22 July 2019

News Flash

 सौंदर्यापलीकडचं संचित

तळ ढवळताना

| March 16, 2019 01:09 am

(संग्रहित छायाचित्र)

नीरजा

केरळमधील कोचीन येथे दर दोन वर्षांनी भरणारं कला प्रदर्शन म्हणजेच ‘कोची बिनाले’. येथील इमारतीतलं प्रत्येक दालन भरलं होतं कलाकारांच्या मनातल्या अस्वस्थतेनं, कधीतरी अचानक कळलेल्या किंवा कळलं असं वाटणाऱ्या जगण्यानं, हव्याशा वाटणाऱ्या स्वातंत्र्यानं, खूप आत दडलेल्या भयानं, सगळं संपून गेल्याच्या भावनेनं, नराश्यानं आणि मनात भरून आलेल्या करुणेनंही..

अनेक दालनांचा भलामोठा प्रासाद. प्रत्येक दालनात शेकडो रंगांची उधळण कोऱ्या कॅनव्हासवर. या रंगातून वाट काढत आपण चालू लागतो तेव्हा अनेकदा मनात पारंपरिक कलादालनांचं चित्र असतं. सौंदर्याची आभा पसरलेली कलेची दालनं म्हणजे मुक्त ठेवाच असतो आपल्यासाठी. या दालनात निसर्गाचे विविध विभ्रम, राजा रविवर्मा यांच्या चित्रांसारखे वेगवेगळे चेहरे, वेगवेगळ्या भावमुद्रा, शरीराची वेगवेगळी ठेवण असलेल्या मोहवणाऱ्या स्त्रिया दिसतील असं वाटतं. पण त्याऐवजी समोर येतात देवाच्या बागेतील सफरचंद छातीवर पेलून योनीतून हसणारी मुक्त तरुणी. झुळझुळणारी पाण्याची धार नाही दिसत कुठंच. दिसतात ते अचानक आलेले आणि सारं उद्ध्वस्त करणारे पूर. छताला लटकलेल्या खांबांना लगडलेली आणि टोकदार बाणांनी आरपार छेदलेली हजारो माणसं.

काही कलाकार आणि रसिक हे असं मोहवणाऱ्या सौंदर्यापलीकडचं काहीतरी शोधत असतात. एक एक दालन पार करत ते पोचू पाहतात त्या शेवटच्या दालनात किंवा त्या दालनांच्या मागे कुठं तरी असलेली अंधाऱ्या खोलीत. तळघरात ठेवलेल्या अनाकलनीय गोष्टींविषयी कुतूहल असतं त्यांच्या मनात. त्याचा अर्थ शोधायचा असतो त्यांना त्यांच्या पद्धतीनं. आत आत खोल काहीतरी सापडेल या आशेनं फिरत राहतात या दालनातून त्या दालनात. कधी आपलं हरवलेलं किंवा अजूनही न सापडलेलं स्वत्त्व शोधू पाहतात तिथं किंवा आजवर न कळलेला जगण्याचा अर्थ सापडतो का याचाही शोध घेऊ पाहतात. रंगाचे, शब्दांचे वेलांटीसारखे फटकारे गुंतवून ठेवत असले तरी त्यात नाही रमत ते. त्यापलीकडचं पाहायचं असतं काहीतरी. पण सारी दालनं पार केली तरी लागत नाही अर्थ कशाचाच, उलट वाढत जातं ओझं ठिकठिकाणी मिळालेल्या अनुभवांचं आणि मनातला संभ्रम वाढत जातो..

माझंही असंच काहीसं झालं फोर्ट कोची येथील अ‍ॅस्पीन वॉल हाऊसच्या परिसरात फिरताना. केरळमधील कोचीन येथे दर दोन वर्षांनी भरणारं कला प्रदर्शन म्हणजेच ‘कोची बिनाले’ बघण्याची आपण सुरुवात करतो ती या मुख्य इमारतीतूनच. त्या इमारतीतलं प्रत्येक दालन भरलं होतं कलाकारांच्या मनातल्या अस्वस्थतेनं, जगता जगता हरवून गेलेल्या क्षणांनी, कधीतरी अचानक कळलेल्या किंवा कळलं असं वाटणाऱ्या जगण्यानं, हव्याशा वाटणाऱ्या स्वातंत्र्यानं, खूप आत दडलेल्या भयानं, सगळं संपून गेल्याच्या भावनेनं, नराश्यानं, मनात भरून आलेल्या करुणेनं.

भारतातले आणि देशोदेशीचे अनेक चित्रकार, शिल्पकार, पॉटरस, संगीतकार, नव्या तंत्रज्ञानानं जगणं आकळून घेण्याचा प्रयत्न करणारे अनेक कलाकार गेले तीन महिने येऊन बसले आहेत तिथं. आपापले पडाव टाकून. आपल्यात असलेल्या साऱ्या शक्यतांना आजमावून, जगणं समजावून घेणारे हे कलाकार त्यांना जाणवलेले जगण्यातले ताणेबाणे, आनंद, वेदना, सल, मानवी मनाचे गुंते, विविध मुखवटे घेऊन जगणारी माणसं, त्यांचे स्वभावविशेष, समाजातील सत्ताकारण, माणसामाणसातलं राजकारण, पर्यावरण, जातव्यवस्थेच्या पलीकडे पोचलेली सहोदराची भावना वेगवेगळ्या कलाकृतीतून व्यक्त करत होते तिथं. दर दोन वर्षांनी भरणाऱ्या या कलोत्सवात सर्जनाच्या साऱ्या शक्यता आजमावत ते. आपल्या भावना कधी शब्दांतून, तर कधी सारे रंग कॅनव्हासवर पसरवून तर कधी दृष्यांतर करून, त्याला संगीताचा साज देऊन, कधी प्रतिमा एखाद्या रंगात अथवा कोणत्या तरी मॅटरमध्ये भरून

सादर करत होते ते आपापल्या कलाकृतीतून. आणि रसिक कधी विस्मयचकित होऊन, कधी भारावून जात त्या कलाकृती आपापल्या परीनं समजावून घेण्याचा प्रयत्न करत भटकत होते एका दालनातून दुसऱ्या दालनात. तिथून बाहेर पडल्यावर मनात साठवलेल्या त्या कलाकृतीतून आपल्याला नेमकं काय कळलं याच्याविषयी कधी मित्राशी तर कधी स्वत:शीच चर्चा करत होते.

खरं तर हे आर्ट फेस्टिव्हल पाहणं ही एका दिवसात फिरून उरकण्याची गोष्ट नाहीच. एखादी दीर्घ कविता पुन:पुन्हा वाचत जावी आणि प्रत्येक वेळी ती नव्यानं समजून यावी असं काहीसं असतं कोणत्याही कलेचं. इथंही तोच अनुभव येतो. संपूर्ण कोची शहरात अनेक ठिकाणी ही ‘इन्स्टॉलेशन्स्’ दिसतात आपल्याला. हातातला नकाशा सांभाळत अख्खं कोची शहर पालथं घालावं लागतं तेव्हा कुठे हाती काहीतरी लागल्याचा आनंद मिळू शकतो आपल्याला. या कलोत्सवात केवळ सर्जनाचा आविष्कार नव्हता तर सोबत वेगवेगळ्या सामाजिक प्रश्नांना आणि जगण्यातल्या गुंत्यांना भिडण्याचा प्रयत्न करत होते लोक. आणि त्याविषयीच्या चर्चाही रंगत होत्या वेगवेगळ्या मंचावरून.

१२ डिसेंबर २०१८ पासून जगातल्या अनेक कलाकारांच्या कलाकृती ‘कोची बिनाले’मध्ये आपली वाट पाहताहेत. महाराष्ट्रातील अनेक कलाकार इथं पोचलेले आहेत. महाराष्ट्रातील कोकणातील माणगाव-इंदापूरजवळ असलेल्या आकार पॉटसचे, आपल्या बोटांनी अनेक आकार-चेहरे घडवणारे राजेश कुलकर्णी, सुप्रसिद्ध चित्रकार राजू सुतार, वैशाली ओक, संगीत आणि नृत्यातून बोलणारे ऋषिकेश पवार, संदीप सोनावणे अशा अनेक दिग्गजांचा सहभाग या ‘बिनाले’मध्ये आहे. राजेश कुलकर्णी यांनी उभं केलेलं अनेक छोटय़ा मोठय़ा मातीच्या कुंभांचं, चेहऱ्यांचं, मुखवटय़ांचं, वस्तूंचं जाळं म्हणजे जणू काही अनेक धाग्यांत बांधून उभा केलेला समाजच होता आपला. प्रेम, विश्वास आणि बंधुभावाच्या नाजूक धाग्यांनी बांधलेला समाज नावाचा डोलारा लांबून सुंदरच दिसत असतो. पण त्या धाग्याला भय आणि हिंसेचं नख जरी लागलं तरी कोसळू शकतो हा सारा समाज आणि उद्ध्वस्त होऊ शकतो हेच जणू सांगण्याचा प्रयत्न करत होता हा कलाकार.

राजू सुतार यांनी विविध रंग आणि आकारमितींनी एका प्रचंड लांबलचक भिंतीवर चितारलेलं चित्र विचाराला मूर्त आकार देण्याचाच प्रयत्न करत होतं. विचार हा अमूर्त असतो असं मानतो आपण. कारण तो दिसत नाही. पण सुतारांनी त्याला मूर्त केलं. संविधान हा एक विचार आहे आणि तोही मूर्तच आहे हे ते पुन:पुन्हा सांगत होते आणि आपल्याला ते पटत होतं. आयुष्यात काहीतरी भव्य करण्याच्या ध्यासातून माणूस आपली पहिली निर्मिती आपल्या हातानं नष्ट करतो. तसंच विचारांचंही असतं. आपल्या हातानंच विचारांचीही तोडमोड व्हायला हवी. या तोडमोडीतून कदाचित हाती काही निर्थकही येऊ शकतं, पण आपण हे विरेचन सतत घडवून आणणं गरजेचं आहे नाहीतर विचारांचंही एक ठरावीक डबकं होऊ शकतं असं काहीसं संदीप सोनावणे यांच्यासकट या सगळ्याच कलाकारांना वाटत होतं. केवळ महाराष्ट्रातील नाही तर संपूर्ण भारतातून आणि जगातूनही म्हणजे, लेबनॉन, केनियापासून ते अगदी युरोपातील विविध देशांतून आलेले कलाकार आपला स्वत:चा असा एक विचार घेऊनच तिथं आलेले दिसत होते.

अ‍ॅस्पीन वॉल हाऊसच्या परिसरात तर एक प्रचंड मोठी गुहाच खुली होते तुमच्यासाठी. एखाद्या दालनातला पडदा बाजूला सारून तुम्ही आत शिरता आणि समोर सलग आठ स्क्रीनवर तुम्हाला दिसायला लागतो माणसाचा प्रवास. वेगवेगळ्या धर्माच्या, संस्कृतीच्या झेंडय़ाखाली सुरू झालेला. प्राचीन काळापासून आजपर्यंत चालत निघालेला माणूस कधी विकलांग तर कधी उन्मादी, कधी जगण्याचं ओझं ओढत तर कधी विकासाचा वेग पकडत चालत असतो निर्थक, पण न कंटाळता. आजच्या थांब्यावर प्रवास संपल्यासारखा वाटतो पण तुम्ही दुसऱ्या खोलीचे पडदे उघडून आत जाता आणि कळतं तुम्हाला हा प्रवास आपल्याला आज कोणत्या वळणावर घेऊन आला आहे ते. त्या दालनात दिसतं उगवून आलेलं टोकदार भाल्यांचं लांबलचक रान. एखाद्या शेतात उगवून यावं हिंसेचं पीक तसे उगवून आलेले ते भाले आठवण करून देतात शरपंजरी पडलेल्या प्रेम आणि करुणेची. त्या भाल्यांच्या टोकावर लटकलेली कवितेची पानं म्हणजे शब्दांची कलेवरंच. अनेक कवितांच्या पोटात खुपसलेली शस्त्रं दिसत असली जमिनीवर तरी आसमंतातून मात्र त्या कवितेतले शब्द पोचत राहतात आपल्या कानातून मनापर्यंत. वरून सोडलेल्या माइक्समधून आवाज येत राहातो कवीचा. शब्दांना लटकवले जाण्याच्या, आवाज बंद करण्याच्या आजच्या काळाच्या पाश्र्वभूमीवर शेवटी कविताच बोलत राहाते जगाच्या अंतापर्यंत हे सुखावून जातं.

प्रत्येक दालनात काहीतरी वेगळं सापडतं आपल्याला. कुठं माणसाचा जीवसृष्टीपासून आजवर झालेला प्रवास, कुठं उद्ध्वस्त झालेल्या अनेक प्रदेशांची वेदना दाखविण्यासाठी नकाशाच्या रेषांपर्यंत पसरलेल्या केवळ शवपेटय़ा, तर कुठं बलात्कार किंवा मॉब लिंचिंग थांबवा अशा आशयाच्या ओळी लिहिलेले लाकडाचे विविध शिक्के. एखाद्या दालनात तर चक्क नारायण सुव्र्याच्या कविता बोलत होत्या, तर एका ठिकाणी सर्जनशील लेखकाला लिहिताना गाब्रेज आयडियाज्, वेस्टेड आयडियाज्, नैराश्य, गाडलेल्या स्टोरीलाइन्स, ग्रामर पोलीस अशा कोणकोणत्या ब्लॉक्सना सामोरं जावं लागतं याविषयीचं मार्मिक चित्र लावलं होतं.

अशाच एका दालनात अनेक चेहरे पाहिले विषारी सापांनी वेढलेले. काहींच्या डोळ्यावर विळखा तर काहींच्या कानांवर, काहींचं तोंड बंद केलेलं या अजगरांनी. देवाच्या बागेतला सर्पाचा वेष घेतलेल्या सतानाची आठवण करून देणारे ते साप आपली विचार करण्याची क्षमताच कशी नष्ट करतात हे पाहताना त्या दालनाच्या मध्यभागी ठेवलेली दोन वेगवेगळी शिल्पं नजरेला पडली. धड नसलेले चेहरे. यातील एका चेहऱ्याला मेंदूपासून अगदी मानेपर्यंत फुटलेले केवळ काटे आणि दुसऱ्याला मेंदूपासून अगदी मानेपर्यंत फुटलेले अनेक चेहरे, पण आंधळे. हिंसा आणि विचारांचं द्वंद्व दाखवणारी ती दोन शिल्पं आजच्या परिस्थितीवर भाष्य करत होती. माणसाच्या डोक्यात सतत येणारे हिंसेचे विचार, द्वेषावर आधारित विचारपद्धती यातील एक मुद्रा चितारित होती तर दुसरीमध्ये दिसत होते एकाच वेळी अनेक मेंदू. माणसाची आजची शतखंडित अवस्था ती मुद्रा दाखवत होतीच, पण त्याचबरोबर या तुकडय़ातुकडय़ात विभागल्या गेलेल्या माणसाचं हरवलेलं डोळसपणही अधोरेखित करीत होती.

अनेक कलाकार सीरिया, लेबनॉन सारख्या देशांतून आलेले असल्याने मनुष्यसंहाराच्या, हिंसेच्या करुण कहाण्या समोर येत होत्या, पण त्याच वेळी करुणेचे पंख धरून ठेवलेले हे सर्जनशील कलाकार आपल्याला सहोदर या संकल्पनेचे बाळकडू देत होते. केरळात आजही जातव्यवस्थेमुळे पंक्तीलाही बसू न देणाऱ्या लोकांचा निषेध म्हणून या कलाकारानं त्या त्या जातीतल्या लोकांच्या घरी जाऊन त्यांच्या सोबत जेवण घेतलं आणि त्या प्रत्येक व्यक्तीचे, सहोदराचे पोर्टेट केल्याची कहाणी ऐकली तेव्हा त्याच परिसरात असलेल्या मुक्त स्वयंपाकघराची संकल्पना समजली. हे स्वयंपाकघर आपल्याला साद घालतं. आपल्या वावरानं कोणी अमंगळ होईल किंवा कोणाचं घर विटाळेल याचं भय घेऊन आजच्या काळातही जगणाऱ्या माणसांसाठी हे स्वयंपाकघर म्हणजे जात, धर्म, वंश यांच्या सीमारेषा तोडून माणूस म्हणून जगण्याचा मुक्त अवकाश देणारी जागाच होती. अ‍ॅस्पीन वॉल हाऊसच्या आत असलेलं हे स्वयंपूर्ण स्वयंपाकघर ही या बिनालेची खासियतच होती.

चित्रकला ही आजही एका अभिजात वर्गाची मक्तेदारी राहिली आहे, पण ‘कोची बिनाले’च्या निमित्तानं ती पोचू पाहते आहे तळागाळातील सामान्य माणसापर्यंत. कोणताही सर्जनाचा उत्सव हा केवळ करमणूक करण्यासाठी नसतो, तर तो माणसाला अंतर्मुख करणारा आणि विचारही करायला लावणारा असतो. या निमित्तानं तो वर्गजातवंशिलग यांच्या चौकटीतून बाहेर पडून प्रत्येकाच्या जगण्याशी जोडला गेला हे महत्त्वाचं.

neerajan90@yahoo.co.in

chaturang@expressindia.com

First Published on March 16, 2019 1:09 am

Web Title: tal dawaltana article by neerja 5