राजन गवस

पाण्याशी आयुष्यभर खेळणाऱ्या, भांडणाऱ्या, झुंजणाऱ्या, तडफडणाऱ्या बाईला पाण्यासाठी किती यातायात करावी लागते याची कल्पनाच कोणी करीत नाही. कधी कधी हेच पाणी तिच्या डोळ्यांतून वाहायला लागतं. मैलोन्मैल धावाधाव करून बेलटय़ानं घागर भरणारी बाई आयुष्यच ओतत असते घागरीत. भरली घागर डोक्यावर, कमरेला घेऊन कुंकवातून गळणारं घामाचं पाणी तिचं रक्तच आटवत जात असतं थेंब थेंब. पाणीच असते तिचे आतबाहेर जोडलेले आयुष्य..

Worker dies due to suffocation in sewage tank
वसई : सांडपाण्याच्या टाकीत गुदमरून कामगाराचा मृत्यू
Nashik, Fraud, developing place,
नाशिक : जागा विकसित करण्याच्या बहाण्याने फसवणूक, सात जणांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला
raman bhalla
काश्मीर खोऱ्यातील लढतींची उत्सुकता
Crime against four for polluting Pavana river
पिंपरी : पवना नदी प्रदूषित करणाऱ्या चौघांवर गुन्हा

आत्ता गावं पाण्याच्या शोधात बाहेर पडतील. काही गावांना टँकरने पाणीपुरवठा केला जाईल..

जॅकवेल कोरडी पडली, विहिरींचे तळ उघडे पडले, धरणातल्या पाणी पातळीचे आकडे छापून यायला लागतील, पाणीकपातीचे वेळापत्रक दर १५ दिवसाला बदलले जाईल, काही गावात नळांना १५ दिवसाला पाणी येईल. काही शहरांचे आणि महानगरांचे नळ १२ तास वाहात राहतील, ‘बादलीभर पाण्यासाठी मारामाऱ्या’ असा आकर्षक मजकूर वाचून लोक पाणीटंचाईवर चर्चा करायला लागतील, पाण्याची पातळी कशामुळे खाली गेली, जमिनीची चाळण झाली, अमुक पीकपाणी खूप खातं, तमुक पद्धतीने पाणी वापरा असे सल्ले देणाऱ्यांचे आवाज मोठे व्हायला लागतील. पाण्याच्या देवऋषींच्या अंगात पाण्याची शिवकळा संचारेल, भाकणुकीला सुरुवात होईल, ‘पाणी अडवा पाणी जिरवा’, ‘ठिबक’ प्रत्येकाला सक्तीचे करा, शेतकरी पाण्याची उधळपट्टी करतो, त्याला पाणी साक्षर करा, असे सांगता सांगता कमोडचा फ्लश दाबून क्षणात हजारो लिटर पाणी वाया घालवून पाणी परिषदांचे आयोजन करण्याचा सपाटा सुरू होईल. दरवर्षी नियमित चालणारा हा कार्यक्रम राजरोस सुरू झाल्यावर विहिरीवरच्या, नदीवरच्या मोटारीच्या फ्युजा काढून ऑफिसात जमा केल्या जातील. रात्री १२ ते सकाळी आठ असे उपसा वेळापत्रक गावचावडीवर लावले जाईल आणि वर्दीधारी हातात दंडुके घेऊन गावशिवारात गस्त घालायला सुरुवात करतील. पण पाणीसाक्षरता खरोखरच कोणाची व्हायला हवी, यावर मात्र चकार शब्द कोणी उच्चारणार नाही.

शेतकऱ्यानं रात्रीअपरात्री, सापाकिरडय़ात पिकाला पाणी पाजून मरायचं पण त्यानं पाण्याविषयी, विजेविषयी काहीच नाही बोलायचं. तांडय़ातल्या, झोपडपट्टीतल्या, वाडय़ावस्तीतल्या लोकांनाही पाणी लागतं असं कोणी मानायला तयार आहे असं चित्र मात्र दिसत नाही. पाण्याशी आयुष्यभर खेळणाऱ्या, भांडणाऱ्या, झुंजणाऱ्या, तडफडणाऱ्या बाईला पाण्यासाठी किती यातायात करावी लागते याची कल्पनाच कोणी करीत नाही. धुणीभांडी, खरकटीसरकटी, फरशीबाळोती अशा कशाकशासाठी बाईला पाण्याशी झुंजावं लागतं, तडफडावं लागतं. कधी कधी हेच पाणी तिच्या डोळ्यांतून वाहायला लागतं. मैलोन्मैल धावाधाव करून बेलटय़ानं घागर भरणारी बाई आयुष्यच ओतत असते घागरीत. भरली घागर डोक्यावर, कमरेला घेऊन कुंकवातून गळणारं घामाचं पाणी तिचं रक्तच आटवत जात असतं थेंब थेंब. तरीही बाई पाण्याविषयी तक्रार करत नाही. पाण्याला शिव्याशाप मोजत नाही. पाणीच असते तिचे आतबाहेर जोडलेले आयुष्य. बाई मूकपणे पाण्याशीच बोलते आपले सुखदु:..

शेतीभाती, जंगलझाडीत पशुपक्षी प्राणी राहतात, त्यांना पाणी लागत नाही. पाणी लागतं ते फक्त माणसाला. विजेसाठी पाणी लागते, नगरमहानगरासाठी पाणी लागते ते अत्यंत गरजेचे, मात्र शेतीसाठी पाणी वापरणे म्हणजे फुकाची उधळेगिरी असा समज सर्वदूर पसरलेल्या काळात आमचं पाणी गेलं कुठं? असा प्रश्नही कोणाला पडत नाही. एखादा भाबडेपणाने विचारायलाच लागला तर कोणी असंही म्हणेल की, तुमचं पाणी होतंच कुठं? त्यांचं त्यांच्यापुरतं बरोबरही असेल पण खरं सांगू, झाडंझुडपं, पशुपक्षी प्राणी यांचं पाणी होतंच रानोमाळ. सहज डोंगरात चक्कर टाकली तर डोंगरच असायचा पाझरत. पाझरणाऱ्या खडकात झाडाच्या पानाची पुंगळी लावली की, पाण्याची धार अलगद तोंडात घेता यायची. थोडं चाललं की, एकादा जिवंत झरा चिंगळ्या मासोळ्यांना अंगावर खेळवत लडिवाळपणे वाहात असायचा. गुडघं टेकलं की, पाण्यात तोंड बुडवून हवं तितकं पाणी पोटात भरून घेता यायचं. वाहात्या झऱ्यात पाय पसरून बसलं की, चिंगळ्या मासोळ्या पायाला डसून गुदगुल्या करत जायच्या. पाण्याची लहर अंगभर पसरत जायची आणि पाणीच व्हायचे शरीर. त्याचवेळी एखादी चिमणीही पाण्यात बुडी मारून पंख झाडत निघून जायची. गुरं सोडली की असे झरे गुरांना आणि आम्हालाही थंडगार करून सोडायचे रणरणत्या उन्हात. कितीतरी ओढे प्रत्येक ओढय़ाला नवीन नाव, त्याच्या त्याच्या अंगकाठी, स्वभावाप्रमाणे. कोण असायचा जळकीचा ओढा, कोण पांढऱ्या दगडाचा ओढा, कोण गुंडकलीचा ओढा. ओढय़ात फर्लाग फर्लाग अंतरावर असायचा एखादा डोह. घनगर्द झाडांची काळीशार सावली पांघरून. डोहाच्याही असायच्याच वेगवेगळ्या डोहकथा. हा भुताचा डोह. या डोहात अमावास्येच्या रात्री भुतं आंघोळ करतात, भुतांची ही आंघोळ बघणारेही असायचे चारदोन. अशा डोहांच्या पुढचा असायचा साती आसरांचा डोह. या डोहात साती आसरा राहतात, त्या खोल डोहाच्या खडकाच्या कपारात. साती आसरा माणसाला अडकून टाकतात. गावातल्या माणसांचा जीव घेतल्याची दंतकथा आलेलीच असते चालत. मध्येच एखादा असतो पवनीचा डोह, त्यात मनमुराद पोहायला परवानगी. असे कैक डोह आणि त्यातलं काळंशार पाणी एखादा ओढाही वाहात असायचा बारमाही. त्यात पाणी कसं आणि कोठून यायचं माहीत नाही. पण कधीही गेलं तरी तो वाहात असायचा झुळूझुळू. त्याच्या नितळ पाण्यात काळ्याभोर नितळ्या खेळत असायच्या गोल गोल. रानशिवारात कुठं ना कुठं असायचंच पाणी. शेताकडे जाताना, गुरं राखताना, शाळेला जाताना कधीच नसायची पाण्याची वानवा. दिसेल त्या झऱ्यात, ओढय़ात, तळ्यात, नदीत असायचं पिण्याचं पाणी उपलब्ध. जसं माणसाला तसंच पशुपक्षी प्राण्यालाही. शेतात जुंपलेला नांगर सोडला की, बैल आणि मालक एकत्रच पाणी प्यायचे नदीच्या काठाला. तोंड खळखळून ओंजळीने हवं तितकं पाणी कोणीही घ्यावं पिऊन. पाण्यानं पोट बिघडलं असं ऐकिवातच नव्हतं. माणसाचं आणि पशुपक्षी प्राण्यांचंही. कधीकाळी परगावला जायचं झालं तर दशम्या बांधून घ्यायच्या, विहीर, ओढा दिसला की, सावली शोधायची वेळच यायची नाही. असायचंच एखादे डेरेदार झाड. सावलीची कमान सजवून. तुकडा मोडला. पोट भरून पाणी प्यायलो. दगड उशाला घेऊन क्षणभर डुलकी काढली की, पुढची वाट हलकी व्हायची वाऱ्याच्या झुळकेसारखी. कुठलंच पाणी असायचं नाही बाधित. उलट काही ठिकाणच्या पाण्याची असायची ख्याती औषधीपाणी म्हणून. असा आमच्याकडचा गावव्हळ. निबीड जंगलात बारमाही वाहणारा ओढा या गावव्हळाचं पाणी लोक अजूनही भरून आणून ठेवतात घरात. खास आजारी माणसाला देण्यासाठी. हे पाणी नारळ पाण्यासारखे गोड. कसलाही आजार बरा करणारं. असं त्या पाण्यात काय आहे कुणास ठाऊक? लोकांची श्रद्धा मात्र अजूनही ठाम आहे. हे पाणी आजार बरा करतं.

लोकांचा स्वभाव सांगतानाही पाण्याचा उल्लेख व्हायचा वारंवार. हे पंचगंगेचं पाणी हाय, हार नाही मानायचं. हे कृष्णेचं पाणी हाय, उगाच नाही खवळायचं. असे कितीतरी पाण्यावरून स्वभाव दर्शवणारे वाक्प्रचार. माणसालाही त्यांच्या त्यांच्या प्रदेशातल्या पाण्याचा भरपूर अभिमान. गावात असतोच एखादा बारा गावचं पाणी प्यायलेला. तसंच पिकाचं, फळाचं, भाजीचंही नातं असतं पाण्याशी. कृष्णेकाठची वांगी, जळगावची वांगी, अमक्या गावची केळी, चवच न्यारी. पाण्यानं असं व्यापून टाकलेलं होतं जगणं. पाणीच असायची ओळख. जगण्याची. मरण्याची. प्राण्यांचेही ठरलेले असायचे डोह नित्यनियमानं पाणी पिण्यासाठी. पाखरांनीही शोधून ठेवलेली असायची डबकी अंघोळ पाण्यासाठी. ज्याचं त्याचं हक्काचं होतं पाणी.

हे पाणी पळवलं कुणी, केव्हा आणि कसं? झरे झाले दिकोपाल, ओढे गिळून टाकले. डोह तर न्हाईनपत झाले. साती आसरा, भूतंखेतं कुठं गेली कुणास ठाऊक? डोंगराला पावसाळ्यात असतो पाझर. चार आठ दिवस पावसानं ओढ दिली की, पांढरे वरंगळ दिसतात खडकावर. कुठलाच झरा, कुठलाच ओढा आता वाहाता राहत नाही महिनादोन महिने. नदीचं तर रूपच पालटून गेलं. नदीची आपण करून टाकली पाणंद. रानात जावं तर सोबत असावी लागते पाण्यानं भरलेली कळशी. शाळेला जावं तर दप्तरात येऊन बसते पाण्याची बाटली. दूरच्या गावाला जावं तर घ्यावी लागते विकत पाण्याची बाटली. रानशिवारात दिसलंच कुठं कुठं पाणी तर पिण्याची हिंमतच नाही होत. कसे कधी कुणी नासवलं हे पाणी? नदी पाण्याने भरलेली, पण पिण्यासाठी एकही थेंब नसतो उपलब्ध. मासेही मरून पडतात काठावर. फक्त केंदळानं भरलेली असते नदी. पाण्याला पाणी म्हणता येऊ नये असे हे पाण्याचे बदललेले रूप. ओढय़ात, विहिरीत असते पाणी, पण पिण्याची हिंमतच करत नाही कोणी. इतके नासवले गेले पाणी. कोणी म्हणते कारखानदारीने नासवले पाणी, कोणी म्हणते, रासायनिक खते आणि कीटकनाशकांनी नासवले पाणी. महानगर, नगर, निमशहर यांच्या सांडपाण्यानी नासवलं पाणी. कोणाचं खरं आणि कोणाचं खोटं ज्याचं त्यालाच माहीत. पैसे असणारे विकत आणतात बॅरेलच्या बॅरेल मिनरल वॉटर. कोणाच्या घरात असतो मिनरल पाण्यांच्या बाटल्यांचा खच. पण गोरगरीब सामान्याला असतो दूषित पाण्याचाच उपलब्ध घोट. मग येते गावात काविळीची साथ. गावच्या गाव पडतं पिवळं धमक. दवाखाने खचाखच भरतात. वाऱ्यासारख्या पसरतात अफवा. नेमले जातात आयोग. पाणी शुद्धीकरणाचे केले जातात प्रकल्प. उद्या कदाचित प्रत्येक गावात पाणी शुद्ध करणारे उभारले जातील नवे नवे प्रकल्प. पण कोणीच विचारणार नाही पाणी नासवलं कुणी आणि कसं? माणसं माणसाला विचारूच शकणार नाही प्रश्न. कारण प्रत्येक जणच आहे यात सहभागी.

उद्या माणसं काहीही करून मिळवतील, साठवतील शुद्ध पाणी. पण जनावरांनी, पशुपक्ष्यांनी शोधायचं कुठं शुद्ध पाणी? ते बिचारे मुके प्राणी विचारणारच नाहीत आपलं चोरलं, नासवलं कुणी पाणी?

chaturang@expressindia.com