28 February 2021

News Flash

ज्येष्ठांचे लिव्ह इन : उत्तरायणाचे गहिरे रंग

गेली दहा वर्षं लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये आणि तेही भारत-जर्मनी असं दूरदेशी राहूनही त्यांच्यातली ओढ आजही कमी झालेली नाही.

तारक काटे आणि मोनिका बुलिटा

सरिता आवाड – sarita.awad1@gmail.com

वयाची साठी पार केल्यानंतर शारीरिक गरजेपेक्षा माणसाला ओढ असते ती निखळ मैत्रीची, मायेची, आपल्या मनातलं सांगायला, ऐकायला कु णीतरी आहे याची. तारक काटे या वनस्पतीशास्त्र अभ्यासकाला हा अनुभव मिळाला तो थेट जर्मनीत. लग्नाच्या कटू अनुभवानंतर त्यांच्यासारख्याच एकाकी पडलेल्या मोनिका बुलिटा त्यांच्या आयुष्यात आल्या आणि एकमेकांच्या सहवासात आयुष्यात गहिरे रंग भरले गेले. गेली दहा वर्षं लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये आणि तेही भारत-जर्मनी असं दूरदेशी राहूनही त्यांच्यातली ओढ आजही कमी झालेली नाही. काय असतं हे एकमेकांसाठी असणं म्हणजे?

२ जानेवारीला ‘ज्येष्ठांचे लिव्ह इन’ या सदरातला पहिला लेख प्रसिद्ध झाला आणि त्यावर वाचकांच्या खूप प्रतिक्रिया मिळाल्या. साशंकता आणि उत्सुकता असे दोन्ही पदर या प्रतिक्रियांना होते. त्यातली एक फोनवरून आलेली अनपेक्षित प्रतिक्रिया वध्र्याच्या तारक काटे यांची होती.

वध्र्याला शाश्वत विकासासाठी काम करणारी ‘धरामित्र’ ही संस्था आहे. तारक काटे त्याचे अध्यक्ष. वनस्पतीशास्त्र आणि पर्यावरण हे त्यांच्या अभ्यासाचे विषय आहेत. सेंद्रिय शेतीसंबंधी ते शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतात. आजतागायत अंदाजे दीड हजार शेतकऱ्यांना त्यांचं मार्गदर्शन लाभलं आहे. गेली अनेक वर्षं ते या कामात मग्न आहेत. तीन वर्षांपूर्वी पुण्यातल्या ‘लोकशाही उत्सवा’चं उद्घाटन त्यांच्या हस्ते पार पडलं होतं, त्या वेळी त्यांनी केलेलं माहितीपूर्ण भाषण आणि त्यांची गंभीर मुद्रा माझ्या लक्षात राहिली होती. त्यामुळे तारक काटे यांचा फोन येणं मला उत्साहवर्धक वाटलं. पण ते जे बोलले त्यामुळे मला आनंद आणि आश्चर्य याचं भरतंच आलं. काटे सरांनी प्रांजळपणे सांगितलं, की त्यांना स्वत:ला ‘लिव्ह इन रिलेशनशिप’चा अनुभव आहे आणि त्यांना हा अनुभव सांगावासा वाटतो. माझा सर्वसाधारण अनुभव असा, की लोकांना ‘लिव्ह इन’चा अनुभव असला तरी त्याबद्दल बोलायला सहसा नको वाटतं. आमच्याबद्दल लिहिताना नावं बदलून लिहा, अशीही काही जण विनंती करतात. या पाश्र्वभूमीवर काटे सरांची व्यक्त होण्याची तयारी हा सुखद धक्का होता. अडचण म्हणजे ते वध्र्याला आणि मी पुण्यात. ‘करोना’च्या सध्याच्या दिवसांत प्रवास कठीण झालाय. भेटणार कसं? मी त्यांना काही प्रश्न ई-मेल केले आणि त्यांची काटे सरांनी मनमोकळी उत्तरं दिली. तीच उत्तरं  लेखाच्या स्वरूपात.

काटे सरांचे वैवाहिक जोडीदाराबरोबरचे संबंध तणावपूर्ण होते. परस्परसंमतीनं २०१२ मध्ये त्यांनी घटस्फोट घेतला. याआधी बराच काळ ते विभक्त राहात होते. मुलांचाही घटस्फोटाला पाठिंबा होता. सरांचं काम तर सुरूच होतं. २००३ ते २०१२ या दरम्यान दक्षिण आफ्रिकेतल्या ‘स्टेलनबॉश विद्यापीठा’त ते ‘व्हिजिटिंग प्रोफेसर’ म्हणून शिकवण्यासाठी जात असत. तिथे त्यांची व्हेरेना या जर्मन विद्यार्थिनीशी ओळख झाली. तिला भारताबद्दल खूप कुतूहल होतं. दौऱ्यादरम्यानच्या भेटीगाठी, गप्पांमधून सरांच्या आयुष्यातल्या उलथापालथीची तिला माहिती झाली. तिची आई मोनिका (बुलिटा)घटस्फोटित होती.  मोनिका जर्मनीत शिक्षिका होत्या, पण घटस्फोटामुळे खूप उदास झाल्या होत्या आणि शाळेच्या नोकरीचा त्यांनी राजीनामा दिला होता. शाईनफेल्ड या जर्मनीतल्या छोटय़ाशा गावात त्या एकाकी जीवन जगत होत्या. व्हेरेनाला या दोघांच्या स्वभावाचा अंदाज आला होता. आपल्या आईनं आणि सरांनी एकमेकांना साथ द्यावी असं तिला वाटलं. या दोघांचे सूर जुळतील याची तिला खात्री वाटत होती. सरांना तिनं ही कल्पना सांगितल्यावर त्यांनी पहिल्यांदा ती झटक ून टाकली. भारत आणि जर्मनी यातला इतका सारा भेद ओलांडून सहजीवनाचा पट कसा विणता येईल, असं त्यांना वाटलं. पण व्हेरेनानं आपला आग्रह सोडला नाही. सरांना आणि आपल्या आईला (मोनिका यांना) परस्परांचे ई-मेल आयडी दिले आणि संवाद साधण्याचा आग्रह केला. तिच्या आग्रहाखातर काटे यांनी मोनिकांशी संवाद साधला. काही महिन्यांनी मोनिकांनी सरांना जर्मनीला बोलावलं. त्याप्रमाणे ते मोनिका यांना भेटले. दोन आठवडे ते एकमेकांच्या सहवासात होते. यानंतर आपण एकत्र येऊ शकतो, आपले सूर जुळतात, असा उभयतांना विश्वास वाटला आणि त्यांनी सहजीवन सुरू करण्याचं ठरवलं. सरांच्या दृष्टीनं ही चमत्काराप्रमाणे अनपेक्षित घटना होती. घटस्फोटानंतर उर्वरित आयुष्य एकटय़ानं काढायची त्यांनी मानसिक तयारी केली होती. पण अनपेक्षितपणे आयुष्यानं वळण घेतलं. हा निर्णय घेतला तेव्हा सरांचं वय ६२ होतं, तर मोनिका ५७ वर्षांच्या होत्या. आता या गोष्टीला दहा वर्षं झाली आहेत.

हे वाचल्यावर व्हेरेनाचं मला विशेष कौतुक वाटलं. इथल्या अनुभवाप्रमाणे आपल्या आई किंवा वडिलांच्या आयुष्यात दुसरी कुठली व्यक्ती येणं ही मुलांच्या दृष्टीनं दुस्सह घटना असते. पण सरांची मुलंही याला अपवाद ठरली. त्यांनीसुद्धा या नव्या नात्याचं स्वागतच केलं. मोनिका दोन आठवडय़ांसाठी भारतात आल्या असताना एका घरगुती समारंभात नजिकचे स्नेही, आप्त यांना बोलावून सरांनी या नात्याची रुजवात करून दिली. मोनिकांनीसुद्धा सर जर्मनीला आले असताना निकटवर्तीयांना बोलावून छोटा समारंभ घडवून आणला. दहा वर्षांच्या एकटेपणांनंतर मोनिकाला सोबत लाभली याचा आनंद सर्वाना झाला. उतारवयात हे उभयता एकमेकांना भावनिक आधार देतील असा दोघांच्याही मुलांना विश्वास वाटला.

या वळणावर माझा नेमका प्रश्न होता, ज्याचं काटे सरांनीही नेमकं उत्तर दिलं, तो म्हणजे ‘लग्न न करता ‘लिव्ह इन’ मध्ये राहाण्याचं का ठरवलं?’. यावर सरांचं उत्तर होतं, ‘‘आम्हाला लग्नाची आवश्यकता भासली नाही.          नवरा-बायको म्हणून एकमेकांवर अपेक्षांचं ओझं लादण्यापेक्षा आम्हाला मित्र-मैत्रिणीच्या निखळ नात्याची जास्त गरज वाटली.’’ नंतर झालेल्या चर्चेतून हेही स्पष्ट झालं की सरांना आपली मुळं भारतात रुजल्याची जाणीव आहे. आपलं कार्यक्षेत्र इथेच असल्याचं भान आहे. त्यामुळे लग्न करून कायमचं जर्मनीला जाणं त्यांना पटलं नाही. मोनिकांना भारतातल्या तापमानाला तोंड देता येत नाही. तरीही हिवाळ्यात कधी त्या इथे येतात. आपण एकमेकांशी जुळवून घेऊ शकतो यावर मात्र दोघंही ठाम आहेत.

हे दोघं एकमेकांशी कुठल्या भाषेत बोलत असतील याचं मला कुतूहल होतं. इंग्रजी हीच त्यांची संवादाची भाषा आहे. मात्र गेल्याच वर्षी ‘मॅक्सम्युलर भवन’मधून सरांनी जर्मन भाषेचा प्राथमिक अभ्यासक्रम केला. सत्तरी पार केल्यावर त्यांनी जर्मन शिकायला सुरुवात केली आहे, हे विशेष.

या दहा वर्षांच्या सहजीवनात ते जेव्हा एकत्र असतात तेव्हा एकमेकांना जपायचा त्यांचा खूप प्रयत्न असतो. आता दोघांच्याही त्रासदायक भूतकाळाच्या पडछाया दूर व्हायला मदत झाली आहे. मोनिका कॅथलिक ख्रिश्चन आहेत. खूप धार्मिक नसल्या तरी भावनिक आधारासाठी रविवारी चर्चमध्ये जायला त्यांना आवडतं. कधी कधी सरही त्यांना सोबत करतात. त्यांच्या संबंधांत धर्म कधी आडवा आलेला नाही. आर्थिकदृष्टय़ा दोघंही स्वावलंबी आहेत. या बाबतीत मुळीच अपेक्षा नाहीत. एक मात्र खरं, मोनिकांचं आतापर्यंतचं आयुष्य त्यांची शाळा, घर आणि मुलं असं गेलं आहे. याउलट सरांचं आयुष्य निरनिराळ्या कामात गेलं आहे. त्यामुळे मानवी स्वभाव, माणसांच्या वागण्याच्या तऱ्हा, त्यांना द्यायचा प्रतिसाद, यासंदर्भात त्यांचे मतभेद होतात. बोलताना दोन संस्कृतींच्या फरकामुळे शब्दांचे संदर्भ लक्षात येत नाहीत, गैरसमज होतात. गंमत म्हणजे वागताना एकमेकांना त्रास होऊ नये या प्रयत्नातही कधी कधी गैरसमज होतात. तरीही सतत संवादी राहून ते दोघेही या गैरसमजांवर मात करतात. परस्परांच्या विचारांचा आदर करणं उभयतांच्या वागण्या-बोलण्यात मुरलेलं आहे. एक निरीक्षण सांगते, सर फोनवर बोलताना मोनिकांबद्दल आदरार्थी बोलतात.

गेल्या दहा वर्षांत त्यांना एकमेकांच्या आवडीनिवडी नीट लक्षात आल्या आहेत. उदाहरणार्थ, घरातल्या फर्निचरची नवनवी मांडणी करून पाहाणं हा मोनिकांचा छंद आहे. बागकामात दोघंही रंगून जातात. त्यांचं शाइनफेल्ड हे गाव रम्य आहे. आजूबाजूचे हिरवे डोंगर, रानवाटा यातून भटकण्याचा आनंद ते अगदी मनमुराद लुटतात. ऐतिहासिक स्थळांना, वस्तुसंग्रहालयांना भेटी देणं हाही आवडीचा कार्यक्रम असतो. असं फिरताना कधी कधी विचित्र अडचणी येतात. एका वर्षी नाताळच्या काळात सर तिथे होते. तेव्हा बाहेर बर्फाचा जाड थर साचलेला असताना मोनिकांनी बाहेर फिरायला जाण्याचा आग्रह केला. लहान मुलाची तयारी करून द्यावी तशी त्यांनी सरांची तयारी करून दिली. कोट, ऊबदार बूट, पायमोजे, हातमोजे.. बर्फात ते बराच वेळ भटकले, पण त्या रानवाटांमधून फिरताना परतीचा रस्ता विसरले. दिवस मावळला. अरे बापरे, आता काय? अशी घाबरगुंडी उडाली. पण हुश्श! रस्ता सापडला. असे काही आगळेवेगळे क्षण कायम लक्षात राहातील. मोनिकांच्या झुरीच येथे नोकरी करणाऱ्या मुलाकडेही उभयता जाऊन आले. तो प्रवासही अविस्मरणीय ठरला.

या सहजीवनात एक महत्वाची अडचण आहे. लग्न न झाल्यानं त्यांना एका वेळी तीनच महिन्यांचा व्हिसा मिळतो. हा काळ संपत आला की दोघांची उलाघाल होते. अधिक काळ सोबत कसं राहायचं हा त्यांना पडलेला प्रश्न आहे. सर जर्मनीतून उत्साहाची, उमेदीची भली थोरली गोणीच घेऊन येतात. ते संचित बराच काळ पुरतं. इथे त्यांच्या आवडीच्या कामांमध्ये ते व्यग्र असतात. पण मोनिकांना मात्र एकटेपणा तीव्रतेनं जाणवत राहातो, कधी पुन्हा भेट होते असं वाटत राहातं. हे वाचताना सरांच्या आयुष्याच्या उत्तरायणाचे गहिरे रंग मला साक्षात दिसत होते.

‘लिव्ह इन रिलेशनशिप’ संदर्भातली तुमची भूमिका काय, हा माझा त्यांना शेवटचा प्रश्न होता. याचं त्यांनी दिलेलं उत्तरही स्पष्ट आणि प्रांजळ आहे. ते म्हणतात, ‘‘स्त्री-पुरुषांच्या सहजीवनातील तारुण्याच्या काळात कुटुंबातील कर्तव्यं, जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी विवाह बंधनात राहाणं गरजेचं असेलही, परंतु कौटुंबिक जबाबदाऱ्या पूर्ण केल्यावर आयुष्याच्या उत्तरकाळात एकटय़ा व्यक्तीला जोडीदाराच्या सान्निध्याची गरज वाटते तेव्हा अशा बंधनांची आवश्यकता राहू नये. विशेषत: ज्यांनी आपल्या पूर्वायुष्यात विवाहबंधनातल्या कटुतेचे घाव सोसले आहेत, त्यांना हे बंधन नकोसं वाटणं स्वाभाविक आहे. उत्तरायुष्यात मायेच्या उबेची गरज महत्त्वाची असते, या भूमिकेशी प्रामाणिक राहिल्यास ‘लिव्ह इन रिलेशनशिप’ मला अधिक सोयीचं वाटतं.’’

काटे सरांशी झालेल्या संवादानं मला समृद्ध केलं आहे. आयुष्याच्या उत्तरायणात मैत्रभाव जोपासणारी अशी तुरळक का होईना नाती फुलत आहेत. समाजमान्यतेची भीड न ठेवता अशांनी आपले अनुभव  आम्हाला अवश्य सांगावेत. ते इतरांसाठीही मोलाचे आहेत.. कारण, जाता जाता सरांनी सांगितलेलं हॅन्स अ‍ॅन्डरसन यांचं वचन – ‘just living is not enough’ said the butterfly.` one must have sunshine, freedom, and a little flower.’

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 30, 2021 6:39 am

Web Title: tarak kate and monica bulita jeshthanche live in dd70
Next Stories
1 व्यर्थ चिंता नको रे : मन मनास उमगत नाही..
2 मी, रोहिणी.. : सारं कसं शिस्तबद्ध!
3 वसुंधरेच्या लेकी : बालीच्या बालिका
Just Now!
X