31 October 2020

News Flash

गद्धेपंचविशी : ‘दगडावरच्या पेरणी’तून अंकुरले बीज

सय्यदभाई यांच्या संघर्षांत त्यांच्या विशी ते तिशीच्या कालखंडाचं योगदान नेमकं काय होतं, याविषयी त्यांच्याच शब्दांत..

(संग्रहित छायाचित्र)

सय्यदभाई

vidyadhar.kulkarni@expressindia.com

‘मुस्लीम सत्यशोधक मंडळा’चे माजी अध्यक्ष सय्यदभाई अर्थात सय्यद मेहबूब शहा काद्री यांच्या कार्याचा केंद्र सरकारने पद्मश्री किताब जाहीर करून गौरव केला आहे. यंदा ८५ व्या वर्षांत पदार्पण करणाऱ्या आणि ‘मुस्लीम सत्यशोधक मंडळा’ला पन्नास वर्षे पूर्ण होत असताना गेल्या अर्धशतकाहून अधिक काळ सुरू असलेल्या सय्यदभाई यांच्या संघर्षांत त्यांच्या विशी ते तिशीच्या कालखंडाचं योगदान नेमकं काय होतं, याविषयी त्यांच्याच शब्दांत..

हलाखीत गेलेले बालपण, शुल्क भरण्याची ऐपत नसल्यामुळे वयाच्या १३ व्या वर्षी सुटलेली शाळा, जगण्याचा संघर्ष सुरू ठेवण्यासाठी करावी लागलेली नोकरी, एकतर्फी तलाक दिल्यामुळे ऐन तारुण्यात घरी परत आलेली धाकटी बहीण, तीनदा तलाक म्हणून एका स्त्रीच्या आयुष्याशी खेळण्याचा अधिकार देणाऱ्या पुरुषसत्ताकाच्या, सनातनी मुस्लीम लोकांच्याविरोधात करावा लागलेला संघर्ष, ‘दगडावर पेरणी’ करताना खर्ची घातलेले आयुष्य.. डोके फुटेल अशी शक्यता असलेल्या ‘दगडावरच्या पेरणी’तून अखेर बीज अंकुरले. सय्यद मेहबूब शहा काद्री हे माझे मूळ नाव. पण तलाकपीडित स्त्रियांचे प्रश्न सोडविण्यासाठी सुरू असलेल्या ‘दगडावरच्या पेरणी’मुळे लोकांच्या प्रेम आणि आदरामुळे ‘सय्यदभाई’ झालो.

प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये विशी ते तिशी हा कालखंड येतोच. तारुण्याच्या उंबरठय़ावर पाऊल ठेवताना भावी आयुष्याची स्वप्ने रंगविण्यात प्रत्येक जण मश्गूल असतो. माझे तारुण्य मात्र बहिणीला न्याय मिळवून देण्यासाठीच्या कामामध्ये व्यतीत झाले. जगण्याचा संघर्ष सुरू असताना बहिणीच्या आयुष्याची होत असलेली परवड आणि तिला न्याय मिळवून देण्यासाठीची खटपट या साऱ्या गोष्टी जणू हातात हात घालून चालत राहिल्या. त्या धडपडीला आता थोडेफार यश येत आहे. समाज बदलाची प्रक्रिया घडून येण्यासाठी वेळ हा लागतोच. ती वेळ आता आली आहे. मुस्लीम समाज प्रागतिक विचार करू लागला आहे. बालपणी पूर्णपणे धार्मिक असलेला मी आता केवळ माणुसकी हाच धर्म महत्त्वाचा मानतो. हमीद दलवाई यांच्या खांद्याला खांदा लावून केलेल्या कामाचे चीज झाले अशी माझी कृतज्ञतेची आणि कृतार्थतेची भावना आहे. छोटय़ाशा व्यवसायामध्ये आयुष्याची गुजराण होण्यासाठी पोटापुरते पैसे मिळतात. त्यामुळे मी समाधानी आहे. मात्र या साऱ्या कामाची मुहूर्तमेढ केली ती माझ्या विशी ते तिशी या कालखंडाने.

एका सामान्य मुस्लीम कुटुंबात माझा जन्म झाला. उर्दू माध्यमाच्या शाळेत चौथीपर्यंत माझे शिक्षण झाले. १३ वर्षांचा असताना फी भरण्यासाठी २५ रुपये नसल्यामुळे माझी शाळा सुटली. मात्र, काबाडकष्ट करताना आयुष्यात खाल्लेल्या टक्क्याटोणप्यांनी मला खूप काही शिकविले. तेव्हा मी रेंजहिल्स येथे राहायला होतो. माझी स्वत:ची गायन पार्टी होती. त्या काळी माझा आवाज सुरेख होता. पेटी वाजवून महंमद रफी यांची चित्रपटातील गाणी म्हणायचो. ‘मन तरपत हरी दर्शन को आज’ या मी गायलेल्या गाण्याला अनेकदा ‘वन्स मोअर’ मिळायचा. पण केवळ तेवढेच करून घरातील खर्चाची जबाबदारी पेलता येणार नव्हती. वाकडेवाडी येथे असलेल्या तात्यासाहेब मराठे यांच्याकडे मी कामाला सुरुवात केली. त्यांचा पेन्सिल तयार करण्याचा कारखाना होता. त्यांना भेटायला गेलो तेव्हा माझ्याकडे पाहून ‘तू काय काम करू शकतो?’ असा प्रश्न त्यांनी मला विचारला. ‘तुम्ही म्हणाल ती सर्व. अगदी झाडू मारण्यापासून ते पाणी भरून ठेवण्यापर्यंत सगळी कामे मी करेन’, असे मी त्यांना सांगितले. त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला आणि मला काम सुरू करण्यास सांगितले. समाजवादी विचारांचे तात्यासाहेब स्वातंत्र्यसैनिक होते. स्वातंत्र्यलढय़ात त्यांनी काही काळ तुरुंगवास भोगला होता. त्यामुळे माझ्यासारख्या पोराकडे पाहून त्यांना दया आली. कार्यालय आणि कारखान्याची झाडलोट करण्याचे काम मी प्रामाणिकपणे आणि अगदी मन लावून करत असे. ही नोकरी गेली तर कोण काम देणार, हा प्रश्न मला भेडसावत असल्यामुळे हे काम सोडायचे नाही हा निर्धार मनाशी पक्का केला. हळूहळू मी मशीनची कामे शिकून घेतली. तात्यासाहेबांनी माझ्यावर पुत्रवत प्रेम केले.

धाकटी बहीण खतिजा माझ्यापेक्षा दोन वर्षांनी लहान होती. अचानक तोंडी तलाक मिळाल्याने पुढच्या आयुष्याचा काळाकुट्ट अंधार पदरात घेऊन ती एक दिवस माहेरी निघून आली. एक साधा संवेदनशील तरुण असलेला मी या घटनेने अस्वस्थ झालो. अनेक रात्री मी तळमळत काढत होतो. केवळ माणुसकीच नाही तर नैसर्गिक न्यायाचा हक्कदेखील आपल्या बहिणीला नाकारला जातो आहे याची वेदना मला सलत होती. आपल्या लहरीनुसार तीनदा तलाक म्हणून बायकोला घटस्फोट द्यायचा हे असे कसे होऊ शकते, हा प्रश्न मला सतावत होता. मनातून उतरली म्हणून टाकून द्यायला बायको म्हणजे बाजारात मिळणारी वस्तू आहे काय? तलाक म्हणून पत्नीला घटस्फोट देणारा पती दुसरे लग्न करू शकतो. मुस्लीम धर्माने पुरुषाला चार लग्ने करण्याची परवानगी दिली आहे. मग जी तलाकपीडित आहे तिचे काय? तिलाही मन आहे. तिच्या भावनांचे काय? तिला कोणी जाणून घेणारच नाही का? अशा प्रश्नांनी मी त्या काळातल्या अनेक रात्री जागून काढल्या आहेत.

बहीण घरी आली. ती एकटी नव्हती, तर तिच्यासमवेत दोन मुलेदेखील होती. या चिमुरडय़ांनी त्यांचा बाप जिवंत असतानाही आता बापाविना आयुष्य कसे व्यतीत करायचे, असा प्रश्न मला भाच्यांकडे पाहिल्यानंतर पडायचा. बहिणीचा संसार पुन्हा सुरळीतपणे चालावा या भावनेतून मी आधी तिच्या नवऱ्याला भेटलो. मशिदीमध्ये जाऊन नमाज पठण झाल्यानंतर मौलवींची भेट घेतली. मात्र ‘एकदा तलाक झाल्यानंतर तो मागे फिरण्याची तजवीज नाही. नवऱ्याला आता तुझ्या बहिणीला घरामध्ये ठेवता येणार नाही’, असेच उत्तर मला सगळीकडे मिळाले. ‘माझ्या मनातून उतरली म्हणून तलाक दिला’, असे बहिणीच्या नवऱ्याने सांगितले. तलाक देऊन तो दुसरे लग्न करून मोकळा झाला. ‘दोन मुले झाल्यानंतर तो असा तलाक देतोच कसा? माझ्या बहिणीचा काय गुन्हा म्हणून तिने तलाकपीडित आयुष्य जगायचे?’ या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे मिळतच नव्हती. तलाक देणाऱ्या पुरुषाला समाज का खडसावत नाही? पुरुषाला असे घाणेरडे अधिकार मिळालेच कसे? तोंडी तलाक कसा काय होऊ शकतो? हे प्रश्न माझ्या काळजाला भिडत राहिले. या प्रश्नांचा छडा लावण्याचे माझे प्रयत्न सातत्याने सुरू होते.

एकीकडे नवरा गेल्यामुळे थोरली बहीण आणि तिची दोन मुले आमच्या घरामध्ये असताना आता तलाक दिल्यामुळे धाकटी बहीण आणि तिच्या दोन मुलांची भर पडली. तलाक झाल्यानंतरही बहिणीच्या काळजीपोटी मी एक दिवस मेहुण्याला घरी बोलावले. तो येतानाच १०-१२ जणांना घेऊन आला. ‘मनातून उतरली म्हणून तलाक दिला. आता तुम्ही काहीच करू शकणार नाही. ये तो ‘अल्लाताला की मर्जी’ है’, असे उत्तर त्याने दिले. मी त्याला प्रश्न विचारण्यास सुरुवात केली. मग मेहुण्यासमवेत आलेल्या लोकांनी घरातील हा लहान मुलगा कोण आहे त्याला बाहेर काढा, अशी मागणी केली. मला घरातून बाहेर काढण्यात आले. जवळपास तासभर मी घराबाहेर होतो. अनेक प्रश्नांचे वादळ तासभर माझ्या मनात घोंघावत होते. मग मी गायन पार्टी बंद केली. प्रत्येक मशिदीत दर शुक्रवारी नमाजाला जायचो. नमाज झाल्यानंतर मौलवींना बहिणीबद्दल विचारत होतो. ‘यामध्ये काहीच करता येणार नाही. कायदा कोण बदलणार?’ असेच उत्तर मला सगळीकडे मिळाले. धर्म आपल्या बहिणीला न्याय मिळवून देणार नसेल तर मलाच काही तरी केले पाहिजे, हा मनाशी निश्चय पक्का होत गेला आणि यातूनच माझ्या कामाची सुरुवात झाली.

घरातील परिस्थितीमुळे माझे शिक्षण सुटले होतेच. मग तात्यासाहेब मराठे यांच्याकडे काम करत असताना मी बाहेरून दहावीची परीक्षा देण्याचे ठरविले. परीक्षेच्या दोन महिने आधीपासूनच काम वाढले. अगदी सुट्टी न घेता तीनही पाळ्यांमध्ये काम करण्याची आवश्यकता होती. या कामाच्या ताणामुळे दहावी उत्तीर्ण होण्याचे राहूनच गेले. मराठेसाहेब सांगतील त्या सर्व जबाबदाऱ्या पार पाडायच्या हेच माझे त्या काळातील ध्येय होते. खूप लवकरच मी तात्यासाहेब यांचा विश्वास संपादन केला. मी कामाला सुरुवात केल्यापासून तीन व्यवस्थापक नोकरी सोडून गेले. मग एक दिवस ‘आता सय्यद हाच कारखान्याची सगळी कामे पाहील’, अशी घोषणा करून तात्यासाहेबांनी मला व्यवस्थापक केले.

एकीकडे काम सुरू असताना बहिणीला न्याय मिळवून देण्यासाठी लोकांना भेटणे, त्यांच्याशी बोलणे हेदेखील सुरूच होते. त्या दरम्यान पुरुषाच्या मर्जीनुसार एकतर्फी तलाक देणारा कायदा बदलल्याशिवाय पर्याय नाही, असेच माझे ठाम मत झाले. घरबसल्या तलाक होता कामा नये आणि पहिली पत्नी हयात असताना पुरुषाने दुसरे लग्न करू नये ही माझी भूमिका होती. या संदर्भात डॉ. बाबा आढाव, भाई वैद्य आणि ‘राष्ट्र सेवा दला’तील लोकांशी सतत बोलत होतो. समतावादी विचारांतून माझ्या मागणीला समर्थन मिळाले. मुस्लीम समाजाशी संपर्क वाढविला. माझ्या बहिणीप्रमाणे समाजात अनेक ‘खजिता’ दिसल्या. त्यांची उलटीपालटी होणारी आयुष्ये दिसू लागली. ‘शोहर याने आधा खुदा’ या अंधश्रद्धेच्या कातळावर आपटून रक्तबंबाळ होणाऱ्या कपाळांनी मला अस्वस्थ केले. माझी ही तगमग हमीद दलवाई या द्रष्टय़ा समाजसुधारकाच्या सहवासात येऊन थांबली. समाजातील प्रश्नांकडे पाहण्याची नवी दृष्टी आणि नवी उमेद मिळाली. मुस्लीम समाजातील एकतर्फी तलाक झालेल्या स्त्रियांचा शोध घेऊन घरबसल्या तलाक होऊ नये यासाठी चळवळ सुरू केली. यामध्ये धार्मिक नेतृत्वापेक्षाही धर्मनिरपेक्षवादी विचारांची कास धरली. संघटना उभारण्यासाठी दलवाई यांची भेट घेतली.

एक-दोनदा आमची भेट होऊ शकली नाही.

एक दिवस ‘हमीद माझ्याकडे आला आहे. तू चार वाजता ये’, असा भाई वैद्य यांचा दूरध्वनी आला.

‘स्त्रियांवर अन्याय करणारा तलाक का मानायचा? बाई असणे हाच तिचा गुन्हा आहे का’, असे प्रश्न उपस्थित करून ‘मी धापवळ करेन. तुम्ही मला मार्गदर्शन करा. हिंमत आणि आधार द्या’, असे मी हमीद दलवाई यांना सांगितले. ‘आपण बरोबर काम करू’ एवढेच त्यांनी मला सांगितले. प्रभाकर पाध्ये आणि कमल पाध्ये यांच्याकडे ते मला घेऊन गेले. त्यांचं मार्गदर्शन मिळालं. हमीद दलवाई यांच्यासमवेत भाई वैद्य यांच्या घरी महिन्याला एक याप्रमाणे वर्षभर बैठका सुरू होत्या. ‘चार-पाच माणसे का असेना आपण संघटना स्थापन करू’, असे दलवाई यांनी सांगितले. तेव्हा लोक दलवाई यांची खिल्ली उडवायचे. अखेर

२२ मार्च १९७० रोजी ‘मुस्लीम सत्यशोधक मंडळा’ची स्थापना झाली. संघटनेचे हे नाव डॉ. बाबा आढाव यांनी सुचविले होते. पुण्यामध्ये वाजतगाजत मिरवणुकीने स्थापन झालेल्या या मंडळाच्या पाठीशी वैद्य, आढाव यांच्यासह नानासाहेब गोरे, एस. एम. जोशी, प्रा. ग. प्र. प्रधान आणि यदुनाथ थत्ते अशी सारी समाजवादी मंडळी खंबीरपणे उभी राहिली. अमीर शेख, बशीर शेख, रफी सय्यद, इब्राहिम सिद्दिकी

अशा मोजक्या कार्यकर्त्यांसह ‘साधना’ सभागृहामध्ये ‘मुस्लीम सत्यशोधक मंडळा’ची स्थापना झाली.

तलाकपीडित स्त्रियांना न्याय मिळवून देण्यासाठीची चळवळ सुरू असताना १९६४ मध्ये बार्शीजवळील पांगरी गावच्या अख्तर सय्यद यांच्याशी माझा विवाह झाला. घर सांभाळून तिने मला सामाजिक कामांमध्ये पूर्णपणे मोकळीक दिली. रास्ता पेठ येथील कादरभाई चौकात मुस्लीम स्त्रिया मदत केंद्र चालविले. माणसे जोडत गेलो. ‘अखिल भारतीय समिती’ची स्थापन करून दिल्लीमध्ये परिषद घेतली. १९७५ मध्ये तलाकपीडित स्त्रियांची जगातील पहिली परिषद पुण्यामध्ये लक्ष्मी रस्त्यावरील गोवन्स हॉल येथे घेतली. घर चालवून काम करता येते यावर माझा विश्वास होता. मराठे यांच्याकडे नोकरी सुरू असताना अनेक व्यापाऱ्यांनी अधिक पगार देतो अशी प्रलोभने दाखविली. पण मी अखेपर्यंत तात्यासाहेब यांच्याशी प्रामाणिक राहिलो. तात्यासाहेब यांच्या निधनानंतर वहिनींनी कारखाना माझ्याकडे सोपविला. नंतर मी कारखाना कोंढवा येथे स्थलांतरित केला.

‘मुस्लीम सत्यशोधक मंडळा’च्या प्रवाहात अनेक जण आले. प्रतिभाशाली कार्यकर्ते झाले. काही मतभेदांनी दुरावले तर काही समाजाच्या बहिष्काराने घाबरले. काहींना आपल्या निधनानंतर दफनभूमी मिळणार नाही या भीतीने ग्रासले. काहींनी मौलवींकडे माफीपत्रे देऊन चळवळीशी नाते तोडले. या साऱ्या काळात ध्येयावरचा विश्वास कायम ठेवून केवळ अवहेलनाच पदरी आली असे नाही, तर दगडफेक आणि बहिष्कार सहन करून जागर करत राहणे ही दररोजची परीक्षा द्यावी लागत होती. हमीद दलवाई यांच्या अकाली निधनानंतर चळवळीचा वैचारिक आधारस्तंभ निखळून पडला. मग मी ही जबाबदारी यथाशक्ती पार पाडत राहिलो.

शाहबानो प्रकरणाने १९८५ मध्ये चळवळीसमोर एक संकट उभे राहिले. शहाबानो ही मध्यमवयीन स्त्री पोटगीच्या हक्कासाठी सर्वोच्च न्यायालयात गेली. तेथे तिचा पोटगीचा दावा मंजूर झाला. पण तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी बहुमताच्या बळावर शहाबानोची लढाई आणि तिला मिळालेला पोटगीचा कायदेशीर हक्क एका क्षणात रद्दबातल ठरविला. हा चळवळीला मोठा हादरा तर होताच. पण देशातील गणिते झपाटय़ाने बदलू लागली. त्याची फार मोठी किंमत समाजातील सगळ्याच घटकांना नंतर मोजावी लागली. ‘ही तुमच्या धर्मनिरपेक्षतेची अग्निपरीक्षा आहे’, अशा शब्दांत सरकारला सुनावले. पण हे सारे प्रयत्न फोल ठरले.

‘मुस्लीम सत्यशोधक मंडळा’ने शाहबानो यांना पुण्यात बोलावून त्यांचा खास सत्कार केला. एवढेच नव्हे तर ‘पोटगी बचाव परिषद’ घेतल्या. थेट तत्कालीन राष्ट्रपती ग्यानी झैलसिंग आणि राजीव गांधी यांच्यापर्यंत धडक मारली. एकीकडे धर्माध मुस्लिमांचा विजयाचा उन्माद आणि दुसरीकडे हिंदूुत्वाचे तापत चाललेले वातावरण यात मंडळाच्या विवेकी आणि न्यायाच्या भूमिकेची गळचेपी झाली. या खडतर काळात मेहरुन्नीसा दलवाई, हुसेन जमादार आणि ताहेरबाई पुनावाला यांच्यासमवेत मंडळाची मशाल तेवती ठेवण्यात यश लाभले. अलीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकतर्फी तलाकवर बंदी आणून मुस्लीम स्त्रियांना न्याय तर दिलाच, पण इतिहासाचे चक्र पूर्ण केले. मंडळाचा सुवर्ण महोत्सव साजरा होत असताना मुस्लीम स्त्रियांना तिहेरी तलाकपासून मुक्ती मिळाली आहे. पण अजूनही आमची लढाई संपलेली नाही. देशात समान नागरी कायदा लागू झाल्याशिवाय आमची लढाई कशी संपेल?

तत्पूर्वी, माझ्या तिशीत आणखी एक महत्त्वाची घटना घडली. विवाहानंतर मूल दत्तक घेण्याचे ठरविले तेव्हा धर्म आडवा आला. मूल दत्तक घेणे इस्लामला मान्य नाही असे सांगण्यात आले. केवळ मूल होण्यासाठी दुसरे लग्न करून पत्नीवर अन्याय करणे मला मान्य होणारे नव्हते. धर्माची बंधने झुगारून आम्ही मूल दत्तक घेतले. मूल झाले नाही यामध्ये पत्नीचा एकटीचा दोष कसा असू शकतो? तिच्यावर ठपका ठेवून ‘मीच दुसरे लग्न केले असते तर तिहेरी तलाकवर बंदी आणा’ अशी मागणी करण्याचा मला नैतिक अधिकार तरी राहिला असता का? मला साथ देणाऱ्या पत्नीला मीच वाऱ्यावर कसे सोडायचे? त्यापेक्षा मूल दत्तक घेणे हाच पर्याय योग्य वाटला. माझ्यावर गांधीवादी विचारांचा प्रभाव असल्याने चळवळीत काम करताना मी नैतिकतेचे अधिष्ठान कधी सोडले नाही.

ज्या बहिणीला न्याय मिळवून देण्यासाठी सारा खटाटोप केला तिचे दुर्दैवाने चार वर्षांपूर्वी निधन झाले. मात्र मातेचे खडतर जीवन ध्यानात घेऊन तिच्या दोन्ही मुलांनी आपल्या आईला फुलाप्रमाणे जपले याचे मला समाधान आहे. पन्नास वर्षांपूर्वी कराव्या लागलेल्या संघर्षांच्या तुलनेत आता समाज पुरेसा बदलला आहे. माझ्या पुतण्याचे लग्न ठरत असताना ‘मुस्लीम सत्यशोधक मंडळा’चे सय्यदभाई असतील तर आम्ही आनंदाने आमची मुलगी याच घरात देऊ’, असे मुलीकडच्यांनी सांगितले. ‘जो दुसरों की बहन-बेटीयों के लिये काम करता है उसके घर में हमारी बेटी चैन से रहेगी’, असे म्हणत आनंदाने त्यांनी आमच्या घराशी सोयरीक जोडली.

तलाकपीडित स्त्रियांना न्याय मिळवून देण्यासाठी केलेल्या संघर्षांची कथा ‘दगडावरची पेरणी’ या पुस्तकामध्ये शब्दबद्ध केली आहे. या मराठी पुस्तकाची आता तिसरी आवृत्ती लवकरच प्रसिद्ध होणार आहे. तर कन्नड, उर्दू, बंगाली, आसामी आणि हिंदूी या भाषांमध्ये या पुस्तकाचा अनुवाद झाला आहे. मी कोणी नेता नाही. विचारवंत नाही. एक साधा कार्यकर्ता हीच माझी ओळख आहे. हीच कार्यकर्त्यांची झूल माझ्यासाठी आनंददायी आहे.

विवाहानंतर मूल दत्तक घेण्याचे ठरविले तेव्हा धर्म आडवा आला. मूल दत्तक घेणे इस्लामला मान्य नाही असे सांगण्यात आले. केवळ मूल होण्यासाठी दुसरे लग्न करून पत्नीवर अन्याय करणे मला मान्य होणारे नव्हते. धर्माची बंधने झुगारून आम्ही मूल दत्तक घेतले. मूल झाले नाही यामध्ये पत्नीचा एकटीचा दोष कसा असू शकतो? तिच्यावर ठपका ठेवून ‘मीच दुसरे लग्न केले असते तर तिहेरी तलाकवर बंदी आणा’ अशी मागणी करण्याचा मला नैतिक अधिकार तरी राहिला असता का? मला साथ देणाऱ्या पत्नीला मीच वाऱ्यावर कसे सोडायचे? त्यापेक्षा मूल दत्तक घेणे हाच पर्याय योग्य वाटला.

 शब्दांकन – विद्याधर कुलकर्णी

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 15, 2020 1:00 am

Web Title: syed mehboob shah qadri gadhe panchvishi chaturang abn 97
Next Stories
1 गर्भपात कालमर्यादा कायद्याविरुद्धच्या लढय़ाचं एक तप!
2 सामाजिक विश्वाशी एकरूपता
3 आरस्पानी माणुसकी
Just Now!
X