ज्या व्यक्तीत सहनशीलता नाही ती त्वरित कोसळते आणि ज्या व्यक्तीने सहनशीलतेचे कवच धारण केले आहे, तिला जीवनात प्रत्येक क्षणी होणारे आघात अधिकच बलवान करीत जातात.
जी वनामधून अंधाराला घालवण्याचा खटाटोप व्यर्थ होय. कारण अंधाराला घालवता येत नाही. म्हणूनच ज्ञानी लोक अंधार घालवीत बसत नाहीत, तर प्रकाश उजळतात.
एक प्राचीन लोककथा आहे. ज्या वेळी मनुष्याजवळ प्रकाश नव्हता, अग्नी नव्हता त्या वेळची ही गोष्ट आहे. तेव्हा रात्र मोठी त्रासदायक वाटे. अंधार घालवण्याचे पुष्कळ उपाय लोकांनी शोधले; पण काही उपयोग झाला नाही. कुणी म्हणाले की, मंत्र म्हणा. तेव्हा मंत्रही म्हटले गेले. कुणी सुचवले की प्रार्थना करा तेव्हा आकाशाच्या दिशेने हात उंचावून प्रार्थनाही केल्या गेल्या; परंतु अंधार हटला नाही तो नाहीच. शेवटी कुणा तरुण तत्त्वज्ञान्याने म्हटले, ‘‘आपण टोपल्यांमधून अंधार भरभरून खड्डय़ांमध्ये फेकून देऊ. असे केल्याने हळूहळू अंधार क्षीण होत जाईल आणि मगच त्याचा अंत होईल.’’ ही युक्ती छान होती! सारी रात्र लोक टोपल्यांत अंधार भरायचे आणि खड्डय़ांमध्ये फेकून द्यायचे; पण बघतात तर काय तिथे काहीच नसायचे. शेवटी लोक फार कंटाळून गेले. कारण अंधार फेकून द्यायची एक प्रथाच पडून गेली आणि प्रत्येक माणूस रात्री कमीत कमी एक टोपलीभर अंधार तरी फेकून द्यायला लागला.
  पुढे त्यांच्यामधला एक तरुण एका अप्सरेच्या प्रेमात सापडला आणि त्याचा विवाह त्या अप्सरेबरोबर झाला. पहिल्या रात्रीच वधूच्या सासरची जी शहाणी म्हातारी माणसे होती त्यांनी तिला टोपलीभर अंधार दरीमध्ये फेकून यायला सांगितले. ते ऐकून अप्सरा खूप हसायला लागली. तिने एक शुभ्र वात तयार केली, एका मातीच्या बुडकुल्यात तूप घातले आणि मग दोन गारगोटय़ा एकमेकींवर घासल्या. लोक विस्मयाने पाहतच राहिले. तेवढय़ात आग निर्माण झाली, दिवा जळू लागला आणि अंधार मावळला. त्या दिवसापासून लोकांनी अंधार फेकून द्यायचे सोडले. कारण ते दिवा पेटवायला शिकले.
आपल्यामधल्या कित्येक जणांना अजूनही जीवनातला दिवा कसा पेटवावा हे समजत नाही. ज्या संधीचे परिवर्तन अलौकिक प्रकाशात होऊ शकते ती संधी आपण अनेकदा अंधाराशी लढण्याच्या कामी गमावतो. ईश्वराला प्राप्त करून घेण्याच्या आकांक्षेने भरून जा म्हणजे पाप आपणहूनच नष्ट होईल. जे पापाशी लढत बसतात ते त्यातच अधिकाधिक खोल फसत जातात. जीवनात विधायक आरोहण हवं. सकारात्मक उद्दिष्टांचं ध्येय हवं. निषेधात्मक पलायन करू नका. हेच यशाचे सुवर्णसूत्र आहे. समृद्ध विचारकण हेच आयुष्याची खरी ठेव आहेत.
ज्या व्यक्तीत सहनशीलता नाही ती त्वरित कोसळते आणि ज्या व्यक्तीने सहनशीलतेचे कवच धारण केले आहे, तिला जीवनात प्रत्येक क्षणी होणारे आघात अधिकच बलवान करीत राहतात. मला एक गोष्ट माहीत आहे. कुणा लोहाराच्या दारावरून एकदा एक माणूस जात होता. ऐरणीवर पडणाऱ्या हातोडय़ाच्या घावांचा आवाज त्याच्या कानांवर पडला आणि त्याने आत वाकून पाहिले. तुटलेले आणि वाकलेले पुष्कळ हातोडे एका कोपऱ्यात पडलेले त्याला दिसले. जुने झाल्याने किंवा सतत वापरल्याने ते अशा अवस्थेत पडलेले होते. त्या माणसाने लोहाराला विचारले, ‘‘इतक्या हातोडय़ांना या अवस्थेपर्यंत पोहोचवावयास आपल्याला किती ऐरणी लागल्या?’’ तो लोहार हसायला लागला आणि म्हणाला, ‘‘अवघी एकच मित्रा. एक ऐरण शेकडो हातोडे तोडू शकते. कारण घाव हातोडे घालतात; परंतु सहन ऐरण करते.’’ जो धैर्याने धाव सहन करू शकतो, तोच शेवटी जिंकतो, हे सत्य आहे. ऐरणीवर पडणाऱ्या हातोडय़ांच्या घावाप्रमाणेच त्याच्या जीवनात अनेक आघात निनादत असतात. शेवटी हातोडे तुटून जातात; परंतु ऐरण मात्र सुरक्षित राहते.
चित्ताची नित्य सफाई
प्रत्येक व्यक्ती म्हणजे एक आरसाच. सकाळपासून संध्याकाळपर्यंत या आरशावर धूळ साठत असते. आपला आरसा जसा असेल तसेच आपले ज्ञान असते. ज्या प्रमाणात आपण आरशासारखे असतो त्या प्रमाणात आपल्यातून सत्य प्रतिबिंबित होत असते.
एकदा कोणा एका माणसाने एका साधूला सांगितले, की विचारांच्या अति ताणामुळे त्याला अतिशय त्रास होतो. त्या साधूने त्याला आपल्या एका साधू मित्राकडे निदान आणि चिकित्सा करवून घेण्याकरिता पाठवले. पाठवताना त्याला म्हटले, ‘‘जा आणि त्याची समग्र जीवनचर्या लक्षपूर्वक पाहा. त्यातूनच तुला मार्ग सापडेल.’’
तो माणूस  गेला. ज्या साधूकडे त्याला पाठवण्यात आले होते त्या साधूवर धर्मशाळेची जबाबदारी होती. तिथे गेल्यावर काही दिवसांपर्यंत त्या माणसाने त्याची दिनचर्या पाहिली; परंतु त्यातून खास शिकण्याजोगे असे काहीच आढळले नाही. तो साधू अत्यंत सामान्य, चारचौघांसारखाच होता. त्याच्यात तर ज्ञानाचे कुठलेच लक्षण दिसून येत नव्हते. तो अत्यंत सरळ होता आणि लहान मुलासारखा निष्पाप वाटायचा. त्याच्या वागण्यात असामान्यपणा असा काहीच नव्हता. त्या माणसाने साधूची सारी दिनचर्या पाहिली. फक्त रात्री झोपण्यापूर्वी आणि सकाळी जागा झाल्यानंतर तो काय करीत असे हे मात्र त्याला समजले नव्हते. त्याने त्याला ते विचारले. साधूने सांगितले, ‘‘मी तर काहीच करीत नाही. रात्री मी सारी भांडी घासतो आणि त्यांच्यावर रात्री थोडीशी धूळ पुन्हा साठते म्हणून सकाळी ती परत विसळतो. भांडी धुळीने भरलेली आणि घाणेरही नसावीत याकडे लक्ष देणे फार आवश्यक असते. कारण मी या धर्मशाळेचा राखणदार आहे ना.’’
अत्यंत निराश होऊन त्या साधूकडून तो माणूस आपल्या गुरूकडे परत आला. त्याने त्या साधूची दिनचर्या आणि त्याच्याशी झालेले संभाषण आपल्या गुरूला सांगितले. त्याच्या गुरूने म्हटले, ‘‘तू योग्य माणसाला भेटून आला आहेस, पण त्याला समजू शकला नाहीस. रात्री तू आपल्या मनाला घासत जा आणि सकाळी ते पुन्हा त्याला स्वच्छ कर. हळूहळू चित्त निर्मळ होत जाईल.’’
चित्ताची नित्य सफाई ही फार आवश्यक असते. ते स्वच्छ होण्यावरच साऱ्या जीवनाची स्वच्छता या अस्वच्छता अवलंबून असते. ज्यांना याचा विसर पडतो ते आपल्या पायांवर आपल्याच हातांनी कुऱ्हाड मारीत असतात.
वासना : आत्मनाशाचा मार्ग
या जगात स्वत:पलीकडे कशाचीच प्राप्ती खरी नव्हे हे लक्षात ठेवा. जे स्वत:ला शोधतात, त्यांनाच खरी प्राप्ती होते आणि जे इतरही काही शोधीत राहतात, त्यांच्या हाती शेवटी अपयश आणि दु:खच येते. वासनेच्या मागे धावणारे लोक नष्ट झाले आहेत, नष्ट होत आहेत आणि नष्ट होतील. तो मार्ग आत्मनाशाचा होय.
नुकत्याच रांगायला लागलेल्या एका चिमुकल्या मुलाने एके दिवशी सूर्यप्रकाशात खेळत असताना आपली सावली पाहिली. त्याला ती काही अद्भुत वस्तूच वाटली. कारण ते मूल जसे-जसे सरकायचे तसतशी त्याची सावली हलायची. ते बाळ आपल्या सावलीचे डोके पकडण्याच्या उद्योगाला लागले, परंतु सावलीचे डोके पकडायला ते जसे पुढे सरकायचे तसे सावलीचे डोकेही दूर सरकायचे. ते मूल किती तरी पुढे सरकत गेले पण सावलीचे डोकेही तितकेच पुढे सरकत गेले. ते मूल आणि त्याची सावली यांच्यामधले अंतर काही कमी होऊ शकले नाही. निराशेने थकून ते मूल रडायला लागले. दारावर भिक्षा मागायला आलेल्या एका भिक्षूने हे पाहिले. त्याने जवळ येऊन त्या मुलाचा हात त्याच्याच डोक्यावर ठेवून दिला. रडता-रडता मूल हसायला लागले. कारण वरील प्रकारामुळे सावलीचेही डोके आता त्याच्या हाती लागले होते.
त्याच प्रमाणे आत्म्यावर हात ठेवण्याची आवश्यकता आहे. जे छाया पकडण्याच्या उद्योगात गर्क होतात, त्यांना ती कधीच प्राप्त होत नाही. शरीर म्हणजे छायाच. तिच्यामागे जो जातो, त्याला एके दिवशी वैफल्याने रडावेच लागते.
वासनेची तृप्ती कधीच होत नाही. तिच्या मागे जितके धावावे, तितकी अतृप्ती वाढतच जाते. जेव्हा व्यक्ती मागे वळून पाहते आणि स्वत:त प्रवेश करते, तेव्हाच ती वासनेतून मुक्त होऊ शकते.    
( साकेत प्रकाशनाच्या ‘पथ-प्रदीप’ या पुस्तकातील हा संपादित भाग, साभार)