वैदिक पद्धतीने लग्न सोहळा चालला होता. सप्तपदी आदी विधी झाले. नववधूला मंगळसूत्राचा अनमोल साज चढविला गेला. वधू-वराचा जोडा किती एकमेकांना अनुरूप आहे, असेच भाव प्रत्येकाच्या नजरेत होते. हा दृष्ट लागण्यासारखा मंगल सोहळा वराची आजी कौतुकाने पाहत होती. आपल्या नातवाला आणि नातसुनेला ती डोळे भरून पाहत होती.. इतक्यात अघटित घडलं.. सत्यघटनेवर आधारित कहाणी..
हॉ लभर गुलाबाच्या पाकळ्यांच्या पायघडय़ा घातल्या होत्या. विविध तऱ्हेच्या देशी-विदेशी फुलांची आकर्षक सजावट केली होती. स्टेजवरच्या निशिगंधाच्या फुलांच्या लडीचा दरवळ सर्वत्र पसरला होता. सनईच्या मंजूळ स्वरांनी तर वातावरण आणखीनच भारावून टाकणारे झाले होते. आप्तेष्ट, स्नेही मित्रमंडळींनी लग्नमंडपात भाऊगर्दी केली होती. अतिशय उत्साही, मंगलमय वातावरणात स्टेजवरती विवाह विधी सुरू होते. स्त्रियांची लगबग चालू होती. मित्र-मैत्रिणींच्या चेष्टेला उधाण आले होते. मध्येच हास्याची कारंजी उडत होती. वैदिक पद्धतीने लग्न सोहळा चालला होता. सप्तपदी आदी विधी झाले. नववधूला मंगळसूत्राचा अनमोल साज चढविला गेला. वधू-वराचा जोडा किती एकमेकांना अनुरूप आहे, असेच भाव प्रत्येकाच्या नजरेत होते. हा दृष्ट लागण्यासारखा मंगल सोहळा वराची आजी कौतुकाने पाहत होती. आपल्या नातवाला – नातसुनेला ती डोळे भरून पाहत होती. वैदिक पद्धतीने सर्व विधी झाले. आता फक्त मंगलाष्टका आणि अक्षता पडल्या की विवाह संपन्न होणार होता.
वधू गौरीहर पूजनासाठी बसली होती. वराकडली मंडळी रुखवताच्या जेवणाचा आस्वाद घेत होती. इतक्यात मुलाच्या वडिलांचे मित्र त्यांच्या कानात काहीतरी सांगून गेले. त्यांच्या आईला, मुलाच्या आजीला अचानक लग्नमंडपात बसल्या जागी हार्टअ‍ॅटॅक आला होता. मुलाच्या वडिलांना काय करावे ते सुचेना, पण लगेचच त्यांच्या मित्रांनी आणि शेजाऱ्यांनी त्यांना मदत केली. त्यांनी सांगितले, ‘‘तुम्ही काही काळजी करू नका. इथे अगदी जवळच हॉस्पिटल आहे. आम्ही आजींना तिथे नेऊन अ‍ॅडमिट करतो. इथे पुढचे विधी चालू राहू देत. आम्ही तुम्हाला पुढील सर्व कळवितो. तुम्ही अजिबात काळजी करू नका.’’ते सर्वजण लगेच आजींना घेऊन गेले.  कुणाशीही फारशी चर्चा न करता! बाकी जमलेल्या लोकांना काय झालंय हे कळण्याच्या आतच त्यांनी आजींना दवाखान्यात नेले. इकडे लग्नमंडपात फारसे कुणाला काहीच कळले नाही. मुहूर्त जवळ येऊ लागला होता. त्याच गडबडीत, उत्साहात सारेजण होते. मुलाच्या वडिलांची मात्र चलबिचल चालली होती. येणाऱ्या लोकांचे हात जोडून हसतमुखाने ते स्वागत करीत होते, पण लक्ष मात्र सगळे आईच्या तब्येतीकडे होते. एवढय़ात त्यांच्या मोबाइलची रिंग वाजली आणि ‘आई गेल्याची’ बातमी त्यांना समजली. हॉलच्या एका कोपऱ्यात जाऊन ते उभे राहिले. क्षणभर त्यांनी डोळे मिटले. मोठा आवंढा गिळत त्यांनी ते दु:ख अक्षरश: गिळले आणि प्रसंगावधान राखून मनावर दगड ठेवून निर्णय घेतला. मित्रांना उलट फोन करून सांगितले, ‘‘आईला ‘आयसीयू’त ठेवलेय असं सांगा.’’ त्यांनी आपल्या भावी सुनेचा विचार केला. नटल्या-सजलेल्या सुनेकडे त्यांनी पाहिले आणि त्यांच्या मनात विचार आला. लग्नसोहळा आयुष्यात एकदाच होतो. तिच्या मनाला काय वाटेल? त्यात तिचा काय दोष? प्रत्येकजण स्वत:ची लग्नाची किती स्वप्ने पाहतो. शिवाय अनेक महिने, कित्येक दिवस मुलीकडच्या लोकांनीसुद्धा केवढी तयारी केलेली असते. केवढा खर्च केलेला असतो. जमलेले सगळे पै-पाहुणे वेळ काढून आशीर्वाद देण्यासाठी आलेले असतात. तेव्हा मुलीकडच्या लोकांच्या एवढय़ा आनंदावर विरजण घालायचे का! जमलेल्या पाहुण्यांना काय सांगायचे! त्यांनी लगेच निर्णय घेतला. आयसीयूमध्ये आहे, असे सांगून लग्नविधी गडबडीने आटोपला.
त्यांची मात्र द्विधा मन:स्थिती झाली होती. घरात येणाऱ्या नवीन सुनेच्या स्वागताची तयारी करायची की आईच्या अंत्ययात्रेसाठी तयारी करायची, हे काही त्यांना उमजेना. एकीकडे नवीन सून घरात येणार याचा आनंद, तर दुसरीकडे आपल्या जन्मदात्या आईला द्यावा लागणारा अखेरचा निरोप, याचे दु:ख. नेमकं काय करावं?
इकडे घरी मात्र खूप वेगळी परिस्थिती होती. दवाखान्यातून आईचा मृतदेह घरी आणणे भाग होते. त्याचे सगळे अंतिम क्रियाकर्म करणे आवश्यक होतेच. आता या अशा परिस्थितीत घरी येणाऱ्या नव्या मुलीला, स्वत:च्या मुलाला, पाहुण्यांना  परिस्थिती माहीत नव्हती. प्रत्येकजण वरात कशी काढायची, नववधूचं स्वागत कसं करायचं या तयारीत, उत्साहात होता. वडिलांच्या मनाची मात्र खूप चलबिचल चालू होती, पण शेजारी खूप मोलाचे असतात असं म्हणतात. अडचणीच्या वेळी सर्वात प्रथम शेजारी मदतीस धावून येतात. शेजारधर्म काय असतो, तो कसा पाळला जातो हे त्या दिवशी कळले. शेजाऱ्यांनी मुलाच्या वडिलांना सांगितले, ‘‘तुम्ही काळजी करू नका. आजींना तुम्ही आमच्या घरी आणा. नवीन सून घरात यायची तर तिचं छान मंगल वातावरणात स्वागत व्हायला हवं. तिच्यात तिची काय चूक! तिला हे काहीच माहीत नाही. ती किती स्वप्नं घेऊन घरात येणार. तेव्हा आपण तिचं ठरल्याप्रमाणे स्वागत करू. तिला या कशाचीच कल्पना देऊ नका. आजीचे पुढचे क्रियाकर्म आपण इकडे करू.’’ शेजाऱ्यांच्या या बोलण्याने वडिलांना गहिवरून आले. मनावरचे मोठे ओझे एकदम कमी झाले. कारण सुनेचे आगमन, स्वागत जितके महत्त्वाचे तितकेच आईला अखेरचा निरोप देणेही महत्त्वाचे होते!घरी नवीन सून आली. अगदी पूर्वनियोजित नाही, पण जेवढे शक्य होते तितक्या उत्साहात तिचे घरी स्वागत करण्यात आले. उंबऱ्यावरचे माप ओलांडून घरी नववधू आली. देवाच्या पाया पडली आणि मग तयारी सुरू झाली अत्यंत कठीण प्रसंगाची. जड अंत:करणाने वडिलांनी आपल्या आईला अखेरचा निरोप दिला. एकाच वेळी आपल्या नव्या सुनेचे स्वागत आणि आपल्या जन्मदात्या आईला द्यावा लागणारा अखेरचा निरोप, हे दोन प्रसंग अनुभवताना त्यांच्या मनाची काय अवस्था झाली असेल, हे परमेश्वरच जाणे!

medical treatment, pregnant minor, hospital , police complaint issue
अल्पवयीन गर्भवतीच्या उपचाराकरता इस्पितळाने पोलीस तक्रारीचा आग्रह धरणे अयोग्य…
Dhananjay Chandrachud
‘एआय’मुळे नैतिक, कायदेशीर, व्यावहारिक प्रश्न! आधुनिक प्रक्रियांबरोबर होणाऱ्या एकत्रीकरणाकडे सरन्यायाधीशांचा इशारा
lokrang article, book review, ekla chalo re, Autobiographical book, sanjeev sabnis, loksatta,
सकारात्मक आत्मकथन
wardha, Akhil Bharatiya Andhashraddha Nirmulan Samiti, Cremation Holikotsav, Remove Superstitions, Associated with Graveyard, terav movie, Harish Ithape,
आज पौर्णिमेस स्मशानभूमीत ‘तेरवं, काय आहे प्रकार जाणून घ्या