14 August 2020

News Flash

कथा दालन : सुनीता

तेव्हापासून आज दिसली सुनीता गावात. गुलाबी साडीत.. आवाज देऊन मी तिला जवळ बोलावलं

(संग्रहित छायाचित्र )

वर्षां ढोके सय्यद

varsha100vd@gmail.com

तेव्हापासून आज दिसली सुनीता गावात. गुलाबी साडीत.. आवाज देऊन मी तिला जवळ बोलावलं. ती फोटो घेऊन आली होती. ‘‘देखो म्यडम. मेरे हजबण्ड.’’ हजबण्ड शब्दावर जोर देऊन बोलत होती सुनीता. हिन्दी बऱ्यापैकी जमत होतं तिला. मी फोटो बघितला. चापूनचोपून मधून भांग पाडलेला. कलप लावलेले काळेकुट्ट केस. गालावर पांढरी खुंटं उगवलेली. जवळपास पन्नाशीतल्या माणसाचा फोटो होता तो. गालातली हवा पार निघून गेली होती. मी म्हटलं, ‘‘चांगले आहेत. मोठे दिसतात.’’ ‘‘हौव नं..’’ काय सांगू नि काय नको असं झालं होतं तिला..

आवारात दुरून कुणी तरी येताना दिसलं. जवळ आली तेव्हा कळलं, ती सुनीता होती.

खूप दिवसांनंतर दिसली सुनीता. एक वर्ष लोटलं असेल जवळजवळ. भडक गुलाबी रंगाची चमचम टिकल्यांची साडी नेसलेली, गुंडाळल्यासारखी. कपाळावर रंगीत टिकली टेकवलेली. भांगात जाडसर कुंकू भरलेलं. वेणी घातलेली. वारंवार खांद्यावरचा पदर चाचपत होती. चेहऱ्यावर नेहमीसारखे भाव.

मी आवाज दिला..

एका हातात साडीच्या निऱ्या धरून लगेच आली ती.

‘‘शादी हुयी म्यडम मेरी,’’ नव्या नवरीच्या उत्साहाने न लाजता बोलली ती.

‘‘कधी गं? कुठे राहतेस आता?’’

तिचं लग्न झाल्याचं दिसतच होतं, पण कधी झालं ते नव्हतं माहीत मला.

‘‘मेरे हजबण्ड का फोटू दिखाऊ क्या?’’ माझ्या प्रश्नाचं उत्तर न देताच ती लगबगीने फोटो आणायला घरी गेली.

लग्न झालं, पण काहीच बदल झालेला दिसत नव्हता सुनीतामध्ये. आधीही अशीच बोलायची, वागायची. सुनीता जवळच राहते. म्हणजे राहायची. लगतच्या शेतावर फार्महाऊस आहे. सुबक बसकं. शेतमालक शहरात राहतो. देखभाल करायला गावातल्याच देवरावला ठेवलंय. फार्महाऊसच्या मागच्या दोन खोल्यांत आपल्या कुटुंबासह राहतो देवराव. देवरावला एक मुलगा आहे. दोन मोठय़ा मुलींची लग्न झालीत. त्यांपैकी एक दिसते कधी कधी. दुसरीला कधीच पाहिलं नाही.  सुनीता सगळ्यात धाकटी. १४-१५ वर्षांची असेल. मी या गावात बदलीवर आले तेव्हा सतत फिरताना दिसायची ती. मालकाच्या मुलीचे वापरलेले अघळपघळ ड्रेस घालायची. केसाच्या मातकट कुरळ्या बटा. कुठल्या तरी साबणाने धुतल्याने चिकटून वाटोळ्या झालेल्या. गोरी, भरीव बांध्याची, पहिल्या पावसानंतर जमीन भेगाळून आतला चकचकीत कोंब तरारून वर यावा आणि डौलात वाढावा तशी सुनीता वयापेक्षा आधीच वयात आली. गचाळ राहणीमानातही ते तारुण्य नजरेत भरायचं. शाळा कधीचीच सोडली होती. इंग्रजीत सही करायची मात्र. सारखी घराबाहेर असायची. दिवसभर गावात चकरा मारायची. चौकातून जाणाऱ्या रस्त्यावर रेंगाळायची. रिकामटेकडी तरुण मुलं मग काहीबाही चिडवायची. दुपारची कामं आटोपून किंवा अर्धवट टाकून बाया बारीक आवाजात गप्पा मारत बसलेल्या असायच्या. येता-जाता त्या तिला डिवचत.

‘‘मोठी झाली सुनीता!’’ तिच्या वाढलेल्या अंगाकडे पाहत डोळे मिचकवायच्या बाया.

सुनीता त्यातली खोच लक्षात न येताच हसायची.

‘‘बहिणी तर खपल्या. तुयं कवा करते लग्न तुवा बाप?’’ त्या संवाद वाढवायच्या. सुनीतालाही आवडायचा हा विषय.

‘‘मी मालकासंगच लगन करणार.’’

‘‘काय?’’

‘‘मंग! बिलिडग लिऊन देणार हाय मले.’’

सुनीता उघडपणे बोलायची. बाया पुन्हा पुन्हा तिला काहीबाही विचारायच्या. आडवाटेने माहिती काढायच्या.आपल्या झाकून ठेवलेल्या लैंगिक भावना चाळवून फिदीफिदी हसायच्या.

लठ्ठ पगारावर रिटायर्ड झालेला मालक वेळ घालवायला फार्महाऊसवर यायचा. मालकाची गाडी आली, की सुनीताचा चेहरा उजळायचा. डोळ्यातली चमक वाढायची. तो राहील तोवर त्याची छोटीमोठी कामं करायला देवराव सुनीताला पाठवायचा. शाळा सोडलेल्या सुनीताला घरची विशेष जबाबदारी नव्हती. घरातली निटनेटकी कामं करणं, शेतावर कामाला जाणं, एवढंच. कायम आईची सावली असल्यासारखी राहायची. मालक असेपर्यंत आई शेतावरची थोडीफार कामं करायची. तो गेला, की पुन्हा रवंथ करणाऱ्या बलासारखे सारे ढेपाळून जायचे. सदानकदा तोंडात पानाचा तोबारा भरून असायचा. आंघोळीला दुपारचे दोन वाजवायचे. देवराव मग इरसाल शिव्या हासडायचा.

सुनीता सतत मालकाच्या मागे-पुढे राहायची. त्याच्या नजरेत भरेल अशी वागायची. मग १००-२०० रुपये तिच्या हातात टेकवायचा तो. मालक मालकी गाजवायला लागला होता. देवरावला कधी तरी कळलं तेव्हा थोडीफार आदळआपट केली त्याने. मालक नसताना पूर्ण व्यवहार त्याच्या हातात असायचा. शेतमजूर देवरावला इथं कुणी टोकत नव्हतं. मालकामागे गुपचूप शेतमाल, भाजीपाला, फळं विकायचा. विशेष मेहनत न करता दोन वेळच्या जेवणापेक्षा जास्त मिळत होतं त्याला. उरलेलं गुत्त्यावर उडवायचा. अन् काही महिन्यांनी सुनीताच्या वाढलेल्या पोटाची फारशी चिंता केली नाही त्याने. देवराव आणि सुनीताला मालक गाडीतून शहरात घेऊन गेला एकदिवस. सुनीताचा गर्भपात करवून आणला.

पावसाळा तोंडावर आला होता. सुट्टय़ांनंतर नवीन सत्र सुरू झालं होतं. शाळेचे सुरुवातीचे  दिवस असल्याने लक्षात नाही आलं. काही दिवसांनंतर जाणवलं.  सुनीता दिसली नव्हती. तिची आई समोरून जाताना दिसली एकदा. मी विचारलं, ‘‘सुनीता दिसली नाही एवढय़ात?’’

‘‘लग्न झालं न जी उन्हाळ्यात. यमपीत देलं. पशे जास्त लागते म्हणून येत नाही नेमीनेमी. फोन करते तं सांगते, चांगली हाय मनून.’’

पुढे स्वयंपाकी काकूंनी सांगितलं, ‘‘उन्हाळ्यात लग्न झालं म्हणून सांगतात तिच्या घरचे. पण विकलं म्हणते तिला. चाळीस हजारांत. मालकानंच विकून दिलं म्हणतात लोक.’’

तेव्हापासून आज दिसली सुनीता गावात. गुलाबी साडीत..  आवाज देऊन मी तिला जवळ बोलावलं.

ती फोटो घेऊन आली होती. ‘‘देखो म्यडम. मेरे हजबण्ड.’’ हजबण्ड शब्दावर जोर देऊन बोलत होती सुनीता. हिन्दी बऱ्यापैकी जमत होतं तिला. मी फोटो बघितला. चापूनचोपून मधून भांग पाडलेला. कलप लावलेले काळेकुट्ट केस. गालावर पांढरी खुंटं उगवलेली. जवळपास पन्नाशीतल्या माणसाचा फोटो होता तो. गालातली हवा पार निघून गेली होती.

मी म्हटलं, ‘‘चांगले आहेत. मोठे दिसतात.’’  ‘‘हौव नं. बडेच है. मेरेकू श्टोव लगा देते है.’’ काय सांगू नि काय नको असं झालं होतं तिला.

‘‘हम दोनोच है उधर घर मे. कामपे जाते है तो ताला लगा देते है दरवाजेकू. उधर न औरत कू भगाके ले जाते है, अकेली दिखी तो. म टिवी देखती दिनभर.’’ एक आश्वस्थ आनंद पसरला होता तिच्या चेहऱ्यावर.

‘‘मेरे हजबण्ड के दोस्त लोग भी आते है खोली पर,’’ नुसतीच बोलत सुटली होती ती.

‘‘तुला आठवण नाही येत इकडची?’’

‘‘कभी कभी आती है. उधर बदली बहूत होती है कामपर. अगले साल उनके गाव को भेजेंगे मेरेकू. बीचबीच मे आयेंगे वो,’’ ती सांगत होती.

‘‘मुलं झाल्यावर येतील मग,’’ मी म्हटलं.

‘‘ना! गोल्या देते ना मेरेकू मेरे हजबण्ड. अभी कुछ साल लडका नही पदा करेंगे बोले वो. बदली करके गाव मे आयेंगे तब,’’ ती सांगत राहिली. नेहमीच्या आनंदात!

दोन दिवस दिसली सुनीता गावात, नंतर ती गेली. त्यानंतर सुनीताला कुणी गावात पाहिलं नाही अजून. घरचेही काहीच सांगत नाहीत कुणाला.

आता बरीच वर्ष झालीत. कधी तिच्या आईला विचारलं तर ती नेहमीच्या थंड चेहऱ्याने सांगते, ‘‘फोन करते तं सांगते ना, चांगली हाय मनून.’’

चमचम गुलाबी रंगातल्या साडीत शेवटचं पाहिलेली सुनीता आठवत राहते अध्येमध्ये..

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 20, 2020 1:07 am

Web Title: sunita katha dalan article abn 97
Next Stories
1 चाइल्ड पॉर्नोग्राफीचा भस्मासुर
2 जीवन विज्ञान : पचनसंस्था -एक जैविक सयंत्र
3 मनातलं कागदावर : श्रींची इच्छा..
Just Now!
X