13-kha…गुलाबी थंडी हळूहळू सुरू झाली आहे. थंडीमध्ये आजी-आजोबांच्या दृष्टीने काळजीची बाब म्हणजे हाडं वाजायला लागतात किंवा सर्दी-पडसं / दम लागणं वगैरे तब्येतीच्या कुरबुरी चालू होतात. मात्र चांगली गोष्ट म्हणजे भूक थोडी सुधारते आणि त्याचा फायदा घेऊन योग्य आहाराने तब्येतीत सुधारणाही होऊ शकते. आज आपण थोडी सोप्पी आणि आरोग्यदायी पाककृती म्हणता येईल अशा ‘सूप्स’ चे प्रकार बघू या. मधल्या वेळी किंवा नाश्ता-जेवणांमध्ये यांचा समावेश केला तरी चालेल. म्हणजे तब्येतीच्या तक्रारीही काहीशा कमी होतील. 

पोषक आहाराचे चांगले स्रोत- त्या त्या गुणधर्मानुसारही खालील पदार्थाचा सूप बनवताना विविधप्रकारे उपयोग करता येईल.
लोह-कडधान्यं, भाजलेले सोयाबीन, डाळी, सुकामेवा, गडद हिरव्या भाज्या, अळीव
कॅल्शियम- दूध आणि दुधाचे पदार्थ, नाचणी भाकरी, डाळी, सुकामेवा, गडद हिरव्या भाज्या, काजू आणि तीळ, राजगिरा
विटामिन बी- बटाटे, दूध आणि दुधाचे पदार्थ, धान्ये (सालीसकट)
फोलेट वा फॉलिक अ‍ॅसिड– हिरव्या पालेभाज्या, विशेषत: मोड आलेली कडधान्ये,पालक, फरसबी, मटार, बटाटे, फळे- केळी विशेषत संत्रा.
व्हिटॅमिन सी- फळे आणि भाज्या, विशेषत: लिंबूवर्गीय फळे, बोरासारखे बी असलेली लहान फळे, किवी फळ, टोमॅटो, हिरव्या पालेभाज्या, आवळे आणि नवीन बटाटे.
हिवाळ्यातले पौष्टिक पदार्थ – हिरवा लसूण, मोहरीचा पाला, आंबे हळद, आवळे, बोर वगैरे
रसम पावडर –
साहित्य- ३/४ कप धणे , २० लाल मिरच्या , तूर डाळ १/४ कप, १/४ कप चणा डाळ , मिरपूड ३ चमचे, जिरे ३ चमचे, १ /२ टीस्पून हिंग
सर्व पदार्थ सुके भाजून पावडर करून ठेवा.
फोडणीसाठी तूप, जिरे किंवा मोहरी, कढीपत्ता आणि सुकी मिरची
शिजवून घोटलेली पातळ तुरीची डाळ घ्या. शिजतानाच डाळीत शेवगा शेंगा, भोपळा, भेंडी, वांगी वगैरे भाज्या घालून त्यात रसम मसाला घालून उकळा आणि फोडणी द्या. चवदार रस्सम तयार.
चवदार सूप
कोथिंबीर, कांदा आणि गाजर (मोठे तुकडे), लसूण, तमालपत्र- पाणी वरील सर्व जिन्नस घालून उकळून घ्यावे आणि हे ‘चवदार’ पाणी कोणत्याही सूपचा बेस म्हणून वापरावे.
सूपसाठी भाज्या- दुधी / भोपळा / टोमॅटो / फरसबी / गाजर / शिराळे / बीट / पालक / मक्याचे दाणे वगैरे
शेवगा शेंगा सूप-
उकडलेल्या शेवग्याच्या शेंगांचा पल्प + पातळ तूर डाळ + रसम पावडर आणि फोडणीत कांदा-लसूण पेस्ट आणि कढीपत्ता, तूप-जिरं, हळद.
जादूई क्रीम सूप
लाल भोपळ्याच्या फोडी, भिजवलेले बदाम आणि थोडे दूध आणि पाणी एकत्र शिजवून घ्या आणि मिक्सरमधून मिक्स करून घ्या. स्वादाला सैंधव आणि जायफळ पूड घाला. अप्रतिम क्रिमी सूप तयार.
आजी-आजोबांनो, थंडी मस्त एन्जॉय करा..