19 September 2020

News Flash

बालशिक्षकांचं विद्यामंदिर!

टाळेबंदीच्या काळात ऑनलाइन शाळा सुरू करण्याचं जाहीर झालं आणि काही प्रमाणात तशा शाळा सुरूही झाल्या. परंतु ग्रामीण पातळीवर अनेक प्रश्न निर्माण झाले.

दहावी-बारावीच्या मुलांनी बालशिक्षक होऊन गावातल्या इतर लहान मुलांना  शिकवायला सुरुवात केली.. वाडीतल्या विठ्ठल मंदिरात विद्यामंदिर भरवलं गेलं.

रेणू दांडेकर – renudandekar@gmail.com

टाळेबंदीच्या काळात ऑनलाइन शाळा सुरू करण्याचं जाहीर झालं आणि काही प्रमाणात तशा शाळा सुरूही झाल्या. परंतु ग्रामीण पातळीवर अनेक प्रश्न निर्माण झाले. अखेर मुलं घरी बसून कंटाळली. गावातली मंडळी चिंतातुर झाली. त्यातून एक अभिनव शाळा घडवली गेली. दहावी-बारावीच्या मुलांनी बालशिक्षक होऊन गावातल्या इतर लहान मुलांना  शिकवायला सुरुवात केली.. वाडीतल्या विठ्ठल मंदिरात विद्यामंदिर भरवलं गेलं. अभ्यास थांबला तर नाहीच.. पण शिक्षणही पुढे जात राहिलं..  रत्नागिरीतील चिखलगावच्या मानेवाडीतील एका अभिनव प्रयोगाविषयी..

आटपाट गाव होतं. गावात वाडय़ावस्त्या होत्या. एक दिवस काय झालं, सगळं सगळं कु लूपबंद झालं. तोंडावर मुखपट्टी आली. माणसं घरातून बाहेर पडेनाशी झाली. सुरुवातीला मुलांना आनंद झाला, कारण शाळेला सुट्टी मिळाली. पण दिवसच्या दिवस, महिनेच्या महिने तसेच जाऊ लागले.  मुंबईतून गावाकडे आलेली मंडळी- तीही तिथेच राहिली. काय करावं? कु णाला काही सुचेना. मुलं वैतागली, नि ‘साळा- साळा’ करू लागली.    टी. व्ही. आणि मोबाइलला चिकटली. घरची मंडळी वैतागली. तशी वाडीतली मंडळी एक झाली. काहीतरी करायला पाहिजे, पोरांचं शिक्षण सुरू राहिलं पाहिजे. इचार करू लागली. गावात एक ‘शिकलेली बाई’ होती. तिला कल्पना सुचली. तिनं ती गावच्या मंडळींना सांगितली. त्यांनाही पटली आणि वाडीच्या मंदिरात शाळा सुरू झाली. लोकं म्हणू लागली, की आता खऱ्या अर्थानं गावात विद्यामंदिर झालंय. त्याचीच ही गोष्ट.. आटपाट नगरीतली नाही, खरीखुरी.  ‘करोना’काळातली!  रत्नागिरी जिल्ह्य़ातील दापोली तालुक्यातील चिखलगावच्या मानेवाडीतली..

एक दिवस काय झालं, की गावची सारी मंडळी मंदिरात जमली. करोनाचा कहर वाडीत नाही त्यामुळे शाळेचं काय करायचं यावर त्या शिकलेल्या बाई आणि गावच्या मंडळींनी चर्चा सुरू केली. देवाला साकडं घातलं, ‘‘इठ्ठला शाळा सुरू होतेय. बेस हाय! पर ‘करोना’ जाऊ दे रे. मंडळी पुन्हा नोकरीधंद्याला जाऊदे.’’ मग या बाईंनी पहिली ते आठवीपर्यंतची मुलं एकत्र केली. पंचवीस ते सत्तावीस मुलं जमली.

सगळ्यांनी विचारलं, ‘‘आता काय करायचं?’’

‘‘इयत्तावार यादी करा.’’ बाईंनी सागितलं.

‘‘केली.’’ मग बाईंनी विचारलं, ‘‘वाडीत दहावी पास, अकरावी पास, बारावी पास कोण कोण आहे?’’

पोरांना प्रश्न समजला. सगळी आधी गप्पगार झाली. बाई म्हणाल्या, ‘‘सक्ती नका करू.  मनापासून ज्यांना वाटतंय त्यांनीच पुढे या.  तुम्हाला वाटतंय ना, की वाडीतल्या मुलांचं शिक्षण व्हावं?’’

समद्यांचा होकार होता. एकेक करता करता

६ मुलं तयार झाली. बाईंनी विचारलं, ‘‘कु णाला कोणता विषय शिकवायला आवडेल? मी शिकवेन तुम्हाला.. मुलं गुंतून जातील त्यात.. तुम्हालाही खूप मजा येईल. आपण असं काम करू, की सगळ्यांना वाटेल आपणही असं करूया.’’

त्यांच्या मनापासून बोलण्याचा परिणाम झाला असावा. मुलं आत्मविश्वासानं ‘हो’ म्हणाली. वाडीतल्या पहिली ते आठवीच्या मुलांच्या स्वतंत्र याद्या झाल्या. मराठी, हिंदी, इंग्रजी, गणित, विज्ञान, समाजशास्त्र अशा विषयांसाठी बालशिक्षकांना आवाहन केलं. ज्याला जो विषय आवडतो तो त्यानं निवडायचा. प्रत्येकानं आपापला आवडीचा विषय सांगितला. एकाला प्रमुख म्हणून नेमलं. ‘बालप्रमुख’ असं पद त्याला दिलं. त्यानं सगळे वर्ग पाहायचे. कोणती मुलं येत नाहीत?, कोणत्या अडचणी येताहेत?, मुलांनी मुखपट्टी लावलीय का?, मुलं अंतर राखून बसलीयत ना?, यावर लक्ष ठेवायचं. बसायच्या जागा ठरवल्या गेल्या. प्रत्येक वर्गात साधारण पाच-सहा मुलं होती. फळ्याचं काय करायचं? बाई म्हणाल्या, ‘‘एवढीच मुलं आहेत तर गोल करून बसूया. पाटीवर लिहूया आणि पाटीचाच फळा करूया.’’ बालशिक्षक म्हणाले, ‘‘चालेल. मस्त आयडिया आहे.’’

वेळापत्रक तयार झालेलंच होतं. सकाळी ९ ते १२ ही वेळ ठरली. सुरुवातीला प्रार्थना आणि मग गाणं, अभंग, ओव्या, समूहगीत, शेतकरी गीत यांपैकी काहीतरी एक म्हणणं सुरू झालं. मजा येऊ लागली. कधी नाचून, कधी गोलात, कधी ओळीत. मग एक गोष्ट, एक खेळ, असा पहिला ९ ते ९.१५ असा समूह तास सुरू झाला. मग प्रत्येक तास २५ ते ३० मिनिटांचा घ्यायचं ठरलं. यात पहिली आणि दुसरीसाठी २ तास, तिसरी आणि चौथीसाठी २.३० तास, आणि पाचवी ते आठवीसाठी तीन ते साडेतीन तास घडय़ाळी आणि प्रत्येक तासिका २५ ते ३० मिनिटांची.

पुढे प्रश्न होता, की प्रत्येक तासाला काय घ्यायचं. कारण हे काही नेहमीचे ‘डी. एड.’, ‘बी. एड.’ शिक्षक नाहीत. मग इतका वेळ हे बालशिक्षक काय बोलणार? यावर विचार झाला, नि एक रचना झाली- जी या बालशिक्षकांना सहज शक्य होती. २५ ते ३० मिनिटांची विविध विषयांसाठी विभागणी करण्यात आली. त्यात ५ मिनिटं बालशिक्षक पाठय़पुस्तकातले आणि पर्यायी पुस्तकं असतील तर त्यातले दोन परिच्छेद वाचून दाखवू लागले. मग त्या परिच्छेदातल्या काही शब्दांच्या संबोधावर चर्चा करायचं ठरलं. ते शब्द कसे निवडायचे?, चर्चा कशी घ्यायची?, यात इतिहास, भूगोल आणि काही अंशी विज्ञान या विषयांच्या बाबतीत प्रात्यक्षिकं दाखवण्यात आली. मुलं खूप बोलतात, त्यांना खूप माहितीही असते, हे यानिमित्तानं लक्षात आलं. शिवाय समोरचे शिक्षक आपलेच ताई-दादा असल्यामुळे त्यांना मजा वाटू लागली.

सुरुवातीला वेळेची एक रचना केली. त्यानंतर पुस्तकाला पूरक आशय कसा जमवायचा याची पद्धत दाखवली. त्यानंतर आणखी काही प्रयोग  के ले.  मुलांना लेखनासाठी पाच मिनिटं देऊन मनातलं लिहिणं, ऐकून नंतर लिहिणं, असे प्रकारही केले. अशी सवय मुलांना नव्हती.

५ मिनिटं वाचन घेणं, यात प्रत्येकानं एक वाक्य, प्रत्येकानं २ वाक्यं वाचणं, किं वा एकानं वाचणं आणि इतरांनी तोच भाग वाचणं असे उपक्रम होऊ लागले. जेव्हा मुलं वाचत असतील, पुस्तकात पाहून लिहीत असतील, तेव्हा उरलेल्यांच्या वह्य़ा पाहायच्या असं ठरलं.

तसं होऊ लागलं.

बालशिक्षकांनी विचारलं, ‘‘ गणित कसं घ्यायचं?’’

बाईंनी विचारलं, ‘‘तू काय काय घेऊ शकतोस?’’

‘‘पाढे येतात. साध्या बेरजा येतात. बेरजेतली ‘व्हरायटी’ येते. दोन अंकी संख्या, तीन अंकी संख्या, चार अंकी संख्या, पाच अंकी संख्या यांची बेरीज, सगळीकडे हातच्यांची बेरीज.’’

‘‘थोडे दिवसांसाठी हे खूप आहे.’’

‘‘आणखी काय?’’

‘‘लहान वर्गाना अनेक वस्तू मोजायला सांगता येतील- पानं, दगड, रोपं. कोडी घालता येतील. एखादा पाढा पूर्ण करा. ११ ते २० मधल्या पाढय़ांतले मधले-मधले आकडे द्यायचे, आणि उरलेले मुलांनी पूर्ण करायचे. असं अगदी ‘३० दाहे ३००’ पर्यंत पूर्ण करता येईल,’’

‘‘अरे खूप आहे हे!’’

विज्ञान शिकवणारा बालशिक्षक खूप चुळबुळ करत होता. बाईंच्या लक्षात आलं. ‘‘विज्ञान जरा कठीण आहे हो,’’ तो म्हणाला.

‘‘अरे, परिसर म्हणजे विज्ञान. तुझ्या अवतीभवती काय काय आहे सांग बरं?’’

तो म्हणाला, ‘‘प्राणी, पक्षी, शेतं, झाडं, वनस्पती, पाणी, माती, हवा, फुलं, कीटक..’’

‘‘किती आहे हे सारं! याविषयी माहिती जमव, मुलांना विचार, त्यांच्याशी बोल.’’

‘‘खरंच किती छान! घेईन मी मुलांचा तास.’’ ..विज्ञानाचा तास सुरू झाला.

काही दिवस गेले. मुलांसाठी गोष्टीची पुस्तकं आणली वाडीवरच्या लोकांनी, आणि दोन नकाशेही आणले. भारताचा आणि महाराष्ट्राचा. बाईंनी बालशिक्षकांसाठी वेगवेगळ्या विषयांशी संबंधित लहान लहान खेळ तयार करून आणले. कितीतरी प्रकारच्या स्पर्धाविषयी माहिती दिली. शनिवारचं नियोजन वेगळं केलं. मुलांचा नाच, पथनाटय़, प्रत्येक मुलानं एखादा विषय घेऊन त्यावर बोलणं, रांगोळ्या काढणं, वेगवेगळे खेळ या सगळ्यासाठी शनिवार राखून ठेवला. मुलांना जास्तच मजा येऊ लागली. शिक्षा झाली तरी मुलं हसत! कारण ताई-दादाच शिक्षक. ते रागवले तरी मुलांना हसू येई.

मुलांना आता नेहमीच्या पुस्तकी अभ्यासाकडे न्यायला हवं. पण संदर्भ जमवणं, स्पष्टीकरण देणं, हे शिक्षकांसारखं कसं देणार? मग बालशिक्षक प्रयत्न करू लागले. यात अगदी चित्रपटावर किं वा मालिकांवर चर्चा घ्यायलाही बंदी नव्हती. बाई एक दिवस म्हणाल्या, ‘‘बालशिक्षक, तुम्हाला शाबासकी! अन्यथा  मुलांना शाळेचा अनुभव कसा घेता आला असता?’’  ही वाडीवस्तीवरची शाळा. त्यामुळे फारशी ‘रेडीमेड’ साधनसामुग्री नव्हती. तरी मुलं शिकती झाली. बाई आणि बालशिक्षक एकमेकांना भेटत होते, बोलत होते. मुलांच्या गरजा बालशिक्षकांना समजत होत्या, तशा उणिवाही लक्षात येत होत्या. गणित आणि इंग्रजीमध्ये व्यत्यय येत होता, पण त्यावर एक सोपा उपाय बाईंनी शोधला होता. एक गट बाईंना तीन-चार दिवसांनी जसजसं भेटू लागला, तसं हे विद्यामंदिर उजळून निघू लागलं. एक नवी शाळा मुलांना मिळाली, नि वाडीला त्यांच्यातले बालशिक्षक बघताना आनंद होऊ लागला.

अशी ही खास शाळा जिथं मुलं ‘स्क्रीन’पासून लांब झाली. मित्रमैत्रिणी अंतर ठेवून का होईना, पण दिसू लागले, भेटू लागले. सामाजिक सोबतीची गरज पूर्ण होऊ लागली. इतके दिवस आलेला कंटाळा, चिडचिड कमी होऊ लागली.

एक दिवस वाडीतले सगळे लोक बाईंना म्हणाले, ‘‘बाई, जर शिकवून झालं नाही, तर मुलं प्रश्नोत्तरं कशी लिहिणार? मग मुलं एकमेकांना विचारतात नि उतरवून काढतात. त्याला काही अर्थ आहे का?’’

बाईंनी जाणीवपूर्वक सांगितलं, ‘‘होईल तेही हळूहळू. हे आधीच सुरू करायला हवं होतं. मनात सगळा आराखडा तयार होता, पण वेळ आली नव्हती. आता आली आहे. आता थांबायला नको. कायम चालू ठेवू. ‘कोविड’ असो वा नसो.’’

चिखलगावच्या मानेवाडीतली  ही खरीखुरी शाळा. मुलांची मुलांसाठीची. यानिमित्तानं एक वेगळं ‘ट्रेनिंग मॉडय़ूल’ तयार झालं.  या वाडीतली अकरावी, बारावीची मुलंच बालशिक्षक असणारं हे विद्यामंदिर सुरू  झालंच, पण त्याबरोबरीनं आकाराला आला होता मुलं आणि बालशिक्षक यांच्यात एक सुंदर नातेबंध..

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 5, 2020 1:05 am

Web Title: teachers day 2020 teachers and students online school dd70
Next Stories
1 गर्जा मराठीचा जयजयकार : प्रयोगशील शिक्षणातील मराठी शाळा
2 हेल्पलाइनच्या अंतरंगात : सुरक्षा वनं, वन्यजीव आणि नागरिकांचीही !
3 चित्रकर्ती : रुक्ष वाळवंटातील ‘हरीजरी’
Just Now!
X