News Flash

निरामय घरटं : निमित्तमात्र!

आपल्यावाचून कशाचं, कोणाचं अडणार नसतं, ना कधी अडलेलं होतं. आपण एक ‘निमित्तमात्र’ आहोत ही जाणीव जितक्या स्पष्टपणे आणि लवकर होईल, तितके अभिनिवेश गळून पडतील.

शिकणं-शिकवणं, घडणं-घडवणं, या प्रक्रियांमध्ये आपण ‘निमित्तमात्र’ आहोत, म्हणत भरभरून जगता येतं. एक-एक फूल हातून ओवलं जाताना आपण निमित्तमात्र, माळ गुंफणं हे मोठं ध्येय, हे जेव्हा भिनतं, तेव्हा व्यक्तिनिरपेक्ष कामाची साखळी जोडली जाते!

उमा बापट – umaajitbapat@gmail.com

आपल्यावाचून कशाचं, कोणाचं अडणार नसतं, ना कधी अडलेलं होतं. आपण एक ‘निमित्तमात्र’ आहोत ही जाणीव जितक्या स्पष्टपणे आणि लवकर होईल, तितके अभिनिवेश गळून पडतील. शिकणं-शिकवणं, घडणं-घडवणं, या प्रक्रियांमध्ये आपण ‘निमित्तमात्र’ आहोत, म्हणत भरभरून जगता येतं. एक-एक फूल हातून ओवलं जाताना आपण निमित्तमात्र, माळ गुंफणं हे मोठं ध्येय, हे जेव्हा भिनतं, तेव्हा व्यक्तिनिरपेक्ष कामाची साखळी जोडली जाते!

जबाबदार पालक, कर्तव्यदक्ष कर्मचारी या मानसिकतेनं कामाला आणि आपल्या भूमिकेला वाहून घेणं अनेकवेळा बघायला मिळतं. कामाशी समरस आणि भूमिकेशी एकरूप असणं काहींना सहजी जमतं. वेगवेगळ्या वयात आणि वेगवेगळ्या परिस्थितीत प्रामाणिकपणे, सातत्यानं, निखळ, निर्मळ जगणं चालू असतं. काही वेळा आपण करत असलेलं काम आणि आपली भूमिका अपरिहार्य आहे, आपण अमुक एक गोष्ट केली नाही तर ती होणार नाही, असंही वाटून जातं.

सर्वस्वानं, तळमळीनं एखादी भूमिका जगणं, कार्यक्षेत्रात आपली कामगिरी शून्यातून उभं करणं, एखादं विश्व साकारणं, हे आपल्याशिवाय घडणारच नसतं का? काही वेळेला आपण या साखरझोपेत मग्न असतोही.. पण वास्तव काय असतं? तेही लख्खपणे कधी आपल्या समोर ठाकतं! खरं तर आपल्यावाचून कशाचं, कोणाचं अडणार नसतं. ना कधी अडलेलं होतं. ज्याला-त्याला ते कधी, कसं, किती समजणार, उमगणार, यात व्यक्तिभिन्नता अर्थात असणार. एखाद्या गृहिणीला आयुष्याच्या मध्यात आपण हे सगळं नेमकं कोणासाठी करत आलो, असा संभ्रम पडू शकतो. कोणी निवृत्तीच्या वयानंतर आपण काय मिळवलं, असा धांडोळा घेऊ पाहातो. उभं आयुष्य समाज बांधिलकीनं कामात झोकून देऊन, एखादी विधायक, कार्यशील संस्था समाजात उभी करूनसुद्धा हा प्रश्न काहींना सतावतो असं दिसून आलं आहे.

शशीताई नवीन लग्न झाल्यापासून लग्नाला कित्येक र्वष लोटली तरी नवऱ्याला, मुलांना माझ्याच हातचं अमुक-तमुक कसं लागतं, याचं अभिमानानं रसभरीत वर्णन सांगायच्या. अशा किती तरी स्त्रिया आजही बघायला मिळतात. तिथंपासून ते ‘‘मी माझी वेळ झाली की बाहेर पडते, तिकडे घरात काय व्हायचं ते होऊ देत’’ असं सांगणाऱ्याही अनेक जणी भेटतात. बाहेर जाण्याची कारणं वेगवेगळी असतात. कामासाठीची बैठक, मैत्रिणींना भेटणं, छंद , परगावी वा परदेशी जाणं असो. हे लीलया करतो, असं मिरवणाऱ्या स्त्रियाही दिसतात. या दोन भिन्न मानसिकता असल्या, तरी दोन्ही बाबतींत ‘कुटुंबातलं परस्परपूरक नातं उलगडण्याचा विचार’ या महत्त्वाच्या पैलूला अग्रक्रम दिल्याचं दिसत नाही. कुटुंबाचं एकत्रित वाढणं आणि समग्र जगणं जर केंद्रस्थानी ठेवायचं असेल, तर कुटुंबातल्या प्रत्येकात ते रुजावं लागेल, हे प्रकर्षांनं समोर यायला हवं. त्यामुळे ‘निर्मोही संयम’ (२५ एप्रिल), ‘निकोप स्वातंत्र्य’ (१५ अॉगस्ट) या संकल्पनांची निर्मिती ‘निरामय घरटं’ या सदरात आवर्जून साकारली. घरासाठी किंवा कामाच्या ठिकाणी काही करताना आपण एक ‘निमित्तमात्र’ आहोत, ही जाणीव जितक्या स्पष्टपणे आणि जितक्या लवकर होईल, तितके अभिनिवेश गळून पडतील. माझ्याशिवाय घरी किंवा दारी पान हलत नाही, हा आभास आणि मी कशात अडकत नाही, असं भासवणारं व्यक्तिवादाचं मायाजाल, दोन्ही माणुसकीचं प्रकटन अपुरं ठेवणारं!  एखादी गोष्ट साध्य करताना आपण निमित्तमात्र आहोत, हे सदैव स्मरता येईल. तरीही कामाविषयीची आणि आपल्या भूमिकेशी बांधिलकी पूर्णार्थानं जगता येईल.

नव्यानं पालक झाल्यावर काही जण विचारायला येतात, की तान्हेपणी बाळाला पाळणाघरात ठेवलं तर त्याच्या मनावर, वाढीवर परिणाम होतील का? आजूबाजूच्या वातावरणाचा मनुष्यवाढीवर परिणाम तर होणार असतो. ‘आमच्या वाचून बाळाचं अडेल का’ याकडे झुकणारा संभ्रम हा मूळ मुद्दा पालकांना बोलायचा असतो. अशा पालकांना मी विचारते, ‘‘पाळणाघर ही तुमची गरज असेल तर ती टाळता येणार नाही. पण जर ती गरज नसेल, तर बाळ आज पहिल्यांदा रांगलं, ‘चिऊ’ हा शब्द त्यानं अचानक उच्चारला, हा अनुभव स्वत: घेणं शक्य आहे का, विचार करून ठरवा . रोज नव्यानं वाढताना बाळाला बघणं, हा आनंद तुम्हाला मिळाला, तर तुमच्या आयुष्याची गुणवत्ता बदलेल का?

निसर्गनियमानं होणारी वाढ कोणासाठी थांबणारी नसते. पण ती वाढ अधिक सकस, समृद्ध आणि सुकर करण्यात पालकांचा, कुटुंबाचा, शिक्षण संस्थांचा, समाजाचा आपापल्या परीनं वाटा असतो. आफ्रिकेतील एका म्हणीप्रमाणं ‘इट टेक्स अ व्हिलेज टू रेज अ चाइल्ड’- अर्थात मूल वाढायला साऱ्या गावाची साथ लागते. ‘निसर्गनियम’ (७ नोव्हेंबर ) या लेखात आपण पाहिलं, की नैसर्गिक वाढीला पोषक वातावरणाची जोड आवश्यक असते. तसंच आपण अपरिहार्य नाही, याचा अर्थ असा नाही की आपली कोणती भूमिका नाही. वास्तवात बांधिलकी, कर्तव्यतत्परता आणि आपण निमित्तमात्र आहोत ही जाणीव असणं ही आपली योग्य भूमिका म्हणता येईल.

अनेकदा पालकांना वाटतं असतं की आपण अमुक गोष्ट मुलांसाठी करतो. स्वत:त डोकावून पाहिलं तर जाणवेल, की अनेक गोष्टी मुलांसाठी म्हणताना पालकांच्या कधी त्या स्वत:च्या गरजाही असू शकतात. अनिकेत मुलाची गोष्टीची पुस्तकंसुद्धा क्रमवार लावून ठेवायचा. नीटनेटकेपणा ही अनिकेतची एक प्रकारची गरजच होती. वरवर पाहाता अनिकेतला वाटायचं, मुलाला हवं ते पुस्तक मिळावं म्हणून माझा खटाटोप चालतो. अस्ताव्यस्त पडलेली पुस्तकं त्याला स्वत:लाच बघवणार नाहीत, हा दडलेला पदर दडलेलाच राहातो. मुलासाठी मी हे करतो, एवढंच त्याचं रूप अनिकेतला दिसायला लागतं. कधी गरजेपलीकडं जाऊन एखादी गोष्ट करणं हे पालकांनी स्वत:च्या आवडीनं निवडलेलं असतं. विशाखाकडे स्वयंपाकाच्या कामाला मावशी येत असल्या, तरी मुलांच्या डब्यात द्यायचे पदार्थ स्वत: करायचे हे तिचं तिनंच ठरवलं होतं. मुलं बाहेरचं खाऊनही खुशीत असतील, हे ती ओळखून होती. गरज, आवड म्हणून निवड आणि त्यापुढे जाऊन एखादी गोष्ट ही व्यक्तीचं व्यक्त होणंसुद्धा असतं. एखादं काम ही अभिव्यक्ती असू शकते. मुलांना न कंटाळता भरवताना आईला समाधान असतं. मुलाचं पोट आणि आईचं मन भरतं जणू. भरवणं हे काम न उरता तिच्या मायेची, काळजी घेण्याची अभिव्यक्ती असते. जशी एखाद्या व्यक्तीची अभिव्यक्ती तशीच गटाची, संस्थेची सामूहिक अभिव्यक्तीही असू शकते. काही संस्थांमध्ये स्वच्छता हे फक्त सफाई कर्मचाऱ्यांचं काम न राहाता संस्थेच्या दैनंदिन कामकाजात श्रमदान सामावलेलं असतं. श्रमदानात सगळ्यांनी सहभागी होणं ही संस्थेची कार्यसंस्कृती होते. संस्थेच्या विचारधारेचं ते कृतीरूप व्यक्त होणं असतं. समभाव, श्रमाचं मूल्य, या तत्त्वाचं ते मूर्त स्वरूप होतं. गटानं मिळून काही ध्येय गाठताना कोणा एकाचं श्रेय न मानता ते खारीच्या वाटय़ासारखं असतं. एक-एक फूल हातून ओवलं जाताना आपण निमित्तमात्र, माळ गुंफणं हे मोठं ध्येय, हे जेव्हा भिनतं, तेव्हा व्यक्तिनिरपेक्ष कामाची साखळी जोडली जाते!

‘करोना’मुळे झालेल्या टाळेबंदीच्या काळात अनेक जण घरी असल्यानं पाककृतींचे प्रयोग करत होते. नवा पदार्थ केल्याचा आनंद मिळत होता. ‘वेगळा खाद्यपदार्थ मी केला’ असं म्हणताना किती वर्षांची परंपरा, कोणा-कोणाचा त्यात वाटा होता, असा विचार माझ्या मनात साहजिकच आला. करोनापूर्वीही कित्येकदा मला भेळ खाताना असं वाटून गेलं आहे, की अनेकांच्या जिभेचे चोचले पुरवणारी, तर कोणाच्या चरितार्थाचं साधन ठरणारी ही पाककृती आहे. अशा कित्येक गोष्टी असतात. अमुक एकाचं श्रेय न मानता अनेकांनी एक-एक पाऊल पुढे वाटचाल चालू ठेवल्यासारखंच. ‘कलेक्टिव्ह व्हिज्डम’. त्यामुळे नवनिर्मिती करताना एक जाणीव पक्की शाबूत असते. सरमिसळ, नव्यानं जोडणी, तोडणी, मांडणी, नवं रूप, रंग, आकार यासाठी आपण निमित्तमात्र असूही; एवढंच काय ते.

आपल्या वाचून जगाचं अडलेलं नाही, हा ‘निमित्तमात्र’ या मानसिकतेतला एक भाग. त्याचबरोबर आपण जे काही करतो त्यात आपल्या पूर्वी अनेकांनी जे काही करून ठेवलं, त्याच्या आधारावर आपण पुढे काही करत असतो, हा दुसरा महत्त्वाचा भाग आहे. आपल्या पूर्वी आणि सद्य:स्थितीतही अनेकांचे हात आपल्या कृतीला लागतात, याविषयी कृतज्ञतेचा भाव माझ्या मनी अखंड रुंजी घालतो. तोच भाव ‘निरामय घरटं’ हे सदर लिहिताना सोबत आहे. ज्या कुटुंबानं मला घडवलं, ज्या शिक्षण संस्थांनी शास्त्रशुद्ध शिक्षणाचे माझ्यावर संस्कार केले, अनेक गुरुजनांनी अनमोल विचारांचं विद्यादान भरभरून दिलं, हे सारं या लेखनात मूलाधार. मी घेतलेलं परदेशातलं शिक्षण आणि तिथलं वास्तव्य, या अनुभवांची जोड मिळाल्यानं क्षितिज विस्तारलं . कित्येक पालक आणि मुलांनी त्यांच्या आयुष्याचे दरवाजे माझ्यासमोर खुले करून वेगवेगळं जग दाखवलं. ‘चतुरंग’च्या वाचकांच्या अभिप्रायांतून हुरूप वाढला. या शिदोरीचं प्रतिबिंब म्हणजे ‘निरामय घरटं’ ही लेखमाला. माझी लेखणी ‘निमित्तमात्र’!

‘माइंडफुलनेस’ हा इंग्रजी शब्द हल्ली अनेकांच्या कानावर असेल. चालू असलेल्या क्षणात जगता येणं, प्रक्रियेचा आस्वाद घेणं, हा याचा मथितार्थ. सध्याच्या काळात कोणी काय मिळवलं, ही फूटपट्टी घेऊन वावरणं थांबवावं. शिकणं-शिकवणं, घडणं-घडवणं, या प्रक्रियांमध्ये आपण ‘निमित्तमात्र’ आहोत, म्हणत भरभरून जगावं. लहानपणी शिकायला मिळालेल्या स्वीडिश संगीतकारांच्या ‘मूव्ह ऑन’ या गाण्यातल्या ओळी स्मरतात. ‘हाऊ आय ट्रेजर एव्हरी मिनिट बीइंग पार्ट ऑफ इट , बीइंग इन इट विथ द अर्ज टू मूव्ह ऑन’. ‘निमित्तमात्र’ सहजतेनं निरामय घरटय़ाचा गाभा जपू या.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 5, 2020 2:44 am

Web Title: the cause niramay gharta dd70
Next Stories
1 पडसाद : पालकत्वाच्या निर्णयाची चिकित्सा गरजेची
2 ‘मी तुझ्यासाठी तू माझ्यासाठी’
3 जीवनदायी पान्हा!
Just Now!
X