ch18एखाद्या मुलाची वर्गातील उपस्थिती अचानक कमी होणे, त्याला प्रवेश घेतलेली शाखा बदलावीशी वाटणे किंवा महाविद्यालयात जाणेच सोडून देणे ही लक्षणं दिसू लागतात, तेव्हा शिक्षकांची भूमिका फार महत्त्वाची असते. त्यांच्या पुढाकाराने मुलांमधील भीती कमी होऊ शकते. -‘करिअर निवडताना’ या लेखाचा हा दुसरा भाग.
आं बेजोगाईजवळच्या एका छोटय़ाशा खेडय़ातून मुंबईत उच्च शिक्षण घेण्यासाठी आलेला शरद नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यानंतर अवघ्या पंधरा दिवसांतच महाविद्यालयात जायला कचरू लागला. चांगल्या गुणांनी दहावीची परीक्षा उत्तीर्ण झालेला शरद हा एक अत्यंत हुशार मुलगा होता. म्हणूनच त्याच्या पालकांनी पुढील शिक्षणासाठी त्याला मुंबईत त्याच्या काकांकडे पाठवलं होतं. मुंबईत त्याला सगळंच नवीन होतं. तो महाविद्यालयात जाऊ लागला, पण पहिल्या काही दिवसांतच निराश दिसू लागला. वर्गातील इतर मुलांचे कपडे, त्यांची जीवनशैली, फॅशन, त्यांचा पॉकेटमनी आणि त्यांना सहज बोलता येणारी इंग्रजी- हे सगळं पाहून शरद स्वत:ला कमी लेखू लागला.
आपण या मुलांपेक्षा कमी आहोत, मागे आहोत अशा विचारांनी त्याच्या मनात थैमान घालायला सुरुवात केली. महाविद्यालयातलं नवं शहरी वातावरण आणि मुलांची प्रतिष्ठा ठरविणाऱ्या या इतर गोष्टी याने शरद पुरता बावरून गेला. या सांस्कृतिक धक्क्यांमुळे त्याच्या मनात महाविद्यालयात जाण्याबाबतच भीती घर करू लागली. त्याने असे कॉलेजला जाणे कमी केलेले पाहून त्याच्या काकांनी त्याला एक मोठे प्रवचन ऐकवले, पण फरक पडला नाही. त्याच्या मनातली भीती आणि नैराश्याची भावना कमी झाली नाही. तो मला म्हणाला, ‘मला इथे राहायचे नाही. मला घरी परत जायचे आहे.’ मी त्याचं सगळं म्हणणं ऐकून घेतलं आणि त्याला ‘तुला इथेच राहावे लागेल, आता परत जाता येणार नाही किंवा इथे राहून दाखवच’ अशी कोणतीही आव्हानं दिली नाहीत. अशा प्रकरणांमध्ये, विशेषत: जेव्हा मुलं ग्रामीण भागातून शहरात येतात तेव्हा त्यांच्यासाठी महाविद्यालयांनी ओरिएन्टेशन कार्यक्रम ठेवला पाहिजे. त्यामुळे वेगळ्या वातावरणात रुळण्याची मुलांची मानसिक तयारी होते आणि वातावरण कसे असेल याची त्यांना थोडी कल्पना येते, त्यामुळे जुळवून घेणं सोपं जातं.
मी त्याला माझ्याबरोबर प्राचार्याच्या कार्यालयात नेलं आणि त्यांच्या मदतीने त्याच महाविद्यलयातील एक असे प्राध्यापक शोधून काढले जे शरदसारखेच उच्च शिक्षणासाठी काही वर्षांपूर्वी मुंबईत आले होते आणि आज ते एक यशस्वी प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. अशा वेळी एकसारखी पाश्र्वभूमी असलेले शिक्षक मदतीचा मोठा आधार ठरतात. त्या शिक्षकांनी शरदला दिवसभरात किमान एका लेक्चरला बसायला सांगितले. वर्गात जायच्या आधी या शिक्षकांना भेटायचे आणि मग वर्गात जायचे असे ठरले. त्याप्रमाणे शरद वागू लागला. शरद भेटायला आला की ते शिक्षक आपला डबा काढायचे आणि नाश्ता करता करता त्यांचे सुरुवातीचे अनुभव त्याच्याशी शेअर करायचे आणि त्यालाही आपल्या डब्यातला खाऊ द्यायचे. हळूहळू शरदच्या मनातली भीती कमी होऊ लागली आणि आपणसुद्धा सरांसारखे मोठे होऊ शकतो हा आत्मविश्वास येऊ झाला. त्याच्यापेक्षा अनेक बाबतींत वेगळ्या असलेल्या मुलांशी आता त्याची मैत्री होऊ लागली आणि तिथल्या वातावरणात तो छान रुळला. आता तो इंग्रजीही चांगलं बोलतो आणि आत्मविश्वासाने वावरतो. शिक्षकांची भूमिका फार महत्त्वाची असते. शरदसारख्या बावरलेल्या मुलांना ओळखून त्यांना वेळीच पुन्हा रुळावर आणणे गरजेचे असते. एखाद्या मुलाची वर्गातील उपस्थिती अचानक कमी होणे, त्याला प्रवेश घेतलेली शाखा बदलावीशी वाटणे किंवा महाविद्यालयात जाणेच सोडून देणे ही लक्षणं दिसू लागतात. अशा वेळी शिक्षकांनी थोडा पुढाकार घ्यावा. या मुलांना मदत करू शकतील अशी त्यांच्याच वयाची मुलं निवडून त्यांना या मुलांबरोबर राहण्यास सांगितले तर ती मुलं एकटी पडणार नाहीत. त्यांना चांगली सोबत मिळाली की बाहेरून आलेल्या मुलांच्या मनातील भीती कमी होऊ शकते. महाविद्यालयात जर समुपदेशक असेल तर अशा प्रसंगी त्यांची खूप मदत होते. आजकाल महाविद्यालये त्यांच्या कार्यक्रमांवर भरमसाट पैसा ओततात, पण पगार द्यायला पैसे पुरेसे नाहीत असे कारण पुढे करून समुपदेशकाची महत्त्वाची जागा मात्र भरतच नाहीत.
माझ्या ओळखीतला एक मुलगा अभियांत्रिकीच्या परीक्षेत अनुतीर्ण झाला आणि त्याच्या घरी एकच गहजब झाला. मी त्याला भेटलो तेव्हा तो मुलगा तोंडातून चकार शब्द काढायला तयार होईना. जाताना माझ्या हातात एक पाकीट देऊन गेला. मी ते उघडलं तर त्यात त्याने केलेल्या कवितांचे अनेक कागद, चिटोरे होत्या. मी त्या वाचल्या. त्याला बोलावून घेतलं आणि त्याच्याकडील आणखी काही कविता मागवल्या. त्या मुलाकडे मला सुमारे दीडशे ते दोनशे स्वरचित कविता सापडल्या. प्रत्येक कविता अतिशय भावपूर्ण आणि आशयघन होती. मला त्याच्या काव्यप्रतिभेचे कौतुक वाटले. एकोणीस वर्षांच्या त्या मुलाने इतक्या सुंदर कविता लिहिल्या होत्या की त्यावरून तो किती विचार करतो हे कळत होतं. मी लगेचच एका प्रकाशकाला त्या कविता पाठविल्या आणि त्या मुलाचा पहिला कवितासंग्रह प्रसिद्ध झाला. आता तो मुलगा पत्रकारितेच्या क्षेत्रात उत्साहाने वावरतो आहे आणि त्याची लेखनशैली दिवसेंदिवस बहरते आहे. अर्थात त्याने अभियांत्रिकीची शाखा केव्हाच सोडली हे वेगळे सांगायला नको.
मुलं करिअरची एखादी दिशा निवडतात आणि त्या दिशेने त्यांचा प्रवास सुरूही होतो, पण यदाकदाचित पुढे तो प्रवास कठीण होऊ लागला तर दुसरी दिशा निवडून त्या मार्गाने नव्याने प्रवास सुरू करता येतो हे आज पालकांनी लक्षात घेण्याची खूप गरज आहे. अमुक एका शिडीवरून नाही चढून जाता आलं तरी हरकत नाही. तिथे अडकून पडण्यापेक्षा सुज्ञपणे दुसरी शिडी निवडा आणि त्या शिडीवरून पुढे जा अशी भूमिका पालकांनी घेतली तर किती चांगलं होईल. चुकीच्या शिडीवर अडकून पडणे म्हणजे आपत्ती ओढवून घेण्यासारखे असते. त्या अट्टहासात महत्त्वाची वर्षे वाया जातात.
माझा एक भाऊ एका प्रतिष्ठित महाविद्यालयातून संगणक अभियंता म्हणून चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाला. तो आमच्या कुटुंबातील पहिला संगणक अभियंता असल्यामुळे सगळ्यांच्या कौतुकाचा धनी ठरला. काही वर्षे त्याने भारतात आणि त्यानंतर परदेशातही चांगल्या पगाराच्या नोकऱ्या केल्या. पण अचानक त्याला चित्रपट निर्मिती क्षेत्रात रस वाटू लागला. इकडे त्याचे पालक त्याच्या लग्नाचा विचार करीत होते आणि तोच त्यांना त्याच्या या नव्या आवडीविषयी कळल्याने त्यांना धक्काच बसला. पण तो त्याच्या निर्णयावर ठाम राहिला आणि त्याने चित्रपट निर्मितीचे शास्त्रशुद्ध तंत्र शिकवणाऱ्या संस्थेत प्रवेश घेतलासुद्धा. आज तो एका बडय़ा निर्मिती संस्थेत साहाय्यक दिग्दर्शक म्हणून कार्यरत आहे. त्याला पुन्हा मागे आणावे आणि संगणक अभियंता म्हणून नोकरी करण्यास भाग पडावे यासाठी आमच्या कुटुंबातील मंडळी माझ्यावर दबाव आणत होती. पण मी जेव्हा त्याला भेटलो, त्याचे काम पहिले, त्या कामातून त्याला मिळणारा आनंद पाहिला तेव्हा तो योग्य मार्गावर असल्याचे मला पटले. कधी कधी आयुष्यात एक वेगळेच वळण येते आणि सरधोपट वाट सोडून त्या वळणावरून पुढे जावेसे वाटू लागते. असे वाटण्यामागे काही कारण असेलच असेही नाही, पण ज्या गोष्टीची आवड निर्माण होते ती थांबविता येत नाही. आज अनेक डॉक्टर आणि अभियंते जाहिरात क्षेत्रात मोठे झालेले दिसतात. अभियांत्रिकी शाखेतून बाहेर पडलेले अनेक विद्यार्थी आज एमबीए करताना दिसतात. आयआयटीमध्ये शिकून परदेशांत जाण्याची भाषा जे करतात त्यांच्याशी माझे मतभेद होतात. आज भारतात चांगल्या अभियंत्यांची गरज आहे आणि ते मिळत नाहीयेत. अभियांत्रिकीचे शिक्षण घेऊन देश सोडणाऱ्यांची संख्या मोठी आहे. वैद्यकीय शिक्षण पूर्ण केल्यानंतर डॉक्टरांनी ग्रामीण भागात जाऊन किंवा सरकारी रुग्णालयात जाऊन शिकणे आणि सेवा देणे जसे बंधनकारक आहे तसे बंधन आज अभियंत्यांवर का नाहीये? वैद्यकीय शिक्षणामध्ये लोकांकडून वारेमाप पैसा उकळला जातो, पण अनेक खासगी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये सराव आणि प्रशिक्षणाचाच अभाव असतो. सराव दिला नाही तर परिपूर्ण डॉक्टर्स कसे निर्माण होणार? म्हणूनच करिअरची निवड करण्यापूर्वी आणि त्यानुसार महाविद्यालय निवडण्यापूर्वी पालकांनी आवश्यक ती चौकशी करणे गरजेचे असते. आवडीच्या विषयात करिअर करता आले तर ते तुमच्या आयुष्यात अनेक रंग भरते. करिअर हे स्वप्न रंगविण्याचा, ते अनुभवण्याचा आणि अनेक रंगांनी रंगविण्याचा विषय आहे आणि म्हणूनच त्याची निवड करताना डोळे उघडे ठेवून करण्याची नितांत गरज आहे.
डॉ. हरीश श़ेट्टी -harish139@yahoo.com
शब्दांकन- मनीषा नित्सुरे-जोशी