राजन गवस

मला बघताच ‘त्याची’ आई धाय मोकलून रडायला लागली. – ‘माझं नशीब फुटकं निघालं. राक्षस आला पोटाला. रात्री-अपरात्री पिऊन येतंय. लाथाबुक्यांनी तुडीवतंय. कुठं केलंतं पाप कुणास ठाऊक.’’ डोकं एकदम चक्रावलं. गावातल्या जाणत्यांचे काळजीचे आवाज-गावाला नको ते वळण लागलं. हा समाज, तो समाज अशी कधी भानगड डोक्यातच आली नाही. प्रत्येकजण प्रत्येकाच्या सुख-दु:खाला धावायचा. आता हे समाजाचं बी उगवलं आणि माणसामाणसांत अंतरच वाढत गेलं. गावचा बदलत चाललेला चेहरा धास्तावून टाकणारा झालाय..

Washim, manuscript Writer, Stabbed, Death, Karanja, Tehsil Office,
दस्तलेखकाच्या मानेवर चाकूने हल्ला, भर तहसील कार्यालय परिसरातच…
Drug trafficker Shirazi case
अमली पदार्थ तस्कर शिराझी प्रकरण : साडेपाच कोटींच्या मालमत्तेवर ईडीची टाच
loksatta analysis report on status of leopards in india
विश्लेषण : बिबटे वाढलेत… शेतात, गावच्या वेशीवर आणि सिमेंटच्या जंगलातही!
shri krushna dwarka
श्रीकृष्णाची द्वारका खरंच पाण्याखाली आहे का? दंतकथा आणि पुरावे काय सांगतात? वाचा सविस्तर…

खेडय़ापाडय़ाला, गावगाडय़ाला आता बाहेरून येऊन लुटण्याची गरजच नाही. गावगाडय़ातच प्रत्येक समाजाला लुटणारा त्यांच्या त्यांच्या समाजातील एक एक म्होरक्या तयार झाला आहे. दुसरा कोणी लुटतो म्हणून कोणाकडे बोट दाखविण्याची गरजच उरलेली नाही. मोठा नेता, छोटा नेता, नेत्यांचे कार्यकत्रे अशी साखळी आपापल्या समाजाला धू धू धुते आहे. आपण धुतले जातोय हे कळूनही प्रत्येकाला मूग गिळून गप्प बसावे लागते.

आता माझ्यासमोरील, माझ्याच गावातील हे एक उदाहरण बघा. अमक्या-तमक्या समाजाचे नेते रस्त्यात भेटले. चालता चालताच म्हणाले, ‘‘खूप घाईत आहे. समाजाची मीटिंग आहे.’’ आणि एकदम चालते झाले. त्यांच्या पाठमोऱ्या आकृतीकडं मी पाहातच थांबलो. कालपरवा गल्लीत उंडगं फिरणारं पोरगं. गावात गेलं की त्याची आई प्रत्येक रविवारी बकोटीला धरून त्याला आणायची. मला म्हणायची, ‘‘चार गोष्टी सांग याला. चांगलं शिकला तर घराचं पांग फिटतील. बाप राबून राबून मरतोय. आणि हे भिकनिशी कसलं ते शाळंचं तोंड बघायला तयार न्हाई. मास्तरबी मिनत्या करून थकलं. तुझं तरी ऐकतोय का बघ.’’ त्याच्या आईचे डोळे पाण्यानं डबडबायचं. बिचारी कळवळून बोलायची. तिच्या डोळ्यांतील स्वप्नं मरताना बघून आतल्या आत कालवल्यासारखं व्हायचं. तिच्या समाधानासाठी त्याच्याबरोबर काय काय बोलायचो. ‘शिकलास तर चांगलं व्हईल, अभ्यास करत जा, चांगल्याची संगत धर, तुझ्या जन्माला तू शहाणा होशील, आईबापाची गरिबी संपल.’ असं माझ्या कुवतीप्रमाणं काय काय सांगायचो. पोरगं ढीम्म. ऐकून न ऐकल्यासारखं करायचं. निर्वकिार चेहऱ्यानं उठून जायचं. चेहऱ्यावर भाव असा की, लागलाय शहाणा तत्त्वज्ञान शिकवायला. त्याचे डोळे निष्ठुर झाल्यासारखं उगाचच मला वाटायचं. त्याची आई मात्र माझ्या बोलण्याचा त्याच्यावर परिणाम होणार आणि आपला मुलगा सुधारणार, अशा आशावादी चेहऱ्यानं घरातून बाहेर पाऊल टाकायची. पुन्हा महिन्यानंतर तोच प्रसंग. तिच वाक्यं, तोच आशावाद. माझे त्याला समजावण्याचे तेच प्रयत्न. असं कैक दिवस चाललं. नंतर त्याची आई आणि तो यायचं बंद झालं. जवळ जवळ विस्मरणातच गेलं सारं. कधी तरी दिसायचा तो. समोर यायचा नाही. बगल मारून दुसरा रस्ता धरायचा. ज्याचं त्याचं नशीब म्हणून मीही त्याला विस्मरणाच्या अडगळीत ढकलून टाकलं. त्याच्या आईनंही त्याची आशा सोडली. ती घर यायची पण आपल्या मुलाबाबत चकार शब्दही काढायची नाही. उगाचच आपल्या नशिबाला दोष देत बरंच काय काय बडबडायची. मी समजुतीखातर काही बोललो तर, कोणताच प्रतिसाद न देता खाल मान घालून बसायची. तिच्या डोळ्यांची खोल विहीर दु:खाची गाठोडी तळाला सांभाळत फक्त ढवळून निघायची.

एकदा नोकरीच्या गावी तो दत्त म्हणून समोर आला. सगळा पेहरावच बदललेला. स्वच्छ इस्त्रीचा झिरझिरीत शर्ट. कपाळावर कसलातरी भलामोठा नाम ओढलेला. पायात कोल्हापुरी चप्पल. सोबत तिघे-चौघे त्याच्यासारखेच रुबाबदार. आल्या आल्या त्यानं अदबीनं नमस्कार घातला. अंग चोरून मी त्याला बसायला खुर्ची सरकवली. त्याच्यासोबतचे बिनधास्त टेकले. कोऱ्या करकरीत चेहऱ्यानं त्या साऱ्यांना मी न्याहाळत बसलो. कोणीच काही बोलत नव्हतं. त्याच्या ध्यानात आलं, यांनी आपल्याला ओळखलेलंच दिसत नाही. तरी खात्री करावी म्हणून तो म्हणाला, ‘‘ओळखलं का न्हाई?’’ आवाजात जरब. बोलण्यात बिनधास्तपणा. मी कोऱ्या डोळ्यानं त्याच्याकडं पाहातच बसलो. तर त्याच्यासोबत आलेल्या एकटय़ानं त्याची एकदम साग्रसंगीत ओळख करून दिली. हे अमक्या-तमक्या समाजाचे नेते.

आणि मी उडालोच. आमच्या गावातील त्याच्या समाजाचे लोक मला नेहमीचेच. माहितीचे. गोरगरीब समाज. मरमर राबणारा. आपली मुलं शिकावीत म्हणून वाटेल ते दु:ख सोसणारा. अशा समाजाला नेत्याची काय गरज? डोळं फाडून त्याच्याकडं फक्त पाहातच राहिलो. त्यालाही काय बोलावं समजत नव्हतं. पण विषयाला सुरुवात तर केली पाहिजे म्हणून त्यानं सुरू केलं, गावात आमच्या समाजाचा मेळावा आहे. बराच खर्च आहे. तुम्ही थोडी मदत करावी म्हणून आलोय. मग तो सांगाय लागला, ‘‘अमुक नेते, तमुक विचारवंत, तमक्या मंत्र्यांचे पी.ए. मेळाव्याला येणार आहेत. साधारण दोन-तीन हजार लोक जमतील. त्यांचे चहापाणी, एकवेळचं जेवण मंडपिबडप असं सगळं धरलं तर लाखभर रुपये खर्च येईल. या निमित्तानं गावातलं नोकरदार मदत करताहेत. म्हटलं, तुमच्याकडूनही काय तरी मदत व्हावी.’’ क्षणभर चक्रावलोच. चड्डीची नाडी बांधता न येणारा हा पोरगा. एकदम समाजाचा नेताच? भुवई उंचावली. हे त्याच्या चाणाक्ष डोळ्यांनी हेरलं. म्हणाला, ‘‘समाजाचं काम कोणीतरी केलं पाहिजे. कैक वर्षे आमचा समाज हालअपेष्टा सोसत आला. फक्त राबराब राबत आला. त्यांनी कधी सुख पाहिलं नाही. दु:ख सांडत जगत आला. अशा समाजासाठी कुणातरी पुढं झालं पहिजे. सगळ्यांनीच गाव सोडून, नोकऱ्या करून कसं चालेल?’’ तो न थांबता आपल्या समाजाच्या समस्या, समाजाची मानसिकता असलं बरंच काय काय सांगत होता.

आतल्या आत माझी घालमेल वाढायला सुरुवात झाली होती. त्याच्यातले सगळे बदल मला भयचकित करत होते. तो न थांबता अखंड बोलत होता. त्याच्या सोबत असलेले त्याची भलावण करत होते. त्याला थांबवतच मी त्याच्यासमोर दोनशे रुपये ठेवले. तर तो आश्चर्यचकित होऊन माझ्याकडं बघायला लागला. त्यानं त्या नोटा तशाच माझ्याकडं सरकवल्या. म्हणाला, ‘‘आम्ही हजारपासूनची पुढची देणगी घेतो. किरकोळ देणारे भरलेत. पण आम्ही स्वीकारत नाही.’’ त्या नोटा तशाच उचलून मी खिशात घातल्या. म्हटलं, ‘‘पुढच्या वेळेला बघू.’’ त्याची बोलती बंद झाली. झटका आल्यासारखा एकदम उठला आणि रस्त्याला लागला. त्याचा चेहरा संतापलेला होता. तो तरातरा गाडीपर्यंत गेला. सोबतच्या माणसानं त्याच्या गाडीचा दरवाजा उघडला. गाडी सुरू झाली. न बघताच त्याची गाडी सुसाट सुटली. पाहातच राहिलो. त्याचं बदललेलं हे सारं रूप मला आश्चर्यचकित करत होतं. मनात आलं, बरं झालं. किमान गोरगरीब समाजाला त्यांच्या त्यांच्या समस्या समजून घेणारा, त्यांच्यासाठी विचार करणारा नेता मिळाला. त्या समाजातील मुलं शिकत जातील. सगळं रूप पालटेल आणि हा समाज नव्याने उभारी घेईल. हा मुलगा शिकला नाही तरी करतो ते काम चांगलंच आहे.

मध्येच गावाकडं जायला लागलं. कुतूहल म्हणून त्याची चौकशी केली. तर गावात तो म्हणजे महत्त्वाचा माणूस. त्याच्या समाजाची दोन-तीनशे मतं त्याच्या हक्काची. समाजात सतत काही ना काही करून सगळ्यांना त्यानं बांधून ठेवलं होतं. तालुक्याच्या नेत्यांत त्याची ऊठबस होती. जिल्ह्य़ाच्या नेत्यानं त्याचं चलनवलन हेरून त्याला एक खास गाडी देऊ केली होती. त्याबरोबरच महिन्याला दोन हजार रुपये घरपोच. फक्त त्यानं करायचं इतकंच की, नेत्याची सभा असेल तिथं गावातली पंधरा-वीस पोरं गाडीत भरायची. सभेच्या ठिकाणी हजेरी लावायची. सभा संपली की नेत्याच्या व्यवस्थेकडून सगळ्यांच्या जेवण्याखाण्याचे पैसे घेऊन रस्त्याला लागायचे. गावात नेता आला की त्याची उठबस सांभाळायची. समाजात, गावात कुठलाही तंटाबखेडा झाला की हा हजर. पोलीस ठाण्यात वट जमवलेली. तो ज्या पार्टीची बाजू घेईल, ते लोक बिनघोर. त्यामुळं प्रत्येकजणच गावात त्याला घाबरायला लागला होता.

त्यानं काही कार्यक्रम काढला की त्याला गाठून वर्गणी द्यायची. एखाद्यानं विरोध केलाच तर त्याचा ध्यानात ठेवून काटा काढायचा. बघता बघता पंचक्रोशीतल्या सगळ्या गावात त्याचं नाव पोहचलं होतं. गावातली उंडगी पोरं त्याच्या नावाचे टीशर्ट घालून बिनधास्त चोऱ्यामाऱ्या करत फिरू लागली. जुनीजाणती माणसं एकूण त्याच्या वागण्यानंच चक्रावली होती. त्याच्या या गावातल्या वावरण्यानं गावात प्रत्येक समाजाचा एक एक नवीन नेता उगवायला सुरुवात झाली. गावात प्रत्येक समाजाचा एक एक बोर्ड त्यांच्या त्यांच्या गल्लीत झळकत गेला. गावात, गावाबाहेर फक्त समाजाचे बोर्ड आणि रस्त्याला प्रत्येक समाजाच्या नेत्याचे डिजिटल. त्यावर त्यांच्या त्यांच्या समाजाचे महापुरुष आणि बऱ्याच गावठी चेहऱ्यांची गर्दी. गावात शिरणाऱ्याला या गावात किती समाजाचे लोक राहतात याची आपसूकच माहिती मिळायची आणि त्यांच्या सामान्य ज्ञानात भर पडायची. गावातल्या जाणत्यांचे काळजीचे आवाज. गावाला नको ते वळण लागलं. असं कधी गावात होत नव्हतं. हा समाज, तो समाज अशी कधी भानगड डोक्यातच आली नाही. प्रत्येकजण प्रत्येकाच्या सुख-दु:खाला धावायचा. आता हे समाजाचं बी उगवलं आणि माणसामाणसांत अंतरच वाढत गेलं. म्हटलं, नको ते कसलं. चांगलंच आहे की. प्रत्येक समाजाला त्यांचा त्यांचा म्होरक्या मिळाला. गावात नवं नेतृत्व तयार व्हायला लागलं. उलट पोरं गावाचं भलं करतील. तर उसळून प्रत्येकजण सांगायला लागला, कसलं भलं? हायस्कुलात जाणारी पोरं आता दिवसाचंच ‘फुल्ल’ होऊन फिराय लागल्यात. कुणाच्या विहिरीवरची मोटार ऱ्हायला तयार नाही की कुणाच्या परडय़ात वाळवाण ऱ्हायला तयार नाही. सगळ्या चोऱ्यामाऱ्या. यांच्या चनीला आईबापाची मिळकत पुरायला तयार नाही. कुणाला काय म्हटलं तर पंधरावीस मिळून येऊन घरावर हल्ला करायला मागंपुढं बघत न्हाईत. घरादाराची वळख न्हाई. पोलिसात जावं तर पोलीस दटावून लावत्यात वाटंला. गावात टोळ्या तयार झाल्या टोळ्या.

गावचा बदलत चाललेला चेहरा धास्तावून टाकणारा. पण मनात आलं, असेना का निदान त्याचं घर तर सुखाला लागलं. बिचाऱ्याची आई दुसऱ्याच्यात राबून खंगली. तिला आता तरी चार दिवस चांगले आले. होताच वेळ. म्हटलं, त्याच्या आईशी बोलू. त्याचं घर गाठलं. तर ती मला बघताच धाय मोकलून रडायला लागली. तिचं रडता रडता एकच- ‘माझं नशीब फुटकं निघालं.’ तिला शांत केलं. तर म्हणाली, ‘‘काय सांगायचं. राक्षस आला पोटाला. रात्री-अपरात्री पिऊन येतंय. लाथाबुक्यांनी तुडीवतंय. कुठं केलंतं पाप कुणास ठाऊक.’’ डोकं एकदम चक्रावलं. घरात आलो तर भाऊ सांगाय लागला. आता कुठल्या समाजाला, कुठल्या घराला दुसऱ्या कुणी लुबाडायची गरज नाही. त्यांच्या त्यांच्यातच लुटारू तयार झालेत. आज याची वर्गणी, उद्या त्याची. आज ही निवडणूक, उद्या ती. मानंवर सुरी मात्र गरिबाच्या. तालुक्याचा, जिल्ह्य़ाचा पुढारी त्यांचाच हात धरून घुसतो गावात. दाद मागायची कुणाकडं आणि आशेनं बघायचं कुणाकडं?

थोडय़ाफार फरकानं सगळ्याच गावांचं वर्तमान सारखंच. गर्भगळीत झालेला सामान्य समाजही सगळीकडं सारखाच. खेडं धुमसतंय. याला कुणी आधुनिकता म्हणेल. कोणी संक्रमण काळ असं नाव देईल. कोणी गोंडस तत्त्वज्ञानात याचंही समर्थन करेल. पण उद्याचं गाव स्फोटाच्या उंबरठय़ावर आहे एवढं मात्र निश्चित.

rajan.gavas@gmail.com

chaturang@expressindia.com