03 December 2020

News Flash

तस्मै श्री गुरवे नम:

शाळा कॉलेजमधले शिक्षकच नाही; तर आपल्या सहवासातील, नातेसंबंधांमधील अनेक व्यक्तींकडून आपल्याला अनेक गुण घेण्यासारखे असतात

| September 7, 2013 01:01 am

शाळा कॉलेजमधले शिक्षकच नाही; तर आपल्या सहवासातील, नातेसंबंधांमधील अनेक व्यक्तींकडून आपल्याला अनेक गुण घेण्यासारखे असतात. आपली गुणग्राहकतेची मधमाशी वृत्ती सोडायची नाही. अनेक गुरुतुल्य व्यक्तींनी माझं आयुष्य संपन्न केलं, त्यांना नमन.
नुकत्याच झालेल्या शिक्षक दिनाच्या निमित्ताने मी जरा स्मरणरंजनात रमले. लहानपणीच्या काही शिक्षकांच्या आठवणीने व्याकूळ झाले. अनेकांनी कळत नकळत माझ्या व्यक्तिमत्त्वाला संस्कारांचं खतपाणी घालून जोजवलं, माझ्या क्षमतांची जाणीव करून दिली, आयुष्याला योग्य दिशा देऊन समृद्ध केले. आज त्यांच्यापकी काही जण हयात नाहीत; पण त्यांच्याकडून मिळालेले धडे हृदयावर कोरले गेले ते कायमचेच!
माँटेसरीत दर दोन दोन मिनिटांनी ‘बाई, माझी आई मला न्यायला कधी येणार?’असे विचारून भंडावून सोडणाऱ्या मला-‘आता तुझी आई पूजा करत असेल’, ‘आता तुझी आई पोळ्या करत असेल’ अशी न कंटाळता व न चिडता उत्तरे देणाऱ्या कारखानीस बाई आठवल्या. किती संयम लागत असेल नाही शिक्षकांना! प्राथमिक शाळेत आजीसारखी जिवापाड माया करणाऱ्या व स्वत: पुढाकार घेऊन मला एका खासगी ट्रस्टतर्फे महिना ५० रुपये शिष्यवृत्ती देऊ करणाऱ्या केतकरबाई आठवल्या- नुसत्या निरीक्षणातून किती जाणता येतं माणसाला! माध्यमिक शाळेत तर ज्यांचा प्रत्येक शब्द जिवाचे कान करून ऐकावा असे शिकवणाऱ्या
मेधा ओकबाई आठवल्या. पाठय़पुस्तकाखेरीज कितीतरी नामवंत लेखक, कवींचे साहित्य वाचून दाखवून मायमराठीची गोडी लावणाऱ्या माझ्या लाडक्या बाई! ‘दहावीत बोर्डाच्या अभ्यासामुळे मी वक्तृत्व स्पध्रेत भाग घेत नाही’, असे सांगितल्यावर बाई म्हणाल्या, ‘अगं, फार तयारी लागणार नाही. रोज शाळा सुटल्यावर तू आणि मी १५-२० मिनिटे जास्त थांबून वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करू, मुद्दे काढू, बास.’ नुसतं म्हणून त्या थांबल्या नाहीत; तर पुढे महिनाभर माझ्याबरोबर रोज २-३ विषयांवर चर्चा करून त्यांनी नकळत माझ्याकडून
७०-७५ विषय तयार करून घेतले, जे स्पध्रेलाच काय पण बोर्डाला निबंध म्हणूनदेखील उपयोगी पडले. त्यांच्या मेहेनतीमुळे मी आंतरशालेय वक्तृत्वात पहिली आले. माझ्या नकारात्मक विचारांना सकारात्मक व्हायला शिकवलं त्यांनी! हे यश आपल्यामुळे मिळाल्याचा अभिनिवेश तर सोडाच, पण पुढे कधी त्यांनी याचा उल्लेखही केला नाही. अशी आस्था, कळकळ असणारे शिक्षक मिळाले; हे आमचं भाग्यच! वयाच्या ८२ व्या वर्षी ‘अगं, पुण्यात येतेस तेव्हा जरा तासभर वेळ काढून माझ्याकडे येत जा; मग मी तुला पुन्हा गाणं शिकवीन’ असे जिव्हाळ्याने म्हणणारे संगीताचार्य दिवाणसर आठवले; ज्ञानदानाचा आनंद, उत्साह त्या वयातही वाखाणण्याजोगा होता.
‘डॉक्टरांच्या जगात’ही असे अनेक जण- काही वैद्यकीय महाविद्यालयातील शिक्षक, काही ज्येष्ठ सहकारी, काही रुग्ण, तर काही सहकर्मचारी, काही मित्र अनेकांकडून खूप शिकायला मिळालं. आठवणींच्या ओघात पहिल्या आठवल्या- ससूनमधील शल्यशास्त्र विभागप्रमुख-
डॉ. मेहेता मॅडम! गौरवर्ण, सडपातळ बांधा, नजरेत भरेल अशी उंची, तडफदार चाल आणि शल्यशास्त्रातला हातखंडा यामुळे बी.जे. मेडिकलमधील प्रत्येक विद्यार्थ्यांला त्यांच्याबद्दल आदरयुक्त भीती वाटे आणि प्रत्येक होतकरू सर्जनच्या त्या ‘आदर्श’ असत. ३० वर्षांपूर्वीच्या काळात जठर, अन्ननलिका, जबडय़ाच्या कर्करोगावरील शस्त्रक्रिया; यकृतावरील जलोदराच्या शस्त्रक्रिया यात त्या पारंगत होत्या. ८-१० तास शस्त्रक्रियेला उभे राहूनही दिवसाच्या शेवटी तितक्याच टवटवीत असत. एकदा रक्ताच्या उलटय़ा होत असलेल्या माझ्या मामीवर यकृताची फार मोठी शत्रक्रिया करून त्या रात्री उशिरा घरी गेल्या. दुसऱ्या दिवशी सकाळी आठ वाजता राऊंडला आल्यावर त्याच प्रसन्नतेने प्रथम त्या मामीला भेटल्या व तिच्या डोक्यावर हात ठेवून म्हणाल्या, ‘विजया, तू दमलीस का गं कालच्या ऑपरेशनमुळे?’ उत्तरादाखल तिच्या डोळ्यांतून आसवं ओघळली आणि तिने हात जोडले. रुग्णाबद्दल केवढी आत्मीयता, सहवेदना सर्जनकडे असायला हवी याचं ते मूर्तिमंत उदाहरण होतं आणि देहभान, काळवेळ विसरून झोकून देऊन आपापल्या कामावर प्रेम कसं करावं याचंही ते चालतंबोलतं उदाहरण होतं!
एमबीबीएस करताना शल्यशास्त्राची गोडी लावणारे डॉ. दातार सर -असंच एक उमदं व्यक्तिमत्त्व! सर्जन होण्यासाठी ‘सिंहाचं हृदय, घारीसारखी तीक्ष्ण नजर, स्त्रीसारखी नाजूक बोटे’ हवीत असं ते सांगत. एकेक पेशंटच्या केसवर तासन तास तल्लीनपणे शिकवून आम्हाला चच्रेत सहभागी करून रोगनिदान करायला प्रवृत्त करायचे आणि आम्ही बरोबर निदान केल्यावर समाधानाने हसायचे. ते म्हणत, ‘प्रत्येक सर्जनला हे तर माहीत पाहिजे की, शस्त्रक्रिया कोणावर करावी, कशी करावी; पण प्रत्येक चांगल्या सर्जनला ही जाण पाहिजे की, आपण शस्त्रक्रिया कधी करायची नाही.’ आम्ही एकाग्रतेने त्यांचं बोलणं ऐकत असू; त्यातला खराखुरा अर्थ मात्र आत्ता कुठे कळू लागलाय!
तेव्हापासून ते आत्तापर्यंत अनेक गुरूंचा सहवास, मार्गदर्शन लाभलं. कोणाकडून शांत प्रवृत्ती, कनिष्ठांना सन्मानाने वागवण्याची खिलाडू वृत्ती, कोणाकडून शिकवण्याची हातोटी, कोणाकडून शस्त्रक्रियेतील हस्तकौशल्य; कोणाकडून विषयाच्या मुळापर्यंत जाऊन भिडण्याची वृत्ती, तर कोणाकडून धडाडी, िहमत असे अनेक गुण अनुभवत गेले. त्यातील काही अंश तरी आपल्यात यावा म्हणून धडपडत गेले.
कोईम्बतूरचे डॉ. पलनिवेलू हे ‘लॅपरोस्कोपी’ म्हणजे ‘दुर्बणिद्वारे शस्त्रक्रिये’चे भारतातील अध्वर्यू! त्यांच्याकडे जाऊन पूर्वापार शिकलेली खुल्या शस्त्रक्रियांची तत्त्वप्रणाली दुर्बणिीच्या शस्त्रक्रियांत कशी अमलात आणायची हे शिकायला मिळालं. तिथे सकाळी ८ पासून रात्री ८ पर्यंत अविरतपणे त्यांच्या शस्त्रक्रिया बघताना उभे राहून आम्ही थकून जायचो; पण शेवटपर्यंत सरांचा उत्साह तिशीच्या सर्जनला लाजवेल असा असायचा. तशीच अविश्रांत मेहनत माझे एंडोस्कोपीतले गुरू- डॉ. मायदेव घेत. शल्यक्रियाशास्त्रातल्या एंडोस्कोपी या तंत्रज्ञानाची कास धरून ध्येयाने झपाटल्यासारखे अविरत काम व चिकाटी या गुणांमुळे ते या क्षेत्रात सर्वोच्च शिखरावर पोहोचले. ‘थांबणं’ हा शब्द त्यांच्या शब्दकोषातच नाही. अशांपुढे आपोआपच माथा झुकतो व हात जोडले जातात. या दोन्ही गुरूंचं वैशिष्टय़ म्हणजे भारतीय माणसाला आर्थिकदृष्टय़ा परवडावे यासाठी काही शस्त्रक्रियेतील परदेशी गोष्टींऐवजी- भारतीय तंत्रज्ञान, हत्यारे, उपकरणे, शिवण्याच्या पद्धती त्यांनी स्वत: विकसित केल्या व भारतात उत्पादित केल्या.
शाळा- कॉलेजमधले शिक्षकच नाही; तर आपल्या सहवासातील, नातेसंबंधांमधील अनेक व्यक्तींकडून आपल्याला अनेक गुण घेण्यासारखे असतात. फक्त आपली गुणग्राहकतेची मधमाशी वृत्ती सोडायची नाही.समर्थ रामदासांचं छान वचन आहे-
‘जेथे दिसती विशेष गुण, ते सद्गुरूंचे अधिष्ठान
या कारणे तयासी नमन, अत्यादरे करावे’
४० वष्रे संधिवाताचे दुखरे सांधे बरोबर घेऊन जगताना समाधानाने, असोशीने, आनंदाने कसं जगायचं; हे कृतीतून दाखवणारी आई; दारी आलेल्याचं आदरातिथ्य किती उत्तम प्रकारे करायचं हे शिकवणाऱ्या सासूबाई; शेजाऱ्यांच्या मुलीवरदेखील आयुष्यभर सख्ख्या बहिणीप्रमाणे माया करणारे ‘सख्खे शेजारी’; रुग्णाशी हसतमुखाने त्याच्या आवडीच्या विषयांवर गप्पा मारत त्याला तपासणारे व त्याचा ताण हलका करणारे फॅमिली डॉक्टर- डॉ.पानसरे, ‘ज्ञान दिल्याने ज्ञान वाढते’या उक्तीनुसार अनेक सर्जनना आवर्जून बोलावून आपले शस्त्रक्रियेचे तंत्र दाखवणारे पुण्यातले डॉ. संजय व डॉ. ज्योत्स्ना कुलकर्णी; डी.वाय.पाटील मेडिकल कॉलेजचे डीन, सुप्रसिद्ध बालशस्त्रक्रियातज्ज्ञ, लेखक अशा हरहुन्नरी व्यक्तिमत्त्वाचे व आता नव्याने रोबॉटिक सर्जरी (यंत्रमानवाद्वारे शस्त्रक्रिया) शिकण्यासाठी सिद्ध झालेले डॉ. संजय ओक सर.. अशा अनेक गुरुतुल्य व्यक्तींची मांदियाळी माझ्या डोळ्यांपुढून सरकू लागली व मला त्यांच्या सहवासाचे दान दिलेल्या ईश्वराला मी हात जोडले. ‘शिकणं’ही एक न संपणारी प्रक्रिया आहे हे मला उमगलं. ‘माझ्यातली विद्यार्थीवृत्ती कधी संपू नये’ अशी मी मनोमन प्रार्थना केली.
शिक्षक दिनाच्या निमित्ताने माझ्या वाचकांनाही गुरुस्मृती व गुरुसहवासातून सकारात्मक ऊर्जा मिळावी ही सदिच्छा करते. अशा अनेक व्यक्त व अव्यक्त गुरुजनांबद्दल मी कृतज्ञतेने परवचामधील एक श्लोक म्हणते;
‘मी ठेविते मस्तक ज्या ठिकाणी,
तेथे तुझे सद्गुरू पाय दोन्ही!’
 vrdandawate@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 7, 2013 1:01 am

Web Title: tasmai shree gurave namha
टॅग Chaturang
Next Stories
1 अंधश्रद्धेच्या बळी
2 बहुआयामी कार्य, समर्पित वृत्ती
3 .. आणि कृतार्थ झालो
Just Now!
X