बगीच्यासाठी खत हे घरचेच वापरावे याला दुजोरा देण्यासाठी अनेक कारणे आहेत. बाजारातील खत घेताना फसवणूक होण्याची शक्यता अधिक असते भले ते गांडुळ खत असो किंवा आणखी कोणतेही. हे खत जुने झाले की त्याचे आवश्यक आणि अपेक्षीत परिणाम होत नाहीत. बरेचदा या खतात भेसळ असते. त्यापेक्षा घरचे खत विनासायास बनू शकते. शिवाय ते एकशे एक टक्के रसायनमुक्त व डोळ्यांदेखत बनल्यामुळे खात्रीलायकही असते. नसíगक घटकांपासून बनवल्यामुळे या खताचे परिणाम चांगले दिसून येतात. या खतामुळे मातीही कसदार होते. ‘घरच्या घरी खत’ हे घरातच निर्माण होणारा ओला कचरा, झाडांचा पालापाचोळा, ऊसाचे पाचट आणि नारळाच्या शेंडया यापासून आपण करू शकतो. कचऱ्याचे घरीच व्यवस्थापन झाल्यामुळे कचरा विल्हेवाटीलाही हातभार लावल्यासारखे होते.

ओल्या कचऱ्यापासून खत
स्वयंपाकघरातील ओला कचरा म्हणजे जैविक, कुजणारा कचरा होय. ज्याचे नैसर्गिकरित्या विघटन होऊन खत तयार होऊ शकते असा कचरा. प्रत्येक कुटुंबातली सरासरी चार माणसे गृहित धरली तरी प्रत्येक दिवशी २५० गॅ्रम ओला कचरा तयार होतो. या प्रमाणे वर्षभरात १०० किलो कचरा तयार होतो. ओल्या कचऱ्याचे साधारण पुढीलप्रमाणे वर्गीकरण करता येईल- पहिला म्हणजे हिरवा कचरा ज्यात भाजीपाल्याच्या काडय़ा, फळांच्या साली, टरफले, देठं येतात तर दुसरा प्रकार म्हणजे वाया गेलेले अन्न, तर तिसरा खरकटे पाणी. या तिनही स्वरूपाचा कचरा बागेसाठी उपयुक्तच ठरतो.
स्वयंपाक घरात तयार होणारा हिरवा कचरा उन्हात चांगला वाळवून घ्यावा. आपल्याकडे चांगले ऊन असते, शक्य असेल तर गच्चीवर मोकळ्या जागेत आहे तसा टाकून तो आधी सुकवावा. भाज्यांच्या देठांचे वा तत्सम कचऱ्याचे बारीक तुकडे करून घ्यावे, त्यामुळे कचरा वाळण्याची प्रक्रिया लवकर घडते. तसेच असा कचरा जाळीदार पृष्ठभागावर किंवा चाळणीवर लवकर वाळतो. फ्लॅटमधील छोटय़ा बाल्कनीत पेपर वर पसरवून हा कचरा चांगला वाळवून घ्यावा. वाळलेला कचरा हातात घेऊन पापडासारखा कुस्करावा, त्याचा कुरकुरीत आवाज आला तर तो कचरा तागाच्या अथवा सच्छिद्र गोणीत, पिशवीत भरून ठेवता येतो. तो कुंडीच्या पुनर्भरणासाठी (रिपॉटिंगसाठी) वापरता येतो. तसेच कुंडीतील झाडांच्या भोवती त्याचे आवरण (मिल्चग) केल्यास कुंडीतील, वाफ्यातील पाण्याचे कमी प्रमाणात बाष्पीभवन होते. यातून झाडांना पोषक तत्वही हळू हळू मिळतात व झाडे चांगली हिरवीगार टवटवीत होतात. म्हणजे घरच्या कचऱ्याचा घरीच चांगला वापर होऊ शकतो.

– sandeepkchavan79@gmail.com