अनेकांना सरप्राइज देण्यात फार उत्साह असतो. काही वेळा हे सरप्राइज खरंच आनंद देणारे ठरतात तर काही सरप्राइज मात्र अपेक्षाभंगही करतात. प्रत्येकाच्या आयुष्यात या सरप्राइजचं एक स्थान असतंच.
आमचा ऑफिसचा डझन जणींचा ग्रुप.. आज आमच्या या ग्रुपचं वय जवळजवळ चाळीस आहे.. अजूनही आम्ही जमतो, भेटतो. यात आमचा आनंद तर अवर्णनीय, पण बाकी सगळ्यांनासुद्धा प्रचंड कुतूहल आहे. आमचे वाढदिवस, लग्नाचे वाढदिवस, डोहाळ जेवणं, बारशी, निरनिराळ्या सहली, मुलांची कौतुकं करत करत आता आमची साठी सत्तरी साजरी करण्यापर्यंतचा आमच्या आयुष्याचा प्रवास या आमच्या ग्रुपने अगदी समरसून अनुभवला.
अशाच एका ठरवाठरवीत एका दिवसाची राहायची लोणावळ्याची ट्रिप ठरवली गेली. शनिवारी रात्री वयाचं भान विसरून गप्पा, गाणी, खेळ यामध्ये मस्त रात्र घालवली. रात्रीच्या पूर्ण जागरणामुळे सकाळी एक एक डुलकी काढून आरामात नाश्ता चालला होता. आणि एका मत्रिणीचा फोन खणाणला. तिच्या घरचा फोन होता.
‘हॅलो’ म्हणून तिनं एकदम ‘कधी?’ हा प्रश्न विचारला आणि आम्ही सगळ्या एकदम चरकलो.. तिचा अमेरिकेतला मुलगा बोलत होता हे एकतर्फी संभाषणावरून आम्हाला कळलं, पण बाकी काही उलगडा न झाल्यामुळे तिचा फोन संपेपर्यंत आम्ही काळजीने चिंब भिजून गेलो. तिनं फोन बंद केल्यावर आम्ही तिच्याकडे बघत तिला काही विचारणार तेवढय़ात तीच पटकन म्हणाली, ‘चिन्मय आलाय अमेरिकेतून काल रात्री. सरप्राइज द्यायचं म्हणून काही न कळवता. ‘अय्या, मग काय केलं त्यानं दाराला कुलूप बघून?’ मी विचारलं. कारण ती घरात नसली की तिचा नवरापण घरात काही करायला नको म्हणून बाहेर पळ काढणाऱ्या नवऱ्यांमधला होता हे मला माहीत होतं. ‘काही नाही  शेजाऱ्यांना उठवलं.’ मत्रीण जरा नाखुशीनेच म्हणाली. ‘हे असलं कसलं सरप्राइज?’ एका मत्रिणीने मत व्यक्त केलं. दुसरी म्हणाली, ‘ही आजची तरुण पिढी ना, आपल्याला गृहीत धरते.’  ‘छे छे उलट मजा असते या अशा सरप्राइज देण्यांत.’ मी अनुभवाचे बोल सांगितले. आणि मग आमच्या बारा जणीत सरप्राइज द्यावं की न द्यावं असं बरोबर सहा विरुद्ध सहा असा सामना सुरू होऊन मस्त वादविवाद सुरू झाले. कॉलेजच्या स्पर्धेची आठवण करून देणारे.. प्रत्येकजण अगदी तावातावाने आपलं मत मांडीत होती.. तहानभूक विसरून.. आणखी किती वेळ ते रंगलं असतं माहीत नाही, पण तिचाच परत फोन वाजला आणि आम्ही भानावर आलो..
पण हे सरप्राइजचं लोण पचायला मात्र जरा कठीण जातं हो. परवा एक मत्रीण सांगत होती, तिच्या सासऱ्यांचा पंच्याहत्तरावा वाढदिवस होता. सासऱ्यांना मधुमेह होता. एरवी सूनबाई गोड काही देत नसल्यामुळे सासरेबुवांनी सुनेकडून वचन घेतलं होतं की वाढदिवसाच्या दिवशी त्यांना प्रचंड आवडत असलेले उकडीचे मोदक संख्येचं बंधन मोडून ती त्यांना करून खायला घालेल. साहजिकच ते त्या पंच्याहत्तरीच्या वाढदविसाची महाआतुरतेने वाट बघत होते. दरम्यान, अमेरिकेतल्या त्यांच्या लाडक्या नातवानं त्यांना वाढदिवसाची भेट म्हणून आजोबा, आजी, आई-बाबा सगळ्यांची ताज हॉटेलमध्ये दुपारच्या जेवणाची मस्त ऑन-लाइन व्यवस्था केली. आजोबांना हे कळल्यावर त्यांच्या डोळ्यांत पाणीच आलं. मत्रिणीला वाटलं त्यांना नातवाच्या प्रेमाने भरून आलंय. पण कसलं काय? ‘आजोबा आता कसले मी मोदक खाणार’ असं सासूबाईंच्या कानात कुजबुजताना तिला ऐकू आलं. त्यांचंपण बरोबर होतं. ‘ताज’मधलं जेवण जेवल्यावर ते घरी येऊन मोदक काय खाणार? आणि नाही जायचं म्हटलं तर सरप्राइज म्हणून ही गिफ्ट देणारा नातू नाराज होणार. नातवाच्या या सरप्राइज प्लानमुळे त्यांचा त्या दिवशीचा मोदक खाण्याचा आनंद हिरावून घेतला होता. आता कोणी म्हणेल सासरेबुवांनी सूनबाईला मोदकांचा बेत रात्री करायला सांगायचा .. पण ‘ताज’मधलं भरगच्च जेवण जेवल्यावर पंच्याहत्तरीच्या आजोबांना रात्री ताकाशिवाय आणखीन काही पिणं शक्य तरी होईल का? आता परत सूनबाईशी मोदकांसाठी नव्याने मांडवली कशी करायची हा गहन प्रश्न मात्र सासरेबुवांना भेडसावयाला लागला.
अशीच दुसरी एक कथा. या प्रकारणात रमा वहिनींचा साठावा वाढदिवस जवळ आला होता. आता रमावहिनी साठीच्या म्हणजे मुलगा-सून तिशी-पस्तीशीतले. आणि एकुलता एक मुलगा. बरं सासू-सुनेचं नातं पिढय़ान् पिढय़ा चालत आलेल्या सासूसुनेच्या नात्यात घट्ट बसणारं.. त्यामुळे रमा वहिनींना सुनेत कधी काही चांगलं दिसायचं नाही. आणि सुनेला वाटायचं मी नोकरी (ती पण बँकेतली वरच्या पोस्टवरची) करून घरातले सगळे सणवार, आलं-गेलं, देणी-घेणी सगळं आनंदाने करते तरी सासूबाईना त्याचं काऽऽही कौतुक म्हणून नाही. पण याच सुनेनं रमाबाईंची साठी वेगळ्या पद्धतीनं करून त्यांना सरप्राइज द्यायचा घाट घातला होता. सोसायटीचा हॉल बुक केला होता. आईच्या झाडून सगळ्या मत्रिणींचे फोन नंबर्स आईच्या नकळत त्यांच्या डायरीतून घेऊन सगळ्यांना पार्टीसाठी परस्पर हॉलमध्ये या म्हणून आग्रहाचं निमंत्रण केले होते. पण रमावहिनी मात्र आपला साठावा, एवढा महत्त्वाचा वाढदिवस असूनसुद्धा मुलगा सून विसरले, त्यांनी साधे अभिनंदनही केले नाही म्हणून सकाळपासून खट्ट झाल्या होत्या. आणि त्याचा वचपा काढायला म्हणून संध्याकाळी मुलगा सून घरी यायच्या आधी घरातून जरा घुश्श्यातच बाहेर निघून गेल्या. मुलाने आणि सुनेने संध्याकाळी घरी येऊन आईला हॉलवर घेऊन जायचं ठरवलं होतं आणि त्याप्रमाणे ते थोडे लवकर घरी आले तर रमा वहिनी घरात नाहीत म्हणून जो काही गोंधळ, गदारोळ झाला की विचारूच नका..
आणखीन एक तर खूपच मजेशीर इस्टोरी.. म्हणजे काय झालं की एका बायकोने तिच्या लाडक्या नवऱ्याची चाळिशी .. म्हणजे चाळीसावा वाढदिवस .. सरप्राइज करायचा ठरवला होता. त्याचा जन्मही नेमका रात्री बारा वाजून एक मिनिटांनी असल्यामुळे त्या दिवशी संध्याकाळी जवळच राहणाऱ्या आईच्या बिल्डिंगच्या गच्चीत तो सरप्राइज वाढदिवस सोहळा करायचा ठरलं. आई-वडिलांना, सासू सासऱ्यांना, जवळच्या नातेवाइकांना, मित्र मत्रिणींना, सगळ्यांकडून सगळ्यांच्या भावना आणि शुभेच्छा लिखित स्वरूपात घेऊन त्याचं एक सुंदर डेकोरेटिव्ह पुस्तक तिनं खूप मेहनत घेऊन बनवलं.. सगळे गच्चीत जमल्यावर ठरल्याप्रमाणे तिच्या मत्रिणीचा मिस्ड कॉल आल्यावर नवऱ्याला घेऊन घरून निघाले.. टेरेसवर यायला ती लिफ्टमध्ये शिरली आणि लिफ्टमध्ये नेमका बिल्डिंगमधला पहिल्या मजल्यावरचा एक छोटा मुलगा आत आला आणि म्हणाला, ‘आंटी ऽऽ आंटी .. आज टेरेसपे अंकलका हॅपी बर्थ डे है ना?’ ती ताबडतोब म्हणाली, ‘नही नही .. कुछ पूजापाठ है रे.’
तोपर्यंत गच्चीत ते पोहोचलेच.. ते दोघं लिफ्टमधून बाहेर आले आणि ठरल्याप्रमाणे एकदम लाइट ऑन झाले आणि सगळ्यांनी ‘सरप्राइज ऽऽ सरप्रइज .. हॅऽऽपी बर्थ डे’ म्हणून एका सुरात ताल धरला.. त्याच्याही डोळ्यात आनंदाने पाणी आलंच .. पुढे बाकी सगळे वाढदिवसाचे सोहळे म्हणजे त्या पुस्तकाचे प्रकाशन, काही मान्यवरांचे म्हणजे त्याच्या आईने, बाबांनी, सासू-सासऱ्यांनी, त्याच्या एका गुरूने संस्कृतमधून व्यक्त केलेल्या भावनांचे अभिवाचन, डान्स, पार्टी, केक आदी सोहळे खूप आनंदात पार पडले .. पण त्या मुलाने जेव्हा ‘आंटी, आज अंकलका हॅपी बर्थ डे है ना?’ असं विचारलं होतं तेव्हा मात्र एक क्षणभर तिला आपला सरप्राइज प्लान फसला असं वाटून ती खूप निराश झाली होती, पण नंतरच्या आनंदोत्सवात तिची ती निराशा विरून गेली म्हणून बरं झालं ना? नाहीतर..
बेबी शॉवर म्हणजे आपल्या मायमराठीतलं डोहाळजेवण हो .. त्याचं सरप्राइज देण्याची अमेरिकेतली पद्धत .. त्याबद्दल तर काही विचारूच नका. गरोदर राहिल्यानंतर दोन-तीन महिन्यांनी मुलगा आहे की मुलगी हे कळल्यावरसुद्धा डोहाळजेवण करायचं यातलं लॉजिक तर मला कधी कळतच नाही. त्या माता होणाऱ्या या स्त्रीला न कळविता तिच्या नवऱ्याचे मित्र-मत्रिणी, तिचे मित्र-मत्रिणी सगळे मिळून एखादा शनिवार ठरवून कोणाच्या तरी घरी हा बेबी शॉवर ऊर्फ डोहाळजेवणाचा बेत ठरवतात .. शक्यतो तिच्या आवडीचा मेनू ठरविण्याबाबत त्यांची आपापसात खूप आधीपासून ‘मेलामेली’ होत असते ..मग तो नवरा आपल्या गर्भवती पत्नीला काहीतरी थाप ठोकून त्या पार्टीच्या ठिकाणी घेऊन जातो .. आणि मग तिथं साग्रसंगीत डोहाळजेवण साजरं होतं. त्या माता होणाऱ्या स्त्रीला आपला सगळा मित्र-मत्रिणीचा परिवार बघून घळाघळा रडायला येतं, कारण आई-बाबांपासून, आपल्या घरच्या जिवलगांपासून सातासमुद्राच्या पलीकडे आपलं कोणीतरी असं आणि इतकं कोडकौतुक करतंय यानं तिचं मन भरून येतं. तिच्या किंवा त्याच्या ऑफिसमधल्या अमेरिकन मित्र-मत्रिणीना आपलं हे कल्चर दाखविण्यासाठी खास आमंत्रण दिलं गेलं असल्यामुळे ते पण आवर्जून उपस्थित राहून तो सोहळा एन्जॉय करतात.. आणि हा सगळा सरप्राइज सोहळा आपल्या इथल्यासारखे फक्त पहिलटकरीण असताना नाही हो.. अगदी दुसऱ्या प्रेग्नन्सीच्या वेळीससुद्धा ..  मजाच आहे ना?
आत्ता, अगदी हा लेख लिहिताना एका मत्रिणीचा फोन आला, की दुसऱ्या एका मत्रिणीची नणंद गेली .. म्हणजे अगदी अचानकच.. सकाळी उठली काय .. आणि नवऱ्याने कपात चहा ओतून तिला हाक मारेपर्यंत ती गेली होती.. मनात आलं,  अरे! हेसुद्धा सरप्राइजच ..  आपल्याला पटो न पटो, आवडो न आवडो, ते स्वीकारावंच लागतं .. कारण तिथे चॉइस करायला आपल्याला दुसरा पर्याय तो देतोच कुठे ना?    
swatilondhe12@gmail.com

Akshaya Tritiya 2024 Gajkesari Rajyog Ma Lakshmi
अक्षय्य तृतीयेला राजयोगांचा मेळा; ‘या’ राशींच्या कुंडलीत लक्ष्मी सोन्याच्या पावलांनी येऊन देणार करोडपती व्हायची संधी
loksatta chaturang The main cause of new and old generation disputes is the mode of spending
सांधा बदलताना: ‘अर्थ’पूर्ण भासे मज हा..
Shukra Gochar In Mesh
२४ एप्रिलपासून ‘या’ राशी होणार प्रचंड श्रीमंत?सुख-समृद्धीचा कारक ग्रह राशी बदल करताच मिळू शकते चांगला पैसा
feast of snowballs juicy fruits and green fodder for animals at Karunashram Orphanage in Wardha
वन्यप्राणी करताहेत उन्हाळा एन्जॉय! बर्फ के गोले, रसभरीत फळे अन हिरवा चारा यांची मेजवानी