देहविक्रय करणाऱ्या स्त्रिया आणि त्यांच्या मुलांचं संभाव्य भवितव्य पाहता त्यांना चांगलं आयुष्य द्यावं या हेतूने श्रीमंत दगडूशेट हलवाई गणपती ट्रस्टचे अध्यक्ष तात्यासाहेब ऊर्फ प्रतापराव गोडसे यांनी बालसंगोपन केंद्र सुरू झालं. इतकंच नव्हे तर या मुलांना कुटुंब मिळावं आणि समाजातल्या एकाकी, वैफल्यग्रस्त वृद्धांनाही आधार म्हणून ‘पिताश्री वृद्धाश्रम’ची स्थापना केली. आज या दोन्ही उपक्रमांमुळे मुले आणि वयोवृद्धही एकत्रितपणे आनंदाने आपलं आयुष्य व्यतीत करत आहेत.

श्रीमंत दगडूशेट हलवाई गणपती हे एक लोकप्रिय श्रद्धास्थान! या गणरायाचे दर्शन घेणे, त्याची पूजा, आराधना करणे ही प्रत्येकाच्या अंतरंगातील उत्कट इच्छा! पण या व्यक्तिगत इच्छेला श्रीमंत दगडूशेट हलवाई गणपती ट्रस्टने व्यापक स्वरूप दिले व समाजसेवेचे अनेक प्रकल्प उभे केले.
मानवसेवेच्या महामंदिरांची उभारणी करणे हाच आपला धर्म असे मानणारे ट्रस्टचे दिवंगत अध्यक्ष तात्यासाहेब ऊर्फ प्रतापराव गोडसे हे या सर्व सामाजिक उपक्रमांचे प्रेरणास्रोत! अवघं आयुष्य पुण्यातील बुधवार पेठेत व्यतीत करणाऱ्या तात्यासाहेबांच्या नजरेला तिथली वस्ती, त्या वस्तीतल्या देहविक्रय करणाऱ्या स्त्रिया आणि त्यांची मुलं प्रत्यक्ष दिसत होती. त्यात त्यांच्या मुलांचा काय दोष? त्यांचं भविष्य काय? त्यांनी पुन्हा याच धंद्यात यावं? दलाली करावी? गुंडगिरी करावी? गणेशाचे निस्सीम भक्त असलेल्या तात्यासाहेब गोडसेंनी सगुणातील ईश्वराची पूजा बांधण्याचा मनोमनी संकल्प केला आणि ते जागेच्या शोधाला लागले. लवकरच त्यांना १२ खोल्या आणि १ किचन असलेलं तयार कौलारू घर कोंढवे गावी मिळालं. लवकरच तिथे शंभर मुलं आणि पस्तीस मुलींचं बालसंगोपन केंद्र सुरू झालं. तात्यांचा हेतू स्वच्छ होता, या मुलांनी इथे राहून फक्त शिकायचं नाही तर आईला त्या दृष्टचक्रातून बाहेर काढायचं. मुलांनी नोकरी व्यवसाय पत्करून समाजाच्या मुख्य प्रवाहात यायचंच, पण त्यांनी देहविक्रयाचं काम केलेल्या आईलाही स्वत:जवळ चांगल्या वस्तीत ठेवायचं. उतारवयात हलाखीचं जीवन कंठणाऱ्या या स्त्रियांना त्यांच्या मुलांनी आधार द्यायचा. त्यासाठी बालसंगोपन केंद्रातल्या या मुलांना अन्न, वस्त्र, निवारा व शिक्षण यासाठी एक रुपयाचाही खर्च येणार नाही. तात्यांचं स्वप्न मुलांनी पूर्ण केलं. गेल्या तीस वर्षांत शेकडो मुलं इथे राहून शिकली. स्वयंपूर्ण झाली. त्यातला वसीम पठाण तर बारावीला बोर्डात पहिला आला.
बालसंगोपन केंद्रातली ही मुलं शाळेत जात, मजेत राहात. पण सुट्टय़ा पडल्या की त्यांची तोंडं सुकून जात. त्यांना गाव नव्हतं. आईला कितीही वाटलं तरी सुट्टीत मुलाला वस्तीवर गेलं की तो बिघडेल ही तिला धास्ती. तात्यासाहेबांचं मन कळवळून जाई. या मुलांना ना आईवडिलांची छाया ना आजी-आजोबांची माया! आपण त्यांना छप्पर दिलंय, पण घर नाही दिलेलं. निवारा दिलाय, पण कुटुंब नाही दिलेलं. शिक्षण देतोय, पण संस्कार नाही देऊ शकत. या मुलांना आजी-आजोबांची माया मिळावी यासाठी वृद्धाश्रमांची कल्पना त्यांना सुचली. तोवर आजूबाजूच्या एकाकी, वैफल्यग्रस्त वृद्धांच्या समस्यांची जाणीव होऊ लागली होतीच. या एकाकी वृद्धांच्या जीवनात मुलांच्या सहवासाने हिरवळ फुलावी आणि ज्येष्ठांच्या शीतल छत्रछायेत मुलंही रहावीत या दुहेरी हेतूने ‘पिताश्री वृद्धाश्रम’ आकाराला आला. सुरुवातीला हा वृद्धाश्रम फक्त वयोवृद्ध पुरुषांसाठी असावा याविषयी तात्यासाहेब आग्रही होते, पण तोवर त्यांची पुढची पिढी अशोकराव गोडसेंच्या रूपाने सार्वजनिक कार्यात उतरली होती. सत्तर माणसांची सोय असलेल्या ‘पिताश्री’त केवळ बावीस जण मुक्काम करतात हे त्यांना रुचेना. त्यांनी वृद्ध स्त्रियांनाही ठेवण्याचा निर्धार केला. कौतुक वा बदनामी जे होईल त्याची जबाबदारी माझी अशी ग्वाही तात्यांना दिली आणि ‘पिताश्री’ची इमारत आबालवृद्धांनी गजबजून गेली.
ch12बालसंगोपन केंद्र तळमजल्यावर होतंच, आता त्याचं विस्तारीकरण गरजेचं होतं. तात्यासाहेबांनी महेश सूर्यवंशी या तरुण सिव्हिल इंजिनीअरला हाताशी धरलं. वडीलांप्रमाणे गणेश सेवेचं व्रत घेतलेल्या महेशजींनी वृद्धांच्या गरजांचा पूर्ण अभ्यास करून इमारतीचं काम हाती घेतलं. हे वृद्ध आयुष्याच्या अंतिम पर्वात देवाच्या घरी राहायला येतात तेव्हा हे देवाचं आलय त्याच्यासारखं वैभवशाली असावं या उद्देशाने संपूर्ण इमारतीला राजवाडय़ाची शान दिली. भव्यता दिली. इथल्या विस्तीर्ण सुशोभित बागेच्या पाश्र्वभूमीवर उभी असलेली राजवाडय़ासारखी भव्य वास्तू, प्रदूषणमुक्त स्वच्छ व शांत परिसर आणि प्रसन्न वातावरण यामुळे या वास्तूत अत्यंत सकारात्मक ऊर्जा भरून राहिलेली जाणवते. मुलांची दंगामस्ती आणि खोडय़ांनी या वास्तूला जिवंतपणा आलेला आहे. या वास्तूत फिरताना सतत सळसळतं चैतन्य जाणवत राहातं.
‘आमच्या या वृद्धांसोबत दगडूशेट गणपतीची पुरातन मूर्तीही आहे. १८९६ पासून १९६७ पर्यंत ज्या गणेशमूर्तीवर उत्सव साजरा झाला त्या मूर्तीचे देखणं मंदिर प्रवेशद्वारी आहे. तिथल्या भिंतींवर गणेश पुराणातल्या कथांची म्युरल्स रेखाटली आहेत. अशोकभाऊ गोडसे सांगतात, ‘या उपक्रमासाठी जनतेचा पैसा वापरला जाणार आहे, याचं भान ठेवून उपलब्ध साहित्याचा पुरेपूर वापर करून आम्ही हा वृद्धाश्रम उभारला आहे.’ कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी पुढे सांगतात, ‘इथल्या प्रत्येक खोलीत पंखा, दूरध्वनी, संगणक, टेबल-खुर्ची, कॉट, स्वच्छ चादरी-उशा व गाद्या आहेत. सर्वच खोल्या हवेशीर आहेत. वयोवृद्ध खाली उतरू शकत नाहीत यासाठी प्रत्येक खोलीच्या बाहेर प्रशस्त, मोकळा पॅसेज आहे. तिथे ते फेऱ्या मारू शकतात. त्यांना वरखाली जाण्यासाठी लिफ्टची सोय आहे. त्यांचे नातलग भेटायला किंवा राहायला आल्यास प्रत्येक मजल्यावर गेस्टरूम आहे. त्याच्या बाजूला डॉक्टरांची तपासणी रूम आहे. प्रत्येक खोलीत इंटरकॉमची सोय आहे. प्रत्येक दोन खोल्यांसाठी स्वच्छ अशी टॉयलेट्स आहेत. ज्यामध्ये त्यांना आधारासाठी रॉड्स बसवण्यात आले आहेत. प्रत्येक मजल्यावर टी.व्ही. पाहणे, गप्पा मारणे यासाठी प्रशस्त दालन आहे. सोलार सिस्टीममुळे वृद्धांना चोवीस तास गरम पाणी उपलब्ध होते. इमारतीच्या पहिल्या व तिसऱ्या मजल्यावर गच्ची आहे. त्या गच्चीत अथवा आवारातील वृक्षांच्या कट्टय़ावर अनेक ज्येष्ठ मंडळी गप्पांची बैठक रंगवतात. इथल्या प्रशस्त वाचनालयात सकाळच्या प्रहरी वर्तमानपत्रांच्या वाचनात ज्येष्ठ रमतात, तर दुपारी धार्मिक अथवा मनोरंजनाच्या पुस्तकांत रमतात. एकूण काय या ज्येष्ठांना घरात ज्या ज्या सुविधा मिळतात त्या सर्व इथे पुरविण्यात आल्या आहेत. म्हणूनच कुसुम भट्ट आजी म्हणतात, ‘आम्हाला घरी जावंसंच वाटत नाही. हेच आमचं घर!’
या वृद्धाश्रमाचं व्यवस्थापन बाबासाहेब गव्हाणे अत्यंत चोखपणे सांभाळतात. पहाटे पाचला आणि रात्री अकराला त्यांची प्रत्येक खोलीत फेरी असते. इथल्या वृद्धांना दिनचर्येचं पूर्ण स्वातंत्र्य आहे. डायरीत नोंद करून ते बाहेर फिरायलाही जाऊ शकतात. त्यांना जेवणखाण, नाश्ता रूममध्ये वेळेवर देण्यात येतो. ते आपापल्या खोलीत पूजाअर्चा, ध्यानधारणा करतात. संध्याकाळी गणेश मंदिरात मुलं व आजी-आजोबा एकत्र आरती करतात. आजोबा मुलांना गणपती अथर्वशीर्ष शिकवतात, त्यांच्यासाठी संस्कारवर्ग घेतात. टीव्हीवरील कार्यक्रम पाहायला किंवा दिवाळी, दहीहंडीसारख्या कार्यक्रमांच्या निमित्ताने आजी-आजोबा व मुलांची गट्टी जमते. अतिवृद्ध तर वरच्या गॅलरीत उभे राहून मुलांचा अंगणात रंगलेला खेळ पाहण्यात रमून जातात. लहान मुलांना तर या आजी-आजोबांचा इतका लळा लागतो की, शाळेतून येताच ती त्यांच्या खोलीत धाव घेतात. त्यांच्याकडून चॉकलेट, खाऊ घेतात. मोठी मुलं आजी-आजोबांना औषधं वगैरे आणून देतात. प्रेमाने त्यांचं हवं-नको बघतात. सुमती बोरगावकर या हिंदी भाषेतील पंडित आहेत. त्या मुलांची हिंदी भाषेची शिकवणी घेतात. किवळे आजोबा मुलांना सूर्यनमस्कार घालायला शिकवतात. बाबासाहेब गव्हाणे म्हणतात, ‘आमचं हे भलं मोठ्ठं विस्तारित कुटुंब पिताश्री वृद्धाश्रमात गुण्यागोविंदाने नांदतंय.’
अशोकभाऊ गोडसे ट्रस्टचे अध्यक्ष या नात्याने त्यांची भूमिका मांडतात. ते म्हणतात, ‘आम्ही तात्यांचा समाजसेवेचा वारसा पुढे चालवत आहोत. या ट्रस्टचे आणि ट्रस्टच्या संपत्तीचे आम्ही केवळ रक्षक आहोत. आज देवस्थानाच्या ट्रस्टमध्ये कोटय़वधीची संपत्ती गोळा होते. तिचा विनियोग उपेक्षित व वंचित घटकांसाठीच व्हावा यासाठी ट्रस्टतर्फे आम्ही अनेक योजना व सेवाभावी प्रकल्प राबवीत असतो. ससून हॉस्पिटलमध्ये आम्ही गरिबांसाठी अनेक योजना राबवतो. कोंढव्याच्या वृद्धाश्रमातील वृद्धांना अल्प मोबदल्यात सर्व सेवा पुरवतो. तिथल्या बालसंगोपन केंद्रात आजवर वेश्या व देवदासींची मुलं होती. आता काचपत्रे गोळा करणाऱ्यांच्या पन्नास मुलांची व्यवस्था तिथे केली गेलीय. आता फासेपारध्यांची मुलं आम्ही घेतली आहेत. त्यांचं समुपदेशन करून, अभ्यासवर्ग घेऊन, त्यांचं चांगलं पुनर्वसन करण्याचा आमचा प्रयत्न आहे. समाजातल्या पीडित व वंचित घटकांसाठी दगडूशेट हलवाई गणपती मंदिर ट्रस्टतर्फे जे काम चालतं ते पाहूनच समाजातील दानशूर व्यक्ती देणग्या देतात. दानपेटीत पैसे टाकतात. समाजाने आमच्यावर जो ‘विश्वास’ टाकलाय त्याचं सार्थक करायचं. समाजातील दानशूरांचे पाठबळ आणि वंचितांचे आशीर्वाद यातूनच आम्हाला काम करण्याची सकारात्मक ऊर्जा मिळते.
आबालवृद्धांसाठी सर्व सुखसोयींनीयुक्त अशा या आश्रयघरात मंदिराइतकीच पवित्रता जाणवते. या वास्तूत सर्वत्र एक मंगलमय, आनंदी, शुभंकर अशी सकारात्मक ऊर्जा श्वासाश्वासात जाणवते. म्हणूनच हा ज्येष्ठांचा वृद्धाश्रम नव्हे आनंदाश्रम आहे. 

पिताश्री वृद्धाश्रम व बालसंगोपन केंद्र
सव्र्हे नं. ५५, भाग्योदयनगर,
कोंढवा (खुर्द) पुणे ४११०४८
दूरध्वनी : ०२२-२६८३८०६६/ २६९३१०६६
बाबासाहेब गव्हाणे : ९६६५७५०२८२