25 November 2020

News Flash

तळ ढवळताना : कन्यादान वगैरे वगैरे..

आपली मुलगी अशा प्रकारे कोणाची तरी गुरुदक्षिणा देण्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी वापरायला देणं हा खरं तर आज विचार करता गुन्हाच आहे.

| May 25, 2019 02:00 am

(संग्रहित छायाचित्र)

नीरजा

लग्न हा एक इव्हेंट मानणारी आणि त्यातले विधी कौतुकानं करणारी आजची मुलं कन्यादानासारख्या प्रथांमागे नेमकं काय दडलं आहे याचा शोध घेणार आहेत की नाही? आपलं दान केलं जातं आहे हे आजच्या उच्चशिक्षित, करिअर करणाऱ्या मुलींना कळणार आहे की नाही? हा विधी करून पुण्य आणि आनंद मिळवणाऱ्या मुलीच्या पालकांनी ‘आंधळेपणानं रूढीपरंपरांच्या नावावर हे काय चाललं आहे युगानुयुगे?’ असा साधा प्रश्नही विचारू नये याचं वाईट वाटतंच, पण संतापही येतो.

अलीकडेच माझ्या एका मत्रिणीच्या मुलीचं लग्न झालं. ही मत्रीण कोणी लेखिका नाही, समुपदेशक नाही, सामाजिक चळवळीत काम करणारी कार्यकर्ती नाही की बंडखोर स्त्रीमुक्तीवाली वगैरेही नाही. ऐंशीच्या दशकात मुंबईत मध्यमवर्गीय कुटुंबातील अनेक मुली शिकल्या आणि नोकरी करण्यासाठी बाहेर पडल्या. त्यातलीच ही एक.

पहाटे उठून कुटुंबासाठी जे जे गरजेचं असतं ते करून रोजचा लोकल ट्रेनचा प्रवास करणारी ही माझी मत्रीण आणि मी एकाच गाडीच्या सहप्रवासी. बऱ्याचदा गाडीत भेट व्हायची. ही बोलघेवडी, प्रेमळ, सगळ्यांनाच जीव लावणारी. कितीही थकली तरी प्रसन्न असणारी, वेगवेगळे पदार्थ करून आम्हाला खाऊ घालणारी आणि सासर-माहेरची नाती निगुतीनं जपणारी. मी क्वचित कधी तरी भेटायचे तिला, पण तरीही लोभ ठेवणारी. तिच्या मुलीच्या लग्नाचं आमंत्रण आम्हा ट्रेनच्या मैत्रिणींना मिळालेलं. मला जाता आलं नाही, पण हे लग्न ठरल्यापासून ते होईपर्यंत या लग्नाच्या कहाण्या वर्षभर आम्ही ऐकत होतो. त्या साऱ्या काळात वेगवेगळ्या कारणांनी तिची होणारी दमछाक अनुभवत होते मी.

हिच्या मुलीचा प्रेमविवाह. तिला वाटलं होतं रजिस्टर लग्न करतील दोघं. पण मुलीला आणि त्या मुलालाही साग्रसंगीत विधिवत  लग्न करायचं होतं. मग ही म्हणाली, ठीक आहे. तशी ती खूप बंडखोर वगैरे नाही, पण तिचीही काही मतं आहेत. मुहूर्त वगैरे पाहिला आणि तारीख ठरवली ती त्याच्या घरच्यांनी. तेव्हा एक दिवस ती मुलाला म्हणाली, ‘‘तुम्हाला हवं तसं करा लग्न, फक्त कन्यादानाचा विधी नको. मला नाही जमणार माझ्या मुलीचं दान करायला.’’ मुलाला काही कळेचना. ‘कन्यादान करणं ही आपली परंपरा आहे’ असं तो शिकलेला. त्यामुळे ‘हा विधी का नाही करायचा?’ हा भला मोठा प्रश्न त्याच्यासमोर उभा राहिला. खरं तर त्याला हा ‘कल्चरल शॉक’च होता. त्याचं आईवर विलक्षण प्रेम आणि त्याच्या आईचं रूढीपरंपरा, कर्मकांडावर. तरी त्यानं सांगितलं आईला. तर ती आणि घरातले सगळेच बिथरले. वर्षांनुवर्षांची परंपरा आहे आपली. असं कसं करणार नाही? परंपरा पाळायला नको का? हे काय भलतंच, वगैरे वगैरे. त्याचं घर रणांगण झालं आणि लढणारा तो एकटाच. त्याच्यावरचा ताण मुलीवर आला. मुलीवर ताण आला तसं माझ्या मत्रिणीवरही आला. मग तिच्या स्वभावानुसार नेहमीप्रमाणे कमीपणा घेतला माझ्या या मत्रिणीनं आणि झाली तयार. पण ती स्वत: नाही बसली विधीसाठी. तिच्या हौशी जावेला ‘मान’ दिला तिनं. दिरांना दोन्ही मुलगे. त्यामुळे कन्यादानाचं पुण्य मिळणार आपल्याला या कल्पनेनं जाऊबाई खूश झाल्या. पण माझ्या ट्रेनमधल्या मैत्रिणी मात्र रुसल्या तिच्यावर. त्या दिवशी आली नव्हती ती. तर आमच्यातली एक म्हणाली, ‘काय बावळट आहे गं ही. कन्यादानाचं एवढं मोठ्ठं पुण्य गमावलं तिनं. आम्ही किती सांगितलं पण नाही बसली.’ मी मनातल्या मनात पाठ थोपटली माझ्या या कायम कमीपणा घेणाऱ्या, दुसऱ्यांच्या सुखात आनंद शोधणाऱ्या मैत्रिणीची. एकदा तरी मनाचा कौल ऐकला तिनं याचा आनंद झाला मला. त्या दिवशी मी माझ्या या ग्रुपमध्ये बोलले थोडसं, ‘तिनं कसा योग्य निर्णय घेतला’ वगैरे. पण अनेक जणीचं मत पडलं, तुझं नेहमीच काही तरी जगावेगळं असतं. मी हसले आणि म्हटलं,

‘विचार केलात थोडासा तर नाही वाटणार गं जगावेगळं वगैरे.’ मग सगळ्या दुसऱ्याच विषयात गुंतल्या. मला मनावेगळं करून.

माझ्या या मैत्रिणींनाच नाही तर आज समाजातील अनेकांना कन्यादानाचं हे पुण्य सगळ्यात मोठं पुण्य वाटतं. त्यामुळेच अजूनही प्रत्येक लग्नात हा विधी कोणतेही प्रश्न न विचारता आनंदानं केला जातो. खरं तर पापपुण्याच्या आपल्या कल्पनांविषयी न बोललेलंच बरं. खुर्चीखालून पैसे घ्यायचे, धान्याचा काळाबाजार करायचा आणि मग कबुतरांना किलोभर धान्य खायला घालून पुण्य मिळवायचं. गाईला मारल्याच्या नुसत्या संशयावरून कोणाचा तरी खून पाडायचा आणि आपल्या मनातले हिंसक विचार जावेत, शांती लाभावी म्हणून कुठल्या तरी देवळासमोर बसलेल्या गाईला तिची खाण्याची इच्छा नसतानाही तुपाची धार घालून वरणभाताचा नवेद्य केळीच्या पानावर वाढायचा, नाही तर गंगेच्या गढुळलेल्या पाण्यात डुबक्या मारायच्या, अधूनमधून एखाद्या मंदिराला सत्पात्री दान वगैरे करायचं. ही अशा प्रकारची पुण्यं कमावण्याच्या गडबडीत ती कशामुळे पुण्यं ठरतात याचा अनेकदा विचारही केला जात नाही.

मुलीला वस्तू म्हणून दान करण्यानं नेमकं कोणतं पुण्य मिळतं आपल्याला? आईबापाला कोणत्या तरी पुण्याची आशा लावून त्यांना हे दान करायला लावणारी आपली संस्कृती स्त्रीला कायम एक वस्तू मानत आली आहे. आणि तीही अगदी विनिमय करता येण्यासारखी वस्तू. आपण ज्या संस्कृतीचं गुणगान गातो त्या संस्कृतीत द्रौपदीला पाच पांडवांनी वाटून घेतलं तेव्हाही त्यांनी तिला वस्तूच मानलं होतं. आज त्या कथेचे कितीही वेगवेगळे अन्वयार्थ लावले गेले तरी भिक्षा संबोधून तिचं माणूसपण आणि एक व्यक्ती असणंही नाकारलंच. ‘तिला या पाच जणांची पत्नी व्हायचंय की नाही?’ असा साधा प्रश्न विचारावासा वाटला नाही तेव्हा कुणालाच आणि पुढे कौरवांबरोबरच्या द्युतात डावाला लावतानाही तिला पुरुषाची संपत्ती म्हणूनच लावलं गेलं. ती भांडली, चिडली, हा अधिकार अधर्मानं वागणाऱ्या धर्माला कुणी दिला असा प्रश्नही केला. पण तिच्या प्रश्नांची उत्तरं कोणाकडेच नव्हती. आजही नाहीत. अधर्मालाच दान देणाऱ्या अशा किती द्रौपदींचं तेव्हापासून आजपर्यंत वस्त्रहरण होत राहिलं आहे.

याच महाभारतातील एका उपाख्यानात माधवीची गोष्ट आहे. माधवी ही ययातीची मुलगी. कायम कुमारिका राहण्याचा वर मिळालेल्या माधवीचं ययाती चार वेळा दान करतो. का, तर गालव या विश्वामित्राच्या शिष्याला आपल्या गुरूला आठशे श्यामकर्णी अश्वमेधी घोडय़ांची गुरुदक्षिणा द्यायची असते म्हणून. असे घोडे पूर्ण आर्यवर्तात कोणाकडेच नसतात. म्हणून गालव ययातीकडे मदत मागायला येतो. हे असे प्रत्येकी दोनशे घोडे वेगवेगळ्या तीन राजांकडे असतात. ते मिळविण्यासाठी त्या राजांनी घातलेल्या अटीनुसार एक-एक वर्षांसाठी ययाती आपली मुलगी माधवी हिला त्या राजांना दानात देतो. माधवीला लैंगिक संबंधांनंतरही कुमारिका होण्याचा वर असल्याने (हे कसे ते आपली पुराणंच जाणोत) ती या तीन राजांकडे एक एक वर्ष राहते आणि गालवाला सहाशे घोडे मिळवून देते. उरलेले दोनशे घोडे खुद्द विश्वामित्रांकडेच असतात. म्हणून ते मिळविण्यासाठी ययाती तिला त्यांच्याकडेही पाठवतो.

आपली मुलगी अशा प्रकारे कोणाची तरी गुरुदक्षिणा देण्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी वापरायला देणं हा खरं तर आज विचार करता गुन्हाच आहे. जसा गुरांचा बाजार असतो तसाच पूर्वी स्त्रियांचा बाजार असायचा. अगदी अलीकडच्या काळातही अशाच एका बाजारातून खरेदी करून आणलेली कमला विजय तेंडुलकरांच्या ‘कमला’ या नाटकात आपल्याला भेटली आहे. स्त्रीला विक्रीची वस्तू समजून पशांसाठी तिला दलालांना विकणाऱ्या मंडळींत काही वेळा बापाचाही सहभाग असतो. कायद्याने बंद केली असली तरी परंपरांच्या नावाखाली आजही देवदासीची प्रथा पुढे नेणारे आईबाप आपल्याकडे दिसतातच. माधवीच्या कथेतल्या बापात मला असे बाप दिसायला लागतात. या कथेत ययातीनं माधवीच्या मनाचा विचार केलेला दिसत नाही. एकूणच गुरुदक्षिणा देण्यासाठी तळमळत असलेल्या शिष्याचं उदात्तीकरण आणि त्याला उपयोगी पडणाऱ्या दानशूर राजांचं गौरवीकरण करण्याच्या नादात या मुलीच्या मनाचा विचार या कथेच्या लेखकानंही केला नाही. त्याचं कारण मागच्या एका भागात मी म्हटल्याप्रमाणे आपल्या समाजात स्त्रीकडे एक व्यक्ती म्हणून न पाहता एक वस्तू म्हणून पाहिलं आहे आणि तिला पुरुषांच्या मालकीहक्काची गोष्टच मानलं आहे.

गृहीतकावर आधारलेली कन्यादानाची ही प्रथा वर्षांनुवर्ष आपल्याकडे पाळली जाते आहे. मृत्यूनंतर अंत्यसंस्कार करण्यासाठी जसा पुत्र गरजेचा असतो तशीच सर्वात मोठय़ा दानाचं हे पुण्य मिळवण्यासाठी कन्या आवश्यक असते. वैदिक काळात ही प्रथा असल्याचे संदर्भ सापडत नाहीत. पण मनुस्मृतीमध्ये याचे संदर्भ सापडतात. त्या काळात केवळ उच्च वर्णातील मुलावर उपनयन संस्कार करून त्याला गुरुगृही पाठवलं जात होतं. पण त्याच वर्णातील मुलीला शिक्षणाचा अधिकारच नसल्यानं हा संस्कार तिच्यावर केला जात नव्हता. त्यामुळे स्त्रियांचा विवाहविधी हाच त्यांचा उपनयन संस्कार मानला जात होता. मन्वादिक स्मृतीकारांचे तसे मत होते. स्त्रियांना निराळा गुरुकुलवास करावा लागत नाही. पतीसेवेतच त्याचा अंतर्भाव होतो इति. मनुस्मृतीतील अध्याय २, श्लोक- ६७ मध्ये सांगितले आहे. त्यामुळे मुलीच्या लग्नावेळीच ब्राह्मणाने जलदानपूर्वक म्हणजे ‘ही मुलगी मी तुला दिली आहे, आता हिजवर माझा अधिकार नाही’ असे म्हणून पाणी सोडून कन्यादान करणे योग्य होय, असे सांगितले आहे (अध्याय ३-३५). एवढंच नाही तर ‘एवढी वर्ष मुलगी नावाची ही जबाबदारी सांभाळली, आता यापुढे ती पती नावाच्या पुरुषानं सांभाळावी’ असं म्हणत बाप नावाच्या पुरुषाला जबाबदारीतून मोकळं करायचाही हा विधी असल्याचं स्मृतीकारांनी सांगितलं असल्याने कन्यादान हा विवाहविधीतील मुख्य भाग बनला.

मुलीच्या मनाचा विचार न करता तिला दानात देण्याची ही प्रथा शतकानुशतके चालू आहे आणि आजही धर्मशास्त्राच्या नावाखाली विवाहविधीतला महत्त्वाचा भाग म्हणून आपण कन्यादानाचा विधी कोणताही प्रश्न न विचारता करतो आहोत. हा विधी करून पुण्य आणि आनंद मिळवणाऱ्या मुलीच्या पालकांनी ‘आंधळेपणानं रूढीपरंपरांच्या नावावर हे काय चाललं आहे युगानुयुगे?’ असा साधा प्रश्नही विचारू नये याचं वाईट वाटतंच, पण संतापही येतो.

खरं तर आजचे बहुतांशी पालक मुलींना गळ्यातली धोंड किंवा जबाबदारी असं मुळीच समजत नाहीत. ते तिच्यावर मुलाइतकंच प्रेम करतात. तिच्या शिक्षणासाठी मुलांएवढाच खर्च करतात. पण तरीही, कधी आपण करत असलेल्या विविध कर्मकांडांचे अर्थ समजून न घेता, तर कधी लग्न सुरळीत पार पडावं, विवाहात राग-रुसवे नसावेत म्हणून अनेकदा इच्छा नसतानाही हा विधी करताना दिसतात. मला आश्चर्य वाटतं ते या उच्चशिक्षित मुलांचं. एकविसाव्या शतकातली ही मुलं म्हणजेच स्वत: मुलगी आणि तिच्याशी लग्न करणारा मुलगाही या गोष्टीचे अर्थ समजून घेत नाहीत, तेव्हा ते नेमके कोणत्या काळात राहताहेत हा प्रश्न पडतो.

ज्या काळात ही प्रथा सुरू झाली तो काळ स्त्रीला वस्तू मानण्याचा काळ होता. पण आज काळ बदलला आहे असं आपणच म्हणतो आहोत. अशा काळात या पुरुषसत्ताक समाजाला जाब विचारायचं सोडून या प्रथा-परंपरांच्या नावाखाली तिला पुन्हा एकदा साधन संपत्ती बनवून बाप नावाचा पुरुष त्याची ही संपत्ती पती नावाच्या दुसऱ्या पुरुषाच्या हाती सोपवतो आहे. अशा वेळी लग्न हा एक इव्हेंट मानणारी आणि त्यातल्या विधी कौतुकानं करणारी आजची मुलं या प्रथांमागे नेमकं काय दडलं आहे याचा शोध घेणार आहेत की नाही? आपलं दान केलं जातं आहे हे आजच्या उच्चशिक्षित, करिअर करणाऱ्या मुलींना कळणार आहे की नाही? ‘या विधींमध्ये दान केवळ मुलींचं होतं आणि मुलांचं नाही आणि ते का नाही’ असा साधा प्रश्न आजच्या सुशिक्षित मुलींच्या आणि त्याच्या आईबापांच्या मनात येणार आहे की नाही? केवळ ‘आपल्या पूर्वजांनी सांगितलं आहे ते थोडं ऐकलं तर काय बिघडतं’ असं म्हणत या चुकीच्या प्रथांचं समर्थन करणाऱ्या या एकविसाव्या शतकातील तथाकथित आधुनिक पिढीतील पालकांनी आणि त्यांच्या मुलांनी आपल्या उदात्त वगैरे भारतीय संस्कृतीची झापडं डोळ्यांवर लावली असतील तर त्यांचे डोळे उघडण्याची वेळ आली आहे, असं वाटतं.

neerajan90@yahoo.co.in

chaturang@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 25, 2019 2:00 am

Web Title: tal dawaltana article by neerja 10
Next Stories
1 ‘पृथ्वी’ प्रदक्षिणा : दिवसाला ४८५ कपडे?
2 शिक्षण सर्वासाठी : उडदामाजी काळे-गोरे
3 वचनभंगाची बळी
Just Now!
X