19 February 2020

News Flash

लोकप्रिय नसला तरी, महत्त्वाचा!

हा अन्नघटक किमान तीनशे चयापचय क्रियांमध्ये  महत्त्वाची भूमिका बजावतो.

(संग्रहित छायाचित्र)

|| डॉ. नितीन पाटणकर

हा अन्नघटक किमान तीनशे चयापचय क्रियांमध्ये  महत्त्वाची भूमिका बजावतो. प्रथिने तयार करणे, पेशींमध्ये ऊर्जा निर्माण करणे आणि ती साठवून ठेवणे, गुणसूत्र बनताना याची भूमिका महत्त्वाची असते. एक केळे, मूठभर शेंगदाणे, बदाम मिक्स, पालक आणि सोयाबीन हे पदार्थ आहारात असले तर या अन्नघटकाची कमतरता निर्माण होणार नाही.  कोणता आहे हा अन्नघटक?

आपल्या अन्नातील सूक्ष्म अन्नघटक म्हणजे जीवनसत्त्वे आणि क्षार. क्षार म्हटले की लोह आणि कॅल्शिअम हे दोन दादा लोक. त्यावर खूप लिहिले गेले आहे. लोकांना ते माहिती असतात. लोह आणि कॅल्शिअम दोन्ही आवश्यक आहेत म्हणून बरेचदा लोक स्वत:हून ते खात राहतात. या दोन्हीमुळे बद्धकोष्ठ होतो म्हणून गरज असतानासुद्धा आणि डॉक्टरने सांगूनदेखील त्याचे सेवन टाळणारेही अनेक लोक असतात.

अनेकजण इंटरनेटवरून ‘ज्यातून लोह मिळते’ असे पदार्थ शोधून काढतात आणि ते खायला सुरू करतात. त्यातही मग खजूर, डाळिंब असे आवडणारे पदार्थ असतील तर मग त्यांचे सेवन चालू होते. किती खजूर खाल्ले की किती लोह मिळते असले क्षुल्लक प्रश्न त्यांना पडत नाहीत. तीच कॅल्शिअमची तऱ्हा. जीवनसत्त्वे त्या मानाने जरा जास्त माहिती असतात. ‘अ’ जीवनसत्त्व, ‘ब’ १२, क, फॉलीक अ‍ॅसिड आणि हल्ली ‘ड’ जीवनसत्त्व हे सोडले तर बाकी जीवनसत्त्वे मात्र फारशी माहिती नसलेली.

आज आपण अशा एका सूक्ष्म अन्नघटकाबद्दल बोलणार आहोत, जो लोकप्रिय किंवा माहितीतल्या अन्नघटकांइतकाच महत्त्वाचा आहे पण त्यांच्याइतका लोकप्रिय नाही. त्याबद्दल फारशी जागरूकता नाही. मधुमेह होण्यासाठी याची कमतरता कारणीभूत असते आणि मधुमेह असणाऱ्या माणसात याची कमतरता निर्माण होते. निसर्ग काय खेळ खेळतो बघा, हा कमी असेल तर शरीरातील पेशी (सेल्स) नित्याच्या ‘इन्सुलिन’मध्ये काम चालवून घेत नाहीत. त्यांना ग्लुकोज पेशींच्या आत घेण्यासाठी जास्त इन्सुलिन लागते. ते जर स्वादुग्रंथींतून (पॅनक्रियाज) मधून पाझरले नाही तर रक्तातील साखर वाढते. वाढीव प्रमाणात इन्सुलिन पाझरले तर त्यातून शरीरातील चरबी वाढते. इथेच हे प्रकरण थांबत नाही. कमी इन्सुलिन पाझरले किंवा रक्तातील साखर वाढली तर आतडय़ांतून याचे शोषले जाण्याचे प्रमाण कमी होते. समजा इन्सुलिन वाढीव प्रमाणात पाझरले तर किडनीतून याला जास्त प्रमाणात बाहेर ढकलले जाते. त्यामुळे याचे आहारातील आणि शरीरातील प्रमाण योग्य राखणे गरजेचे असते.

याचे प्रमाण कमी झाले तर पटकन कळतदेखील नाही. भूक कमी होणे, थकवा जाणवणे, स्नायू आकुंचनाचा झटका येणे, हातपाय बधिर होणे किंवा हातापायाला मुंग्या येणे ही लक्षणे इतकी सर्वसामान्य आहेत की असे काही झाले की लोक लिंबूपाणी, नारळपाणी, जीवनसत्त्वाच्या गोळ्या घेतात आणि मग थोडेसे बरे वाटले की विसरून जातात. कधी कधी पोटात ढवळून ओकंबे (नॉशिया) येतात. असे झाले की मग यकृतासाठीची औषधे दिली-घेतली जातात. किडनी किंवा आतडय़ाचे रोग असतील तरच याची तीव्र टंचाई निर्माण होते. तेव्हा आकडी येऊ शकते. दारू पिण्यात सातत्य असेल आणि सोबत योग्य आहार नसेल तरी याची कमतरता निर्माण होते. साधारणपणे याची कमतरताही लक्षात येत नाही. एक मात्र खरे की, याची कमतरता भरून निघाली तर मात्र तब्येतीतला फरक स्वत:लाच जाणवतो.

सुरुवातीपासून या सूक्ष्म अन्नघटकाचे नाव का घेतलेले नाही, सतत ‘या’, ‘हा’ अशी सर्वनामे का वापरली आहेत, असा प्रश्न वाचकांना नक्की पडला असेल. पूर्वीच्या काळी स्त्रिया पतीचे नाव घेत नसत. इकडून बोलणे झाले, हे आले की विचारून सांगीन, असे बोलले जात असे. कधी कधी बायका, ‘अजून पगडी घरी आली नाही’, ‘अजून ऑफिस यायचेय’ असेही बोलायच्या. माझ्या लहानपणी आमच्या गावाला, शेतावर नांगरणीसाठी गेलेल्या नवऱ्याचा उल्लेख, ‘अजून बल यायचेत शेतावरून’ असा केलेला ऐकला आहे. यात कुठेही अनादराची भावना नव्हती. त्यावेळेस नवऱ्याचे नाव घेत नसत. ती पद्धत आता फक्त हॅरी पॉटरच्या पुस्तकात ‘व्हॉल्डेमार्ट’बद्दल पाळली जाते. त्याची आठवण कुणाला होईल म्हणून सांगतो की पुढे याचे नाव सांगीनच. तोपर्यंत चोखंदळ वाचकांना हे नाव कळलेले असेलच याची मला खात्री आहे. हे नाव कळले की लक्षात येईल की ‘माहीत असूनही लक्षात न येणारे’ असे किती तरी आहार घटक असतात.

हा अन्नघटक किमान तीनशे चयापचय क्रियांमध्ये (मेटाबॉलिक रिअ‍ॅक्शन्स) महत्त्वाची भूमिका बजावतो. प्रथिने तयार करणे, पेशींमध्ये ऊर्जा निर्माण करणे आणि ती साठवून ठेवणे, गुणसूत्र बनताना (डीएनए सिंथेसिस) याची भूमिका महत्त्वाची असते. नसांमधून संदेशवहन व्यवस्थित होण्यासाठी, हाडांच्या वाढीसाठी आणि त्याच्या ताकदीसाठी, हृदयाचे काम व्यवस्थित होण्यासाठी, नसांकडून मिळालेले संदेश स्नायूंना कळण्यासाठी, साखरेच्या नियंत्रणासाठी आणि रक्तदाब नियंत्रणासाठी हा अन्नघटक महत्त्वाची भूमिका बजावतो.

हा अन्नघटक कुठे कुठे वापरला जातो किंवा गेला तर जास्त फायदा होतो ते पाहू या. साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी याचा उपयोग होतो. रक्तदाब नियंत्रणात राखण्यासाठी, हाडांच्या मजबुतीसाठी, मायग्रेनचा अ‍ॅटॅक टाळण्यासाठी, ताणतणाव कमी करण्यासाठी, मूड सुधारण्यासाठी, स्मरणशक्ती वाढविण्यासाठी, प्रतिदाह (इनफ्लेमेशन) कमी करण्यासाठी आणि एडीएचडी (अटेंशन डेफिसिट हायपरअ‍ॅक्टिव्हिटी डिसऑर्डर) मध्ये या अन्नघटकाचा उपयोग केला जातो.

यातील ‘ताणतणाव कमी करणे’ हा शब्दप्रयोग थोडा फसवा आहे. ताणतणावाची कारणे कमी होत नाहीत किंवा बदलत नाहीत पण त्या कारणांचे मनावर आणि शरीरावर होणारे परिणाम बदलतात. तणाव नियंत्रणासाठी जे अन्नघटक मदत करतात किंवा जे उपाय केले जातात त्यावर एक शंका कायम उपस्थित केली जाते ती म्हणजे, ‘हे सर्व केल्याने तणाव निर्माण करणाऱ्या बा गोष्टी बदलणार आहेत का?’ हे म्हणजे, ‘डोळ्याच्या डॉक्टरने उत्तम चष्मा बनवून दिला तरी निरक्षर माणसाला वाचता येणार आहे का?’ असे विचारण्यासारखे आहे. हे सर्व उपाय केल्याने आपला त्या तणाव निर्माण करणाऱ्या गोष्टींकडे बघण्याचा दृष्टिकोण बदलतो. त्यांचा सामना करण्याची पद्धत बदलते. त्यातून तणावाचे रूपही बदलत जाते, हा फायदा असतो.

हा अन्नघटक नेहमीच्या आहारातील अनेक पदार्थामधून मिळतो. उदा, पालक. पालकाला हल्ली फार चांगले दिवस आलेत. अमेरिकेत एक काळ असा होता की मुलांच्या आहारात भाज्या जवळजवळ नसायच्याच. त्या द्यायचा प्रयत्न केला तर मुले विरोध करत. माझ्या लहानपणी, ‘पानात पाहिले वाढलेले सगळे खाल्लंच पाहिजे, नंतर घेऊ नका एकवेळ’ हा अलिखित नियम होता आणि तो न पाळण्याची हिम्मत नव्हती. अमेरिकेत मुलांनी पालक खावा म्हणून ‘पोपाय शो’नावाची कार्टून मालिका निर्माण केली गेली.

दुसरा पदार्थ ज्यात हा अन्नघटक मुबलक प्रमाणात मिळतो तो म्हणजे बदाम. यातही ‘लहान, एका बाजूने अंतर्वक्र असलेले बदाम जास्त गुणकारी’ असा एक समज असतो, त्यात फार काही तथ्य नाही. या बदामांना ‘ममरा बदाम’ असेही म्हणतात. यात या ‘ममरा’ या शब्दाचा संबंध लावून कोणीतरी ‘मेमरी वाढवणारा म्हणून ममरा’ म्हणतात अशीही कथा आहे. तसेच ‘गरिबांचे बदाम’ म्हणून ओळखले जाणारे आपले साधे शेंगदाणे हासुद्धा या सूक्ष्म अन्नघटकाचा स्रोत आहे. आता रक्तदाब कमी करताना शेंगदाणे खायचे असतील तर ते प्रमाणात खाणे चांगले. आणि हो, खारे शेंगदाणे नकोत हे ओघाने आले. सोया मिल्क, राजमा, केळे, अ‍ॅवोकॅडो, सामन मासे आणि सालीसकट बटाटा यात हा अन्नघटक पुरेशा प्रमाणात असतो.

झिक हा क्षार रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी आवश्यक असतो. हे जरी खरे असले तरी ‘जास्त झिक म्हणजे जास्त रोगप्रतिकार’ असे वाटून जास्त झिक पोटात गेले तर  हा अन्नघटक कमी शोषला जातो. तीच गोष्ट तंतुयुक्त अन्नाची (फायबर.) या उलट प्रथिनांसोबत हा पोटात गेल्यास याचे शोषण (अ‍ॅबसॉर्बशन) वाढते. हा अन्नघटक कमी शोषला गेला तर त्यामुळे ‘ड’ जीवनसत्त्वाची परिणामकारकता कमी होते आणि मग कॅल्शिअम कमी शोषले जाते. आहे तेसुद्धा हाडात जाऊन बसत नाही.

एक केळे, मूठभर शेंगदाणे, बदाम मिक्स, पालक आणि सोयाबीन हे पदार्थ आहारात असले तर या अन्नघटकाची कमतरता निर्माण होणार नाही. वर सांगितलेले कुठलेही दीर्घकालीन राहणारे आजार असतील तर डॉक्टरांना विचारून या अन्नघटकांची तूट भरून काढायला हवी..

इतक्या सगळ्या वर्णनानंतर आता सांगतोच.. हा महत्वाचा अन्नघटक आहे, मॅग्नेशियम!

feedback@wisdomclinic.in

chaturang@expressindia.com

 

First Published on August 24, 2019 12:09 am

Web Title: the composition of foods mpg 94
Next Stories
1 लळा
2 उंबरठा ओलांडण्याची गोष्ट..
3 नवी पायवाट
Just Now!
X