१५ वर्षांची असताना ‘चाइल्ड सोल्जर’ अर्थात बालसैनिक म्हणून अतिरेक्यांकडून अपहरण झाल्यानंतर, जगायचं असेल तर दुसऱ्यांना ठार करूनच हे प्रत्यक्षात आणावं लागणारी ती. नशिबाने तिची तिथून सुटका होते. शिक्षण पूर्ण करून अमेरिकेत स्थायिक होत असतानाच ती बालसैनिकांवरच्या अमानुष, जुलमी कृतीविरोधात आवाज उठवते, आतंरराष्ट्रीय स्तरावर हा विषय छेडते, कारण अशा अनेक दाबल्या गेलेल्या आवाजांचे प्रतिनिधित्व तिला करायचे आहे. तिच्यावर झालेल्या छळामुळेच तिने बालसैनिकांवरच्या अत्याचाराच्या रोगावरचं औषध बनायचं ठरवलं आहे. युगांडाच्या ग्रेस अकालोची ही थरारक कहाणी.
ग्रेसला तो भीषण दिवस लख्ख आठवतो. ९ ऑक्टोबर १९९६. युगांडाचा स्वातंत्रदिवस. अतिरेक्यांचा हल्ला होणार अशा अफवा पसरलेल्या होत्या. त्यामुळे तणावाचे वातावरण होतेच. यापूर्वीही अनेकदा अफवांनी घबराट माजवली होती. त्यावेळी काही घडले नव्हतेच, पण या काळरात्री मात्र अतिरेक्यांनी डाव साधला आणि गाठलं लहान लहान मुलींना. पुढचा सगळा घटनाक्रम एखाद्या चित्रपटात घडावा तसा अकल्पित, अनाकलनीय आणि क्रूर!
  ग्रेस अकालो, एक मध्यमवर्गीय स्वप्नाळू मुलगी. प्राथमिक शिक्षणानंतर पुढील शिक्षणासाठी आई-वडिलांकडे हट्ट करून सेंट मेरीज या खास मुलींच्या हायस्कूलमध्ये दाखल झाली. तिच्या गावातल्या खूूप कमी मुलींना ही संधी मिळत असल्याने ती फार उत्साही होती. शिक्षणाचं महत्त्व तिला उमगू लागलं होतं. म्हणूनच तर विद्यापीठात गेलेली पहिली मुलगी होण्याचा मान आपण मिळवायचाच, हे तिनं पक्क ठरवलं होतं.
पण घडलं वेगळंच. ९ ऑक्टोबरच्या रात्री लॉर्ड्स रेझिसटन्स आर्मी (एलआरए)चे अतिरेकी थेट मुलींच्या वसतिगृहात शिरले. बंदुकांच्या धाकाने त्यांनी १३९ मुलींना जबरदस्तीने बाहेर काढले. त्यांना चार रांगा करायची तंबी दिली. आणि साऱ्या निघाल्या, जंगलाकडे जाणाऱ्या चिंचोळ्या, अंधाऱ्या वाटेने.. अधांतरी भविष्याकडे. यावेळी ग्रेस होती फक्त १५ वर्षांची!
ग्रेसच्या शाळेच्या मुख्याध्यापिका सिस्टर रॅशेल यांना ही खबर लागताच त्यांनी अतिरेक्यांचा प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्यापुढे गयावया केल्या. मात्र निर्दयी अतिरेक्यांनी तिलाही जिवे मारण्याची धमकी दिली. सिस्टर रॅशेल नमल्या नाहीत, डगमगल्या नाहीत. त्या मुलींच्या मागे धावत राहिल्या. अखेर एलआरएच्या लोकांनी त्यातल्या १०९ मुलींना सोडून दिलं. पण ग्रेस तेवढी सुदैवी नव्हती.
झाल्या प्रकाराने ग्रेस गांगरून गेली. त्यांचा हेतू काय, आपल्याला इथे का आणलं गेलं या विचाराने ती सुन्नपणे चालत होती. संवेदना बोथट झाल्याप्रमाणे कृती घडत होत्या. भीतीने, दहशतीने, पुढे काय वाढून ठेवलंय या विचाराने या मुली रडत होत्या, भीतीने किंचाळत होत्या. त्यांचा तो आक्रोश पाहून एलआरएचा कमांडर मोठमोठय़ाने हसत होता.
या आठवणी सांगताना, ग्रेस आवंढा गिळते, ‘‘त्या रात्री चालताना भीतीने आम्हा मुलींची अवस्था वाईट झाली होती. माझा शरीरावरचा ताबा सुटला होता. लघवीने पायजमा ओला झाला होता. जवळपास महिनाभर आम्ही युगांडाच्या जंगलात भटकत होतो. मग आमचे दोन गट करण्यात आले, सुदानवर हल्ला करण्यासाठी आम्हाला नेले जाणार होते, असे कमांडरच्या सूचनांवरून कळत होते.’’
ग्रेसबरोबरीच्या अनेकजणींना जंगलातून मैलोनमैल चालणं असह्य़ होऊ लागलं. पोटात अन्नाचा कण नसल्याने अनेक मुली रस्त्यात कोलमडून पडल्या. ज्यांनी पुढे चालण्यास नकार दिला त्यांना ठार केलं गेलं, ग्रेसच्या डोळ्यांदेखत! कुऱ्हाडी, बंदुका अनेकदा धारधार सुरे यांनी मुलींना भीती घातली जात होती. मुली चालत होत्या.
ग्रेस सांगते, ‘‘सुदानच्या आसपास आम्ही पोहोचताच आम्हा मुलींच्या हातात एके-४७ देण्यात आल्या. पण त्या बंदुका चालवायच्या कशा हे आम्हाला शिकवण्यात आलंच नाही. ‘तुमची तहानभूकच तुम्हाला हे शिकवेल’ असं कमांडर सांगत होता आणि ते खरंही झालं. आम्हाला ‘सुदान पीपल्स लिबरेशन आर्मी’ (रढछअ) च्या विरोधात अनेकदा प्रत्यक्ष युद्धभूमीवर पाठवलं गेलं. त्याआधी परस्पर गटात आमची विभागणी करण्यात आली होती. अनेक सुंदर मुलींना वरिष्ठ कमांडरांशी लग्न करण्यास भाग पाडण्यात आलं. ज्या मुलींनी पळून जाण्याचा प्रयत्न केला वा ज्यांनी नवऱ्याला स्वीकारण्यास नकार दिला त्यांना मारून टाकण्याचं काम आमच्यावर सोपवण्यात आलं. कित्येक दिवस अन्नाचा कण पोटात गेला नाही. जगायचं तर कुणालातरी मारावं लागेल, ही अट घातली गेली. कमांडरच्या कोणत्याही सूचनेला नकार देणाऱ्यांना शिक्षा एकच, अमानुष शारीरिक छळ. त्या कमांडरने माझ्यावर किती वेळा बलात्कार केला, जबरदस्तीनंतर माझी झालेली स्थिती आठवूनही आता भीती वाटते. मी नुकती उमलणारी कळी होते, पण त्या अत्याचारांनी मला दगड करून टाकलं. वारंवार होणाऱ्या बलात्कारांमुळे संवेदना कुठे उरल्या होत्या, तरीही मी जिवंत होते.’’ ग्रेसचे हे अनुभव अंगावर शहारे आणणारे होते.
सुदानच्या सैनिकांकडून होणाऱ्या गोळीबाराला उत्तर देताना ग्रेसला भोवळ आली. ती खाली कोसळली. ग्रेस ठार झाली असे वाटल्याने एलआरएच्या म्होरक्याने तिला एका खड्डय़ात पुरून टाकले. मात्र ग्रेस जिवंत होती. सात महिन्यांच्या या अनन्वित छळानंतर ९ एप्रिल १९९७ रोजी ग्रेस तेथून निसटण्यात यशस्वी झाली. सलग दोन आठवडे अन्नपाण्याशिवाय, थांबले तर संपले, या भीतीने चालत राहिली. अखेर सुदानच्या एका गावात पोहोचल्यावर काही लोकांनी तिला युगांडा सैनिकांच्या हवाली केलं. त्यांनी सिस्टर रॅशेलकडे तिला सोपवलं व ग्रेस कुटुंबीयांकडे परत आली.
ग्रेस परत आली, पण तिचे मन शांत नव्हते. त्या भयानक आठवणी तिचा पिच्छा सोडत नव्हत्या. शारीरिक अत्याचाराच्या जखमांचे व्रण मनावरही झाले होते. ती अस्वस्थ होती. आपण सुटलो, पण अनेकांना त्या नरकात मागे ठेवून आपण एकटे परत आलोय, यामुळे जगण्याविषयी अपराधी भावना तिच्या मनात होती. अजूनही तिचे सवंगडी अतिरेक्यांच्या ताब्यात आहेत, या विचाराने ती दुखी होत होती.
जवळजवळ एक महिना तिने या घालमेलीत घालवला. पण घडलेल्या घटनांनी ग्रेस अकाली प्रौढ झाली, कणखर झाली. भळभळत्या जखमा घेऊनच ग्रेसने परत शाळेत जाणे सुरू केले. त्याच शाळेत जिथून तिचे अपहरण झाले होते. या अपघातानंतरचा शाळेचा पहिला दिवस तिला विसरणं शक्य नाही, ती म्हणते. पण कुटुबांच्या पाठिंब्यामुळे ग्रेस उभी राहिली. ‘ शाळेत पुन्हा दाखल होणं, ही माझ्या आयुष्यातली सर्वात सुंदर घटना ठरली असे वाटते. शिक्षणाने मला धीर आला. भविष्याविषयी आशा वाटू लागली.’
ठरवल्याप्रमाणे तिने युगांडा ख्रिश्चन विद्यापीठात प्रवेश घेतला. तिथे तिला अमेरिकेतील स्कॉलरशिपविषयी माहिती मिळाली. त्या आधारावर तिने ‘जॉर्डन महाविद्यालयात’ प्रवेश मिळवला तेथून पदवी घेतली. तर क्लार्क विद्यापीठातून ‘आंतरराष्ट्रीय विकास व सामाजिक बदल’ या विषयातून एम.ए. पूर्ण केले. मात्र भूतकाळ ग्रेसला स्वस्थ बसू देत नव्हता.
कुठल्यातरी उदात्त हेतूने आयुष्याने आपल्या बाजूने कौल दिला, याची जाणीव तिला आहे व त्याबद्दल ती ऋणी आहे. ती म्हणते, ‘‘या घटनेनंतर मी शाळेत जाऊ शकले, कुटुंबाचा पाठिंबा व प्रेम याचा मला आधार होता. मी सुदैवी ठरले. पण त्यांचं काय, ज्यांना हे मिळू शकत नाही. त्यांच्यासाठी काम करायचे आहे. बालसैनिकांच्या व्यथा अजूनही खऱ्या अर्थाने दुर्लक्षितच आहेत. त्या रोखण्यासाठी काम करायचे आहे.’’
 बालसैनिक या अमानुष, जुलमी प्रथेने ग्रेसच्या आयुष्याची दिशाच बदलून टाकली. २००७ साली, तिने आपले अनुभव मांडणारे, ‘गर्ल सोल्जर: अ स्टोरी ऑफ होप फॉर नॉर्दन युगांडाज् चिल्ड्रन’ हे पुस्तक लिहिले. या पुस्तकाने युगांडामधील बालसैनिकांच्या ज्वलंत समस्येवर प्रकाश टाकला. २००९ सालच्या संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत बालसैनिकांचा व एलआरएच्या कारवायांचा मुद्दा छेडला गेला. ग्रेसला यावेळी खास आमंत्रित करण्यात आलं. आंतरराष्ट्रीय स्तरावर याविरोधात ठोस कारवाईची गरज असल्याचे ग्रेसने ठामपणे सांगितले.  
युद्धाने पोळलेल्या, बालसैनिकांना भूतकाळातील जखमा विसरण्यासाठी शिक्षण हे उत्तम औषध ठरू शकतं. १० वर्षांहून अधिक काळ युद्धखोरीचे साक्षीदार असणाऱ्या मुलांनाही समाजाने स्वीकारले, त्यांना पाठिंबा दिला, शिक्षण व योग्य समुपदेशन दिले तर त्यांच्यातही सुधारणा होऊ शकते, असे ग्रेसने यावेळी ठासून सांगितले.
तिच्यासारख्या अनेक बालसैनिकांसाठी, पीडित महिला व मुलींच्या सुरक्षितता व हक्कांसाठी ग्रेसने काही समविचाारी लोकांच्या मदतीने ‘युनायटेड आफ्रिकन्स फॉर वुमेन्स अ‍ॅन्ड चिल्ड्रेन्स राइट्स’ ही सेवाभावी संस्था २००९ मध्ये स्थापन केली. लष्करी कलहाचे बळी ठरलेल्या मुलांची ती प्रतिनिधी आहे तर बालहक्क, शांतता यांची खंदी समर्थक आहे. जगभरातील अनेक विद्यापीठांमध्ये लेक्चर्स देऊन ‘बालसैनिक’ या प्रथेविरोधात ती आवाज उठवते आहे. अवघ्या तिशी-बत्तिशीतील तिचा दुर्दम्य आशावाद कमालीचा आहे.
अजूनही बालसैनिकांविरुद्धचा लढा संपलेला नाही. २००९ ते २०१२ या कालावधीत तब्बल ६०० मुलांचे कांगो, सुदान व युगांडा येथून एलआरएमार्फत अपहरण करण्यात आले आहे. लहान मुले भडकाऊ भावनांचे सहजासहजी लक्ष्य ठरतात व त्यांच्या मनात सुडाचे विष पेरले की त्याचा परिणाम दीर्घकाळ टिकतो, या हेतूने एलआरए कडून लहान मुलांना लक्ष्य केले जाते. शिवाय लहान मुलांवर विरोधी सैन्याकडून हल्ला होण्याची शक्यता कमी असते, असाही हेतू असतो.
ग्रेस म्हणते, ‘‘माझी शोकांतिका मी सांगितली, पण अजूनही कित्येकांच्या व्यथा अव्यक्तच आहेत. जगभरातील अनेक फुटीरतावादी संघटनांनी लहान मुलांची आयुष्य पणाला लावली आहेत, लहानग्यांचे भविष्य काळवंडून टाकलं आहे. त्यांना जगाकडून मदतीची गरज आहे, अपेक्षा आहे. लैिगक हिंसाचाराला दरवर्षी हजारो लहान मुले बळी पडतात. पण मला आशा आहे, परिस्थिती बदलेल असा विश्वास आहे.’’
       ग्रेसच्या पुस्तकातील तिचे भीषण अनुभव ऐकून अनेक वाचक, विद्यापीठातील मुले तिला विचारतात, ‘तुला रडावेसे वाटत नाही,’ तिचे उत्तर असते, ‘‘कोवळ्या मुलांचे आयुष्य करपून जात आहेत. सर्वत्र शांतता नांदायला हवी, हे माझं  ध्येय आहे. माझ्या दुखासाठी पुन्हा कधीतरी आसवं गाळत बसेन, आत्ता नाही.’’