24 November 2020

News Flash

सुत्तडगुत्तड : गुंतवळ

विचार करता करता सामान्यातला सामान्यही कधीतरी मारतो चपराक. आपण हादरून जातो आतल्याआत.

(संग्रहित छायाचित्र)

राजन गवस

भारतासारख्या जात्यांध समाजात मुलींच्या शिक्षणाबाबत स्वतंत्र शिक्षणशास्त्र विकसित केले पाहिजे असे कुणालाच का वाटत नाही? भारतीय मुलींचे मानसशास्त्र, भारतीय मुलींच्या पालकांचे मानसशास्त्र शोधून सिद्ध केल्याशिवाय मुलींचे शिक्षण या देशात कसे काय रुजविले जाईल? मुलींना वाढवताना पालकांचा दृष्टिकोन कसा असायला हवा, हा प्रश्न आज ऐरणीवर यायला हवा.

मी ज्या गावात राहतो ते गाव बघता बघता उभं आडवं वाढत चाललंय. १९८० मध्ये जेव्हा मी या गावात आलो तेव्हा सगळ्या गावाची पोराबाळासह ओळख व्हायला फक्त एक महिना लागला होता. महिन्यानंतर सगळेच ओळखीचे. रस्त्यातून फिरताना, बाजारातून चालताना प्रत्येक जण ओळखीचाच असायचा. त्यामुळे प्रत्येकाशी संवाद. खासगी काहीच नाही. एक मिनिटात सगळी बातमी गावभर. त्यामुळे मास्तर नावाच्या प्राण्याला भलतंच जपून राहायला लागायचं. किंचित चूकसुद्धा त्याला भोवायची. इज्जत खल्लास!

अशा गावात ‘बीअरची सहा कॅन’सारखा कथासंग्रह लिहिणारा लेखकही वास्तव्यास होता. त्याबाबत अजूनही माझ्या मनात प्रश्न आहेच. त्यांना बीअर कोण आणून देत होतं? ‘तुझं आहे तुजपाशी’ हे नाटक पु.लं.नी याच गावात लिहिलं. तर सांगायचा मुद्दा असा की, असं गाव वाढताना, बदलताना मी बघितलंय. या गावात जातीच्या कोडग्या अहंकारात जगणारे कैक. प्रत्येकाला आपल्या कुळीचा इतिहास तोंडपाठ. कोणी विचारलं, ‘तुमचं कर्तृत्व काय?’ तर शून्य. तरीही आपल्या भूतकाळाचं ओझं डोक्यात घेऊन जगणाऱ्यांची संख्या अमाप. पण अशा लोकात जगताना, वावरताना आपण वाढत विस्तारत जातो. हे मात्र निश्चित! कधी ते आपल्या मेंदूचा भुगा करतात. कधी जगण्याचा अपरिमित आनंद देतात. कधी ओरबडतात, कधी मायेनं थोपटतातही. अशा लोकांत असल्यानं आपण आपलं जिवंतपण टिकवू शकतो. ते कधीकधी कळीचे मुद्देच उपस्थित करतात. आणि आपण हतबल होऊन जातो. विचार करता करता सामान्यातला सामान्यही कधीतरी मारतो चपराक. आपण हादरून जातो आतल्याआत.

अशा या गावात परवा मी संध्याकाळी दुचाकीवरून चाललो होतो. समोर बऱ्यापैकी गर्दी होती. एवढय़ात पाठीमागून आवाज आला, ‘‘ओ ‘मुक्त लेक’वाले, थांबा थांबा..’’ आवाज ओळखीचा वाटत होता. तो आवाज मलाच साद घालतोय याची खात्री पटल्यामुळे थांबलो. तर ते परिचित गृहस्थ म्हणाले, ‘‘परवाची ती अमुक तमुक पेपरातली बातमी वाचली का न्हाई?’’ मला काही संदर्भच लागायला तयार नव्हता. फक्त हसलो. तर म्हणाले, ‘‘तुम्ही नसलीच वाचणार. पण वाचा.’’ म्हटलं, ‘‘काय बातमी तरी सांगा बापू.’’ मी त्यांना ‘बापू’ म्हणतो. गावात सगळीकडे ते ‘बापू’ नावानंच ओळखले जातात. त्यांनी मागच्याच महिन्यात असंच अडवून म्हटलं होतं, ‘‘काय राव तुम्ही ‘सुत्तडगुत्तड’ लिहायला लागला. आम्हाला पेपर मिळणं बंद झाला.’’ तेव्हा सुखावलो होतो. पण आताच्या त्यांच्या आवाजानं बावचळलो.

तर बापू काहीच बोलले नाहीत. त्यांनी खिशातलं पेपरचं कात्रण काढलं, माझ्या हातात दिलं. ‘मुली पळून जाण्याचे प्रकार रोखणार.’ अमुक अमुक ठिकाणच्या पोलीस पाटलाची मोहीम. तमुक पोलीस अधिकारी उपस्थित. इत्यादी इत्यादी. बातमी नीट वाचून म्हटलं, ‘‘बापू, हेच म्हणतोय मी. मुली घरात नीट वाढल्या, त्यांचं संगोपन केलं तर अशा लहान वयात त्या कशाला पळून जातील? त्या नीट शिकतील, चांगलं करिअर घडवतील. आपण मुली नीट वाढवत नाही. त्यांचं योग्य संगोपन करत नाही. म्हणून इतक्या कोवळ्या वयात त्या नको ते पाऊल उचलतात आणि आपलं आयुष्य बरबाद करून घेतात.’’ बापू क्षणभर थांबले. स्वत:वरच चिडले. नंतर म्हणाले, ‘‘मास्तर, येडं हाय तुम्ही. आमच्या आता शंभर पिढय़ा झाल्या. आमच्या भावकीत, पावण्यापत कदीच एकसुदिक पोरगी पळून गेली नव्हती. त्या ऊठ म्हटलं की उठायच्या, बस म्हटलं की बसायच्या. दिल्या घरातनं पोरीचं मढं भाईर यायचं. पर सून कदी कुणाच्या नदरं पडायची न्हाई. घरातच पोरीचा जलम. तिथंच तिचं आयुष्य. लगीन झालं तरी दोन-दोन पोरं व्हईपर्यंत नवऱ्याशी बोलतापन यायचं न्हाई त्यास्नी.’’ म्हटलं, ‘‘बापू, हे बरोबर हाय काय? दोन पोरं हुईस्तोवर नवऱ्याशी बोलायचंपन न्हाई म्हनजे? त्ये काय तुमच्या घरातलं जनावर हाय काय?’’ बापू लगेच उत्तरले, ‘‘तसं समजा. पन घराची इज्जत राह्य़ाची का न्हाई शाबूत? आता हे काय हो? पोरी आठवी-नववीतच पळून चालल्या. कश्याला शिकवायचं यांना?’’ त्यांचा प्रश्न.

मग मी स्वत:च विचारात पडलो. या माणसाला कसं समजून सांगायचं? बाईला मन असतं. ती पण माणूस आहे. तिला पण स्वप्नं पडतात. तिच्यापण आकांक्षा असतात. तरीपण रेटून म्हटलं, ‘‘बापू असं कसं? जरा पोरीचा माणूस म्हणून इच्यार करा की. तिला पण मन असतं.’’ बापू एकदम खवळले. म्हणाले, ‘‘कसलं मन? नकळत्या वयात शेण खायचं? काय सांगतो मास्तर, अशा पळून गेलेल्या पोरी नंतर परत येऊन आईबापाच्या छातीवरच दगड म्हणून बसत्यात. या वयात त्यास्नी कळतंय तरी काय? मन म्हनजे काय? शरीर म्हनजे काय? ओढ म्हनजे काय? ती कशासाठी? यातलं काय तरी कळतंय काय आठवीच्या वर्गात? ह्य़ो सगळा ह्य़ा मोबाइलनं, टीव्हीनं घोळ घातलाय जगण्यात. पयल्यांदा हे टीव्ही, मोबाइल बंद कराया पायजेत. त्याशिवाय ह्य़ा पोरी पळून जायच्या बंद व्हईत न्हाईत मास्तर.’’ बापूचा संताप वाढतच चाललेला. म्हटलं, ‘‘बापू, मोबाइल पोरींना कोण घेऊन देतो? टीव्ही घरात आणतं कोण?’’ बापू एकदम भानावर. म्हणाला, ‘‘आपूनच आनतो की मास्तर. पण त्ये का वाईट व्हावं म्हणून आणतो? पोरगी शाळेत, गावात जाते. तिची खबरबात मिळावी, अडीअडचणीला तिला लगेच संपर्क साधता यावा म्हणून आईबाप देतात मोबाइल. काळजी म्हणून. ते काय पळून जायला मोबाइल देत्यात?’’ बापूचा प्रतिप्रश्न. मग जरा सावरून म्हटलं, ‘‘बापू तुमचं एकदम बरोबर. पोरीची काळजी म्हणून मोबाइल घेऊन दिला. पण त्याचा वापर कसा करावा? किती करावा? कधी करावा? हे कधी सांगितलं का आपण?’’ बापूचा चेहरा आक्रसला. त्याला प्रश्न अडचणीचा होता. पण त्यानं पर्याय काढलाच. म्हणाला, ‘‘त्ये काय सांगाय लागतंय? ज्येचं त्येनं शिकायचं. नको शिकायला?’’ त्यांचा प्रतिप्रश्न.

या चर्चेचा शेवट मला माहीत होता म्हणून त्याच्याशी काहीच न बोलता थंड थांबलो. बापू पुन्हा चिडून म्हणाला, ‘‘हे शिक्षणच वाईट हाय. पोरींच्या शाळा बंद केल्या पाहिजेत. पहिलं बरं होतं. पोरगी वयात यायच्या आधीच भालगडून रिकामी व्हायचे आईबाप. या शाळा आल्या, मुली शिकवायला लागलो आणि सगळं बिघडलं. बाईला असू दे, पोरीला असू दे. ज्या त्या जागीच ठेवायला पाहिजे. जरा मोकळीक दिली की, त्या डोक्यावर मिऱ्या वाटणारच. हे ठरलेलं. पायातली वहाण पायातच बरी.’’ बापूचं स्वगत चालू झालं. आणि मी एकदम हादरलो. बापूसारखा सगळ्या खेडय़ापाडय़ात मुलीकडं, बाईकडं बघण्याचा दृष्टिकोन सारखाच. कोणीही मुलीला माणूस मानायला तयार नसतो. ती म्हणजे घरची इज्जत. आणि घरची इज्जत फार महत्त्वाची. बाईनं जात सांभाळायची, बाईनंच धर्म सांभाळायचा. बाईनंच करायचे सगळे आपल्या घरादाराच्या इज्जतीचे बंदोबस्त, अशी ठाम समजूत असणाऱ्या समूहाला कसं सांगणार बाईचं माणूसपण?

नकळत्या वयात मुली पळून जाताहेत. लग्न करत आहेत. शारीरिक आकर्षणामुळं त्यांना फसवलं जात आहे. यातून अनेक गुंते तयार होत आहेत. हे खरं असलं तरी शिक्षणाबाबतचा नकारार्थी दृष्टिकोन या सगळ्यातून निर्माण होत असेल तर करायचं काय? पालक म्हणून आपण कमी पडत आहोत. मुलींच्या वाढ-विकासाबाबत पालक गंभीर नाहीत. शाळा गंभीर नाहीत. भारतासारख्या जात्यांध समाजात मुलींच्या शिक्षणाबाबत स्वतंत्र शिक्षणशास्त्र विकसित केले पाहिजे असे कुणालाच का वाटत नाही? भारतीय मुलींचे मानसशास्त्र, भारतीय मुलींच्या पालकांचे मानसशास्त्र शोधून सिद्ध केल्याशिवाय मुलींचे शिक्षण या देशात कसे काय रुजविले जाईल? मुलींना वाढवण्यासाठी शिक्षण उपयोगी कसे काय

होऊ शकेल? भारतीय मुलांना आणि मुलींना एकाच तराजूत तोलता येत नाही. तसेच दोघांना एकाच शिक्षण प्रणालीत कोंबता येत नाही. हे आमच्या शिक्षणतज्ज्ञांना सांगणार कोण? भारतीय मुलींची शिक्षणव्यवस्था स्वतंत्रपणे विकसित केली पाहिजे असे कोणाही शिक्षणतज्ज्ञाला का बरे वाटले नसावे? सगळे पाश्चात्त्य शिक्षणशास्त्राच्या सिद्धांतांना चाटून चाटूगिरीतच धन्यता मानत राहिले. त्यांना भारतीय समाज, भारतातील जातव्यवस्था, भारतातील स्त्री-पुरुष व्यवस्था, त्यातील पुरुषसत्ताक दृष्टिकोन विचारात घेतले पाहिजेत असे का बरे वाटले नसेल? की असे सर्व ध्यानात येऊनही त्यांना पुरुषसत्ताक व्यवस्थेने गुलाम बनवले असेल?

भारतातील मुलगी वाढत असताना ती जातीच्या, धर्माच्या, पोटजातीच्या दडपणाखाली वाढत असते. यात पुन्हा रीतिरिवाज, प्रथापरंपरा, व्रतवैकल्ये, सणसमारंभ, घरादाराचे नियम, भावकीचे काच, नात्यागोत्याचे आवळलेले बंदिस्त फास तिच्याभोवतीच असतात. तीच रीतिरिवाजाची, धर्माची, संस्कृतीची तारणहार. त्यामुळे सगळ्या बेडय़ा तिच्याच पायात. अशा जातीच्या उतरंडीने आणि अमानुष प्रथा परंपरांच्या ओझ्याने वाकलेल्या मुलींचे शिक्षण सर्वसामान्य शिक्षण पद्धतीत कसे काय होऊ शकेल? तिला अक्षरं शिकवता येतील, पदव्या देता येतील, उच्च पदाच्या नोकऱ्याही दिल्या जातील. पण माणूसपण हे शिक्षण देऊ शकेल काय? असं बरंच काय काय चालू राहिलं.

बापूनं दिलेलं कात्रण नीट वाचून पाहिलं. शहरातल्या एका उपनगरात सगळे ग्रामस्थ जमा करून एक नवखा पोलीस अधिकारी वरिष्ठांच्या आदेशानुसार त्या गावातल्या पोलीसपाटलासोबत मार्गदर्शन करत होता. ते त्या तालुक्यात गावोगाव बठका घेणार असेही त्या बातमीत म्हटले होते. हे पोलीस अधिकारी, तो पोलीस पाटील त्या गावातल्या पालकांना सांगणार काय? मुली घरात वाढवताना कोणती काळजी घ्यावी, त्यांच्याशी संवाद कसा साधावा? घरातला, दारातला, गल्लीतला, गावातला पुरुष कसा समजून घ्यावा हे सांगता येईल? भविष्य म्हणजे काय? आयुष्य म्हणजे काय? बाईच्या आयुष्यातील गुंतवळ कशी असते हे सगळं पुरुषसत्ताक व्यवस्थेतील म्होरके सांगतील काय? तसूभरही शक्यता नाही. ते तिसरेच धडे देतील. यामुळं खेडय़ापाडय़ातल्या शिकणाऱ्या पोरी कोलमडून पडतील. मुलींना वाढवताना पालकांचा दृष्टिकोन कसा असायला हवा, हा प्रश्न आज ऐरणीवर यायला हवा.

हे सारं डोक्यात चालू असतानाच आमच्या विभागातला सहकारी समोर आला. तो अल्पसंख्याक समाजातला. त्याला विचारलं, ‘‘मुलीला कसं वाढवायला हवं? मुलीला या शिक्षणव्यवस्थेत नीट शिक्षण मिळतं का?’’ तर तो म्हणाला, ‘‘आता मुलीला वाढवायला अक्कल लागत नाही. त्यांच्या त्याच वाढतात. आमच्या समाजात पोरी जातीत लग्नच करायला तयार नाही त्यामुळे मुलांच्या लग्नांचे प्रश्नच प्रश्न.’’ महाराष्ट्रात आता असे बरेच अल्पसंख्याक समूह आहेत की जे या प्रश्नाने ग्रासलेले आहेत. तो म्हणाला, ‘‘आमच्या समाजात पोरी दक्षिणेतून विकत आणताहेत पालक. समाज अस्वस्थ आहे. करायचं काय?’’ त्यानं तिसरंच सुरू केलं.

मुलींबाबत हे सारं बोललं जाताना, कोणीच का म्हणत नाही ती माणूस आहे. तिला माणूस म्हणून वाढवायला हवं. तिला आशाआकांक्षा असतात. तिला शरीर, मन असते. तिला समंजसपणे वाढवू या. तिच्याशी मुक्त, मोकळा संवाद करू या. तिच्या मनातील ताणतणावाला आम्ही आमचे शब्द देऊ या. तिलाही व्यक्त व्हायचे असते. तिचे म्हणणे ऐकू या. सगळ्या बंधनातून मुक्त. तिचं बालपण तिला देऊ या. म्हणजे ती आपल्यासोबत आणि आपल्याशी संवाद करत जाईल. तिच्यासाठी म्हणून आपण स्वतंत्र शिक्षणव्यवस्था विकसित करू या. ज्या व्यवस्थेत तिचा दृष्टिबदल होईल आणि समाजाचा दृष्टिकोन बदलून जाईल. म्हणजे ती आततायी निर्णय घेणार नाही. उतावीळ होणार नाही. तिच्या उतावीळपणाला आपणच जबाबदार आहोत असे खुलेपणाने मान्य करू या. असा निर्मळ दृष्टिकोन पालकात रुजवण्याची जबाबदारी कोणाची?

chaturang@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 25, 2019 1:52 am

Web Title: suttadguttad article about author rajan gavas 9
Next Stories
1 सरपंच! : गतिमान कामाचं फलित
2 आभाळमाया : तेवती तपश्चर्या
3 कोण म्हणतं ‘टक्का’ वाढला?
Just Now!
X