट्रपती भवन येथे ‘सेल्फी विथ डॉटर फाऊंडेशन’च्या उद्घाटनासाठी त्याला निमंत्रित केलं. विभा बक्षीनं २०१९ मध्ये दिग्दर्शित केलेल्या ‘सनराइझ’ या माहितीपटात सुनीलच्या कामाचं ठळक चित्रण आहे. हा माहितीपट सध्या ‘यूएन विमेन’च्या ‘ही फॉर शी’ अभियानांतर्गत जगभरात सिनेमहोत्सवांमध्ये सादर केला जातो.

आता सुनील ३८ वर्षांचे आहेत. सध्या ‘प्रणब मुखर्जी फाऊंडेशन’मध्ये सल्लागार म्हणून, तसंच स्वत:च्या संस्थेमार्फत सुनील हरियाणा, उत्तराखंड, राजस्थान येथे कार्यरत आहेत. स्त्रियांच्या हक्कांविषयी ‘लाडो राइट्स’ पुस्तक प्रसिद्ध करून अनेक ठिकाणी वितरित करून जागरूकता निर्माण करणं, ‘पीरिअड चार्ट’ घराघरात लावून मासिक पाळीला दैनंदिन चर्चेचा विषय बनवणं, अनेक गावात लाडो पुस्तकालय, संगणक केंद्र सुरु करून, मोबाइल फोन भेट देऊन मुलींच्या कक्षा रुंदावणं, राज्याराज्यांतील सरपंचांना ऑनलाइन पद्धतीनं जोडून घेऊन मार्गदर्शन करणं हे त्यांचं अथकपणे चालूच आहे. ५ वर्षांचा कार्यकाळ आणि त्यापुढे जाऊन एक माजी सरपंच काय विधायक, रचनात्मक कार्य करू शकतो याचा एक वस्तुपाठच सुनील जागलान यांनी घालून दिला आहे.

saharsh267@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 17, 2021 1:03 am

Web Title: sunil jaglan work for women s honor in haryana zws 70
Next Stories
1 गद्धेपंचविशी :  तो योग्य निर्णय..
2 खल-बत्ता, कढई-झारा
3 होती धाडसवेडी एक..
Just Now!
X