सुजाण पालकत्व
शाळेतला किंवा महाविद्यालयातला तो वर्ग जिथे आपण शिकतो ते ज्ञानाचे एक मंदिर असते, जिथे ज्ञानाची उपासना होते. या मंदिरात जाताना आपण तीन प्रकारच्या चपला बाहेर काढून जायला पाहिजे. पहिली गोष्ट म्हणजे शिक्षकांविषयीचे आपण बाळगलेले पूर्वग्रह, दुसरे म्हणजे एखाद्या विषयाबद्दल असलेल्या आपल्या आवडीनिवडी किंवा आकस किंवा भीती, तिसरे म्हणजे स्वत:च्या क्षमतेबद्दल असलेल्या आशंका.. का ते स्पष्ट करणारा लेख.
मागच्या लेखात म्हटल्याप्रमाणे ज्ञानाभिसरणाचे एकमेव साधन म्हणजे आजचे व्याख्याते (लेक्चर्स).  कुठल्याही विद्यार्थ्यांचा सर्वाधिक काळ लेक्चर ऐकण्यात खर्च होणार असतो. साहजिकच शिक्षक जे सांगू इच्छितो ते जर १०० टक्के विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचले तरच शिक्षणाची प्रक्रिया पूर्ण होणार असते. दुर्दैवाने असे होत नाही. संवादातून होणाऱ्या शैक्षणिक दळणवळणात अनेक अडथळे असतात आणि या अडचणी व्यक्तिगणिक कमी-जास्त होतात. खरं म्हणजे कोणत्याही दोन व्यक्तींमध्ये होणाऱ्या संभाषणात नेहमीच अडचणी असतात. तेव्हा लेक्चर्स ऐकणे हासुद्धा सदोष संभाषणाचाच एक नमुना असू शकतो. खरं म्हणजे शिक्षक देत असलेलं एकच लेक्चर सर्व विद्यार्थी ऐकत असतात. परंतु त्यातून व्यक्त केलेले विचार किंवा तत्त्व किंवा माहिती समप्रमाणात पोहोचत नाही. प्रत्येक विद्यार्थ्यांचे टय़ुनिंग वेगळे असते. त्याचे स्वत:चे फिल्टर्स असतात. या संदर्भात मी एकदा एक प्रयोग केला होता. एक विद्यार्थी जो माझ्या कार्यशाळेला हजर होता. कार्यशाळा संपल्यानंतर तो अत्यंत उत्साहात मला म्हणाला, ‘‘सर, आता बघा मी काय करून दाखवितो.’’ मी त्याला हसून म्हणालो, सध्या तू कार्यशाळेच्या प्रभावाखाली आहेस. काही दिवस जाऊ दे, नंतर मला भेट. तो माझ्या अपेक्षेप्रमाणे परत आला आणि म्हणाला, ‘‘सर, काय करू परत पहिल्यासारखे फ्रस्ट्रेशन यायला लागलंय. तीन तास क्लासमध्ये आणि सात तास कॉलेजमध्ये घालवल्यानंतर अभ्यासाला वेळच उरत नाही. आणि रोजच आपला परफॉर्मन्स चांगला होईल असं नाही. आपल्याला अभ्यासाला वेळ का पुरत नाही असा विचार येऊन मी अस्वस्थ होतो. काहीतरी उपाय सांगा.’’ मी त्याला विचारले की क्लासमध्ये, कॉलेजमध्ये लेक्चर्स अटेंड करतोस ना? तो म्हणाला, हो. मग प्रत्येक लेक्चर संपले की फारसा विचार न करता तुझे त्या लेक्चरमध्ये किती लक्ष होते यावर स्वत:ला १ ते १० मार्क्स द्यायचे. १० मार्क्स म्हणजे तुझं त्या लेक्चरमध्ये पूर्ण लक्ष होतं आणि सांगितलेलं सगळे तुला समजले असा होतो. असे जर नसले तर त्या प्रमाणात स्वत:ला कमी मार्कस् द्यायचे. एक आठवडाभर हा प्रयोग करून मला भेटायला ये. त्या मुलाने प्रामाणिकपणे हा उद्योग केला आणि संपूर्ण आठवडय़ाचे स्टॅटिस्टिक्स माझ्यासमोर ठेवले. त्यात त्याने स्वत:ला दिलेल्या मार्काची सरासरी आश्चर्यकारकरीत्या कमी होती. म्हणजे फक्त ३५ टक्के होती. याचा अर्थ शिक्षणासाठी खर्च होणाऱ्या वेळेच्या ६५ टक्के वेळ वाया जात होता. मी त्याला विचारलं, असे का? त्यावर तो म्हणाला, ‘सर खरं सांगू का? ते प्रोफेसर एकदम बोअर आहेत. हे माझंच नव्हे, बऱ्याच मुलांचे मत आहे.’
‘मग तुम्ही त्यांच्या लेक्चर्समध्ये काय करता?’ मी.
‘काही नाही. मागच्या बेंचवर बसून इतर बरेच उद्योग करतो.’ तो म्हणाला.
‘अच्छा ठीक आहे. दुसऱ्या लेक्चरनंतर तू स्वत:ला फक्त ४ मार्क्स दिले आहेत. ते का?’ मी. ‘सर, ते लेक्चर केमिस्ट्रीचं होतं. प्रोफेसर चांगले आहेत, पण मला हा विषय अजिबात आवडत नाही. माझं लक्ष नाही लागत!’ तो.
‘ठीक आहे. तिसऱ्या लेक्चरसाठी तू स्वत:ला ५ मार्क्स दिले आहेत. त्याचा काय प्रॉब्लेम आहे? टीचर्स बोअर आहेत की विषय कंटाळवाणा आहे?’ मी.
‘दोन्ही नाही. टीचर्स पण चांगले आहेत, विषय पण बोअर नाही म्हणता येणार. परंतु मला स्वत: खात्री वाटत नाही. मी गणितात कच्चा आहे. मला वाटते मी काही केले तरी मला हा विषय येणार नाही.’
थोडक्यात, शिक्षक जे काय शिकवितो ते सर्व शिकण्यात किंवा पचवण्यात तीन तऱ्हेचे अडथळे असतात. पहिला अडथळा शिक्षकाविषयीचे आपले पूर्वग्रह! दुसरा अडथळा विषयाबद्दल असलेल्या आपल्या आवडीनिवडी! तिसरा अडथळा म्हणजे आपल्या स्वत:च्या क्षमतेबद्दल असणारा अविश्वास. त्या विद्यार्थ्यांच्या मार्काबद्दल विचार करत असताना मला माझे स्वत:चे विद्यार्थी जीवन आठवायला लागले. मी त्या वयाचा असताना काही वेगळा नव्हतो.
मी दहा हजार लोकांची वस्ती असलेल्या जळगाव जिल्ह्य़ातील एका खेडेगावात जन्माला आलो. मराठी माध्यमाच्या शाळेत ११वीपर्यंत शिकलो. ११वी नंतर जेव्हा जिल्ह्य़ाच्या गावी महाविद्यालयात शिकायला गेलो तेव्हा असे वाटायचे की इथले प्राध्यापक सर्वार्थाने गावातल्या शिक्षकांपेक्षा सरस असतील. त्यांचे इंग्लिश, त्यांचे ज्ञान जास्त चांगलं असेल. मला आठवते की माझे महाविद्यालयातले पहिलेच लेक्चर फिजिक्सच होते. एक प्राध्यापक महाशय वर्गात शिरले. त्यांनी सुरुवात केली ती अशी ‘लेट देअर बी अ कॉइन! कॉइन म्हणजे नानं!’ एवढं ऐकल्याबरोबर माझ्यातला रिअॅलिटी शोतला परीक्षक जागा झाला. अरे, या माणसाला धड मराठीसुद्धा येत नाही. त्यांना इंग्लिश काय येणार? फिजिक्स तर सोडूनच द्या. त्या दिवसापासून मी माझे ज्ञानचक्षु त्या प्राध्यापकापुरते बंद करून टाकले. ६ महिन्यांनंतर सहामाही परीक्षेत मला अगदी कमी मार्कस् मिळाले. माझा एक अतिशय जवळचा हुशार मित्र होता. त्याला मात्र पैकीच्या पैकी मार्कस् मिळाले. त्याला मी विचारले, ‘तुला कसे काय मार्कस् मिळतात?’ त्यावर त्याचे उत्तर माझ्या डोळ्यात झणझणीत अंजन टाकणारे होते. तो म्हणाला, ‘ते सर आहेत ना, ज्यांना तुझ्या मते इंग्लिश येत नाही. त्यांना मराठी पण चांगले येत नाही, हो की नाही? पण त्यांना फिजिक्स येते. त्यांच्याकडूनच मी सगळं शिकलो.’
त्याने स्वत:शी प्रामाणिक रहात फायदा करून घेतला. मी मात्र नको त्या भूमिका स्वत:वर लादल्या आणि नुकसान करून घेतले. समोरची व्यक्ती मूर्ख आहे असा चष्मा आपण डोळ्यावर लावला की आपल्या दृष्टिकोनाशी सुसंगत पुराव्याची आपण गोळाबेरीज करायला लागतो. त्यांच्या चुका मोजत रहातो. त्याचे गबाळेपण, त्याची भाषा, त्याची वेषभूषा सगळ्यातून आपल्याला सुसंगत असे पुरावे गोळा करत रहातो.
या संदर्भात मी केलेल्या एका प्रयोगाचा इथे उल्लेख करणं आवश्यक आहे. खरं म्हणजे या प्रयोगातून निर्माण होणारे निष्कर्ष फार विस्तृत प्रमाणात सर्वच कम्युिनकेशनला लागू होतात. एकदा एका वर्गावर माझं पहिलंच लेक्चर होतं. थोडक्यात माझ्या लेक्चर्सकडे बघण्याचा कोणताही चष्मा अजून निर्माण झाला नव्हता. मी माझ्या एका जुन्या विद्यार्थ्यांला बोलावले आणि सांगितले की या वर्गातल्या एका मुलाला बाहेर बोलावून विचार की कुणाचे लेक्चर आहे? तो म्हणेल, कोणीतरी जकातदार म्हणून सर आहेत. तेव्हा त्यांना सांग अगदी कपाळावर शक्य तितक्या आठय़ांचे जाळे करून, अरे बापरे सगळ्यात पकाऊ शिक्षक तुला शिकवायला येत आहेत!
‘काय सर माझी चेष्टा करता? मी त्याला असं का सांगू?’
‘अरे, हा एक प्रयोग आहे! मी म्हणतो ते कर.’ त्या मुलानं मी सांगितल्याप्रमाणे एकाला बोलावून त्याला तसं सांगितलं. नंतर त्याला सांगितलं की आता दुसऱ्या विद्यार्थ्यांला बोलावून सांग की या कॉलेजमधले सवरेत्कृष्ट शिक्षक तुला आता शिकवायला येत आहेत. त्याने ते पण केले. ते दोघे विद्यार्थी एकमेकाशेजारी बसून माझे लेक्चर ऐकत होते. त्या लेक्चरमध्ये मी ठरवून ४-५ अत्यंत साध्या चुका केल्या. शिक्षकांनी अशा चुका केल्या की मुलांना खूप जोश येतो. ते खूप खूश होऊन आरडाओरडा करतात. सर, सर, सर करून अगदी सरसावून येतात. मला हे सगळं अपेक्षित होतं. त्यामुळे काही बिघडले नाही. लेक्चर संपल्यावर मी माझ्या जुन्या विद्यार्थ्यांला त्या दोन विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया विचारायला सांगितल्या. पहिला म्हणाला, ‘तुझं म्हणणं बरोबर होतं. अरे त्या माणसाला साधी बेरीज नि गुणाकार करता येत नाही.’ दुसरा मात्र त्याच्याकडे आश्चर्याने बघत होता. तो म्हणाला, ‘अरे इतकी र्वष गणित शिकवणाऱ्या माणसाला हे येत नसेल असे कसे म्हणतोस? अशा चुका होतात. मीसुद्धा अनेकवेळा अशा चुका करतो. पण एकंदरीत मात्र त्यांनी सांगितलेल्या सगळ्या संकल्पना मला नीट समजल्या. खरे म्हणजे मला वाटते ते अतिशय चांगले शिक्षक आहेत.’
गंमत म्हणजे दोघांच्या माझ्या लेक्चरबद्दलच्या या मतामध्ये मी किंवा माझे लेक्चर कुठेच नव्हते. जे काही त्यांना प्रतीत होत होते ते त्यांनी घातलेल्या चष्म्यामधून पडलेले माझ्या लेक्चरचे प्रतिबिंब होते.
त्यासारखाच एक दुसरा प्रयोग मी करून पाहिला. एका विद्यार्थ्यांचे ठाम मत होते, त्याला गणितात फारशी गती नाही. दुसऱ्याची मात्र स्वत:ला गणित चांगले येते अशी खात्री होती. त्यांना एका वर्गामध्ये बसविले आणि त्या दोघांना आय.आय.टी.च्या आधीच्या परीक्षेत आलेले गणित सोडवायला दिले. आता आय. आय. टी.च्या परीक्षेत येणारे बरेच प्रश्न आधी समजायलाच खूप वेळ लागतो. त्यामुळे दोघांनीही तो प्रश्न वाचला. दोघांनाही तो कळला नाही. पहिल्या मुलाच्या मनात साहजिकच आले की आपल्याला काही हा प्रश्न सुटत नाही. नाहीतरी आपले गणित कच्चेच आहे. त्याने थोडय़ा वेळाने प्रयत्न करणेही सोडून दिले. याउलट दुसरा मात्र गणित का कळत नाही या विचारात पडला. आपल्याला हा प्रश्न आलाच पाहिजे या हट्टामुळे त्याने तो परत परत वाचला. हळूहळू त्याला तो प्रश्न कळायला लागला. त्यातच त्याने मोठी लढाई जिंकली होती. तो कसा सोडविता येईल या विषयी त्याच्या मनाने आडाखे बांधायला सुरुवात केली. थोडय़ा प्रयत्नांनंतर तो जोरात चीत्कारला, ‘सुटलं.’ खरे म्हणजे त्याला अजिबात कळले नाही की थोडा म्हणजे चांगला अर्धा तास तो प्रश्न सोडविण्यात गर्क होता. त्याने प्रश्न सोडविलेला पाहून पहिला अधिकच खजील झाला. आता त्याची खात्रीच पटली की गणित आपल्याला येणारच नाही. त्यांचे निरीक्षण करणाऱ्या मुलाला मी त्याचं निरीक्षण विचारले, तर तो म्हणाला, ‘या पहिल्या मुलाने प्रयत्नच केला नाही. दुसऱ्याने मात्र खूप मेहनत करून प्रश्न सोडविला.’ वास्तविक दुसऱ्याची बुद्धिमत्ता पहिल्यापेक्षा खरोखरच श्रेष्ठ होती का? खरे म्हणजे दोघांचा परफॉर्मन्स दोघांच्या आपल्या क्षमतेविषयी असलेल्या चष्म्याशी सुसंगत होता. पहिला हे सिद्ध करत होता, की त्याला गणित येत नाही आणि दुसरा हे सिद्ध करत होता की तो गणितात कसा हुशार आहे. दुसऱ्या विद्यार्थ्यांने गणित सोडविले हे तो हुशार होता म्हणून नव्हे तर ते सोडविण्यासाठी त्याने हरतऱ्हेचे प्रयत्न केले आणि असे प्रयत्न करण्याची ऊर्जा किंवा इच्छा त्याच्या स्वत:विषयीचा पॉझिटिव्ह अॅटिटय़ूडमधून त्याला मिळाली. या उलट पहिल्या विद्यार्थ्यांने आधीच शस्त्र खाली ठेवले. शिक्षक काय किंवा पालक काय, दोघांनाही मुलांच्या मानसिकतेची जाणीव हवी आणि त्यांना अशा या प्रगतीला बाधक अशा पूर्वग्रहापासून मुक्त व्हायला मदत करावी अशा मताचा मी आहे. त्यासाठी शिक्षणाकडे बघण्याचा एक व्यापक दृष्टिकोन बाळगायला हवा. गंमत म्हणजे चांगल्या शिक्षकाकडे काय काय असायला हवे. असा जर प्रश्न पालकांना किंवा विद्यार्थ्यांला विचारला तर त्याची उत्तरे तयार असतात. त्याला विषय चांगला आला पाहिजे, त्याचे भाषेवर प्रभुत्व हवे. ते स्पष्ट करण्याची योग्य उदाहरणे देऊन सांगण्याची हातोटी पाहिजे.. लिस्ट संपतच नाही. पण चांगल्या विद्यार्थ्यांची लक्षणे काय, असा प्रश्न विचारला तर त्यांच्याकडे सहसा उत्तर तयार नसते. माझ्या मते चांगला विद्यार्थी म्हणजे असा ज्ञानार्थी की, जो वाईट शिक्षकांकडूनसुद्धा स्वत:ला हवं ते शिकून घेतो.
खरं म्हणजे शाळेतला किंवा महाविद्यालयातला तो वर्ग जिथे आपण शिकतो ते ज्ञानाचे एक मंदिर असते, जिथे ज्ञानाची उपासना होते. या मंदिरात जातानादेखील आपण तीन प्रकारच्या चपला बाहेर काढून जायला पाहिजे. पहिली गोष्ट म्हणजे शिक्षकांविषयीचे आपण बाळगलेले पूर्वग्रह, दुसरे म्हणजे एखाद्या विषयाबद्दल असलेल्या आपल्या आवडीनिवडी किंवा आकस किंवा भीती, तिसरे म्हणजे स्वत:च्या क्षमतेबद्दल असलेल्या आशंका. या तीन गोष्टी आपण जर चपला समजून वर्गाच्या बाहेर ठेवल्या तर आत गेल्यानंतर तोच शिक्षक, तोच वर्ग, तोच विषय परंतु शैक्षणिक अनुभव आणि परिणाम मात्र अगदी वेगळे असणार आणि खऱ्याखुऱ्या अर्थाने ज्ञान प्राप्त होणार.
pmjakatdar@gmail.com