16 December 2019

News Flash

‘जपून टाक पाऊल जरा..’

वाईट परिणाम घडून गेल्यानंतर पश्चात्तापदग्ध अवस्थेतील रुग्णांचे नातेवाईक बऱ्याच वेळा बघण्यात येतात; पण ती वेळ त्यांना शिकवण्यासाठी योग्य नसते.

| November 30, 2013 01:01 am

वाईट परिणाम घडून गेल्यानंतर पश्चात्तापदग्ध अवस्थेतील रुग्णांचे नातेवाईक बऱ्याच वेळा बघण्यात येतात; पण ती वेळ त्यांना शिकवण्यासाठी योग्य नसते. म्हणून हा लेखनप्रपंच! म्हटलं तर विषय अगदी साधा, पण अपेक्षित, अनपेक्षित शक्यतांचा आधी विचार करून, थोडी खबरदारी वाढवल्यास असे जीवघेणे प्रसंग कमी जरी करता आले, तरी सार्थक झाले! शेवटी समर्थाचा सल्ला आपल्या सर्वासाठी कायमच मोलाचा आहे- ‘अखंड सावधान असावे!’
‘डॉक्टरांच्या जगात’ रोज वेगवेगळ्या आजाराने त्रस्त झालेले रुग्ण येत असतात. त्यातले काही आजार जन्मजात, काही जंतुसंसर्गाने झालेले, काही शरीराच्या अवयवांची झीज झाल्यामुळे झालेले, काही आवश्यक घटकांच्या कमतरतेमुळे होणारे तर काही अगम्य कारणाने पेशींची अवास्तव वाढ झाल्यामुळे होणारे, काही अपघाताने झालेले- असे असतात. यापकी काही टाळण्याजोगे तर काही अटळ! अपघातांपकी काही कारणं अशी लक्षात येतात; जी जराशा सावधगिरीने सहज टाळता येऊ शकतात. एका क्षणाची एक चूक, एक बेफिकिरी एखाद्याच्या आयुष्याला संपूर्ण उद्ध्वस्त करणारी ठरू शकते. अशा टाळता येणाऱ्या चुकांसाठी सर्वानाच सांगावंसं वाटतं, ‘जपून टाक पाऊल जरा’..
अलीकडे माझ्याकडे एक चार वर्षांचा छोटा मुलगा भाजलेल्या अवस्थेत आणला होता. त्याच्या शरीरावर अनेक ठिकाणी गरम पाणी सांडून फोड आले होते. भाजण्याचे प्रमाण साधारण २५ टक्के असावे, जे लहान मुलाच्या आकारमानाने जास्त आहे. भाजण्याचं कारण होतं-आईच्या हातातलं गरम पाण्याचं पातेलं सटकून मुलाच्या अंगावर पाणी सांडल्याचं. अशा प्रकारे अपघाती भाजणं तर लहान मुलांच्या बाबतीत मोठय़ा प्रमाणात दिसून येतं. रांगतं मूल घरात असताना गरम पाण्याचं किंवा पदार्थाचं पातेलं खाली जमिनीवर ठेवणं, आंघोळीसाठी तापवलेलं पाणी स्वयंपाकघरापासून बाथरूमपर्यंत फडक्याच्या किंवा चिमटय़ाच्या पकडीत घेऊन जाताना पकड सटकणं किंवा वाटेत लहान मूल समोरून धावत येणं, मोठय़ांचं लक्ष नसताना लहान मूल आंघोळीच्या गरम पाण्याच्या बादलीत हात घालणं वगरे अनेक प्रकारांनी असे अपघात होतात. त्याचे परिणाम फार भयानक होतात. हे घडल्यावर कितीही वाईट वाटलं तरी उपयोग नसतो. नंतर हळहळण्यापेक्षा आधीची सतर्कता, खबरदारी महत्त्वाची. गरम पाण्याचं पातेलं बाथरूमपर्यंत नेण्याऐवजी रिकामी बादली गॅसजवळ आणून अर्धी-पाऊण भरून नेणं हे तुलनेने कमी धोक्याचं. त्याहून सुरक्षित म्हणजे गीझरवर बाथरूममध्येच पाणी तापवणं. इतर काही हौशी खर्चापेक्षा असे खर्च करणं हे जास्त सुज्ञपणाचं नाही का? लहान मुलाच्या तयारीसकट मुलाबरोबरच आंघोळ घालणाऱ्याने बाथरूममध्ये प्रवेश करणं अशा अनेक सावधानता सांगता येतील. वाटताना किरकोळ वाटणाऱ्या या गोष्टी पुढे मोठं संकट टाळू शकतात.
तीच गोष्ट दरवाजे, खिडक्यांची. आमच्याकडे किती तरी वेळा लहान मुलाचं बोट दाराच्या फटीत अडकून अर्धवट किंवा पूर्ण तुटलं म्हणून कासावीस होऊन पालक येतात. पूर्णपणे तुकडा पडलेल्या स्थितीत तो तुकडा स्वच्छ प्लॅस्टिकच्या पिशवीत नॉर्मल सलाइनमध्ये (मेडिकल स्टोअर्समध्ये मिळते) बुडवून ती पिशवी अजून एका बर्फ असलेल्या प्लॅस्टिकच्या पिशवीत घालून आणल्यास व त्वरित प्लास्टिक सर्जनकडे रुग्ण नेल्यास काही केसेसमध्ये तो जोडता येऊ शकतो. अर्धवट अवस्थेत तुटलेल्या बोटाला टाके घालून जोडले तरी शेवटपर्यंत रक्तपुरवठा पोहोचला तरच बोट वाचू शकते; अन्यथा काही दिवसांत टोकाचा भाग गँगरीन झाल्याने काळा पडतो व शस्त्रक्रिया करून काढावा लागतो. ह्य़ा सर्व प्रकारांत शारीरिक इजा, मानसिक क्लेश, कधी कधी व्यंग या सगळ्या प्रकारांनी रुग्णाबरोबरच कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला त्रास होतो. बस-रेल्वेच्या खिडकीत मुलांना बसवताना किंवा स्वत: बसताना- खिडकीच्या तावदानांची खिट्टी बरोबर लागलेली आहे की नाही; हे बघणं मोठय़ांचं काम. कळत्या वयातील बालकाला हात कुठे ठेवू नये, खिडकी पडल्यास काय होईल हा संभाव्य धोका लक्षात आणून देणं, शिकवणं; हेही मोठय़ांचं काम. घरातील प्रत्येक दाराला स्टॉपर्स लावणं, वाऱ्याने आपोआप लागणाऱ्या दारांबाबत अधिक दक्षता घेणं या लहानसहान गोष्टी प्रसंगी अतिमहत्त्वाच्या होतात. फटाके उडवणाऱ्या लहान मुलांबरोबर एका मोठय़ा माणसाने थांबणं, घरातील इलेक्ट्रिक प्लग पिनला सर्व ठिकाणी ब्लॉकर्स लावणं, सोसायटीच्या अंडरग्राउंड पाण्याच्या टाक्यांना झाकणं बसवणं ..ही यादी ‘केलेच पाहिजे’ या मथळ्याखाली हवी.
काही वर्षांपूर्वी माझ्याकडे एक स्त्री रुग्ण अ‍ॅसिड प्यायल्यामुळे अन्नच काय पण स्वत:ची थुंकीदेखील गिळता येत नाही, या तक्रारीने आली होती. जवळ राहणाऱ्या बहिणीकडे संडास-बाथरूम सफाईचे अ‍ॅसिड मागण्यासाठी ती गेली होती. तिथे पोहोचल्यावर थकून पाणी पिण्यासाठी जी बाटली तिने उचलली. ती बाटली तिलाच देण्यासाठी अर्धे अ‍ॅसिड भरून बहिणीने तयार करून ठेवली होती; पण त्या वेळी बहीण दुसऱ्या खोलीत असल्याने ते ती सांगण्यापूर्वीच हा अपघात झाला. मी एण्डोस्कोपी करून बघितलं; तर संपूर्ण अन्ननलिका, जठराचा निम्मा भाग आतून जळून पापुद्रय़ासारखा झाला होता. त्यानंतर मुंबईतील एका मोठय़ा रुग्णालयात तिच्यावर जवळजवळ चार मोठय़ा शस्त्रक्रिया झाल्या. चौदा महिने ती रुग्णालयातच दाखल होती. पाण्यासारखा पसा खर्च झाला. प्रश्न हा पडतो, की थोडी सावधगिरी, जागरूकता वाढवली असती, तर हे टाळता आलं नसतं का? अ‍ॅसिडसारख्या सफाईच्या गोष्टी, बेगॉनसारखी विषारी कीटकनाशकं बिस्लेरीसारख्या पाण्याच्या बाटलीत किंवा औषधांच्या बाटलीत भरल्या जातातच कशा? सहजासहजी कोणाच्याही हाताला येतील अशा ठिकाणी का ठेवल्या जातात? याउपर त्यावर मोठय़ा लक्षवेधी अक्षरात आतील द्रवपदार्थाचे नाव का लिहिले जात नाही? लहान मुलांच्या हाताशी येणाऱ्या जागी तर कधीच या गोष्टी ठेवता कामा नयेत.
अजून एक आश्चर्यकारक व टाळता येणारी घटना म्हणजे छोटय़ा मुलग्यांची शूची जागा पँटच्या चेनमध्ये अडकल्यामुळे इजा! अशा प्रकारच्या रुग्णांना आमच्याकडे आणतात, तेव्हा त्या मुलांना खूप वेदना होत असते. शूच्या जागेची चामडी त्या चेनमधून काढायला कधी कधी संपूर्ण बेहोशी द्यावी लागते. कधी कधी ती अडकलेली चामडी रक्तपुरवठय़ाअभावी काळी पडू लागली असल्यास सुंता करण्याची शस्त्रक्रिया तातडीने करावी लागते. छोटय़ाशा कारणासाठी बेहोशीचा धोका स्वीकारावा लागतो. म्हणजे चेनची पँट घालण्यापूर्वी आत साधी छोटी चड्डी घातलीच पाहिजे, हे न शिकवल्याने किंवा मुलाने न ऐकल्याने केवढी ही यातायात! वेदना, काळजी, मनस्ताप सगळंच वाढतं.
तीच गोष्ट शस्त्रक्रियेची. मोठय़ांप्रमाणे लहान मुलांनाही शस्त्रक्रियेपूर्वी कमीत कमी चार तास पाण्याचा थेंबही न घेता उपाशी आणावे, असा नियम आहे. डॉक्टरांनी अशा सूचना दिल्यानंतरही त्याकडे दुर्लक्ष करणारे काही पालक आढळतात. मूल उपाशी राहिलेले पाहावत नाही म्हणून चॉकलेट, बिस्किट, आईचं दूध मुलाला देतात व हे डॉक्टरांपासून लपवून ठेवतात. परिणामी बेहोशीतून बाहेर येताना उलटी झाली, तर हे अन्नपदार्थ जठरातून वर येऊन श्वासनलिकेत जातात व तेथून सरळ फुप्फुसात जातात. हे फार भयानक धोक्याचे असते. कधी कधी ह्य़ात रुग्णाला गुदमरून मृत्यू येऊ शकतो, कारण एकदा श्वासनलिकेतून पुढील श्वासमार्गामध्ये गेलेले अन्नकण काढणं अशक्य असतं. त्यामुळे डॉक्टरांनी सांगितलेल्या सूचना तंतोतंत पाळण्यात शहाणपण असतं. रुग्णाने शस्त्रक्रियेपूर्वी शेवटचं काय खाल्लं आहे व किती वाजता या गोष्टीची शंभर टक्के खरी माहिती शस्त्रक्रिया करणाऱ्या व बेहोश करणाऱ्या डॉक्टरांना द्यायला हवी. मग भले शस्त्रक्रियेची वेळ थोडी पुढे ढकलली गेली तरी हरकत नाही; पण हे संकट नको. ‘संपूर्ण उपाशी’ याचा अर्थ मोठय़ांच्या संदर्भात पाणी, विडी-सिगरेटसुद्धा नाही असा; तर लहानांच्या बाबतीत आईचं किंवा वरचं दूध, पाणी काहीही नाही; असा असतो.
वरील सर्व घटनांमध्ये मनुष्याची चूक एवढीशी पण शिक्षा मात्र फार मोठी असं जाणवतं. एका सुंदर कवितेत सुधीर मोघ्यांनी असं लिहिलं आहे,
‘कणभर चुकीलाही आभाळाएवढी सजा असते,
चूक आणि शिक्षा यांची बरोबरी कधी करायची नसते.
क्षणोक्षणी चुका घडतात आणि श्रेय हरवून बसतात;
आपल्याच रिकाम्या ओंजळी आपल्याला बरंच काही शिकवत असतात.’
अशा विविध घरगुती अपघातांमधील टाळता येण्याजोग्या धोक्यांविषयी आज सांगावंसं वाटलं. कारण वाईट परिणाम घडून गेल्यानंतर पश्चात्तापदग्ध अवस्थेतील रुग्णांचे नातेवाईक बऱ्याच वेळा बघण्यात येतात; पण ती वेळ त्यांना शिकवण्यासाठी योग्य नसते. म्हणून हा लेखनप्रपंच! म्हटलं तर विषय अगदी साधा, पण अपेक्षित, अनपेक्षित शक्यतांचा आधी विचार करून, थोडी खबरदारी वाढवल्यास असे जीवघेणे प्रसंग कमी जरी करता आले, तरी सार्थक झालं! शेवटी समर्थाचा सल्ला आपल्या सर्वासाठी कायमच मोलाचा आहे-‘अखंड सावधान असावे!’    
vrdandawate@gmail.com

First Published on November 30, 2013 1:01 am

Web Title: take care about expected unexpected life threatening events
Just Now!
X