News Flash

नोकरी करण्याचा निर्णय

नुकतीच ह्य़ांना नोकरी लागली होती आणि मी तर गृहिणी. निदान एक बेडरूम हॉल किचन ही आमची गरज होती, पण मुंबईत तर जागा परवडणार नव्हती.

| March 15, 2014 01:23 am

नोकरी करण्याचा निर्णय

नुकतीच ह्य़ांना नोकरी लागली होती आणि मी तर गृहिणी. निदान एक बेडरूम हॉल किचन ही आमची गरज होती, पण मुंबईत तर जागा परवडणार नव्हती. एक दिवस वसईची एका वसाहतीची जाहिरात वाचली. थोडी बजेटच्या बाहेरचीच घरं होती, पण घ्यायचं ठरवलं. ह्य़ांनी कर्ज काढलं. त्या वेळी कर्जावरील व्याजदरही जास्त होता. ह्य़ांचा अर्धा पगार कर्जाचे हप्ते फेडण्यात जायचा. मुलांचं शिक्षण, पाहुणे-पै, घरात सहा माणसं, त्यांचा खर्च, सगळा भार यांच्यावर होता. मला काही तरी काम करणं आवश्यक होतं. पण कोण देणार मला काम? मी जेमतेम अकरावी पास. मराठी माध्यमातलं शिक्षण, त्यामुळे इंग्रजी यथातथाच आणि संगणकाचं ज्ञान नाही आणि वयही चाळिशीकडे झुकणारं. पण घराला हातभार लावायची इच्छा मात्र तीव्र होती. तो निर्णय माझं आयुष्य बदलवून गेला. माझ्या आयुष्यातला टर्निग पॉइंट होता तो. त्याने मी अधिक ठाम झाले.
तेव्हाच वसई पूर्वेला एक बिल्डर मोठे टाऊनशिप बांधत असल्याचं कळलं. विचार केला त्यांना लोकांची गरज असेल आणि शिवाय घराजवळ असल्यामुळे येण्या-जाण्याचा वेळ आणि खर्च वाचेल. सरळ थडकले त्यांच्या ऑफिसमध्ये. समोर स्वागतिका होतीच, तिला मुलाखतीविषयी विचारलं. तेव्हा तरुण सेल्स गर्ल्सच्या मुलाखती सुरु होत्या. मी तिला विनंती केली, ‘मला आत जाऊ दे.’ मला केबिनमध्ये बोलावलं. सर आणि मार्गारेट मॅडम होत्या. सरांनी माझा बायोडाटा बघितला. त्यात बघण्यासारखं काहीच नव्हतं, वयही ३९. काहीतरी बोलायचं म्हणून ते म्हणाले, सध्या ऑफिसबाहेर पीसीओ (टेलिफोन बूथ) आहे तिथे बसा, मग बघू.
काय सांगू, मला काय वाटलं एकदम. मी ताडकन उठले आणि म्हणाले, ‘पीसीओमध्येच काम करायचं असतं तर तुमच्या ऑफिसमध्ये आले नसते. आमच्या घराच्या बाजूलाही एक बूथ आहे तिथेच बसले असते. तुमच्या ऑफिसमध्ये जागा होईल तेव्हा कळवा.’ असं म्हणून बाहेर पडले. बोलून आले खरी, पण मनात विचार आला, आपल्याकडे काही नाही. ना शिक्षण, ना वय, ना अनुभव. आपण असं कसं म्हणालो? पण एवढं नक्की, मला काहीही करून दाखवण्याची जिद्द निर्माण झाली होती. त्यासाठी कितीही मेहनत करायची, शिकायची माझी तयारी होती.
दुसऱ्या दिवशी आमच्या घरी त्या ऑफिसचा शिपाई आला. म्हणाला, ‘मॅडमनी तुम्हाला बोलावलं आहे.’ मी लगेच त्यांना भेटायला गेले. त्यांना माझ्या बोलण्यातला विश्वास आवडला. मला त्यांनी पझेशन क्लार्क म्हणून नेमलं. खरं तर संगणकाचं ज्ञान नसलेली, इंग्रजी फारसं चांगलं नसलेली मी, पण त्यांनी विश्वास दाखवल्याने मी जीवतोड मेहनत घेतली. सेल्समधले सगळे बारकावे टीममधल्या इतरांकडून शिकले आणि या सगळ्याचं चीज झालं. गृहिणी असलेल्या मला निवृत्त झाले तेव्हा ळँी इी२३ २ं’ी२ स्र्ी१२ल्ल म्हणून माझा गौरव झाला.
पतीच्या बरोबरीने मी संसाराला, मुलांच्या शिक्षणाला हातभार लावला. माझी दोन्ही मुलं छान शिकली. मोठय़ा हुद्दय़ावर आहेत. सुनाही खूप छान आहेत. एका गोंडस नातवाची मी आजी आहे.
आजवरच्या मेहनतीचं, कष्टाचं सार्थक झालं. एका निर्णयाने मला हे सारं मिळवून दिलं. सुख सुख म्हणजे आणखीन काय असतं!    
लेकीच्या अपयशानं धाडस आलं
नवरा आपल्या बायकोसाठी आधार असतो, पण आधार तर सोडाच उलट माझ्यासाठी व मुलीसाठी तो दहशतच ठरला. त्याचा परिणाम मुलीवर झाला आणि मी एक ठाम निर्णय घेतला..
आयुष्य बदलणारं वळण माझ्या आयुष्यात आलं ते माझ्या मुलीला १२ वी सायन्स परीक्षेत अपयश आलं तेव्हा! त्या वेळच्या घेतलेल्या निर्णयामुळे माझ्या मुलीच्या आणि पर्यायाने माझ्या आयुष्यात खूप मोठा बदल झाला. माझं आयुष्य पूर्णपणे बदललं.
आमचं कुटुंब तिघांचं. पती चांगल्या नोकरीत. पैशाला अजिबात ददात नव्हती, पण तरीसुद्धा घरात सुख नव्हतं. आपुलकी नव्हती. दिसायला घर सुखवस्तु होतं, पण आम्ही दोघी त्रस्त होतो. कारण नवऱ्याचं वागणं. त्याचा दरारा म्हणजे अंधश्रद्धांचा त्यांच्यावर असलेला पगडा! आम्हाला दोघींना हे पटत नव्हतं. पण जबरदस्तीने आम्हाला ऐकावं लागत असे. घरातील वातावरण पारंपरिक असावं असा त्याचा अट्टहास होता आणि ते स्वत: मात्र घराबाहेर नको तेवढे बेताल वागत होते. हे सगळं मुलगी बघत होती, पण बोलत नव्हती. घरातील वातावरणामुळे मुलीवरही परिणाम होत होता. ती ऐकेनाशीच झाली. तिचे पाऊल वाकडे पडायला लागल्याचा मला संशय आला. अभ्यासात ती चांगलीच होती, पण मार्क कमी कमी होत गेले आणि बारावीत तर ती चक्क नापास झाली. तेव्हा मात्र माझे धाबे दणाणले.
आणि मला एक कठोर मार्ग स्वीकारावा लागला. एक ठाम निर्णय मी घेतला की, यापुढे नवऱ्याचे काहीही ऐकायचे नाही. पटले नाही तर त्याला सडेतोड उत्तर द्यायचे. एकदा त्यांना निक्षून सांगितले, ‘आजपासून मुलीची जबाबदारी माझी. तिचे जे काही बरे-वाईट होईल त्याला मी जबाबदार राहीन. तुम्ही तिला कोणत्याही बाबतीत बेलायचे नाही.’ तेव्हापासून मुलीच्या मागे खंबीरपणे उभी राहिले. मुलीला विश्वासात घेऊन आश्वस्त केले. हळूहळू तिचा आत्मविश्वास वाढला.
नवरा मला छळतच होता, वेळप्रसंगी अंगावर हात टाकत असे, हे सर्व मी व मुलगी सहन करत होतो. पण मनाप्रमाणे निर्णय घेण्याचे सुख आम्ही अनुभवत होतो. मुलीने आवडती शाखा निवडली. तिचे महाविद्यालयही तिने स्वत:च्या इच्छेने ठरविले. मुलगी इंजिनीअर झाली. (डिप्लोमा व नंतर डिग्री) चांगली नोकरी लागली. आज ती सुस्थितीत आहे. मी तिच्यामागे ठामपणे उभी राहिली नसते तर नवऱ्याने तिला इतके स्वातंत्र्य दिले नसते, याची आम्हाला कल्पना आहे.
आता कधी नवरा लोकांपुढे माझी मुलगी म्हणून कौतुक करतो, तेव्हा मी ठासून सांगते, ‘माझी मुलगी’ हा शब्दप्रयोग तू करायचा नाहीस. ती फक्त माझी आहे.’ माझ्यामुळे आज या जागी स्थिरावली आहे.
अनामिक

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 15, 2014 1:23 am

Web Title: take decision to take job
टॅग : Chaturang
Next Stories
1 ‘मला सांगा मनातलं’
2 काय करू मी?
3 अंतर्मुख करणारा लेख
Just Now!
X